प्रकाशकाचे निवेदन
प्रस्तुत पुस्तकांतील मजकूर महाराष्ट्रीय वाचकांच्या परिचयाचा असला तरी तो खंडशः वाचलेला असणार. त्याला अविभक्त वाचनाची सर येणे अशक्यच. आणि लेखकाची भाषा व वर्णनशैली अशी आहे की, पुनर्वाचनाने विषयाची जास्तच गोडी लागावी. तेव्हा हे पुस्तक वाचकांस सादर करण्यांत . शिळ्या कढीस ऊत आणण्याचा प्रयत्न करण्याचा दोष येणार नाहीच. शिवाय सध्याच्या सार्वत्रिक जागृतीच्या काळांत, आपल्या मुसलमानधर्मीय शेजा-यांविषयीची अगदी अलीकडची माहिती शक्य तितकी, शक्य तितक्या वेळां जनतेपुढे मांडल्याने त्या जागृतीला योग्य अशी मदतच होईल असा भरवसा आहे.
येथे एका गोष्टीचें स्पष्टीकरण करणे अवश्यक आहे, ते म्हणजे पुस्तकांत योजिलेल्या शुद्धलेखनपद्धतीविषयी. दोन वर्षांपूर्वी * महाराष्ट्र-साहित्यसंमेलना'ने जे शुद्धलेखनमंडळ नेमलें त्याचे निर्णय प्रस्तुत पुस्तकांत ग्रथित करण्याचा शक्य तितका प्रयत्न करण्यांत आला आहे. परंतु हा प्रथम प्रयत्न असल्याने ते निर्णय पूर्णत्वाने पुस्तकांत उतरले नाहीत हे खरे. तेव्हा प्रचलित पद्धति व तिची जागा पटकावू पहाणारी नवी पद्धति या दोहींच्याही चाहत्यांस दोष काढण्यास भरपूर जागा आहे. ते त्यांनी शक्य तितक्या सूक्ष्मतेने काढून त्यांचे मंथन करावे व त्यांतून सर्वसंमत असे शुद्धलेखनरत्न काढावे, अशी अत्यंत आग्रहाची विनंती आहे. |
पुणे, ता. ३-१-१९३१.