मुंबई ते गाव - संकेत मुळगांवकर
तसं लहानपणापासून आत्तापर्यंत खूप प्रवास झाले असतील पण त्या सगळ्या मध्ये सर्वांत जास्त वेळा केलेला प्रवास कोणता असेल तर तो मुंबई ते गाव आणि गाव ते मुंबई असा प्रवास.
लहानपणी खूप कुतूहल वाटायचं सुट्टी लागली की गावी जायचं, मज्जा करायची. पेपर कधी संपणार आहेत हे बघून बाबा ट्रॅव्हल्सचं तिकीट reserve करायचे, पेपर संपले रे संपले की आम्ही उद्या गावाला जाणार आहे हे मित्राला सांगायची मजा काही निराळीच. मी गावाला जाऊन काय काय करणार आहे हे मित्राला सांगत मग घरी यायचं. शाळेचं ओझं कोपऱ्यात टाकायचं, ते शाळा सुरू होईपर्यंत त्याच्याकडं बघायचं पण नाही आणि मग गावाला जायची तयारी सुरू.
बॅग भरून संध्याकाळी सर्वजण गावी जायला सज्ज. मग सामान घेऊन गाडी येण्याचा ठिकाणावर जायचं अनेक रंगबेरंगीरंगीबेरंगी ट्रॅव्हल्स आधीच ऐटीत तिथे उभ्या असतात त्यात नेमकी आपली कोणती, हे बाबा शोधून काढतात आणि मग सामान गाडीत चढवून आम्ही सगळे आमच्या जागेवर स्थिरावतो.
या प्रवासात मला अजून एक आवडणारी गोष्ट म्हणजे टी.व्ही. प्रवासात आपल्या मनोरंजनाची केलेली सोय. अनेक नवनवीन चित्रपट मी अशा प्रवासात पाहिले असतील.
मग साधारण रात्री 2 ते 3 च्या दरम्यान गाडी हॉटेल वर थांबायची. मग बाबांचा हात पकडून गाडीतून खाली उतरायचे आणि "काय पाहिजे?" असं बाबांनी विचारलं की मग 2-3 वेफर्सची पाकिटं, फ्रुटी किंवा स्लाइसची बॉटल घेऊनचं परत गाडीत परतायचे, सगळं हळूहळू चित्रपट बघत फस्त करायचे आणि मग कधी झोप लागायची कळायचंच नाही.
वाऱ्याची झुळूक खिडकीतून आत येऊन गालावर हळुवार स्पर्श करून गेली की अचानक जाग यायची, बाहेर पहावे तर दूरवर फिकट दिसणाऱ्या त्या डोंगररांगा, उसाचं किंवा झेंडूच्या फुलांचं रान, कौलारू, दगडी घरं, तांबडी मातीची जमीन आशाअशा अनेक गोष्टी पाठीमागे टाकत गाडी पुढे जात असते आणि मग गावाला जायची ओढ अजूनच वाढते. मनाचा वेग गाडीच्या वेगापेक्षा जास्त असतो. ते कधीच गावी जाऊन हुंदडून आलेले असतं.
शेवटी गाडी पोहोचते आणि बाबा समान उतरून घेतात. स्टॉपपासून गाव लांब असल्यामुळे घरातलं कुणीतरी मदतीला आलेलं असतं, सगळं समान डुगडुग्यात (गावची रिक्षा) भरून आम्ही गावात जातो, त्या डुगडुग्याचा आवाज एवढा असतो की संपूर्ण गावाला कळतं की गावात कुणीतरी आलंय, सकाळचं कोवळं ऊन आणि वाऱ्याची थंड झुळूक असं संमिश्र वातावरण शरीराला जाणवत असतं आणि एक विशिष्ट प्रकारचा तलम सुगंध वाऱ्यावर पसरलेला असतो.
असं हे शुद्ध वातावरण शहरात मिळणं कठीणच!!!
लेखक: संकेत मुळगांवकर
ईमेल: sanketmulgavkar72@gmail.com