Get it on Google Play
Download on the App Store

कोकणातील दुर्गम खडतर प्रवास - प्रभाकर पटवर्धन

पंच्याहत्तर ते ऐशी दरम्यानचा काळ.

कोकणातील एका दुर्गम खेड्यातून जिल्ह्याच्या ठिकाणाकडे जाण्यासाठी करावा लागणारा प्रवास कसा होता ते सांगतो.  त्यावेळी मी डोरले नावाच्या एका खेडेगावात राहत होतो. हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी तालुक्यात मुचकुंदी नदीच्या काठी वसलेले आहे .नदीच्या दक्षिण तीरावर हे गाव वसलेले आहे. पूर्वगामीनी असलेली ही नदी नंतर मोठे वळण घेऊन पश्चिमगामीनी होते व पूर्णगड येथे समुद्राला मिळते.

 त्या काळी पूल रस्ते हे अभावानेच होते. त्यामुळे सगळा प्रवास होडीतून किंवा पायी किंवा समुद्रातून बोटीतून करावा लागे. जिथे रस्ते होते तिथेही लहान लहान नद्यांवर पूल नव्हते व त्या नद्या पावसाळ्यात वाहात असल्यामुळे  रस्त्यांवरील वाहतूकही बंद पडत असे. त्यामुळे पायवाट नंतर होडी, असल्यास रस्ता, मिळाल्यास त्यावरील कोणतेही वाहन नाही तर पायी असा प्रवास करावा लागे. काही नद्यांमध्ये वाळू होती तर काहींमध्ये घनदाट चिखल असे .

भरतीच्या वेळेला होडी धक्क्याला  लागे ओहोटी असल्यास ती लांब नदीत उभी राही.ओहोटीच्या वेळी पाण्यातून कपडे व सामान सांभाळत होडीपर्यंत जावे लागे .चिखल काही वेळा निसरडा असे अशा वेळी चिखलातून तोल सांभाळत जाणे मोठे कठीण असे.  एका हातात चपला त्याच हाताने कपडे सावरणे व दुसऱ्या हातात सामान् अशा प्रकारे चालत जाऊन होडीत बसावे लागे. चिखलाने बरबटलेला पाय धुणे हा एक मोठा कार्यक्रम असे .होडीमध्ये पाणी चिखल इत्यादीमुळे बसण्याच्या जागा खराब झालेल्या असत त्यावर बसणे मोठे मुष्किल असे .त्या काळी एसटी गाड्या नव्हत्या सर्व्हिस मोटारी असत.त्यामध्ये ड्रायव्हर शेजारी डाव्या उजव्या बाजूला दोघेजण फ्रन्टला निदान एक तरी बसत असे.एकूण ४/५ जण पुढे बसत .ड्रायव्हरच्या मागे एक किंवा दोन कम्पार्टमेंट असत त्याला ज्यादा आकार द्यावा लाग.मागे हौदा असे त्यांमध्ये किती माणसे  कोंबावीत त्याला काही हिशोब नसे।टपावर दहावीस माणसे बसणे हे अगदी सामान्य असे. टपावर बसल्यावर वाटेत झाडांच्या फांद्या असत त्या आल्या की क्लिनर खाली वाका म्हणून सांगे. नाही तर डोके उडून जावयाचे. आपणही समोर लक्ष ठेवून बसावे लागे.नेहमी प्रवास करणाऱयांना फांद्या केव्हा येणार याची बरोबर कल्पना असे. मोटारींमध्ये प्रचंड उकडत असे. घामाच्या धारा लागलेल्या असत .त्यामुळे टपावरचा प्रवास आल्हाददायी वाटे.

त्या काळी चपला नसत. वहाणा असत वहाणा ही थोडीबहुत चैनीची गोष्ट होती. होडी संबंधी एक गोष्ट सांगावयाची राहिली. ज्याने तरीचे कॉन्ट्रेक्ट घेतलेले असे त्याला मोठ्या नदीवर  दोन होड्या ठेवणे सक्तीचे असे. एक होडी लहान असे व दुसरी मोठी .सरकारकडून लिलावात एका वर्षासाठी एखाद्या नदीवर एखाद्या ठिकाणी होडी चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले जाई. दुसऱ्या कुणाला उतारुंची वाहतूक करण्याची परवानगी नसे. कॉन्ट्रॅक्टरला सरकारने ठरवलेल्या दराप्रमाणे पैसे देऊन त्याशिवाय खाजगी होडीवाल्याला ज्यादा पैसे दऊन प्रवास करता येई. वेळकाढूपणा करून काम केल्याशिवाय पैसे गोळा करण्याची  प्रवृत्ती असे. या मक्ता घेतलेल्या होडीला तर असे म्हटले जाई व त्याचा मालक तरवाला.जिथे उतारुंची वाहतूक मोठ्या प्रमाणात असे तिथे खासगी होड्या असत . अन्यथा तर वाल्यांवर अवलंबून राहावे लागे.  आता प्रत्यक्ष प्रवास कसा करावा लागे त्याला किती वेळ लागे ते पाहू या.

आम्ही राहतो होतो तिथून निघाल्यावर प्रथम दहा मिनिटे चालत नदीला असलेल्या बांधावर यावे लागे. हा बांध मळा व नदी यांच्यामध्ये मळ्याच्या संरक्षणासाठी होता .तर पैलतीरावर गेली असल्यास तिची वाट पाहावी लागे. त्यामध्ये किती तरी वेळ जाई. भरती ओहोटी प्रमाणे सरळ रेषेत तर न जाता ती तिरकी तिरकी जाइ व पुन्हा कडेने आपल्यापर्यंत येइ. पैल तिरावर गेल्यावर चालत चालत एक डोंगर चढून नंतर सड्यावरून म्हणजे डोंगराच्या  माथ्यावरून कातळावरून उन्हात  चालत जावे. लागे कातळ म्हणजे डोंगर माथ्यावरील केवळ दगडाचा असलेला भाग. नंतर कच्चा गाडीरस्ता लागे. पुन्हा घाटी उतरल्यावर गावखडी नावाचे गाव लागे त्यातून चालत चालत नदी किनारी यावे लागे. आता पुन्हा मुचकुंदी नदी ओलांडावी लागे. या ठिकाणी वाळू होती चिखल नव्हता परंतु तरवाला तर फार लांब पाण्यात उभी करी. त्यामुळे केव्हा केव्हा कंबरभर पाण्यातूनही चालत जाऊन होडीत बसावे लागे. सर्व कपडे भिजून जात. नदी ओलांडल्यावर पूर्णगड येइ. येथून रत्नागिरीपर्यंत बऱ्यापैकी गाडी रस्ता होता. मोटारींच्या फेऱया फारच कमी असत कारण प्रवासी विशेष नसत. मोटार मिळाल्यास मोटार अर्थात खिशात पैसे असल्यास नाहीतर उन्हातून चालत आठ किलोमीटर अंतर चालल्यावर पावस  नावाचे गाव येई.वाटेत एक पूर्णगडची घाटी चढावी व दुसरी पावसची घाटी उतरावी लागे. पावसचे हे अंतर आठ किलोमीटर होते .येथून रत्नागिरीला मोटारी जास्त प्रमाणात होत्या. त्यामुळे मोटार मिळण्याचा संभव जास्त असे.

पावसपासून मोटारीतून भाट्ये नावाच्या गावापर्यंत मोटारी येत. हे अंतर सुमारे चौदा किलोमीटर होते आता पुन्हा एक खाडी ओलांडावी लागे ही खाडी मोठी होती. पलीकडे जिल्ह्याचे ठिकाण रत्नागिरी होते. रहदारी खूप असे व त्यामुळे खासगी होड्या पटकन मिळत. तरीवर अवलंबून राहावे लागत नसे.पलीकडे गेल्यावर सुमारे एक दीड किलोमीटरवर  चालल्यावर रत्नागिरीची बाजारपेठ येई.

आपले दैव चांगले असेल व सर्व गोष्टी पटापट होत गेल्या तर दुपारपर्यंत रत्नागिरीला पोहोचता येई व आपली सर्व कामे आटपून संध्याकाळी पाच सहाला निघता येई.  पुन्हा सर्व गोष्टी मनासारख्या होत गेल्या तर रात्री नऊ वाजेपर्यंत डोर्ले गावी पोचणे शक्य होत असे. जर दैव अनुकूल नसेल व ते बऱ्याच वेळा नसायचे अशावेळी सामान्यतः रत्नागिरीला कोणाकडे तरी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी उरलेली कामे निपटून नंतरच निघून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत डोरले गावी पोचता येई.जर पावसाळी दिवस असतील तर सर्वच अनिश्चित असे नद्या भरलेल्या असल्यास मोटारी पुढे जात नसत ठिकठिकाणी अडकून पडत पेट्रोल पंप नसल्यामुळे गाड्यांना लागणारे पेट्रोल कॅनमधून रत्नागिरीहून भाट्ये येथे आणावे लागे.

रत्नागिरी मुंबई रत्नागिरी कोल्हापूर इत्यादी मार्गावर चालणाऱया सर्व्हिस मोटारी जुन्या झाल्यावर त्या भंगारमध्ये या रूटवर येत त्यांची किंमत सुमारे हजार रुपयांपर्यंत जास्तित जास्त असे.त्या वारंवार बिघडत मध्येच बंद पडत व मग नंतर पुढचा मुक्काम चालत चालत जावे लागे.

कोणी आजारी झाल्यास त्याला डॉक्टर किंवा वैद्यापर्यंत न्यावयाचे झाल्यास डोलीशिवाय दुसरा काही उपाय नव्हता.डोली म्हणजे पाळण्याला वरून एक बांबू टाकून पुढच्या बाजूला एक गडी व मागच्या बाजूला एक अशा प्रकारे केलेली  वाहन व्यवस्था .वृद्ध लहान मुले माहेरवाशिणी इत्यादीसाठी हीच वाहन व्यवस्था असे. रत्नागिरीपर्यंत मोडतोड झालेल्या किंवा आजारी असलेल्या व्यक्तीला नेणे फारच दुरापास्त होते.

मी काही वेळा रत्नागिरीला जाताना चालतच जात असे. अगदी वाटेवर नाही परंतु थोडे आडबाजूला मावळंगे गोळप अशी दोन गावे लागत. मावळंग्याला माझ्या वडिलांचे मामा असत तर गोळपला माझी आते होती. मी पहिला मुक्काम मावळंगे, दुसरा गोळप व तिसरा रत्नागिरी,अशा प्रकारे तीन दिवसांनी रत्नागिरीला पोचत असे. मावळंग्याला जाताना दालदी व खारवी वाड्यातून जावे लागे (दर्यावर्दी मुसलमान कोळ्यांना दालदी म्हणत व दर्यावरदी हिंदू कोळ्यांना खारवी म्हणत).  

रस्त्यावर मासळी वाळत टाकलेली असे उग्र दर्प सर्वत्र दरवळत असे त्यामधून मागे पुढे वाट काढीतजावे लागे. डोरले ते रत्नागिरी हे एकूण अंतर सुमारे पंचवीस किलोमीटर असावे. हा टप्प्या टप्प्याचा प्रवास ,कधी कधी, मी करीत असे त्यावेळी माझे वय सुमारे अकरा बारा वर्षे असावे. असा होता तो प्रवास व असे होते ते (मंतरलेले) दिवस. केव्हा केव्हा असे वाटते की मुक्कामाकडे लक्ष ठेवून घाईगर्दीने केलेल्या प्रवासापेक्षा असा रमतगमत केलेला प्रवास जास्त आनंददायी असतो.               

लेखक: प्रभाकर पटवर्धन
ईमेल: pvpdada@gmail.com

आरंभ: मार्च 2019

संपादक
Chapters
आरंभ टीम संपादकीय लडाख ऑन व्हिल्स – अजित मुठे भुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे छायाचित्रे: भुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे केरळ टूर - अनुष्का मेहेर भाजे लेणी, लोणावळा - स्नेहल घोलप कोकणातील दुर्गम खडतर प्रवास - प्रभाकर पटवर्धन अशी ही मनाली, खूप खूप भावली - रिता जोहरापूरकर/ वनिता महाजन भावस्पर्शी व्यक्तिचित्र भाग १- किरण दहिवदकर मुसळधार पावसात कोकणाकडे - अमित चाळके पंढरीची वारी: एक अनुभूती! - नवनीत सोनार बंगलोर येथील इस्कॉन मंदिर - अक्षता दिवटे बँगलोर मधील ओरियन मॉल - अक्षता दिवटे म्हैसूर दर्शन - अक्षता दिवटे माझा शॉर्ट दक्षिण भारत प्रवास - निमिष सोनार खिडकी शेजारची जागा - ओमकार बागल मुंबई ते गाव - संकेत मुळगांवकर औषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे - आशिष कर्ले रेसिपी: चायनीज व्हेज मंचुरियन (ड्राय) - मंजुषा सोनार माझे स्केच - मधुरा दहिवदकर माझे काही व्यंगचित्र - प्रिया भांबुरे (निकुम)