Get it on Google Play
Download on the App Store

यु. कीडवे (आय. सी. एस.)

चि. सौ. कां. चिमूताईच्या लग्नाच्या खटपटीकरितां मी ऑफिसातून दोन महिन्यांची रजा काढली. ती. बाबांचा लांब पारशी फॅशनचा सर्जचा कोट, त्यांची पगडी, त्यांचे उपरणे ही सर्व त्यांच्या पेटीत लोळत पडली होती ती बाहेर काढिली. भार दस्तपणा येण्याकरितां ० नंबरचा चष्मा वापरूं लागलो. चिमूताईचे लग्न ही माझ्या पाठीवरची फार मोठी जबाबदारी होती; कारण । कै. ती. बाबांची ती शेवटची आज्ञा होती. तीन वर्षांपूर्वीची आठ वण मला पक्की आहे. ती. बाबा मृत्युशय्येवर पडले होते, चिमणीस शेजारच्या बयाताईनी जेवू घालून निजविले होते, मी बाबांच्या उशाशी बसलो होतो, ती. सौ. मातोश्रीचा आकांत चाललेला होता. तेव्हां क्षीण झालेल्या स्वराने बाबांनी मला हाक मारिली, 

"चिम्या !" 

" ओ बाबा, काय हवं ? " मी नम्रपणे विचारले. 
" बाळ, माझ्यामागं चिमीचं कसं होईल याची मला काळजी लागली आहे. तुझ्याबद्दल काळजी वाटण्याचं बाकी राह्यलं नाही, कारण तुझ्या अभ्यासावरून पुढचे दिवे दिसतच आहेत. कुठे तरी कारकुनी नाही तर मास्तरकी मिळवून पोटापुरतं मिळवलंस की झालं. पण मी चिमीच्या लग्नाकरितां शिलोत्री बँकेत २००० रुपये ठेवले आहेत ते खर्च कर. तिला चांगलं स्थळ पहाण्याच्या कामांत कसूर करूं नको." हे शब्द त्यांच्या तोंडून अडखळत 
यू. किड्वे, आय. सी. एस. निघाले. मी अगदी सद्गदित की कायसें ह्मणतात तसा झालों होतो. माझ्या एकुलत्या एका बहिणीसाठी बाबांनी न सांगतां -देखील मी केवढाहि स्वार्थत्याग करण्यास तयार झालो असतो. 

" चिमण, हे बध, चिमणीचं लग्न झाल्याशिवाय तूं आपलं लग्न करून घेऊ नको, " पुन्हां डोळे उघडून बाबा म्हणाले. 
" बाबा, हे सांगावयाला का पाहिजे ? तिच्याकरितां जीव देण्याचा प्रसंग आला तरी मी डगमगणार नाहीं !" 
" जीव दे किंवा नको देऊ पण तिच्या नांवचे रुपये तिच्या करतां खर्च कर, स्वतः वापरूं नको इतकंच माझं शेवटचं सांगणं आहे, " असें म्हणून बाबांनी डोळे मिटले. 
" फुटलं ग माझं कपाळ ! " असें आई ओरडली. 

क्षणभराने डोळे उघडून बाबा म्हणाले, “ हे माझ्या उशा खालीं बाळकरामकृत ठकीच्या लग्नाचं पुस्तक आहे, ते काळजी पूर्वक वाच म्हणजे चिमणीच्या लग्नाच्या खटपटीला मार्ग दर्शक होईल. आणखी ए ! उगाच रडूं नको. दोघां मुलांकडे पाहून........" असें म्हणून बाबांनी पुनः डोळे मिटले 
आणि गरीब बिचारी आई श्रीमती झाली. 

आतां चिमणी मोठी लग्नाला योग्य जाहली होती. जुन्या चालीच्या बायका, “ हिचं सासर कुठे आहे ? ” असे मुद्दाम विचारून आईस लाजवू लागल्या. हिला स्थळे पहा, असें आईनें फरमावले. त्यांत चिर्माच्या आधी स्वतःचे लग्न करणार नाही असें मी बाबांना वचन दिले असल्यामुळे तिचे लग्न लौकर करून  टाकण्यास मी किती उत्सुक झालो असेन ते वेगळे सांगावयास नको. एक टांचणवही आणून प्रथम तींत गोत्रावळी आणि छत्तीस गुण जमविण्याचे कायदे लिहून काढिले, आणि वहींत चि. सौ. का. चिमूताई जोग हिच्या तीन कुंडल्या मांडून ठेविल्या-एक नव्या पंचांगाची, दुसरी ग्रहलाघवीय जुन्या पंचांगाची आणि तिसरी सायनची. यामुळे तीन कुंडल्यांपैकी वराच्या कुंडलीशी जी जमेल ती वरबापापुढे ठेवितां येत असे. पारशी लोकांत दोन पंचांगांमुळे कदमी आणि उदमी ( असेच कायसे ) दोन भेद झाले, तसे आपल्या समाजांत न होतां सोयीप्रमाणे तिहींपैकी वाटेल त्या पंचां गाचा लोक उपयोग करून घेत आहेत ही अभिनंदनीय गोष्ट आहे. टांचणवहींच्या इतर पानांवर कोष्टके आखून त्यांत नवर देवांची माहिती नोंदविली, व जशी जशी नवीं स्थळे कळत गेली तशी तशी कोष्टकांत भर घालीत गेलो. ही टांचणवही अद्याप मजजवळ आहे, आणि तिच्यावरून अवशिष्ट स्थळे पहाण्यास वधूबापांना उपयोग होत असतो. वहींचे पहिले पान पुढील प्रमाणे होते:--- 
धूबापा 
वराचे नांव 
चौकशीचे ठिकाण | धंदा, उत्पन्न 
वय 
खर्चाचा अंदाज. 
अनंत आत्माराम उकिडवे 
आय. सी. एस्. 
स्वतः वराकडे, 
। रत्नागिरी 
असि, कलेक्टर 
पगार रु. ६०० 
| २९ । २५००० रुपये. मुलगी चांगली 
असल्यास सवलत. 
कमळाकर काशीनाथ किडभिडे | बापाकडे, भटजी | एल. एल. बीच्या | २४ । ३००० रु. बरिस्टरीचा खर्च मि बी. ए. महाराजांच्या मठा-टर्स. उत्पन्न कळाल्यास काळी मु. पत्करतील. 
जवळ सातारा. 
यू. किड्वे, आय. सी. एस. 


वामन नरहर रटाटे, 
. मॅट्रिक नापास. 
गोन्या रामाजवळ | मोटार ड्रायव्हर । २२ । हुंड्याची अट नाही. नासिक, मामाकडे | दरमहा रु. ६० विचारणे. 
रामचंद्र सदाशिव भट, बापाकडे चौकशी. शिक्षक रायपूर । एम्. ए. ( १ क्लास ) मु. कुरधे, जि. हायस्कूल रु. ५० 
रत्नागिरी. 
हुंडा व करणी रु. २५०० मुलगी सुस्वरूप व शिकलेली. 

वेगळाल्या पंचांगांवरून जशा तीन प्रकारच्या कुंडल्या कर विल्या तसे चिमूताईचे दोन प्रकारचे फोटो काढविले. एक सुधा रकांकरितां व दुसरा दुर्धारकांकरितां. पहिल्यांत कु. चिमूबाला डोळ्यांस आरशी लावून टेबलाशी वाचीत बसलेली आहे. तिचा बांकडा भांग, कुरळे केस, बारीक कुंकुमतिलक, आंगांतला दिसतो न दिसतो असा ब्लाउज, कानांतील कुडी, हातांत एकएक सोन्याची बांगडी, नाकांतील मुगबट आणि एकाद्या विदुषीप्रमाणे खुर्चीवर बसण्याची ऐट, यांकडे पाहून कोणासहि वाटेल की, ही एक नामां कित कवयित्री किंवा लघुकथालेखिका आहे असें ! दुसऱ्यांत चि. सौ. कां. चिमूताई फोटोग्राफराकडे हमेष असणाऱ्या लाकडी पोकळस्तंभावर एक हात टेकून उभी आहे. तिचा सरळ भांग, ठळक कुंकुमटिळा, त्याच्याखाली हळदीचा डाग, नाकापेक्षां जड नथ, इरकली लुगडे, पायांत सांखळ्या, हातांत भरपूर कांकणे, यांच्या योगाने ती अव्वल इंग्रजीतल्या खानदानी घराण्यांतल्या स्वकुलतारक सुतेसारखी गरीब मुलगी दिसत होती. सुधारकी फोटोंतल्या चिमू ताईला फौन्टन पेनपेक्षां जड ओझें उचलण्याची सवय नाही असें, 
आणि दुसऱ्यांतल्या तिला बाधलीभर धुण्यांचे ओझें सुद्धां हास्या स्पदपणे हलके वाटेल असें दिसत होते. 

याप्रमाणे तयारी करून मी बहिणीचे लग्न जमविण्यास' निघालों. आई म्हणाली, " अप्पा, तूं अजून अजाण आहेस. गुंड्याभाऊला तरी बरोबर घेऊन जा." परंतु दुसऱ्याला श्रेय द्याव याचे माझ्या मनांत नव्हते. मी आपली टांचणवही काढिली. तींत पहिले स्थळ रत्नागिरीचे होते व दुसरें साताऱ्याचे होते. मी विचार केला की, प्रथम साताऱ्यास आणि तेथून पुढे कोल्हापुरमार्गे रत्नागिरीस जावें. म्हणून पत्रिका व फोटो बरोबर घेऊन एका शनिवारी दुपारी पुण्याहून निघून साताऱ्यास गेलो. तेथें किड मिड्यांचा शोध करून त्यांच्याच घरी मुक्काम केला. 

किडमिड्यांनी प्रथम मला चि. चिमूताईबद्दल माहिती विचा रिली. किडमिडे मंडळीचा एकंदर थाट जुन्या चालीचा दिसल्यामुळे मी तिचा दुर्धारको फोटो बाहेर काढिला. नंतर त्यांनी पत्रिकेबद्दल विचारिलें असतां मी थाप दिली, “ पत्रिका आणायला विसरलों बुवा ! बाकी कमळाकरपंतांची पत्रिका जर मला दाखवाल तर फार बरे होईल." माझ्या मनांतला हेतु एवढाच की, ' मुला'च्या पत्रिकेस जमेल तीच पत्रिका पाकिटांतून काढून किडमिड्यांच्या हातांत द्यावी. 

पुढे जेवणाचे वेळी काशीनाथपंतांनी माझी सगळी चौकशी केली. मी अविवाहित आहे असे कळाल्यावर त्यांनी म्हटले, “ मग खतःचे लग्न अगोदर का करून घेत नाही ? " 
"! बहिणीचे लग्न झाल्याशिवाय स्वतःचे लग्न करून ध्यायचे नाही असा माझा निश्चय आहे, " मी उत्तर केले. 
“ अहो, पण कन्यादान करायला तुमच्या बहिणीचे वडील हयात नाहीत, मग तुम्ही काय एखाद्या म्हाताऱ्यासारखी कडोसरीला सुपारी लावून बहिणचिं लग्न करणार की काय ? त्यापेक्षां आमच्या काऊला पदरांत ध्या म्हणजे तुमच्या बहिणीचं लग्न जुळवण्याच्या कामी आम्ही कंबर कसून तुम्हांला मदत करूं.". 
यावर काय उत्तर द्यावें हे माझें मला समजेना. मी कोणत्या  प्रकारें आढेवेढे घेतले आणि नकार किती जोरानें प्रदर्शित केला तें वर्णन कितीहि जीव तोडून केले तरी वाचणारांस खरें वाटणार नाहीं, तेव्हां त्या भानगडीत न पडतां इतकेंच सांगतों की, साधा रण शेकडा नव्याण्णवांत मोडणाऱ्या इसमास दाखविता येईल इतका दृढनिश्चय मी दाखविला. परंतु हा चिमणराव म्हणजे काही भीष्म नव्हे. 

काशीनाथपंतांनी माझे सगळे बोलणे हासण्यावारी घालविलें आणि स्वयंपाकघराकडे तोंड करून ते मोठ्याने बोलले, " अग काऊ, कोशिंबीर घेऊन ये पाहूं वाढायला ! पानांतली संपली आहे. ये इतक्यांतच काही लाजायला नको." बापाची आज्ञा ऐकून कोशि बिरीची दगडी हातात घेऊन काऊताई वाढावयास आली. त्या मुलीविषयी मला त्या वेळी काय वाटले ते “ कोशिंबीर वाढणाऱ्या कुमारीस पाहून " नांवाच्या भावसुनीतगज्जलांत मी वर्णन केलें होते, परंतु हे सुंदर काव्य काव्यदेवतेच्या दुर्दैवाने काऊताई यांच्या रोषास बळी पडले. 

वाढून ती परत गेल्यावर काशीनाथपंत म्हणतात, “ पाहिलीत मिस्टर' जोग, आमचर्चा काऊताई ! लाखांत मुलगी आहे लाखांत !" 
मलाहि तसे वाटले आणि लग्नापूर्वी एका अर्थाने प्रत्येक पुरुषाला आपापल्या वधूविषयी तसेंच वाटते; लग्नांतर थोडे दिवस तिची लाखवारी कायम असते, व पुढील आयुष्यात हळूहळू भूमि तिश्रेढीने ती कमी कमी होत जाते. शून्यापर्यंत आल्यावर उलट अर्थाने ती पुन्हा वाढत जाऊन आपल्या बायकोसारखी कुरूप बायको लाखांत सांपडणार नाही असे वाढू लागते. 

___“हिला न्यू इंग्लिश स्कुलांत घातला आहे, कारण येथे अद्याप मुलींची शाळा नाही; पण तिथेहि हिचा नंबर पहिला असतो. शिवाय गृहकृत्यांत अशी प्रवीण आहे की पुसू नका. फार हुषार ! " तिची प्रशंसा करीत पंत बोलले. 
. " प्रत्येक बापाला आपल्या मुलीविषयीं असेंच वाटते!"- मी. 

" त्यांत संशय नाही. पण इतर लोकांच्या आपापल्या मुलीं बद्दलच्या कल्पना अतिशयोक्तिपूर्ण असतात, तसे माझें नाहीं हो! मला आपल्या मुलीबद्दल न्याय्य आणखी योग्य असाच अभिमान आहे. ती करील आपल्या नवऱ्याला सुखीतम पुरुष ! " हे शेव टचे वाक्य जोर येण्यासाठी काशीनाथपंतांनी इंग्रजीत उच्चारले. 

जेवण झाल्यावर काशीनाथंपत घरांत बराच वेळ बायकोशी कुजबूज करून ओसरीवरील झोपाळ्यावर मी बसलो होतो तेथे बाहेर आले. ओसरीतून माजघरांत जाण्याच्या दाराआड सौ. काशी बाई उभ्या राहून आमचे संभाषण ऐकू लागल्या. संभाषण समग्र देऊन विनाकारण वाचकांचा वेळ घेत नाही. इतकेच सांगतो की, काऊताईशी माझे लग्न ठरले. आमचे लग्न झाल्यावर चिमूताई साठी स्थळे पहाण्याचे व नच जमल्यास तिला स्वतःची सून करून घेण्याचे पंतांनी कबूल केले; म्हणूनच मी या खटाटोपांत पडलों, स्वार्थपरायणतेने नव्हे. 

परंतु आईला मात्र तसे वाटले नाही. मी साताऱ्यास जाऊन स्वतःचे लग्न ठरवून आलों हे कळताच तिने मला शिव्यांची लाखोली वाहिली. परंतु बहिणीकरितां मी केवढा स्वार्थत्याग केला याची जाणीव तिला कशी होणार ? मी तिला सांगितले की, किड मिड्यांची मुलगी मी केली की, चिमूताईला ते आपली सून म्हणून पत्करणार आहेत. हे ऐकून चवताळून ती . ओरडली, “ मेल्या ! काहीबाही सांगून माझी समजूत घालायला पहातो आहेस का ? आपण काय असं साटंलोट करावयाला देशस्थ आहोत का आणखी कोणी आहोत ? मला फसवायला पहातोय मोठा !" 

लग्नांच्या थंड्या मोसमांत म्हणजे मार्गशीर्षात माझं लग्न झाले. लग्नांचा खरा हंगाम वैशाखांत असतो. वैशाखाचे डोहाळे पुण्य नगरीत लागले की, तिची शोभा अवर्णनीय होते आणि ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय ऐकू येत असतो. जरा बुधवार चौकांत उभे राहिलां आणि जाणारायेणारांच्या तोंडचे शब्द ऐकण्याचा यत्न केला तर असे उद्गार कानी पडतील: ___ अहो, मुलगी उफाड्याची आहे म्हणून मोठी दिसते. बाकी त्या मुलाच्या मानानें कांहीं मोठी दिसायची नाहीं हो ! बाकी आतां कांहीतरी खुसपट काढून फेंटाळायचंच असेल तर गोष्ट निराळी ! 

काय हो, गेल्या वर्षी पुष्कळ लग्नं लागली. पण त्यांत गंमत अशी झाली की, मुलांपेक्षां मुलीकडली लग्नं जवळजवळ दुप्पट झाली ! आतां यंदाचं प्रमाण काय बसतं ते पाहूं. 
आर त्यो रामा हे काय धरून बसलाया, दोनशे रुपय घेतल्या बिगर पोरगी देत नाही ! 

___ अहो, मंजुळाबाई, मी म्हणल्ये मुलगी आहे सासूच्या मुळावर आणखी सासू तर झाली आहे अर्धांगवायूनं लुळी पांगळी. मी 
यू. किड्वे, आय. सी. एस. म्हणत्य, सुनेच्या ग्रहबळानं एकदां बिचारीची कायमची सुटका तरी होईल. मग काय हरकत आहे करून घ्यायला ? 
"ए रामभट, एकाद स्थळ सांग ना कमी हुंड्याचं ! खाऊन पिऊन सुखी असलं म्हणजे झालं. " 

" अरे धोंडू. स्थळं आहेत कुठे आपल्या काण्णवांत ? नुस्ता मॅट्रिक झाला की पांचशे रुपये छन् छन् वाजवून घ्यायला पहातो." 
हे बघा शेट, आतां लग्नसराईमंदी आमचे कमाईचे दिवस. एक पंगत वाजवली की पंधरा रुपय् मोजून घेतों पटापट ! आतां वैशाख आला की तुमची बाकी नाही ठेवीत. समदं व्याजासकट फेडून टाकतों बघा. वाईच दमानं ध्या. 

जिकडे तिकडे स्थळे, टिपण, मुलगी, मुलगा, मुहूर्त, हुंडा, कजाग, एकनाड, बिजवर असे शब्द कानी पडतात. सिमल्यापासून कोलंबो आणि क्वेट्यापासून रंगूनपर्यंतचे दक्षिणी लोक आपापल्या मुली बरोबर घेऊन त्यांना उजविण्यासाठी जमा होतात. अर्थात् नवरदेव, आणि सूनमुख पहाण्यासाठी उतावळे झालेले त्यांचे आई बाप पुण्यास येऊन ठाणे देतात. खेडेगांवचे शाळामास्तर बीन पगारी रजा काढून तीन रुपये रोजावर वाढप्याचे काम करण्यास गोळा होतात. भाज्या, दूध, मजुरी यांचे दर चढतात. परगांवच्या लग्नेच्छु वधूवरांच्या वडील माणसांच्या लांबलचक मुक्कामांनी कुटुं बवत्सल रहिवासी कंटाळून जातात; आणि त्यांची ब्याद घाल विण्याकरितां का होईना पाहुण्यांच्या स्थलसंशोधनास अंतःकरण पूर्वक मदत करितात. किडमिड्यांच्या घरी चिमूताई पडण्याऐवजी त्यांचीच मुलगी जोगांच्या घरी आली, याबद्दल आई रागावली, चिमूताई खट्टू झाली, गुंड्याभाऊ आणि मित्रमंडळी मला बावळट बावळट म्हणून चिडवू लागले. तेव्हां मी कानास खडा लावून घेतला आणि सर्वांस म्हटले, " हे पहा, माझी एकदां चूक झाली खरी. आता पुन्हां चिमूताईला नवरा पाह्यला गेलो तर कुणी कितीहि आग्रह करो, त्याची मुलगी मी गळ्यांत बांधून घेणार नाही, समजलांत ? " मी इतक्या सरळप णाने हे वचन दिले परंतु कोणासहि ते खरे वाटले नाहीं; कारण तें ऐकून सर्वांची हासतां हासतां मुरकुंडी वळली. सौ. सुद्धां पदरा आडून हासली असा मला संशय आला. 

वरांच्या माझ्या जवळील यादीत पहिले नांव अनंत आत्माराम उकिडवे आय. सी. एस्. यांचे होते. मजसारख्या गरिबाला ही उडी झेपणार नाही असे वाटल्याने मी प्रथम साताऱ्याचे स्थळ पहाण्यास गेलो होतो. परंतु तेथें योग अकल्पित घडून आला. चिमीला नवरा मिळविण्याऐवजी मी तिला भावजयच आणिली, त्यामुळे तिचा मजवर झालेला सकारण राग घालविण्याकरितां तिला आय. सी. एस. ची बायको करणे हा चांगला उपाय वाटला, आणि तो मी आईस सांगितला. तेव्हां ती म्हणाली " नको रे बाबा, आपल्या गरिबांला हे स्थळ कसं झेपणार ? हे विलायतेला जाऊन आलेले लोक विलायतचा सगळा खर्च सासऱ्याकडून काढून घेतात. अन् अलीकडे तर हे मेले बायकांना गोऱ्या सवती आणा यला शिकले आहेत !" 

__ " मग काय जाऊ नको म्हणतेस ?" पडत्या फळाच्या आज्ञेच्या आशेने मी विचारले. 

"तसं नाहीं अगदींच," आई मला उत्तेजन देत म्हणाली, " सगळेच तसे असतात अस माझं म्हणणं नाही. पण असल्या विलायती लोकांची नीट चौकशी केली पाहिजे. त्या रावबहादुर भोळ्यांना भरावे लागले तीस हजार रुपये, तेव्हां त्यांच्या जावयानी मड्डम आणून ठेविली होती धरांत, तिची धिंडका बाहेर निघाली न् मग त्यांच्या मुलीला सुख लागलं " 
" ती काळजी आपल्याला नको, कारण आपल्याजवळ तीस हजार रुपयेच काय पण तीस हजार कवड्या देखील सांपडायच्या नाहीत. पण अशी माझ्या मेहुण्यानं पांढरी बाई आणिली तर अश्शा तिच्या झिपऱ्या ओढून तिला विलायतच्या बोटीत फेकून द्यायला हा चिमणाजी आप्पा कमी करणार नाही ! " 

" मोठा शूर माहीत आहेस ! " माझ्या भोवती काल्पनिक दिवे ओवाळीत आई म्हणाली, " पण गुंड्याभाऊला घेऊन जा बरोबर म्हणजे मागच्यासारखी फजिती होणार नाही. तो व्यवहारांत जरा कुशल आहे. काही काळंबेरं असलं तर तेव्हांच ओळखून काढील. " 

आईच्या आज्ञेप्रमाणे दोन दिवसांनी गुंड्याभाऊला घेऊन तुकाराम बोटीने रत्नागिरीस जाण्याला निघालो. बोटींत शनवारांतले रावसाहेब फडणीस आपल्या मुलीला घेऊन तेथेच जाण्यास निघाले होते. मात्र आपण कोणत्या कामाला जात आहों तें ते सांगत नव्हते. दुसरे एक नाशिकचे गृहस्थहि जात होते, ते आपल्याला जैतापुरास उतरावयाचे आहे असे म्हणत होते. हे गृहस्थ उकि डवे यांची बारकाईने चौकशी करीत होते, परंतु ही चौकशी आपण  सहज कुतूहलाने करीत आहों असें ते सांगत होते. . आम्हां चौघांना उकिडव्यांविषयी बोलतांना पाहून लोअर क्लासांत बसलेले एक मोठ्या मिशा आणि पांढरा फेटावाले बुवा आमच्याकडे आले आणि पुसते झाले, “काय मंडळी, उकिडव्यांचा तपास चालला आहे ? तुम्हांला खबर नाही वाटतं.---'". 
" काय ? " आम्ही चौघे एकदम ओरडलों. 
" काय काय ? खबर इतकीच की, तरतच त्यांचं लग न झा लं!" मोठ्या मिशा आणि पांढरा फेटावाल्या गृहस्थाने आपले वाक्य पुरें केलें. 
गुंड्याभाऊ खेरीज बाकीच्या आम्हां तिघांची तोंडे उतरली. त्याने मात्र त्याला विचारिले, " पण काय हो, मग तुम्ही आपल्या मुलीला घेऊन रत्नागिरीला कशाला चाललां आहां ? ती तुमच्या सामानाजवळ तुपाच्या डब्यावर बसलेली तुमची मुलगीच दिसते आहे ! " ___ " हं, दिसती आहे खरी. दोघांचा चेहरा अगदी एकाच घाटाचा दिसतो आहे बुवा ! " नाशिककर हांसत गुंड्याभाऊस संमतले. 

आपलें बेंड उघडकीस आलेले पाहून तो गृहस्थ गोंधळल्या सारखा दिसला आणि, " मी तिला दाखवायला नाही चाललो. अरे पण तो पहा तिकीट कलेक्टर आला, मी आपल्या जागी जाऊन बसतो." असे म्हणून त्याने आपल्या जागेकडे पळ कादिला. 

" पाह्यलं ? कसे वस्ताद आहेत राजेश्री ! म्हणे उकिडव्यांचं लग्न झालेलं आहे, म्हणजे आम्हांला ते खरं वाटावं आणखी आम्ही त्याच्या मार्गात येऊ नये, म्हणून थापा द्यायचा यत्न चालला होता, " गुंड्याभाऊ म्हणाला. 

" एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अॅन्ड वॉर, या इंग्रजी म्हणींत देशपरत्वे फरक करून एव्हरीथिंग इज फेअर इन मॅरेज सेटलमेंट अँड इलेक्शन, असं हिंदुस्थानांत म्हणायला हरकत नाही," असें जैतापुरला जाण्यास निघालेले गृहस्थ म्हणाले. 

" म्हणूनच हे राजेश्री जैतापुरला जाण्याची थाप देत आहेत, बरं कां ? " गुंड्याभाऊ माझ्या कानांत पुटपुटला. 
मुंबई बंदरची हद्द संपेपर्यंत मी बोटीत बसून राहिलो आणि बोट 'लागते ' म्हणतात ती कशी याचे नवल करीत होतो. इतक्यांत मोकळ्या दर्यात बोट येऊन आडवे उभे झाके खाऊ लागली, तेव्हां मी घट्ट डोळे मिटून पडलों. थोड्याच वेळांत खांदेरी-उंदेरीच्या मधून ती जाऊ लागल्यावर जिकडे तिकडे ओकाबोकी सुरू झाली. मीहि तीस थोडाबहुत तोंडभार लाविला. शेवटीं संध्याकाळी रत्ना गिरी आली. बोटीतून पडावांत आणि पडावांतून खलाशांच्या खांद्या वर बसून आम्ही किनाऱ्यावर उतरलों, पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे असे आम्हीं भूगोलांत पाठ केले होते, परंतु सूर्याऐवजी ती आतां माझ्याभोवती गरगर फिरूं लागली होती. रात्री विश्रांति घेऊन सकाळी जागा झालों तेव्हां सर्व स्थिरस्थावर झाल्याचे माझ्या नज रेस आले. 
सकाळी आठ वाजतां चि. चिमृताईचा सुधारक वेषांतला फोटो व तिच्या तिन्ही कुंडल्या घेऊन आणि भारदस्त पोषाक करून मी, गुंड्याभाऊ आणि रत्नागिरीस आम्ही ज्यांच्या घरी उतरलो होतो ते भार्गवराव असे तिघे उकिडव्यांच्या बंगल्यावर जाण्यास निघालो. न गच्छंद् ब्राम्हणत्रयम् असें निमित्त काढून भार्गवराव बंगल्याच्या फाटकापासून माघारे गेले आम्ही बंगल्याच्या मधल्या दालनात गेलों तो आगबोटींतले तिन्ही मित्र तेथे आधी पासून विराजमान झालेले दिसले ! नाशिककर गृहस्थांस मी नम स्कार करून पुसलें, “ काय महाराज, तुमचं जैतापुर इथेच झालं वाटतं ? " 

__ आपल्या नारिंगी पगडीच्या झिरमळ्या हलवति फक्त हास ण्यापलीकडे त्यांनी काही उत्तर दिले नाही. ____ नंतर मोठ्या मिशा आणि पांढरा फेटावाल्या गृहस्थांस नम स्कार करून मी विचारिलें, " काय हो, उकिडव्यांचं लग्न झालं असं तुम्ही म्हणत होतां ना ? " ___" असं ऐकलं होत बुबा ! पण त्यांना फरीवार लग्न करायचं असेल, नाही तर त्यांची पहिली बायको मैयत झाली असेल," त्याने उत्तर दिले. 

इतक्यांत इंग्रजी पद्धतीचा पायजमा सूट घातलेले उकिडवे साहेब चिरूट फुकीत हॉलांत प्राप्त होऊन सर्वांशी स्मितहास्य करीत हस्तांदोलन करून मध्यभागी खुर्चीवर विराजमान झाले. " काय साहेब, इथे कुणीकडे" ? त्यांनी रावसाहेब फडणिसांस विचा रले, कारण फडणिसांचा रुबाब त्यांना पहिली विचारपूस मिळावी असाच होता. 

 “साहेब, मी पुण्याचा फडणीस-रावसाहेब फडणीस " . 
" ओ येस्. तुम्हीं होते लिहिले एक पत्र विषयीं तुमच्या मुलीच्या. नाहीं काय ? ” साहेब इंग्रजीत म्हणाले, “ आणि 
आहेत हे सर्व लोक आलेले याच कामा करतां ?" 
"आम्हीहि आपापल्या मुलींकरितां आलो आहों साहेब. आणखी आपल्याला ज्याची मुलगी पसंद पडेल तिच्याशी लग्न करावं-" पांढरा रुमालवाला म्हणाला. 
___“ साहेब, माझी मुलगी अठरा वर्षांची आहे-" नाशिककर म्हणाले. 
“ आणखी माझी एकुणीसची आहे-" रावसाहेब म्हणाले. 
" माझी मॅट्रिक फेल आहे पण यंदां पुनः बसली आहे, " नाशिककरांनी सांगितले. 
“ माझी तर इंटरला बसली आहे, शिवाय मॅट्रिकमध्ये तिला संस्कृत प्राइझ मिळालं होतं. हार्मोनियम, शिवणकाम, पेंटिंग, सगळ्यांवर तिची मास्टरी आहे. कोणतीहि नवी कला पिकप् करण्यांत हातखंडा आहे,' रावसाहेब उभे राहून दोन्ही हात जोडून म्हणाले. आपण आपल्या जिल्ह्याच्या असिस्टंट कलेक्टरपुढे बोलत नसून दुसया एका जिल्ह्याच्या असिस्टंट कलेक्टरपुढें खासगी गोष्ट बोलत आहों, ही गोष्ट ते विसरले होते. 
“साहेब, " पांढरा फेटावाला लांब मिशांचा बुवा हात जोडून म्हणतो, " आतां माझं तरी ऐका. माझी मुलगी मॅट्रिक फेल नाही की इंटर पास नाहीं, आणखी काही नाही. बापजी, मुलींना ही केळवणी काय उपयोगाची आहे ? असिष्टण कलेक्टरची बायको होऊन तिला काय मास्तरणीची नोकरी धरायची आहे 
यू. किड्वे, आय. सी. एस. ६९ थोडीच ? पण माझी गंगी-'' ___" माझी चिमणी"-मी बोलण्याचा यत्न केला, परंतु त्या बुवाने आवाज अधिक चढवून माझा आवाज त्यांत बुडवून टाकिला व म्हटले, " माझा गंगीला बेतापुरतं लिहायवाचायला येत, पण शिवणटिपण, सांजी काढणं, भरतकाम, यांत तिनं बक्षिसं मिळ विली आहेत. रसोई तर अशी नामी करते की, एकदां तिच्या हातचं जेवलेला माणूस हयातभर तिची आठवण काढील. म्हैशीची धार तर अशी बेटी चलाखीनी काढते की, पांच शेर दूध देणाऱ्या म्हैशींनी तिचा हात कासेला लागला की, पाव पाव मण दूध दिलेलं आहे. आतां बोला ! " असा कन्यागुणगौरव करून इत 
रांना आव्हान देत बुवा चोहोंकडे ऐटीने पाहू लागले. 
- " काय हो, असिष्टण कलेक्टरची बायको होऊन शेवटी म्हशीची धारच काढायची असली तर त्यापेक्षा एखाद्या डेअरी वाल्या ब्राह्मणाला कां नाही मुलगी देत ? " गुंड्याभाऊनें त्यास विचारिलें. 
" माझी बहीण-" मी पुनः बोलण्याचा यत्न केला. 
परंतु “ माझ्या मुलीनं एखाद्या आय. सी. एस. च्या नाहीतर आय. एम. एस. च्या किंवा संस्थानिकाच्या घराला शोभा द्यावी आणि युरोपियन समाजांत तिला बरोबर अभिमानानं घेऊन जाता यावं असं कल्चरल (सांस्कारिक) शिक्षण मी तिला दिलं आहे," या रावसाहेबांच्या भाषणाने पुनः मला गप्प बसावे लागले. 
उकिडवे साहेबांनी इतका वेळ तोंडांत चिरूट धरून ठेविला असल्यामुळे त्यांस आपल्या श्वशुरपदावर नजर ठेवणाऱ्या गृह स्थांच्या चढाओढीत भाग घेता आला नाही; परंतु चिरूट विझत आल्यावर तो बाजूस ठेवून ते आतां बोलू लागले, “ सद्गृहस्थ हो, माझ्या वैवाहिक सुखाची तुमच्यासारख्या ति-हाइतांनी इतकी आस्था बाळगावी हे मजवर आपले थोर उपकार आहेत. तुमचे सर्वांचे अभिप्राय ऐकून मलाहि दोन शब्द बोलावेसे वाटतात. मला असं वाटतं की, पाश्चात्य देशांतल्याप्रमाणे बेजबाबदार वयोमर्या देपर्यंत मुली न वाढवतां लहानपणीच त्यांची लग्न करावी. मला फारशी ग्रोन अप ( वाढलेली) मुलगी नको आहे." 

"साहेब माझी मुलगी फक्त सोळा वर्षांची आहे," नाशिककरांनी मध्येच सांगितले. 
“ आणखी माझी पंधरा वर्षांची आहे,". रावसाहेब म्हणाले. 
" पण मघाशींच म्हणालां होतां ना.की ही एकोणीस वर्षाची आहे असं ? " गुड्याभाऊने विचारले, 
__ "ती चांद्र वर्षमानानं एकोणीसची असली तरी सौर वर्षाप्रमाणं पंधराची आहे, " रावसाहेबांनी स्पष्टीकरण केलें. 
___“ माझी गंगी मोठ्ठाड दिसते पण वयानी चौदापेक्षा लहा नच आहे. आमच्या काठेवाडची जनावरं आकारांनी मोठ्ठींच दिसतात, " मोठ्या मिशावाला म्हणाला. 
___“ आणखी माझी चिमूताई-" मी बोलू लागलों; तोच उकि डवेसाहेब पुढ़े म्हणाले, “ शिक्षण हा बायकांच्या बाबतीत फारसा महत्त्वाचा मुद्दा मी समजत नाही. माझ्या पोझिशनच्या माणसाच्या बायकोचं शिक्षणावांचून काही अडत नाही." 
पांढऱ्या फेटेवाल्याच्या मिशा स्फुरण पावू लागून त्यांच्या जंजाळांतून पुढील उद्गार बाहेर पडले, "म्हणूनच माझ्या गंगीला मी शिकवलं नाही. त्यांतून आमच्या राजकोटास दक्षणी शिकायची गोठवण आहेच कुठे मुळी ?" ___“ माझ्या बहिणीला सुद्धां-" मी चौथ्यांदा बोलण्याचा यत्न केला; परंतु मजकडे लक्ष न देतां उकिडवे पुनः बोलू लागले, " त्याचप्रमाणं गृहशिक्षणाची देखील विशेष गरज माझ्या भावी पत्नीला नाही. कारण सिव्हिल सहँटाला चारपांच नोकर ठेवा यची ऐपत असते. तेव्हां शिक्षणाकडे मी सहानुभूतीने पहाणार नाही. साधारणपणे स्वरूपाकडे लक्ष पुरवून वधू पसंत करायचं मी ठरविलं आहे." ___" साहेब, माझ्यावरून माझ्या मुलीच्या स्वरूपाची कल्पना तुम्हाला होईलच. तूर्त हा फोटो पहा म्हणजे तिच्या सौंदर्याची खात्री होईल "--रावसाहेब. 

" माझी मुलगी मजसारखी बिलकूल नसून आईच्या वळणावर गेलेली आहे, असं आश्वासन मी आपल्याला देतो, " नाशिककर म्हणाले. 
उकिडवे यांस स्वरूपाचे फारसे आकर्षण वाटले नाही. चित्र पट मंडळ्या निघाल्यापासून पैसेवाल्या लोकांच्या सुंदर स्त्रिया आणि मुली यांच्या गृहवासावर जबरदस्त घाला पडला आहे, व म्हणून आपल्याला काही अगदी हजारांतली मुलगी नको असे त्यांचे म्हणणे पडले, 
आपली गंगी शंभरांतली आहे असें काठेवाडी गृहस्थांनी सांगितले. 

" माझी चिमूताई तर दहा जणींसारखीच आहे ! " चार वेळां अपूर्ण वाक्ये बोलल्यानंतर हे एकच पूर्ण वाक्य बोलण्याची मला संधि मिळाली. ___कृपा करून नका अडथळू मला बोलण्यांत, " असें इंग्र जीत बजावून उकिडवे म्हणाले, " अलीकडे असं फॅड निघालं आहे की, हुंडा म्हणजे फार वाईट चाल आहे. विशेषत: या मताचे अनुयायी मुलींचे बाप आणखी ज्यांची लग्नं अजून लांब आहेत असे विद्यार्थी हेच असतात. हुंडा का नको तर तो मुलींच्या बापांना जाचक असतो, त्यांना पिळून काढतो, आणखी पुष्कळ रॉट्-मी म्हणतों, मुलगे आपल्या बापाला जाचक का नाही वाटत ? फरक इतकाच की, पूर्वांच्या मुसलमान अॅडव्हेंचरर्सप्रमाणे मुली बापाला एकदम लुटतात, आणि इंग्रजांप्रमाणे मुलगे बापाला हळूहळू शोषून घेतात. माझंच उदाहरण ध्याना. ? माझ्या बापाला लागलं काढावं कर्ज पंचवीस हजाराचं माझ्या शिक्षणाकरतां !" 

"पण मिस्टर उकिडवे, मुलाकडून हे पैसे बाप परत घेऊ शकतो तसे मुलीकडून थोडेच परत मिळताहेत ?” गुंड्याभाऊने म्हटले. 

" ओ रॉट् ! तो रामाचा काळ आतां राह्यला नाही. माझंच उदाहरण ध्याना ! बापानं माझ्याकरतां घरदार गहाण टाकून मला आय. सी. एस. केलं पण मी नाही त्यांला पाठवीत एक फार्दैिग देखलि ! मला सहाशे रुपये पुरले तर पाठवीन ना ! ते जाऊ द्या. सांगायचा मुद्दा असा की, आपल्या मुलाला रहायला बंगला असावा, चार नोकरचाकर घरी राबावे, मोटारीतून हिंडायला मिळावं, मुलखावर सत्ता असावी, कसली ददात नसावी असं माझ्या फादरला वाटत होते, म्हणून त्यांनी सक्रिफाइस करून माझ्या करतां पंचवीस हजार रुपये खर्च केले ! माझ्या फादरचं हे करणं तुम्हांला 

बरोबर वाटतं की नाही?" 

" अलबत !" रावसाहेब उद्गारले. “ केव्हांहि ! " नाशिककर ओरडले. " खरी वात !" पांढरा फेटावाले म्हणाले. " अगदी बरोबर, अगदी असंच ! " मी रुकार दिला. 

" त्याचप्रमाणे आपली मुलगी थाटांत आणि डामडौलांत रहावी, तिला कसलीहि काळजी नसावी, तिला काम पडूं नये, या उच्च कन्याप्रेमाच्या भरांतच तुम्ही मला आपापली मुलगी देऊ करा यला आला आहां ना ? " वकिली थाटाने उकिडव्यांनी प्रश्न केला. 

" होय ! " सर्वजण एकदम ओरडले. 

" तर मग माझ्या वडलांच अनुकरण करून तुम्हीहि तितकेच रुपये मुलीच्या भावी सौख्याकरितां आणि सिव्हिलियनचा सासरा म्हणून मिरवायच्या आपल्या स्वतःच्या हौसेकरतां खर्च करण्याला कां तयार होऊ नये ? ” उकिडव्यांचा हा तडकातडफी प्रश्न ऐकून आम्ही सगळे आ वासून आश्चर्याने त्यांच्या तोंडाकडे पाहूं लागलो. त्यांच्या तर्कटशास्त्राला समर्पक उत्तर आम्हांला सुचेना. आश्चर्याचा भर ओसरल्यावर मी म्हणालों, “ माझ्या बहिणीकरितां वडिलांनी फक्त दोनच हजार रुपये ठेविले आहेत. " 

" मी तीन हजारांला तयार आहे. पैकी हजार रुपये वाटलं तर आगाऊ ध्या, बाकीचे हप्त्याहप्त्यांनी फेडून टाकीन, " लांब मिशांतून शब्द निघाले. 

" सर, मी गरीब आहे; पण माझ्या एकुलत्या एका मुली करता माझ्या जवळचे सगळे पैसे खर्च करायला मागे घेणार नाही. माझ्या वाइफच्या सिकनेसमध्ये मी चारपांच हजार खर्च केले. शिकस्त दहा हजारपर्यंत माझी मजल; पण आपल्याला मिळेल आदर्श बायको !” रावसाहेबांनी पुनः उभे राहून उपरण्यांत गुंडाळलेले हात जोडून नम्रपणे विनविलें. 

___“ आणखी मीसुद्धां माझ्या मुलीवरून पंचवीस हजार रुपये ओवाळून टाकले असते हो, पण काय करावं ? " नाशिकचे गृहस्थ काकुळतीस येऊन बोलू लागले, “ पण जेव्हां जेव्हां थोडेबहुत पैसे मजजवळ सांठत तेव्हां तेव्हां माझंच लग्न करायची वेळ येई." 

कारण ? इतक्या बायका मेल्या की काय ? " " नाही हो. पण पुत्रसंतति नाही ह्मणून चार लग्नं केली, शेवटी मुलगा नाहीं तो नाहींच. एवंच माझ्याजवळ पैसा बिलकूल नाहीं खरा, पण उकिडवे महाराज ! तुम्हांला चार सास्वांचा लाभ मिळेल !" 

" अरे बापरे ! सासू हे एक अवश्यक संकट ह्मणून पाश्चात्य देशांत समजूत आहे. मग या चार सास्वा ह्मणजे चौपट संकट बळेनं ओढून कोण घेतो" ?----उकिडवे. ____“ पण आपल्या देशांत सासू हे संकट नसून जिवंत घबाड आहे म्हणाना ? बाळंतपण, आजारीपण, मंगलकार्य कांहीं असलं तरी आपल्याला मनुष्यबळाची कधीहि अडचण पडणार नाहीं, दर वर्षी आपल्या घरी बाळंतपण झालं तरी मुलीची  एकादी आई तरी हजर राहीलच. 'मुलीला मोळा लावायला आई आहे का नाही ? ' असं सगळींजणं विचारतात, माझ्या मुलीला तर चार आया आहेत महाराज !' असे नाशिककरांचे भाषण चालू असतांच बंगल्याच्या दाराशी धडाधड सामान येऊन पडत असल्याचा आवाज माझ्या कानी येत होता आणि मधूनमधून युरोपियन स्त्रीचा शब्दहि ऐकल्याचा मला भास होत होता. नाशिककरांचे भाषण संपतांसंपतां पारशी त-हेचे निळे पातळ नेसलेली एक युरोपियन तरुणी आंत लगबगाने आली. तिला पहातांच रा. उकिडवे घाबऱ्याघावऱ्या उठले व तिला चूप रहा ण्याची निष्फळ खूण करूं लागले. आम्हांस वाटले, ही एखाद्या ऑफिसरी बायको सहज उकिडव्याला भेटावयास आली असेल. ... परंतु तिने जो प्रकार मांडिला त्यावरून आम्ही चकित होऊन गेलो. " ओ डियर अनंटा," तिने एकदम त्यांच्या मानेला विळखा घालून इंग्रजीत म्हटले, “ मला चुकवायचा यत्न केलास काय ? पण माझें प्रेम बघ कसें दृढ आहे तें ? मी तुझा पत्ता काढीत काढीत इंग्लंडांतून हिंदुस्थानांतल्या या लहानशा बिळापर्यंत आल्ये की नाही ?" उकिडव्यांच्या चेहऱ्यावर आपल्या आगमनाने संतोषाचे प्रतिबिंब उठलेले न दिसतां त्रासाचे चिन्ह दिसून आल्याने किंचित् थांबून ती रागाने म्हणाली, " काय ? माझ्या येण्याने माझ्या प्रिय आनंटाला आनंद होत नाही काय ? आनंटा, तुझ्या करता मी आपल्या आईबापांना साडलें, माहेर सोडलें, आणखी जॉनी क्रोकरसारख्या सुहृदांचा धिक्कार केला, आणि तूं असा मला येथे पाहून थंडपणा कां दाखवीत आहेस ?........तूं  माझी थट्टा करीत आहेस, होय ना ? " असे म्हणत तिने स्वतः पासून आपल्याला सोडवू पाहणाऱ्या आनंटाचा बळेच मुका घेतला. तेव्हां त्यांचे तोंड लाजेनें अगदी गोरेमोरें झालें. 

त्यांनी तिला दूर ढकलले आणि आम्हांस सांगितले, “ गरीब बिचारी ! हिचं डोकं फिरलं आहे हिचा नवरा मेला आणि मलाच ती नवरा समजत आहे. वॉर्डरची नजर चुकवून ल्युनॅटिक असाय लम् मधून आली वाटतं. शिपाय !--" 

त्या बाईला मराठी येत नव्हते; परंतु बॉर्डर ( रखवालदार) आणि ल्युनटिक असायलम् ( वेड्यांचे इस्पितळ ) हे इंग्रजी शब्द ऐकतांच तिच्या ध्यानांत त्यांच्या बोलण्याचा मतलब आला व ती ओरडली, " काय ? मी वेडी आहे असें तूं आपल्या मित्रांना सांगतोस काय ? अरे विश्वासघातक्या ! हे तुझे सगळे मित्रच आहेत वाटते ! ऐका तुम्ही तरी ऐका. मी याची विवाहित बायको आहे. गेल्या वर्षी आम्ही ऑक्सफर्डला असता आमचे लग्न झाले. हे पहा या बॅगवर माझें मिसेस लीलावती यू. किड्वे नांव आहे." 

मिस्टर यू. किड्वे अगदी खजील झालेले दिसत होते. मिसेस लीलावतांचे बोलणे संपतांच ते पुनः म्हण ले, " अरेरे पिटी पिटी! मी हिच्याशी लग्न लावलं आहे, असा हिला भ्रम झाला आहे. गरीब बिचारी !” 

मिसेस लीलावती ही रावसाहेब फडणिसांकडे पाहून म्हणाली, " तुम्ही सन्मान्य म्हातारे गृहस्थ दिसतो. तुम्ही सगळे सारख्या पिसांचे पक्षी नसाल अशी आशा आहे. बोला तुम्ही याचे मित्र आहां काय ? " याचा मित्र असणे हा एक घोर अपराध आहे असे ती समजत असल्याचे तिच्या चर्येवरून स्पष्ट दिसत होते. त्यामुळे घाबरून जाऊन रावसाहेबांनी आपला आशय इंग्रजीत व्यक्त केला, “ नाहीं मॅडम् , मी आपली मुलगी यांना लग्नांत देऊ करावयास आलो आहे. मला आपले अस्तित्व माहीत नव्हते." 

" असे, " दांतओठ खात ती म्हणाली, “ मी जिवंत असतांना हा दुसरी बायको करतो काय ? ( नाशिककरांस) आणखी तुम्ही हो इथे कशाला आला आहां ? " 

आपणहि आपली मुलगी देऊ करण्यास आलो असल्याचे नाशिककरांनी सांगितले. ती एकदम खवळून जाऊन ओरडली; " बरोबर आहे ! तुम्ही हिंदुस्थानचे एतद्देशीय स्वभावतःच बहु पत्नीक असतां असें मी याच्याशी लग्न करण्यापूर्वी आई मला सांगत होती त्याचा प्रत्यय आला. एकूण आनंटा माझ्या घरांत झनाना उघडणार आहे काय ? आणखी तुम्ही त्याचे साथीदार ! दम धरा, मी तुम्हांला झनाना उघडावयास शिकवित्यें !" असें म्हणून समोरच भिंतीस खुंटीवरून एक पिस्तुल लटकत होतें सिव्हिलियनच्या घरांत ते तसे असावे यांत नवल नाही-तें काढून हातांत धरून तिनें प्रथम मोठ्या मिशांच्या सफेद फेटेवाल्यावर रोखलें व सर्वांस दटाविलें, “ माझ्या नवऱ्याला मुली देत आहेत ! लुच्चे, हरामखोर ! चला; व्हा चालते इथून, नाही तर एकेकाचें डोके फोडून मेंदू काढल्ये बाहेर जर असलाच तर ! " 

तिचे बोलणे पुरे होण्याच्या आंत सगळ्यांनी यापलाय सजी वते करण्यास प्रारंभ केला होता. मिस्टर उकिडवे मात्र, " अहो तें पिस्तुल भरलेले नाही, भिऊ नका. ती वेडी आहे, तिच्या बोल 

चिमणरावाचें च-हाट. ण्याकडे लक्ष देऊ नका, ” अशी आश्वासने देत आम्हांला पोहोंच वावयास फाटकापर्यंत मागोमाग धावत आले; , नाहीतर एकेकांवे डोके बोलण्याकडे लक्ष न देतां मिसेस उकिडव्यांच्या पासून शक्य तितकें दूर जाण्याचा यत्न करीत होतो. सर्वांच्या पुढे रावसाहेब एका  लाल पुणेरी जोडा संभाळीत फरफटत पळत होते. काठेवाडी गृहस्थ आपल्या देशांतील सुप्रसिद्ध तुरंगमाप्रमाणे उड्या मारीत चालले होते; व आम्हांविषयी म्हणाल तर अपमान सांगावा मनांत ही म्हण आठवून मी मौन स्वीकारीत आहे. रावसाहेब फाटकाच्या बाहेर पडले तरी जीव घेऊन पळत होते. त्यांनी येतांना सारवट ( दमणी ) भाड्याने आणिली होती. सारवटवाल्यास वाटले हा बामण भाडे चुकवून पळत आहे, म्हणून त्याने त्यांच्या मागोमाग बैल पिटाळले. काठेवाडी गृहस्थ आम्हांस म्हणाले, “ तरी मी आगबोट सुटण्याच्या अगोदरच तुम्हांला नाहीं सांगितलं की, उकिडव्यांचं लग्न झालं आहे म्हणून ? " आम्ही दहा मिनिटांतच सड्यावरून वरल्या आळीत आमच्या बि-हाडी येऊन धापा टाकीत बसलो. वडिलांच्या मृत्युसमयी त्यांना मी वचन दिले होते की, चिमूताईकरितां जीव देण्याचा प्रसंग आला तरी मी डगमगणार नाही, ते अंशतः तरी पूर्ण झाले यांत मला समाधान वाटत होते. 

__ " नकोरे बाबा, ही विलायती धेडे आणखी यांच्या भानगडी. यापेक्षा गरिबाकडे मुलगी दिली तर सुखाने मीठभाकरी खाईल; पण गोऱ्या सवतीच्या गुलामागरीत खितपणे कपाळी नको," गुंड्या भाऊ म्हणाला. 

मलाहि त्याचे म्हणणे पटले.