करोना : थप्पड आणि ऑडिट...
आत्मिय माता, पिता, बंधु-भगिनीं आणि मित्रांनो...
नमस्कार वि. वि.
खरतर विनंती विशेष असे लिहायची आपली पूर्वापार पद्धत आहे...
आजचा संवाद करोना विनंती विशेष संवाद आहे...
ज्या शब्दाची आपली दिड दोन महिन्यापूर्वीपर्यंत ओळखही नव्हती त्या करोना या शब्दाने आपल्यावर एक अभूतपूर्व दहशत निर्माण केली आहे... आज पर्यंत कधीही अनुभवा लागला नाही असा लॉक डाऊन आणि नानाविध बंधने यांचा आपण सामना करीत आहोत... आपण सध्या ज्या अनुभवातून जात आहोत त्याचे वर्णन करायला खरतर कोणताही अचूक शब्द सापडत नाही आहे... पण हा एक आगळावेगळा धक्कादायक अनुभव आहे एवढे नक्की...
आज घरामध्ये देवपूजा करीत असताना.. महाराजांबरोबर संवाद करीत असताना एक विचार मनात आला. तो आहे करोना : थप्पड आणि ऑडिटचा विचार…
करोनाने आपल्याला आपलीच एक नविन ओळख करून दिली आहे. सतत एकरेषीय प्रगतीच्या मागे लागलेले आपण... सतत हिशोब... सतत स्पर्धा... सतत धावाधाव आणि पळापळ... आणि त्यासाठी सातत्याने आबाळ... आबाळ आपली स्वत:ची आणि कुटुंबाची... आबाळ आरोग्याची... आबाळ भावनांची... आबाळ प्रेमाची, प्रेमपूर्वक संवादाची... प्रत्येक गोष्टीला आपल एकच उत्तर ते म्हणजे नंतर बघू... आणि नंतर म्हणजे कधीच नाही... कारण सतत नफा नुकसानीचे हिशोब आणि फायदा तोट्याचेच विचार... किती आयुष्य आहे आणि किती गरज आहे याचा सारासार विचार न करता नुसती गोळा करायची अमानुष धडपड आणि अव्याहत यातायात... कधी स्वत:शी प्रामाणिक संवाद नाही, कुटूंबाबरोबर संवाद नाही... नुसती कोरडी ठणठणीत धावपळ आणि धडपड...
करोनाने एक जोरदार धक्का दिला, ब्रेक दिला... खरतर एक थप्पड दिली आहे आणि पृष्ठभागावर सणसणीत लाथ घातली आहे... करोना आपल्याला विचारत आहे, अरे मुर्खांनो, डोके ठिकाणावर आहे का... जरा विचार करा... जरा वेळ द्या स्वत:ला... गती कमी करा आयुष्याची... जरा हळू हळू जगा... थोडा भरभरून श्वास घ्या... आपल्या हृदयात जरा हवा भरू द्या... मनाला जरा मोकळ होऊ द्या... आपल्या स्वत:च्या शरीराकडे जरा लक्ष द्या... प्रत्येक अवयवावरून जरा प्रेमाने हात फिरवा... त्यांचे जरा आभार माना...
करोना सांगत आहे... प्रेमाने सांगत आहे... कळवळून सांगत आहे... जरा ऎका... अंतर्मुख व्हा... आतमध्ये वळा... आतल अद्भुत जग पहा... बास झाल आता बाहेर फिरण... नंतर वेळ उरणार नाही...
आत वळण म्हणजे काय ? डोळे मिटून स्वत:च्या आतमध्ये पाहणे...
ज्ञान म्हणजे आत्मज्ञान । पहावे आपणासी आपण । याची नाव ज्ञान ।
मी जन्माला का आलो आहे ? माझे सुख कशात आहे ? मला कशाने दु:ख होते ? मला काय आवडते ? मला कशाने आनंद होतो ? माझा विकास नक्की कशात आहे ? आता पर्यंतच आयुष्य मी कस जगलो ? माझी कर्तव्ये मी पार पाडली आहेत का ? मी माझ्या आई वडीलांच्या बाबतीतले कर्तव्य पार पाडले आहे का ? माझे कुटूंब, माझे गुरूजन, नातेवाईक, शेजारी आणि लहानपणांपासून माझ्यासाठी ज्यांनी काही तरी केले त्यांची कुणाची तरी मला आठवण आहे का ? समाज आणि देशापोटी माझे काही कर्तव्य आहे का ? समाजासाठी, देशासाठी मी काही नि:स्वार्थ कॄती केली आहे का ? खरतर असे काही प्रश्न मला पडतात का ? त्यांची प्रामाणिक उत्तरे काय आहेत ? करोना आपणा प्रत्येकाला हे प्रश्न विचारत आहे. आपण प्रामाणिकपणे या प्रश्नांची आपल्यालाच उत्तरे देणे करोनाला अपेक्षित आहे.
करोना अजून विचारत आहे कि बाबांनो... तुमच प्रत्येकाच अजून किती आयुष्य शिल्लक आहे ? आतापर्यंत जगलेल्या आयुष्याच कधी नि:ष्पक्ष विश्लेषण केले आहे का ? यापुढे उरलेल्या आयुष्याचा कधी विचार केला आहे का ? आपला देश, धर्म, संस्कृती, परंपरा यांचा कधी अभ्यास केला आहे का ? आपले देव, मंदिरे, नद्या, तीर्थक्षेत्रे, सण, उत्सव, कला, साहित्य, भाषा, शास्त्र परंपरा यांची कधी ओळख करून घेतली आहे का ? आपल्या देशातील ऋषि, मुनी, साधू, संत आणि अवतार, त्यांची जीवन कथा, त्यांचे साहित्य आणि त्यांचा संदेश आपल्याला माहित आहे का ? वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, विद्या आणि चौसष्ठ कला आपल्याला माहित आहेत का ? श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या जीवनाविषयी आपल्याला माहित आहे का ? वसिष्ठ, विश्वामित्र, अत्रि, अगस्ती, चाणक्य असे शिक्षक – गुरू, चंद्रगुप्त, अशोक, वाकाटक, विक्रमादित्य, समुद्रगुप्त, चालुक्य, चोल, पल्लव, असे संपूर्ण विश्वभर साम्राज्याचा विस्तार करणारे भारतीय राजे, पाणिनी, पतंजली, आर्यभट्ट, भास्कराचार्य यांसारखे भारतीय वैज्ञानिक, कालिदास, भास, बाणभट्ट हे महाकवी आपल्याला माहित आहेत का ? ज्या देशातुन घरोघरी सोन्याचा धूर निघत असे त्या विश्वगुरू भारताचे आपण पुत्र आहोत. आपण भारतीय आहोत म्हणजे नक्की कोण आहोत ? जन्मोजन्मीचे पुण्य कार्य केलेले असेल तरच भारतात जन्माला येण्याचे भाग्य लाभते हे आपल्याला माहित आहे का ? या जन्माचा आपण कसा उपयोग करून घेणार याविषयी काही विचार आपण आतापर्यंत केला आहे का ? भविष्यात कधी करणार आहात का ?
आणि ऑडिटचे काही शेवटचे प्रश्न... वैयक्तिक साधना कधी करणार आहात का ? ज्ञानेश्वरी, नामदेवगाथा, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, दासबोध, श्रीरामकृष्ण वचनामृत, योगी कथांमृत हे ग्रंथ कधी वाचणार ? त्यांचा कधी अभ्यास करणार ? किमान गोंदवलेकर महाराजांची दैनंदिन प्रवचने वाचयला कधी सुरवात करणार ? आपण मुमुक्षु कधी होणार ? या जन्मात आपली आपल्या सद्गुरूंची भेट होणार का ? आपल्याला अनुग्रह मिळणार का ? दिक्षा मिळणार का ? आपल्याला साधनामार्ग मिळणार का ? नाहितर हाही जन्म असाच पशू सारखा नुसता भोग भोगण्यातच संपून जाणार का ? उकिरड्यावर लोळण्यालाच आम्ही स्वर्ग सुख समजून हाही जन्म वाया घालवणार का ?
गंमत अशी आहे की आपल्या ऑडिटचे अंपायर आपण स्वत:च आहोत. आपण नक्की कुठे आहोत ते आपल्याला आणि फक्त आपल्यालाच ठाऊक आहे. प्रत्येकाची कर्म त्याची त्यालाच माहित असतात आणि कर्माचे भोग ज्याचे त्यालाच भोगायचे असतात. प्रत्येकाच्या अंत:र्मनात एक शुभ वासनांचा आणि एक अशुभ वासनांचा प्रवाह खळखळून वहात असतो. साधना, स्वत:चे ऑडिट आणि स्वत:चे स्वत: केलेले परिक्षण म्हणजे अशुभ वासनांच्या प्रवाहाला लगाम घालणे आणि शुभ वासनांच्या प्रवाहाला मोकळी वाट करून देणे हे आहे.
एक गोष्ट नक्की सांगतो...आपण अमृताचे पुत्र आहोत...आपल रक्त विजिगिषु भारतीय हिंदू संस्कृतीचे रक्त आहे.. आपल्या नसानसातून महान वीर पुरूषांचे रक्त वहात आहे... संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे... हजारो वर्षांची गुलामी आणि अत्याचार सोसूनही आमचा हिंदू धर्म अजून जिवंत आहे...कोरोना सारख्या विषाणुने मरण्यासाठी आपण जन्माला आलेलो नाही.... आणि असेतसे आपण मरणारही नाही... श्रीदत्त गुरूंची आणि श्रीस्वामी महाराजांची आणि आई तुळजाभवानीची आपणा सर्वावर कृपा आहे तेव्हा धीर धरा आणि साहसी बना... अर्थात मा. पंतप्रधान आणि सरकारी यंत्रणेने सांगितलेल्या सर्व निर्बंधांचे मनापासून पालन करून आपण करोनावर विजय मिळवू याची खात्री बाळगा....
आणि शेवटी करोना बरोबर बोला... करोनाने विचारलेल्या प्रश्नांना प्रामाणिकपणे उत्तरे द्या.. स्वत:चे करोना ऑडिट करा आणि याच जन्मात एक नविन जन्म घ्या...
सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा...
कळावे
आपलाच
प्रा. क्षितिज पाटुकले
कर्दळीवन सेवा संघ, पुणे
ईमेल – patukalesir@gmail.com