मुक्काम पहिला : पेशावर १
अफगाणिस्तान हा आपल्या हिंदुस्थानपेक्षाही मागसलेला देश, धार्मिक समजुती व रूढींचा पगडा तेथे विशेष, राज्यपद्धति जुन्या चालीची, आधुनिक सुधारणेचा प्रवेश तेथे फार उशीरा झालेला. असे असतांही तेथील अमिरांनी आपल्या राष्ट्राची सर्वांगीण प्रगति मोठ्या झपाट्याने व्हावी असे प्रयत्न सुरू केले. तेव्हा आपणांसही आपल्या शेजारच्या राष्ट्राकडून कांही उपयुक्त गोष्टी शिकता येतील त्या पहाव्या म्हणून तिकडे जाण्याचे ठरविले.
अशा हेतूने प्रेरित होऊन दुर्योधनाचा मातुल देश पहाण्यासाठी निघावयाचे ठरले. पण त्यांत अडचणी काही कमी नव्हत्या. पहिली अडचण परवान्याची. कारण अफगाणिस्तान हा बोलूनचाळून परकीय देश. सध्याच्या नाजुक वातावरणांत त्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले असल्याने तिकडे जाणान्यायेणा-यांवर सरकारचे फार कडक नियंत्रण आहे. प्रथमतः आमच्याच सरकारने परवानगी दिली तर अफगाण सरकारकडे अनुज्ञा विचारावयाला जावयाचे. तेव्हा पासपोर्ट ऑफिसांत चौकशी केली. तेथे असे कळले की, युरोप किंवा अमेरिकाखंडांत प्रवास करण्याची परवानगी तत्काळ मुंबईहून मिळत असली तरी, अफगाणिस्तानला जाण्याची अनुज्ञा हिंदुस्थान सरकारच्या संमतीविना देता येत नाही. जाण्याचा मार्ग व हेतु, कोणत्या गांवीं हिंडावयाचे, किती दिवस तिकडे काढणार इत्यादि सविस्तर लिहून हिंदुस्थान सरकारकडे परवानगीची मागणी केली. पण उत्तर येण्यास निदान तीन आठवडे लागतात असे कळले. कारण अफगाणिस्तानातील ब्रिटिश वकिलातीची आणि अफगाण परराष्ट्रीय मंत्र्यांची अशा येणा-या इसमास कांही हरकत आहे काय, अशी पृच्छा करण्यांत येते व समाधानकारक उत्तर आल्यावरच पासपोर्ट दिला जातो. एवढ्यानेच काम भागते असे नाही. पासपोर्टवर मुंबईत असलेल्या अफगाण वकिलाची संमतिदर्शक सही घ्यावी लागते. मुंबईला अफगाण वकिलाची एक कचेरी आहे. तेथे गेलो असता असे कळले की, * रहदारी'वर ( रहदारी=पासपोर्ट ) शिक्कामोर्तब करण्यासाठी अफगाण सरकारने दोन खास अधिकारी नेमले आहेत, त्यांच्याकडे गेलों असतां काम लवकर होईल. मुंबईच्या अफगाण वकिलाकडून पुष्कळ माहिती याच भेटीत मिळाली. अफगाणिस्तानला जाण्याचे मार्ग दोन. एक पेशावरहून खैबर घाटांतून काबूलला जाणारा आणि दुसरा केट्टयाहून कंदाहारला पोहोचणारा. पेशावरहून प्रतिदिवशी सकाळी आठ वाजतां मोटारगाड्या निघतात. सायंकाळीं जलालाबाद येथे मुक्काम होऊन दुसरे दिवशी सकाळी प्रवास सुरू झाला म्हणजे तिस-या प्रहरी काबूलला पोहोचता येते, अशी माहिती मिळाली खरी; पण त्याच वेळी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयीं अफगाण वकिलाला विचारल्यावर फारच गंमतीचे उत्तर मिळाले. मुंबईच्या अफगाण वकिलातीसाठी येत असलेल्या तिजोरीवर सरहद्दीवरील रानटी लुटारूंनी हल्ला केला अशी ती बातमी होती. पण त्या वकिलाने तत्काळ एक नोटांचे पुडके काढून दाखविले आणि म्हटले की, " हे पहा आमचे पैसे ! ते आम्हांला बँकेतून मिळतात. आमच्या राज्यांतून एक रुपयाही बाहेर जात नाही. कारण राजेसाहेबांची सक्त ताकीदच तशी आहे. | मी त्यावर त्यांना विचारले की, " मग वर्तमानपत्रांतल्या बातम्या खोट्याच तर ? वकिलाने उत्तर केलें, "समजा, आम्हांला कांही पैसे पाठवावयाचे असले तर बरोबर रखवालदार दिल्याविना का कोण पाठवील ? इतके का आमचे अधिकारी वेडे आहेत ? हे पैसे कालच आले. आणखी पुढील आठवड्यांत येतील. वर्तमानपत्रे,अफगाणिस्तानची बातमी म्हटली की, कांही तरी तिखटमीठ लावून लिहितात. | अशा प्रकारचे बोलणे झाल्यावर मी विषय बदलण्यासाठी असा प्रश्न केला की, * हिंदु म्हणून मला तेथे कांही त्रास होईल काय ? ? त्यास असे उत्तर मिळाले की, * मुळीच नाही. फारच प्रेमाने आमचे लोक आपले स्वागत करतील. शिवाय . आमच्या देशांत पुष्कळ पंजाबी हिंदु व शीख आहेतच. साहेबांना मात्र तेथे कोणी विशेष मानीत नाहीत. इतकी माहिती मला पुरी झाली. तेवढ्यावर संतुष्ट होऊन पेशावरला जावें व तेथे पुढची माहिती मिळवावी असे मी ठराविलें..
पेशावरचा परिचय–
मुंबईहून पेशावर पंधराशें पंचेचाळीस मैल (जी. आय. पी. मार्गे) आहे. बी. बी. सी. आय.ने पंचाण्णव मैल जवळ पडते. तेथे जाण्यास सोईच्या अशा गाड्या दोन्हीही रेल्वेच्या आहेत. सर्वात अधिक सोईची जाणारी गाडी बी. बी. सी. आय्.ची फ्रंटियर मेल असल्याने मी. त्याच गाडीने आलो. सुमारे चव्वेचाळीस तासांत हा प्रवास झाला आणि पेशावरला येतांच पासपोर्ट अधिका-याकडे जाऊन माझ्या ‘ रहदारी 'वर शिक्का मारण्याविषयी विनंती केली. पण सरहद्दीवरील गडबडीमुळे तिकडे जाण्याची कोणासच परवानगी देतां येत नाही असे सांगण्यांत आले. काबूलचा रस्ता जो अडला गेला तो अफगाण हद्दीतलाच आहे. खेबर घाटापुढे डाका म्हणून अफगाणिस्तानांतलें एक गांव आहे. त्यानंतर जलालाबाद हे दुसरे शहर. आणि नंतर काबूल. अशा मार्गाने मोटारी जातात. सध्या जी गडबड चालली आहे, ती डाका व जलाला बाद यांच्यामध्ये असलेल्या भागांत आहे. सरहद्दीवरील प्रांतांत आफ्रिदी, वजिरी, महशुदी, बलुची इत्यादि अनेक रानटी जातींचे लोक आहेत. त्या सर्वांत ‘शिनवरी' म्हणून जी जात आहे ती विशेष नाठाळ आहे. त्यांच्यावर सत्ता कोणाचीच नाही. म्हणजे ते कोणालाच मानीत नाहीत आणि स्वत:पैकी कोणाला तरी मुख्य मानून त्याच्याच तंत्राने चालण्यासाठी लागणारी विचारशक्ति त्यांना नाही. थोडक्यांत सांगावयाचें तर प्रत्येकजण अगदी राजाप्रमाणे स्वतंत्र, नव्हे निस्तंत्र, आहे ! त्यांचा प्रांत अफगाणाधिपतीच्या सत्तेखाली मोडत असला तरी त्याच्यावर हुकमत गाजविणे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही. राजा हा त्यांचा केवल शब्दपति' होय असे म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाही. लूट, मारहाण, चोरी हे तर त्यांचे वडिलोपार्जित धंदे होत. तेव्हा त्यांना कोणीही लगाम घालण्याचा प्रयत्न केला की ते चवताळणारच! आणि हाच प्रकार सध्या झाला असल्याने या शिनवरी लोकांनी डाका व जलालाबादमधील रस्त्यांत पुंडाई मांडली आहे. | ही अव्यवस्था दूर होऊन पूर्ववत् रहदारी सुरू व्हावी म्हणून अफगाण सरकारचे प्रयत्न जारीने चालू आहेत शिनवरी लोकांस वठणीवर आणण्यासाठी काबुलाधिपति जातीने जलालाबादपर्यंत आले होते; त्यांनी विमाने, मशिनगन्स यांचाही उपयोग केला; त्यामुळे तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली आहे असे म्हणतां येते. कारण तीन दिवसांपूर्वीच एक 'काफिला ' काबूलहून येथे आला. काफिला म्हणजे उंटवाल्या व्यापारी लोकांचा तांडा. हा काफिला किती मोठा असतो याची कल्पना प्रत्यक्ष पाहिल्याविना यावयाची नाही. पांचशे सहाशें उंट एकामागून एक चालत असतात, बरोबर त्यांचे रक्षकही असतातच, पण अशा या मालिकेने मैल मैल रस्ता अडल्यास नवल नाही. कित्येक काफिले दहा पंधरा मैल असतात असे म्हणतात. प्रत्यक्ष पाहिलेला असा हा काफिला केवळ अडीच तीन मैल लांबीचाच होता. हा काफिला या धामधुमीत डाक्याजवळ अडकला होता. तो आला तेव्हा रस्ता खुला झाला असेल अशी साहजिक कल्पना झाली. परंतु पुन: दंगाधोपा होण्याची भीति असल्यामुळे दुसन्या आणखी काफिल्यांना जलालाबादवरूनच मागे फिरविलें असे त्यांनी सांगितले. म्हणजे तेथे अद्याप पूर्ण शांतता नांदत नाही हे उघड आहे. येथे आल्यापासूनच्या रिकामपणाच्या काळांत पेशावर शहरासंबंधाने बरीच माहिती मिळाली. आजची ही पठाणांची वस्ती पाहून की काय कोण जाणे, येथील जुन्या परंपरेच्या हिंदु मंडळींत हिला 'राक्षसनगरी' म्हणण्याचा प्रघात आहे. परंतु येनाक्षरसमाम्नायमधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः ।। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः ।। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः ।। असें ज्या जगांतील अद्वितीय वैयाकरणाचे वर्णन आहे, तो अष्टाध्यायीकर्ता पाणिनी येथेच जन्मला असे म्हणतात ! इतकेच नव्हे तर एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करणारा जमदग्निसुत प्रतापी परशुराम या पुरीचा जनक समजला जातो. पूर्वी परशुपुर किंवा पुरुषपूर म्हणून हे शहर विख्यात होते, असाही कित्येक जनांचा समज आहे. पुराणवस्तुसंशोधनखात्याने लाविलेल्या शोधांवरून परिक्षित राजाच्या सर्पसत्राची भूमि तक्षशिला नगरी हीही येथून जवळ असलेल्या तक्षिला गांवांतच असली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कदाचित् शिकंदराच्या (अलेक्झांडर) वेळचा 'पौरस' राजाही हल्लीच्या पेशावरचा स्थापनकर्ता असू शकेल. इतकें मात्र निश्चितीने म्हणतां येते की, अल्बीरुणीने निर्दिष्ट केलेले * परशुशावर' हे गांव किंवा अबुल फझलने आपल्या ग्रंथांत उल्लेखिलेले * पेशेवर' अथवा हल्लीचे पेशावर शहर ही सर्व एकच होत. दिल्लीपति अकबराने पेशवराच्या ऐवजी 'पेशावर' हे नाव बदलून ठेवले आणि ते यथार्थही होते, व आजही यथार्थ आहे. 'पेशावर' याचा अर्थ सीमानगर म्हणजे सरहद्दीवरील शहर असा आहे. वायव्यसीमाप्रांताधिका-यांची राजधानी, सरहद्दीवरील मोठे लष्करी नाके, वैमानिक दलाचे ठाणे, इराण, अफगाणिस्तान व मध्य आशियांतील इतर देश यांच्या सर्व व्यापाराची मोठी उतार पेठ, रेल्वेचे
विजारी वापरणाच्या स्त्रिया
मोठे स्टेशन इत्यादि अनेक बाबींमुळे या शहरास महत्त्व प्राप्त झालें आहे. पाणी मुबलक असल्याने भाजीपाला विपुल व चांगला मिळतो. सर्व प्रकारचे धान्य व खाद्य वस्तू फारच स्वस्तांत मिळतात. महागाई आहे ती एका स्वच्छतेचीच ! हिंबाळ्याचा नुकताच प्रारंभ असला तरी थंडी, आपल्या पुण्याकडील मानाने बोलावयाचे तर, कडाक्याची पडते असे म्हणता येईल. सूर्याचा प्रखरपणा असा भासतच नाही. अगदी स्वछ ऊन पडले तरी तासच्या तास कांहीही त्रास न होतां उन्हांत बसतां येते व बसावेसे वाटते ! शिवाय गेले दोन तीन दिवस पावसाची झिमझिम चालू आहे. यानंतर थंडीस अर्थातच जास्त जोर येईल. | पठाणांची भाषा पुश्तु हीच सर्वत्र चालू आहे. पण पंजाबी बोलणारे लोकही आढळतात. लिपी उर्दू असल्याने हिंदु देवालयांवर असणारे फलकही उर्दूत लिहिलेले पाहून विचित्र वाटते ! • न वदेद्यावनी भाषाम् प्राणैः कण्ठगतैरपि' असा निबंध घालणाराने * श्रीकृष्णमंदिर ' अशी पाटी उर्दूत लिहिलेली पाहिली असती तर त्याचा कोपानल किती भडकला असता याची कल्पनाच करावी ! मंदिरांत पूजेसाठी वरकोट [ ओव्हरकोट ] घालूनही आंत जाणारे पुजारी किंवा पठाणांच्या सारख्या रंगीत कापडाच्या पोकळ विजारी घालणाच्या हिंदु स्त्रिया दृष्टीस पडल्या म्हणजे एकदम धक्का बसल्यासारखे होते. पण इकडील तो रिवाजच असे लक्षात आल्यावर कांही वाटत नाही. कांहीही म्हटले तरी विजारी व सदरे घालणाच्या हिंदु स्त्रिया ही कल्पनां मनाला एकदम पटत नाही, डोळ्यांना रुचत नाही, हे खरे. पण हे देशदेशचे रिवाज आहेत. पुराणवस्तुखात्याचे संग्रहालय, सरकारी उद्यान, शहरचा बाजार व लष्करांतील नवीन धर्तीची दुकानें इत्यादि भाग प्रेक्षणीय आहेत.
पेशावरचा किल्ला हल्ली ब्रिटिशांच्या ताब्यात असून तेथे बिनतारी तारायंत्राचे मोठे स्टेशन आहे. अशा या पेशावर शहरी मराठी बोलणारी मंडळी अगदी दुर्मिळ हे खरे; परंतु आश्चर्य हे की, येथे मुंबईहून चार पांच महाराष्ट्रीय मंडळी मुलामंडळींसह पेशावर पहाण्याच्या उद्देशाने आली होती ! कर्मधर्मसंयोगाने आम्ही सर्व एकाच ठिकाणी उतरलो होतो; म्हणून त्यांच्या सहवासांत चार दिवस झटकन् गेले. आता येथून केट्टा गांठावयाचा व कंदाहारमार्गे काबूलला जावयाचे असा आजचा बेत आहे. –केसरी, ता. ११ डिसेंबर, १९२८.