स्वैर : मेघना जोग.
1. आमची आई रिकामे डबेसुद्धा इतके तालासुरात वाजवायची...की आम्ही थोडा वेळ भूक विसरायचो....आणि मग तिला शेवटच्या डब्यात काही तरी सापडायचे...तेव्हा ती चेहऱ्यावर असे भाव दाखवायची की जणू काही कुठला अलिबाबाचा खजिनाच सापडला आहे...
(अर्थात ती गृहिणी असल्याने तिला नक्कीच माहीत असेल की कुठल्या डब्यात काय आहे ते...तरी पण असे करण्यात ती आम्हाला सामिल करून घेई..)
आम्ही पण 'बघू..बघू..' करत त्यात डोकावत असू...
असून असून काय असणार??...तांदूळ, पोहे...किंवा तत्सम काही...पण त्या गोष्टी एकदा आईच्या हातात आल्या..की त्याचे पंचपक्वान्न व्हायचे...
2.आज दादा तालुक्याला गेले होते....सगळ्यांचे पगार आणायला...आल्यावर ते सगळ्यांना पोस्त करून देणी चुकवूनच घरी येतील हे आईला माहीत होते....तरीही तिचे डोळे त्यांच्या वाटेकडे लागले होते..सकाळपासून घरात काही अन्नच शिजले नव्हते.
...आणि दादा दिसले...खूप खूश होते.....त्यांच्याकडे बरेचसे सामान पण होते....आई हरकली.....फराफरा स्टोव्ह पेटवून त्यावर चहा ठेवला....एरवी आई स्वयंपाक चुलीवरच करायची...पण दादांना कडक आणि पटकन चहा लागायचा..त्यासाठी आणि काही बाही गरम करण्यासाठी स्टोव्ह राखीव होता..
गरम गरम पितळीतून दादा बिनदूधाचा, बिनसाखरेचा चहा पिता पिता आजचा आढावा सांगत होते,.. आणि त्यांनी पिशवी उघडली तर काय???... केवढातरी खजिना बाहेर पडला होता...
मला बऱ्याच दिवसांपासून शाळेचा शर्ट हवा होता तो,... बहिणीला ठकी, आईला खणाचा तुकडा....आणि त्यांना स्वतःला चपला...
आई सगळ्याकडे खणावरून हात फिरवत डोळे भरून पहात होती..आणि तिने दादांना विचारलं...
"इतकं सगळं आणलंत....पण वाणसामान??"
"आहे ना..."म्हणत दादांनी आईच्या हातात पिशवी दिली...पिशवी भरलेली होती तरी हलकी होती...म्हणून आईने डोकावून बघितले तर चिरमुऱ्यांनी भरली होती...
आत अजून एक पुडी होती..त्यात शेव पापडी आणि रेवडी होत्या...
आठवड्याचं वाणसामान होतं ते!!...
आई कावरी बावरी झाली...आणि दादांकडे पाहू लागली...
दादा म्हणाले,...
"आज वाणसामान घेतलं असतं तर हे सगळं कधी घेतलं असतं??ते तर थोड्याश्या उधारीवर इथूनही घेऊ..."
यावर आईने समाधानाने म्हणाली...
"बरंच झालं हे आणलंत ते... नाहीतरी कोरडी भेळसुद्धा कित्ती दिवसात खाल्ली नव्हती...."
आईने भराभर ते कागदावर पसरले...आणि त्या दिवशीचा उपास आम्ही असा सोडला...
3." कारटी..कसली जन्माला आलीय पोटाला....एवढ्या सहा सात भाकरी होत्या....सगळ्या स्वतःच रिचवल्या....अगं आमचा नाही...निदान भावंडांचा तरी विचार करायचा...."
आईची तोफ चालू होती...आणि अक्का निगरगट्टपणे ऐकून घेत होती...हे तिचे रूप आम्हाला अतिशय नवीन होते...
" आणि दोन आणे होते तुझ्याकडे...ते..ते कुठायत??"
" ते खर्च झाले.." ..
या तिच्या वाक्यावर कधी नव्हे ते आईचा हात उठला....पण आम्ही सगळेच होतो म्हणून तिने राग आवरता घेतला...
ताटलीभर पेज कमी पाणी जास्त पिऊन आम्ही झोपी गेलो...
अर्धवट पोटी कधी झोप लागली कळलंच नाही...
दुसऱ्या दिवशी जाग आली...ते अक्काच्या गुणगुणण्याने...
तिचे केर काढून सडा रांगोळी चालले होते...आई अंग धुवून आली होती...ती पूजा करत होती..पण तिचा कालचा राग उतरला नव्हता...
आज रांधणार तरी काय??...हा प्रश्नच होता
अक्काने सगळ्यांना उठवले.. आपणही आंघोळ करून आली..
देवाला नमस्कार केला...
आणि आमचा पोळीचा डबा घेऊन आईसमोर उभी राहिली...
त्यात लाडू होते...
अक्का आईला म्हणाली...
" आई आज वर्षाचा पहिला दिवस...सगळ्यांकडे गोडधोड असणार...आपल्याला आणि माझ्या भावडांना आज अधाशी वाटू नये....म्हणून मीच केलेत हे...कालच्या भाकऱ्यांचे...
दोन आण्याचा गूळ घेऊन आले...शेजारच्या काकूंनी दिलेलं दूध होतं...ते चांगलं उकळून कुसकऱ्यात घातलं...
कालचा दिवस असाच पेजेवर गेला...
आजचा सणाचा तरी पोटभर खाऊन साजरा करूया..."
आई आवाक होऊन बघत राहिली....
#####################
ह्या कुठे कुठे वाचलेल्या मनाच्या गाभाऱ्यात राहिलेल्या गोष्टी...
काय शिकवतात ह्या???...
परिस्थिती किती गंभीर आहे हे???...
का कोणत्याही परिस्थितीत आपण आनंद शोधू शकतो ते???...
शेवटी प्रत्येकाला काय हवं असतं??
तर आज आहे त्यापेक्षा जास्त समाधान...
###########
आज आपण कोरोनाला सामोरं जात आहोत...
नक्कीच चांगल्या रितीने बाहेर पडतोय आपण...
पण म्हणून कोरोनावर विनोद नकोत... खिल्ली उडवणारे तर नकोतच...
सारख्या त्याच त्याच ताण वाढवणाऱ्या बातम्या...
त्याच चर्चा...
हे करा...ते करू नका....
अरे होय....पण असे करून आपण त्याला जास्त मोठ्ठा करतोय...
हत्तीएवढा मोठ्ठा....
त्याचा आपल्या मनावर आत कुठेतरी नकारात्मक परिणाम करतोय...
जे लोक मनाने कमकुवत आहेत...ते आत कुठेतरी घाबरताहेत...
मला काही झाले तर???...
त्याचवेळी आपण ह्याच्याकडे एक डोळ्यांना न दिसणारा प्राणी म्हणून बघितले तर???...
मी स्वच्छता राखली तर हा माझे काहीही वाकडे करू शकत नाही... असे बघितले तर??...
त्याच्यावर विनोद करून हसले तर???...
माझा सकारात्मक दृष्टीकोन ही वाढतो...आणि लढा देण्याची शारिरीक ताकदही...
मग मी का त्याला माझ्या मनात प्रवेश करून द्यायचा??...
यथेच्छ हसा.....
आणि तंदुरूस्त रहा...
परिस्थिती तर....
हे ही दिवस जातील.....
अगदी मान्य आहे की यामध्ये बऱ्याच जणांना त्रास सोसावा लागतोय....ते खडतर वाट चालताहेत...
पण नुसता विचार करून आपण आपलेच डोके उठवू...
कृती तर अशीही काही करता येणार नाहीये...
आणि प्रत्येकवेळीच आपल्याला कुणाची ना कुणाची बिकट परिस्थिती दिसतच असते तरी आपण मदत करू शकतो का???...
आपवाद सोडला तर नाहीच...
मग अशा परिस्थितीत स्वतः स्वस्थ राहणे हेच मोलाचे ठरते..
ती ही आपली जबाबदारीच आहे...
नाही का??
मेघना जोग.