मोहुनिया तुजसंगे - हेमंत बेटावदकर
सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला निघालो होतो. नेहमीच्या रस्त्यावरून फिरत असतांना विचार आला की आज थोडी वेगळी वाट धरावी. बाजूच्या रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. फिरायला जाणारे नेहमीचे यशस्वी कलाकारही तिकडे फिरकत नाहीत कारण त्या रस्त्यावर बसायला बाके नाहीत. टुमदार बंगले झेलत असलेला हा रस्ता जणू बाजूला असल्यामुळे एकाकी वाटतो. आपण जरा हटके करावे म्हणून मी त्या रस्त्याला वळलो.
सुरुवातीच्या दोन-तीन बनल्यानंतर दोन रिकामे फ्लॅट होते आणि त्यानंतर मात्र सलग दुतर्फा छान बनले होते. आत मध्ये सुखवस्तू माणसे रहात असावीत कारण कोणत्याही बंगल्यात वर्दळ हालचाल काही म्हणता काही जिवंतपणाची लक्षणे दिसत नव्हती. सारे बंगले एक जात सकाळच्या साखरझोपेत असल्यासारखे वाटत होते. मी आपला या रस्त्यासाठी नवखा होतो कारण याआधी कधीही इकडे येण्याचा प्रसंग आला नव्हता. थोडा पुढे चालत गेलो आणि एकदम दचकलो, माझे डोळे विस्फारले आणि आपण कोठे आहोत याचा विसर पडला.
समोर रस्ताभर बुचाच्या फुलांचा सडा पडला होता आणि हवा सुटलेली असल्यामुळे झाडांवरून बुचाची फुले गिरक्या घेत घेत जमिनीवर पडत होती आणि मादक सुगंध पसरवत होती. साधारणतः दसऱ्यापासून सुरू होणारा हा फुलोत्सव आता अगदी बहरात आला होता आणि आपल्या स्वर्गीय सुवासाने वातावरणाला सुगंधित करत होता.
मी न राहवून पुढे झालो आणि वाकून ती लांब दांडी असलेली नाजूक फुले हळुवारपणे वेचू लागलो. मी ओणवा होऊन फुले वेचत असताना वरून झाडावरून फुलांचा वर्षाव होत होता आणि त्यातली काही फुले माझ्या पाठीवर पडून खाली पडत होती. माझ्या त्या फुलांच्या सड्यातून चालण्यामुळे काही पायदळी येऊन कुस्करली जात होती तर काही जुनी फुले मलूल होऊन वाळक्या रूपात पडलेली दिसत होती. त्या ताज्या फुलांचा मोठा गुच्छ हातात घेऊन मी निघालो आणि जाता जाता ती मुले नाकाजवळ नेऊन तो स्वर्गीय सुगंध रोमारोमात भरून घेत होतो. हे सारे घडत असताना मी थोडा अंतर्मुख झालो आणि नकळत माझ्या बालपणीचा काळ मला आठवू लागला.
तो साधारण सत्तरच्या दशकातला काळ असावा. मी त्यावेळी पाचवी किंवा सहावीत असेन. आमच्या घराच्या मागच्या गल्लीत एक डेरेदार आणि उंच उंच असे बुचाचे झाड होते. वर्षातले नऊ महिने अंगावर फक्त पाने आणि फांद्या यांना मिरवणारे हे झाड दसरा आला रे आला की अगणित अशा कळ्यांच्या गुच्छांनी भरून जायचे. त्या कळ्यांच्या असण्याची कोणाला काही घेणेदेणे नसायचे कारण त्या ना सुवास सांडायच्या ना खाली पडायच्या. एखाद-दुसरी कळी चुकून खाली पडली तरी तिच्या कपाळावर टोचून फटाका करण्याकडेच उपयोग व्हायचा कारण ती पोकळ फुगीर असायची. तिच्यात अजून बुचाचा म्हणून असतो तसा सुगंध भरलेला नसायचा. त्यामुळे पोरीबाळी ही त्याकडे दुर्लक्षच करत.
हळूहळू दिवाळीचे दिवस जवळ येत. खास दिवाळीची म्हणावी अशी हवा आणि वातावरण तयार होई. सुखद गुलाबी थंडी पांघरुणातून बाहेर पडायला मज्जाव करी. तरीपण दुरून येणारा मोहक सुगंध पांघरून टाकून त्या सुगंधाच्या दिशेने धावायला मजबूर करी. आता बुचच्या झाडावरील कळ्यांनी छान टपोऱ्या फुलांचे रूप धारण केलेले असायचे आणि त्यांचा सडा जमिनीवर अविरत पडत असलेला दिसायचा. सोबतीला त्यांचा मादक सुगंध सार्या आसमंतात भरलेला असायचा आणि झाडाखाली गर्दी केलेल्या मुलींचे परकर आणि स्कर्टचे ओचे त्या फुलांनी गच्च भरून जायचे. बिचाऱ्या वाकून वाकून फुले वेचून जात पण झाडावरून होणारा फुलांचा वर्षाव अविरत चालू असे. एखाद्या भिंगरी प्रमाणे गिरक्या घेत घेत ती जमिनीवर येऊन विसावत आणि अलगदपणे एखाद्या मुलीच्या ओच्यात जात. त्या बिचार्या हातात जेवढे मावतील तेवढेच वेचत आणि पळत जाऊन घरी आईला नाहीतर ताईला घेऊन पुन्हा वेचण्यासाठी झाडाखाली दाखल होत.
बूचाच्या झाडाला खालून दगड मारून किंवा झाड हलवून फुले पाडताना कुणी पाहिलाय का? त्याची काही गरज पडत नाही कारण फुलं उमलली की ती स्त्री वर्गाच्या कल्याणासाठी जमिनीवर यायचेच.
दोन-तीन वेळा झाडाखाली जाऊन वेचलेली फुले आईच्या ताब्यात दिली की ती त्यांची फार छान वेणी बनवायची. वेणी बनवतांना फुलाच्या लांब लांब दांड्या गुंफण पक्की होण्यासाठी फार उपयोगी पडतात त्यामुळे धाग्याचा वापर न करताही घट्ट आणि दाट अशी वेणी तयार होत असे. ती वेणी केसात माळून आई आणि ताई इतक्या सुंदर दिवसाच्या की हे झाड वर्षभर का फुलत नाही असा मला प्रश्न पडायचा. आपण कष्टाने वेचलेल्या फुलांचा असा सदुपयोग झालेला पाहून मला आपण आपल्या ताई आणि आई साठी काहीतरी चांगले केले याचा अभिमान वाटायचा. देवा! या बुचाच्यां झाडाला वर्षभर असाच फुलांचा बहर येऊ दे म्हणजे मी दररोज माझ्या आई आणि ताई साठी अशीच भरभरून फुले वेचीन आणि माझ्या आई आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळे भरून पाहिन.
आई काही फुले हुशारीने बाबांच्या लिखाणाचे टेबलवर ठेवून द्यायची जी आपल्या स्वर्गीय सुवास घरभर पसरवत आणि त्यांना उचलून नाकाजवळ यायची गरज नसे.
हेम्न: पुष्पाणि निर्मातु बहव: संन्ति शिल्पिन: |
त त्र सौरभ निर्माणे चतुर: चतुरानन: ||
अर्थ: सोन्याची फुले करणारे कारागीर पुष्कळ असतात मात्र त्यांच्यात सुगंध निर्माण करण्यात चतुर्मुख ब्रह्मदेवच चतुर असतो.
लेखक: श्री. हेमंत बेटावदकर, जळगांव
मोबाईल: 9403570268
(लेखक रिटायर्ड SBI कर्मचारी असून वाचन, लेखन आणि चित्रकला हे त्यांचे आवडते छंद आहेत. ते सकाळ आणि लोकमत वर्तमानपत्र तसेच अनेक दिवाळी अंकांमधून सातत्याने लिखाण करत असतात. तसेच त्यांनी "काळ सुखाचा" आणि "माझं काय चुकलं?" ही दोन प्रसिद्ध पुस्तके लिहिली आहेत)