खिडकी शेजारची जागा - ओमकार बागल
मुंबईतील लोकल ट्रेन तशी अधून मधून उशिराच येते. प्रवाशांनाही या गोष्टीची सवयच जडली आहे. जशी प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढत होती तशी जोशींच्या हृदयाची धडधडदेखील वाढत चालली होती. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे खिडकीशेजारील जागा. आज आपल्या हातून आपलं हक्काचं सिंहासन निसटणार याची त्यांना चुणचूण लागली असावी. आमचे जोशीबुवा म्हणजे खूप वल्ली माणूस हो!! गेल्या १५ वर्षांत खिडकीशेजारील जागा पकडून ट्रेनने प्रवास करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असावा. विश्व विक्रमाची नोंद ठेवणाऱ्यांना ही गोष्ट ध्यानातच आली नसावी, नाहीतर भारताच्या नावे अनोखा असा विश्वविक्रम जोशींनी रचला असता यात काही शंका नाही.
असो. इतक्यात माझं लक्ष एका इसमाकडे गेलं. प्लॅटफॉर्मवरचा एक प्रवासी जोशींकडे सारखा पाहत होता. मी जोशींच्या कानात हळूच पुटपुटलो, "अहो जोशी, तो समोरचा माणूस तुमच्याकडे चोरट्या नजरेने वारंवार पाहत आहे." जोशी म्हटले, "हो, मीही आताच पाहिलं" त्यावर मी म्हटलं, "तुम्हालाही तेच वाटतंय का जे मला वाटतंय?" जोशी उत्तरले, "हो, मलाही असंच वाटतंय कि याची माझ्या नेहमीच्या खिडकीशेजारील जागेवर वाईट नजर आहे, पण मीही हाडाचा मुंबईकर आहे, इतक्यात हार कसला मानतोय, त्याला माझी जागा अजिबात बळकावू देणार नाही, बघच तू." जोशींचं हे वाक्य ऐकून मी तूर्तास तरी गप्प राहायचं ठरवलं, आधीच गर्दीने डोकं गरम झालं होतं आणि हा माणूस नाहकच डोक्यात कुकरच्या शिट्ट्या वाजवत चालला होता. कुकरमधील भात शिजायला तीन शिट्ट्या लागतात म्हणे, माझ्या बुद्धीने तर जोशींसमोर एकाच शिट्टीत शिजणे पसंत केले होते.
एव्हाना मला असं वाटू लागलं होतं कि ट्रेन चालकाला बहुधा लहानपणी खेळण्यातील 'झुकझुक झुकझुक आगीनगाडी' हे गाणं माहितच नसावं किंवा चालक नवीन असावा त्यामुळे त्याचा ट्रेन चालवण्याचा जास्त सराव झाला नसेल. असा मनातल्या मनात विचार करत होतो इतक्यात ट्रेन आली आणि लोकांची जी झुंबड उडाली की बस्स. आमच्या जोशींच रूपांतर बाहुबलीत झालं कि काय असंच मला वाटतं होतं. हातातील बॅग म्हणजे जणू त्यांना तलवार वाटतं असावी आणि एका एका माणसाला मागे रेटून ते पुढे चालले होते. त्या वाकड्या नजरेच्या माणसाला तर ते भल्लालदेव समजत होते कि काय देव जाणे. त्याच्याकडे बघितलं कि जोशींची पावलं आणखी जोरात पुढे जात होती. आणि साऱ्यांना बाजूला धडकावून जोशींनी त्यांचं सिंहासन कायम राखण्यात यश मिळवलं होतं. लढाई जिंकल्यावर जशी विजयीमुद्रा देतात अगदी तशीच मुद्रा दाखवत मला त्यांच्या समोर बसण्यासाठी त्यांनी हातवारे केले. त्या माणसाकडे बघतच जोशींनी त्याला एक दीर्घ स्मितहास्य देऊन पुन्हा भेटू असा इशाराच केला असावा. अशी आमची मुंबई, मुंबईकर जोशीबुवा आणि त्यांची खिडकी शेजारची जागा.
लेखक: ओमकार बागल
ईमेल: omkardbagal2@gmail.com