Get it on Google Play
Download on the App Store

केविन फायगी – अभिषेक ठमके

गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याचशा पालकांना जी गोष्ट साधता आली नाही, ती गोष्ट एका सिनेमाने साध्य केली. ती गोष्ट म्हणजे, मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवणे. आणि तो सिनेमा म्हणजे, अवेंजर्स एन्डगेम!

मार्व्हल्स सिनेमॅटिक युनिव्हर्सअंतर्गत गेल्या दहा वर्षांपासून जे सिनेमे प्रदर्शित झाले त्या सिनेमांचा हा शेवटचा सिनेमा होता. प्रेक्षकांमध्ये त्या सिनेमाबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली होती. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी बऱ्याचशा चाहत्यांनी आपापल्या पद्धतीने फॅन थेअरी जाहीर केली होती. म्हणजे सिनेमामध्ये पुढे कदाचित असं घडू शकेल अथवा तसं घडू शकेल, किंवा सिनेमांमध्ये सुपरहिरो अशा पद्धतीने योजना तयार करतील आणि सिनेमाचा शेवट असा होईल वगैरे वगैरे. सिनेमा प्रदर्शनाची तारीख जवळ आली आणि सिनेमाचे ट्रेलर आणि इतर व्हिडियो सर्व प्रसारमाध्यमांवर प्रदर्शित होऊ लागले, त्यांना चांगली प्रसिद्धी मिळत होती आणि चाहते सिनेमाची तिकिटे मिळवण्यासाठी धडपडत होते. आपल्या भारतामध्ये देखील मध्यरात्री, पहाटे करत 24 तास सिनेमागृहांमध्ये शो चालवून सर्वच्या सर्व शो हाऊसफुल्ल करणारा हा पहिला सिनेमा ठरला.

सिनेमामध्ये नक्की काय घडतं, अवेंजर्स कसे एकत्र येतात, त्यांचा शेवट कसा होतो अशा प्रत्येक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊनच बघायची होती. यासाठी आपल्याला कोणताही स्पॉईलर (रहस्य भेद) मिळू नये म्हणून मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग सोशल मीडियापासून दूर होता. हे या सिनेमाचं खरं यश. पण तुम्हाला माहित आहे, हे सर्व एका माणसामुळे शक्य झालं. तो म्हणजे केविन फायगी!

आपला एखादा सिनेमा सुपरहिट झाला की बरेचसे निर्माते, दिग्दर्शक त्याचा सिक्वेल काढण्याचा विचार करतात. पण केविन फायगी यांनी मार्व्हल्स सिनेमॅटिक युनिव्हर्सची सूत्रे आपल्या हाती घेतल्यावर सुपरहिरो सिनेमांची मालिका करायचे ठरवले, ज्यापैकी पहिला सिनेमा होता, आयर्न मॅन. पहिल्या सिनेमापासूनच प्रेक्षकांनी हे नवे युनिव्हर्स डोक्यावर घेतले.

केविन फायगी यांनी लोकांचा सुपरहिरोकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला. त्यांच्या आधी कोणत्याही निर्मात्याने अथवा स्टुडीओने आपले पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणत्याही सुपरहिरो सिनेमावर खर्च केले नव्हते.

मार्व्हलस सिनेमॅटिक युनिव्हर्सचे सर्व सिनेमे हे केविन फायगी यांच्या नियंत्रणाखाली आहेत. आपल्या पुढील सिनेमासाठी कोणता दिग्दर्शक घ्यायचा, कोणते कलाकार घ्यायचे, कोणत्या लेखकाने सिनेमासाठी लिखाण काम करावं हे सर्व केविन फायगी ठरवतात. त्यातच, जो दिग्दर्शक त्यांचे म्हणणे ऐकत नाही, त्यांना ते आपल्या प्रोजेक्टमधून काढून टाकतात. भले त्या दिग्दर्शकाने त्यांना सुपरहिट सिनेमा दिला असो. उदाहरणार्थ, एग्वर्ड रॉड, पेटी जेनकिन्स, एग्वर्ड राईट.

मार्व्हलस सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या आधी हॉलीवूडमध्ये सर्वात मोठा स्टुडियो म्हणून 'पिक्सार स्टुडियो' ओळखला जात होता. त्यांचा प्रत्येक सिनेमा सुपरहिट होता. जसे, टॉय स्टोरी, कार्स, अप, मॉन्सटर्स, फाइन्डींग निमो. अशा अव्वल स्टुडियोला मागे सोडत मार्व्हलस सिनेमॅटिक युनिव्हर्स अशा उंचीवर पोहोचले, जिथे आजवर कोणतीही सिनेमा कंपनी पोहोचू शकली नाही. एकीकडे ते आपले सिनेमे बनवत होते, तर दुसरीकडे सोनी कंपनी स्पायडर मॅनचा युनिव्हर्स बनवण्याचा प्रयत्न करत होती. पण प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी अपयश पडत होते. स्पायडर मॅनचा एक सिनेमा सुपरहिट झाला की पुढील सिनेमा दणकून आपटायचा किंवा त्याला म्हणावे तसे यश मिळत नव्हते. डीसी सिनेमाच्या बाबतीतही असंच काही घडत होतं. पण स्टार वॉर्स आणि लिगो आपापले युनिव्हर्स चांगल्या पद्धतीने बनवत आहेत. ट्रान्सफॉर्मर्स सुद्धा पुन्हा नव्याने सिनेमे घेऊन येत आहेत. म्हणजे हॉलीवूडमध्ये प्रत्येक सिनेमा कंपनी आपापले सिनेमॅटिक युनिव्हर्स बनवत आहेत, पण हे सर्व आताच घडत आहे, असे नाही. आधी सुद्धा बऱ्याच कंपन्यांनी सिनेमॅटिक युनिव्हर्स बनवायचे प्रयत्न केले होते, आणि नंतर ते इतिहासजमा झाले. आता केविन फायगी यांनी हा ट्रेंड त्यांच्या पद्धतीने कोणतीही तडजोड न करता पुन्हा एकदा सुरु केला, आणि त्यात ते यशस्वी देखील झाले आहेत.

मार्व्हल्स सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या आधी केविन फायगी 'दि डोनर्स' कंपनीमध्ये लॉरेन्स रॉनरसोबत काम करत होते. ज्या आता फॉक्स स्टुडियोसाठी काम करतात. केविन यांनी त्यांच्यासोबत 'यु गॉट मेल' आणि 'वोल्कॅनो' सिनेमांसाठी काम केलं. नंतर लॉरेन्स यांनी 'एक्स मेन' सिनेमांची फ्रॅन्चायझी घेतली. त्यावेळी त्यांनी केविन यांना देखील सोबतीला घेतलं. याच अनुभवाच्या वेळी केविन यांना मार्व्हल्स स्टुडियोमध्ये काम करावेसे वाटले. त्यावेळी मार्व्हल्स स्टुडियोचे प्रमुख अविया रेड होते, ज्यांनी मार्व्हल्सच्या 90 च्या दशकातील टीव्ही मालिकांची निर्मिती केली होती. केविन लवकरच मार्व्हल्सचे सह-निर्माते झाले. तेव्हा त्यांनी 'डेअरडेव्हिल्स' आणि 'हल्क' या दोन सिनेमांची निर्मिती केली. पण दोन्ही सिनेमे दुसऱ्या एखाद्या स्टुडियोसोबत बनवले होते. मार्व्हल्सचे 2006 सालचे तत्कालीन अध्यक्ष डेव्हिड नेशल यांना मार्व्हल्सचे सिनेमॅटिक युनिव्हर्स असावे असे वाटत होते. पण अविया रेड यांना ते मान्य नव्हते. त्यांना वाटत होते, आपण आपल्या सुपरहिरोंचे हक्क इतर कंपन्यांना विकायचे आणि नफा कमवायचा. त्यांच्या मताशी तत्कालीन सीईओ आयझ्याक झेक सहमत होते. त्यामुळे डेव्हिड नेशल यांना काही करता आले नाही. नंतर अविया रेड यांची ओळख केविन यांच्याशी झाली. केविन यांच्याकडे नवनवीन कल्पना होत्या. त्या कल्पना अविया रेड आणि सीईओ आयझ्याक झेक या दोघांनाही आवडल्या. तेव्हा या सर्वांनी एकत्र येऊन सिनेमॅटिक युनिव्हर्ससाठी काम करायचं ठरवलं.

केविन यांनी कर्ज घेऊन 2008 साली 'आयर्न मॅन' आणि 'द इन्क्रेडिबल हल्क' या दोन सिनेमांची निर्मिती केली. पैकी 'द इन्क्रेडिबल हल्क' सिनेमाचे हक्क युनिव्हर्सल स्टुडियोकडे असल्याने त्या दोन्ही कंपन्यांना एकत्र काम करावं लागलं. दरम्यान सिनेमाचा नायक एग्वर्ड रॉड आणि केविन यांच्यात वाद झाला. एग्वर्ड यांना तो सिनेमा त्यांच्या पद्धतीने बनवायचा होता. केविन यांना ते मान्य नव्हतं. शेवटी केविन यांनी एग्वर्ड यांना पुढील सिनेमांमधून काढून टाकले. सिनेमाला देखील चांगला व्यवसाय करता आला नाही. यानंतर केविन यांनी त्यांच्या कल्पकतेने काम केले. त्यांनी जॉन फेवेन्यू आणि रॉबर्ट द्वानी ज्युनियरला सोबत घेऊन एका अशा सुपरहिरो सिनेमाची निर्मिती केली, ज्याच्याबाबत बऱ्याच जणांना जास्त काही माहित नव्हते. केविन आणि मार्व्हल्सने मोठ्या हिमतीने हे धाडसी पाऊल उचलले होते. आणि तो सिनेमा होता 'आयर्न मॅन'. आणि हा सिनेमा मार्व्हल्सचा पहिला सुपरहिट सिनेमा ठरला. हा सिनेमाला प्रेक्षक पसंत करतील की नाही, याचा विचार न करता त्यांनी पुढील सिनेमांवर आधीच काम करणे सुरु केले होते. म्हणजेच आयर्न मॅनचे शुटींग होत असताना केविन फायगी 'थॉर', 'कॅप्टन अमेरिका - द फर्स्ट अव्हेंजर' आणि 'द अव्हेंजर्स' सिनेमांच्या स्टोरीलाईनवर काम करत होते. नुसते काम करत नव्हते, तर त्यांनी या सिनेमांची घोषणा 2006 च्या कॉमिकॉन समारंभात केली होती.

पुढे जाऊन मार्व्हल्स स्टुडियोला डिज्नेने 4 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केले. त्या दरम्यान डेव्हिड नेशल यांनी सेवानिवृत्ती घेतल्यावर मार्व्हल्सची सर्व सूत्रे केविन फायगी यांच्या हाती आली. ते मार्व्हल्स स्टुडियोचे अध्यक्ष झाले. केविन यांना हेच हवे होते. त्यांनी आपल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सलच्या पहिल्या टप्प्यात तब्बल सहा सिनेमांची निर्मिती केली. यामध्ये 'आयर्न मॅन', 'द इनक्रेडिबल हल्क', 'आयर्न मॅन 2', 'थॉर', 'कॅप्टन अमेरिका - द फर्स्ट अव्हेंजर' आणि 'द अव्हेंजर्स' या सिनेमांचा समावेश होतो. मोठ्या प्रमाणात सुपरहिरो एकत्र आणून त्यांना न्याय देत 'द अवेंजर्स' हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. त्या सिनेमाने अनेक विक्रम नोंदवले.

आपल्याला मिळालेल्या या यशाने होळपळून न जाता केविन यांनी पुढील टप्प्याची घोषणा केली. ज्यामध्ये त्यांनी 'आयर्न मॅन 3', 'थॉर - द डार्क वर्ल्ड', 'कॅप्टन अमेरिका - द विंटर सोल्जर', 'गार्डियन ऑफ द गॅलेक्सि', 'अव्हेंजर्स - एज ऑफ अल्ट्रॉन' आणि 'अँट मॅन' अशा एकापाठोपाठ एक सहा सिनेमांची निर्मिती केली. दरम्यात 'थॉर - द डार्क वर्ल्ड' सिनेमामध्ये थोडा गोंधळ झाला. त्यामुळे त्यांनी सिनेमाच्या दिग्दर्शिका पेटी जेनकिन्स यांना सिनेमा सोडायला सांगितलं, तो सिनेमा मग अॅलन टेलर यांनी दिग्दर्शित केला. दिग्दर्शक इग्वार्ड यांच्या जागी पॅटॉन रिड यांनी 'अँट मॅन' सिनेमा दिग्दर्शित केला. 'आयर्न मॅन' दिग्दर्शित करण्यासाठी जॉन फेवेन्यू यांनी नकार दिला. तो सिनेमा शेन ब्लॅक यांनी दिग्दर्शित केला. केविन यांची इच्छा होती, 'अव्हेंजर्स - एज ऑफ अल्ट्रॉन' हा सिनेमा जॉन फेवेन्यू यांनी दिग्दर्शित करावा. पण काही कारणांमुळे ते शक्य नाही झाले. मग तो सिनेमा जॉश विडेन यांनी दिग्दर्शित केला. पण त्या सिनेमाला 'द अव्हेंजर्स' प्रमाणे यश मिळाले नाही. यामुळे आयझ्याक यांना चिंता वाटू लागली. त्यांनी पुढील सिनेमांसाठी जास्त पैसे न गुंतवण्याचा विचार केला. पण त्यानंतरचा 'आयर्न मॅन 4' हा केविन फायगी यांचा महत्वाकांक्षी सिनेमा होता. कोणत्याही परिस्थितीत त्यांना तो बनवायचाच होता. सिनेमाच्या बजेटचा विचार करून आयझ्याक यांनी त्या सिनेमामधून रॉबर्ट द्वानी ज्युनियरला काढण्याचे सुचवले. त्यावर केविन फायगी इतके भडकले, की त्यांनी मार्व्हल स्टुडियो सोडण्याचा निर्णय घेतला. बऱ्याचशा वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी बरेच दिवस ब्रेकिंग न्यूज म्हणून होती. पण डिज्ने स्टुडियोचे सी.इ.ओ. बॉब आयगर यांनी अॅलन हॉन यांच्यासोबत पुढाकार घेतला आणि केविन यांना हवा तसा सिनेमा बनवण्यासाठी सहाय्य्य केलं. नंतर रुसो भावंडांच्या दिग्दर्शनाखाली त्या सिनेमाचे नाव 'कॅप्टन अमेरिका - सिव्हिल वॉर' असे निश्चित झाले. आणि त्या सिनेमाने काय कमाल करून दाखवले हे आपल्या सर्वांना माहितच आहे. याच सिनेमाने सोनी स्टुडियोच्या स्पायडरमॅनला मार्व्हल कुटुंबात आणले.

केविन यांच्या डोक्यात मग वेगळी कल्पना आली, त्यांनी नवनवीन दिग्दर्शकांना संधी द्यायचे ठरवले. मग 'थॉर – रॅग्नारॉक' टायको भटीडी यांनी, आणि 'ब्लॅक पँथर' इयान वोग्लर यांनी दिग्दर्शित केले. या दिग्दर्शकांनी आपल्या दिग्दर्शनातून ते करून दाखवले जे गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या दिग्दर्शकांना करता आले नाही. पण या सर्व घडामोडींचे सर्व श्रेय अर्थातच केविन फायगी यांनाच जाते. त्यांनी नंतर 'अव्हेंजर्स - इन्फिनिटी वॉर' आणि 'अव्हेंजर्स – एन्डगेम' असे दोन्हीही मोठे सिनेमे रूसो भावंडांना दिग्दर्शित करण्यासाठी दिले. कारण 'कॅप्टन अमेरिका - सिव्हिल वॉर' सिनेमामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात सुपरहिरो सोबत घेऊन प्रत्येक सुपरहिरोला न्याय दिला होता.

'अवेंजर्स एन्डगेम'ने जगाला वेड लावले आहे. नुकतेच या सिनेमाने आणि 'अवतार' या सिनेमांच्या कमाईचे विक्रम मोडत जगभरात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम केला आहे. पण तुम्हाला माहित आहे का? केविन यांनी त्यांच्या पुढील सिनेमांची लिस्ट आधीच करून ठेवली आहे. त्याविषयी लवकरच बोलू.

लेखक: अभिषेक ठमके

मोबाईल: 9768650098

ईमेल: abhishek.thamke@gmail.com

(लेखक साय-फाय विषयाचे अभ्यासक आणि ई-पुस्तक प्रकाशक आहेत.)

आरंभ: जून २०१९

संपादक
Chapters
आरंभ टीम संपादकीय (जून 2019) आई नावाचं विद्यापीठ - अविनाश हळबे केविन फायगी – अभिषेक ठमके मोहुनिया तुजसंगे - हेमंत बेटावदकर दादामामा: एक प्रसन्न व्यक्तिमत्व - किरण दहीवदकर फॅमिली फार्मसिस्ट - आशिष कर्ले आमच्या वेळेस असं होतं? - निमिष सोनार दुष्काळ: महाराष्ट्राची एक शोकांतिका - मयुर बागुल स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी! - विक्रम अरने मार्कंडा महादेव मंदिर, गडचिरोली - प्रतिक पुरकर नाशिकची त्रिरश्मी लेणी - अजित मुठे आफ्रीका आणि यु.ए.ई ! - अविनाश लोंढे पुलवामा हल्ला- अक्षता दिवटे माहेरची चैत्रगौर - श्रेया गोलिवडेकर रजोनिवृती - अभिलाषा देशपांडे छत्री दिसलीच पाहिजे - भरत उपासनी कथा: अद्वैत - सविता कारंजकर कथा: प्रेमात पडताना (भाग 1)- सत्यजीत भारत बाल कथा: ते दोन अद्वितीय - लेहिनी नायर, मलेशिया शनि ग्रहाचे महत्व – मंजुषा सोनार त्या रात्री मला कोण बरे भेटले? – प्रभाकर पटवर्धन कुठे असेल नागी? - सारिका उबाळे असावे घरकुल आपुले छान - भरत उपासनी आमची आजी म्हणायची! - श्रेया गोलिवडेकर एक वात्सल्यपूर्ण पिता - प्रिया निकुम सात लघु लेख - अभिलाषा देशपांडे कविता: गरिबीतील जीवन - सुवर्णा कांबळे कविता: पोरी पदर तुझा सावर - सुवर्णा कांबळे कविता : तू जीवनात आला आणि असं वाटलं - प्रिया निकुम कविता संग्रह: शारदेय (भाग1) - कपिल नवले चारोळी: दर्शन - सिद्धेश प्रभुगावकर फिल्मी गॉगल: चोरीचा मामला - निमिष सोनार एक विचार: पाकीट - उदय जडिये एक विचार: वाढदिवस - उदय जडिये ग्राफिटी: अविनाश हळबे व्यंगचित्रे: सिद्धेश देवधर त्रिरश्मी लेणी : फोटोग्राफ्स