कोरोनाष्टक : सौ तनुजा सुरेश मुळे ( मानकर )
( अर्थात कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुचलेल्या आठ अति लघु कथा )
1 . आठ दिवस झाले , संचारबंदी लागू आहे . कुठे बाहेर पडता येत नाहीये , भाजी पण संपलीय आता काय करायचं जेवायला ?
ती कपाळाला हात लावून बसली होती . तेवढ्यात सासूबाईनी चुटकीसरशी प्रश्न सोडवला ,अग वरच्या डब्यातून कुरडया काढ 5 - 6 मस्त कुरड्याची भाजी करूया , तुझ्या नवऱ्याला पण खूप आवडते .
तिला एकदम आठवले , मागच्या वर्षी सासूबाईनी कुरड् यांचा घाट घातला तेव्हा तिने किती त्रागा केला होता ते ...
2 . अरे बापरे हातात कॅश तर काहीच नाही , ATM मधले पैसे देखील संपलेत आणि आता ड्रायव्हर पगार मागतोय
मुलगा आजारी आहे म्हणे , काय करावं ?
तो विचारच करत होता , तेवढ्यात
बाबांनी 10,000 हातात ठेवले , घे मागच्या आठवड्यात पेन्शन काढली होती
त्याला एकदम आठवले , सर्व काही ऑनलाइन असताना विनाकारण बँकेत कशाला जायचं ? यावरून त्याने बाबांशी किती तरी वेळा वाद घातला होता ते ......
3 . अगगबाई , माझ्या सगळ्या गोळ्या संपत आल्यात
आणि बाहेर तर ही पारस्थिती , सगळं बंद . आता कसं करणार ? आजीला खूप काळजी वाटत होती .
दुसऱ्या दिवशी दुपारीच एक माणूस दारात हजर , सगळी औषध घेऊन .
अग याला कुणी सांगितलं माझी औषध संपली म्हणून ?
अग ऑनलाइन ऑर्डर केली मी , नात मोबाईल नाचवत म्हणाली
आणि आज्जीला एकदम आठवलं , ' सारख मेल काय त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसतेस , म्हणून आपण कितीतरी वेळा हिला रागावलो होतो ते ....
4 . सगळं बंद म्हणजे काय , आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी काय करायचं घरात बसून ? संध्याकाळी जरा मंदिराच्या आवारात बसून मित्र मित्र गप्पा मारत होतो , तर मंदिरही बंद करून टाकली , सकाळपासून आजोबांची चीड चीड चालू होती ,
संध्याकाळी नातवाने बोलावलं त्याच्या खोलीत , आणि बसवलं लॅपटॉप पुढे , आजोबांचं सगळं मित्र मंडळ जमलं होत skype वर , मग काय दोन तास गप्पांचा फड रंगला.
आणि रात्री झोपताना आजोबांना आठवलं " तासनतास त्या कॉम्पुटर वर कोणाशी गप्पा मारत बसतो " म्हणून याचीच आपण सारखी तक्रार करायचो ते ....
5 . आता सगळं बंद
ऑफिस आता घरीच थाटल त्यानं , सुट्टी असल्यामुळे पोरही घरी , नुसता दिवसभर दंगा . त्याला काय हवं नको ते सगळं देऊन ती पोरांच्या दिमतीला दिवसभर उभीच , एक मिनिट ही बसली नाही ,
रात्री थकून भागून अंथरुणावर शांत पडलेल्या तिला पाहून त्याला आठवलं , आजवर कितीक वेळा " घरातच तर असतेस , काय काम असतात तुला " अस तिला म्हनालो होतो ते ......
6 . बापरे उद्यापासून सगळी घरी
तेही 21 दिवस
काटाच आला तिच्या अंगावर
नवरा करतोय वर्क फ्रॉम होम , मला मेलीला कसली सुट्टी ? ती चरफडली
दिवसभर त्याच्या कामाच्या व्यापात तो , कॉल्स घेतोय , मिटिंग , कॉन्फरन्स कॉल काय नी काय , धड जेवायला सुद्धा मिळालं नाही , चहा चारवेळा गरम केला तरी प्यायला मिळाला नाही .
हे पाहून अचानक तिला आठवलं " तुमचा काय ऑफिसात राजेशाही थाट , मी मरतेय इथे " अस किती तरी वेळा त्याला सूनवल होत ते .....
7 . ती मनात विचारच करत होती , उद्यापासून सगळं बंद आता कामाला तरी कसं येणार ?
पण काम नाही तर पैसे नाही , मग लेकरांच्या पोटात काय घालू , या घालमेलीतच तिने कसंबसं काम उरकलं
आणि जाताना म्हणाली , ताई मला उद्यापासून ....
तेवढ्यात मालकीण म्हणाली अग तेच म्हणणार होते मी, उदयापासून येऊ नको आता , आणि हे घे म्हणून पुढच्या महिन्याचा पगार हातात ठेवला .
भरल्या डोळ्यांनी तिला आठवलं
" यांना काय कळणार आमच्या हातावरच पोट असणाऱ्यांच दुःख , यांचं बरंय सगळं " असं काहीवेळापूर्वीच मनात म्हंटलं होत ते .......
8. आता काय महिनाभर सुट्ट्याच .
शाळेत मुलं नाहीत , पेपर पण कॅन्सल , चला भरपूर मोकळा वेळ मिळणार आता , थोडं फार ऑनलाइन काम करून तिने मैत्रिणीला फोन लावला , बऱ्याच वेळा try केल्यानंतर तिचाच आला
अग emergency ward मध्ये ड्युटी आहे चोवीस तास .
घरी मुलगी आजारी आहे, आईला बोलावून घेतलंय ,
काय करणार अशा परिस्थितीत ड्युटी फर्स्ट
तिला एकदम आठवलं
" पैसे होते तुझ्या वडिलांकडे , म्हणून झाली डॉक्टर , आमच्या नशिबी काय , तर मास्तरकी "
असं कितीतरी वेळा तिच्या मागे टोमणे मारले होते ते ........
सौ तनुजा सुरेश मुळे ( मानकर )