Get it on Google Play
Download on the App Store

छत्री दिसलीच पाहिजे - भरत उपासनी

(हा लेख एक नाट्यछटा आहे)

मंडळी, यावर्षीचा उन्हाळा एकंदर भयानकच होता म्हणायचा! थोडं तीन-चार महिने मागे जाऊन पाहा म्हणजे लक्षात येईल लगेच! आंतरराष्ट्रीय किर्तीचा उन्हाळा होता महाराजा! वैताग होता नुसता वैताग! काय ती पाण्याची टंचाई...काय ते विजेचे नेमकं प्रचंड उकाड्यात गायब होऊन जाणं...काय तो घामाचा चिकचिकाट.झाड,चिमण्या,पशुपक्षी,माणसं सगळी कशी स्तब्ध आणि नि:शब्द! सिनेमागृहात जाऊन बसावं तर तिथेही तोच उकाड्याचा वैताग! इतके लोक प्राणवायू घेतात आणि कर्ब वायू सोडतात! मग होतं काय सिनेमा गृहात प्राणवायू कमी कर्ब वायू जास्त,मग जास्त जीव घाबरतो!

पाण्यात डुंबून बसावं तर पाणी सुद्धा नाही. पंखा काय गरम हवा सोडत होते अशा वैतागात एक मित्र आला आणि म्हणाला मित्रा,मी तैवानहून एक नवीन छत्री आणली आहे घेणार का?

आधीचा हा उन्हाळ्याचा उल्हास आणि त्यात छत्री विकत घेण्याचा फाल्गुन मास ! इम्पोर्टेड वस्तू  तिचे आकर्षण जास्त! त्यात हा मित्र कनपटीला बसलेला! म्हटलं, आण बाबा आण छत्री ! आता तुम्ही म्हणाल  या छत्रीत विशेष ते काय?

सांगतो सगळं काही सांगतो सांगतो ऐका. अरे काय सुपीरियर चकाकता चंदेरी कपडा आहे महाराजा! तबीयत खुश होऊन जाईल खुश!  कपड्यात स्वतःचा चेहरा पाहून घ्याल इतकी पारदर्शकता इतकी तलमता आणि इतका मऊ मुलायम कपडा आहे महाराजा! इतका तलम रेशमी स्पर्श आहे ह्या छत्रीच्या कापडाचा ! हात फिरवाल तर हातच फिरवत रहाल! माझ्या सौंदर्याचं रहस्य  ‘लि..री ल..’असं म्हणत साबणाच्या फेसात डुंबणाऱ्या मधाळ डोळ्याच्या सिने नटी पेक्षाही जास्त मुलायम असा स्पर्श आहे माझ्या   ह्या छत्रीच्या कापडाचा!

अजून सांगतो ऐका, फक्त एवढंच नाही पांढऱ्याशुभ्र फायबरच्या पारदर्शक दांडीची ही छत्री आणि त्या फायबरच्या आत तळाशी आणि वर टोकाशी अंतर्गत सुंदर विजेचे दिवे छत्रीच्या दांडी जवळचं हे बटन दाबलं की लाईट लागलाच पाहिजे! वा..वा...वा महाराजा, अशा या प्रचंड उन्हाच्या धुमश्चक्रीत सुद्धा  तैवानची ही छत्री सुखावून गेली हो! आणि बस मनाशी एक पक्कं ठरवलं की येनकेन प्रकारे माझी छत्री लोकांना दिसलीच पाहिजे! दिसलीच पाहीजे!

मग काय त्यासाठी पावसाची वाट पाहत बसलो सगळी उन्हाळ्याची कटकट संपली एकदाची आणि असा धो-धो बरसला पाऊस की विचारता सोय नाही! "डोळे भरून पाहिला, असा पहिला पाऊस, मनातल्या कवितांचा, गाव झाला ग बेहोश!" असं एका कवितेत म्हटलेलं आहे! असा छान कवितेसारखा  पाऊस पडला! बरसला धो-धो बरसला! मग काय विचारता? जंगली चित्रपटातल्या या शम्मी कपूर सारखी या $$$ हू $$$. ......या $$$ हू $$$  अशी एक जोरदार आरोळी घरातच स्वतःशीच ठोकली आणि निघालो की छत्री घेऊन बाहेर! कारण आपला निर्धारच होता ना की छत्री दिसलीच पाहिजे!

निघालो छत्री घेऊन बाहेर! बरसात मे... ताक धिना धिन....ताक धिना धीन! अशा थाटात निघालो की जणू काही, आगे पीछे हमारे सरदार, यहॅां के हम है राजकुमार$$$! असा रुबाब असा आवेश अशी शान, की बघणाऱ्याने बघतच रहावं!

वेळ संध्याकाळची....मस्त पाऊस पडलेला आहे.....चित्रपटासारखं.... सुंदर कवितेसारखं वातावरण निर्माण झालेलं आहे.... आणि राजकुमाराच्या थाटात ही तैवानची छत्री घेऊन मी निघालो आहे!  एकटाच नाही निघालो! मला माझ्या छत्रीचं प्रदर्शन करायचं होतं! म्हणून मग एका मित्राला बरोबर घेतलं! कोपऱ्यावरच्या एका इराण्याच्या टपरीवर सुंदर गरमागरम वाफाळते दोन चहा लागोपाठ मी ही घेतले आणि मित्रालाही पाजले आणि निघालो फिरायला! आगे पीछे हमारे सरदार यहॅां के हम है राजकुमार! छत्री दिसलीच पाहिजे ना सगळ्यांना म्हणून निघालो फिरायला!

थोडा अंधार पडला.....छत्रीच बटन दाबलं....छत्रीतला लाईट लागला....! चंदेरी प्रकाश चमकला...! आश्चर्याने मित्रच काय, पण भोवतालची सगळी येणारी जाणारी रस्त्यावरची मंडळीसुद्धा जागच्या जागी स्तब्ध झाली महाराजा! प्रत्येक जण विचारू लागला कुठून आणली? केव्हा आणली? केवढ्याला आणली? छान आहे, सुंदर आहे, अप्रतिम आहे मग मी सगळ्यांच्या प्रश्नांना एका वेगळ्याच थाटात उत्तर देऊ लागलो..... जणू काही पत्रकार माझ्या सभोवताली उभे आहेत ते मला प्रश्न विचारत आहे आणि मी एखाद्या सेलिब्रिटीसारखा त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहे.... दूरदर्शन बातम्यांसाठी  मी  स्वतः  खूदपसंत  तळवाडकर..... आजच्या वार्तापत्रात इतकच....पुन्हा भेटू या......आमच्या पुढील वार्तापत्रात मध्यरात्री एक वाजता....तोपर्यंत नमस्कार...! अशा थाटात...अशा थाटात माझं छत्री प्रदर्शन चालू होतं....! गर्वाने छाती फुलून गेली होती...! हरभऱ्याच्या झाडावर चढून मी अगदी खुशीत गाजरे खात होतो....! खूप आनंदी झालो होतो कारण छत्री दिसली पाहिजे ना महाराजा!

मग काय मी जास्तच छाती फुगवून अगदी आत्मविश्वासाने मित्राबरोबर रस्त्याने चालू लागलो...!

लोक  कुतूहलाने प्रश्न विचारत होते  आणि मी उत्तर देत होतो! माझा आतला आवाज मला सांगत होता बच्चमजी, लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत जा.....थाटात चालत रहा... कारण येनकेनप्रकारे लोकांना आपली छत्री दिसलीच पाहिजे ना महाराजा...! आगे पीछे हमारे सरदार और इस छत्री के हम है राजकुमार....अहो पहात काय राहिलात माझ्याकडे नुसते?  छत्रीकडे बघा, माझ्या छत्रीकडे कारण तुम्हाला माझ्यापेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात माझी छत्री दिसलीच पाहिजे....!

लेखक:  भरत उपासनी

ईमेल: br1957u@gmail.com

आरंभ: जून २०१९

संपादक
Chapters
आरंभ टीम संपादकीय (जून 2019) आई नावाचं विद्यापीठ - अविनाश हळबे केविन फायगी – अभिषेक ठमके मोहुनिया तुजसंगे - हेमंत बेटावदकर दादामामा: एक प्रसन्न व्यक्तिमत्व - किरण दहीवदकर फॅमिली फार्मसिस्ट - आशिष कर्ले आमच्या वेळेस असं होतं? - निमिष सोनार दुष्काळ: महाराष्ट्राची एक शोकांतिका - मयुर बागुल स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी! - विक्रम अरने मार्कंडा महादेव मंदिर, गडचिरोली - प्रतिक पुरकर नाशिकची त्रिरश्मी लेणी - अजित मुठे आफ्रीका आणि यु.ए.ई ! - अविनाश लोंढे पुलवामा हल्ला- अक्षता दिवटे माहेरची चैत्रगौर - श्रेया गोलिवडेकर रजोनिवृती - अभिलाषा देशपांडे छत्री दिसलीच पाहिजे - भरत उपासनी कथा: अद्वैत - सविता कारंजकर कथा: प्रेमात पडताना (भाग 1)- सत्यजीत भारत बाल कथा: ते दोन अद्वितीय - लेहिनी नायर, मलेशिया शनि ग्रहाचे महत्व – मंजुषा सोनार त्या रात्री मला कोण बरे भेटले? – प्रभाकर पटवर्धन कुठे असेल नागी? - सारिका उबाळे असावे घरकुल आपुले छान - भरत उपासनी आमची आजी म्हणायची! - श्रेया गोलिवडेकर एक वात्सल्यपूर्ण पिता - प्रिया निकुम सात लघु लेख - अभिलाषा देशपांडे कविता: गरिबीतील जीवन - सुवर्णा कांबळे कविता: पोरी पदर तुझा सावर - सुवर्णा कांबळे कविता : तू जीवनात आला आणि असं वाटलं - प्रिया निकुम कविता संग्रह: शारदेय (भाग1) - कपिल नवले चारोळी: दर्शन - सिद्धेश प्रभुगावकर फिल्मी गॉगल: चोरीचा मामला - निमिष सोनार एक विचार: पाकीट - उदय जडिये एक विचार: वाढदिवस - उदय जडिये ग्राफिटी: अविनाश हळबे व्यंगचित्रे: सिद्धेश देवधर त्रिरश्मी लेणी : फोटोग्राफ्स