केरळ टूर - अनुष्का मेहेर
केरळ.. देवभूमी म्हणतात केरळला.. किती समर्पक ना..
आम्ही हैद्राबादला राहत असताना केरळला जायचं ठरवलं. आम्ही 2012 ला गेलो होतो. आधी सगळं प्लॅन केलं. मी आणि नवऱ्याने केलेल्या प्लॅनचा आवाका फार मोठा होता. कोची पासून स्टार्ट करून अल्लेपी, कोवलम, तिरुअनंतपूरम, कन्याकुमारी, मुन्नार, थेककडी नंतर परत कोची मार्गे आथिरापल्ली वॉटरफॉल आणि शेवट थ्रीचुरला गुरुवायूर मंदिर आणि त्या दिवशी ट्रेननी मुंबई गाठायची होती कारण आईचा सेवानिवृत्तीचा समारंभ होता. आम्हांला थोडंस आरामात करायचं होतं आणि हातात फक्त नऊ दिवस होते म्हणून आम्ही कॅब बूक केली जी आम्हांला कोचीच्या एअरपोर्टवर घ्यायला येणार होती आणि परत थ्रीचुर रेलवे स्टेशनला शेवटच्या दिवशी सोडणार होती. गूगल वरून एका कॅब ड्रायवरला शोधला.
तर हैद्राबाद वरून कोचीला पोहोचलो. कोची शहर, वेम्बनाड लेक मधल्या बॅकवॉटरची राईड करून आम्ही कोवलम च्या बीच रिसॉर्ट वर राहायला आलो.तिथून कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रमला आलो..
अगदी अमेझिंग टूर चालली होती. जवळ पास सगळंच बघून झालं आणि होता होता शेवटचा दिवस आला. आता पर्यंत जे आम्ही बघितलं होतं ते सगळेच बघतात पण शेवटचा दिवस जो आम्ही अनुभवला तो मात्र अनुभव खूपच भारी होता जो सहसा कोणी अनुभवला नसेल. तो दिवस म्हणजे चेरी ऑन द टॉप होता.
वरच्या सिक्वेन्स प्रमाणे आम्ही सगळ्यांत शेवटी थेककडीला पोहोचलो आणि तिथून कोची मार्गे थ्रीचुरला जायचं होतं. आम्ही आधी थेककडीला जाऊन मग मुन्नारसाठी कॅब ड्रायव्हरने भरपूर प्रयत्न केले पण हॉटेल बुकिंग आधीच केल्या मुळे ते शक्य नव्हते. अगदी हायवे वर ज्या ठिकाणी मुन्नार आणि थेककडीचे फाटे फुटत होते तिथे कार थांबवून ड्रायवर आम्हांला म्हणाला हॉटेल मध्ये बोलून काही होतंय का ते बघा. पण नाहीच झालं. शेवटी हनिमूनर्सचा पॅरडाईज असलेल्या मुन्नारला पोहोचलो..
मुन्नार..अशक्य सुंदर..
आजही मुन्नार म्हटल्यावर माझे तिथले दिवस मला आठवतात..
तर मुन्नारला अलविदा करुन आम्ही थेककडीला पोहोचलो. केरळ इतकं सुंदर आहे की सतत बघून ही आणि नऊ दिवस उलटून गेले तरी एकदाही घराची आठवण आली नाही. केरळ म्हणजे अगदी पाचूच. गर्द हिरवाई आणि समुद्राची नवलाई. खरंच. 'Gods own country' म्हणतात ते काही खोटं नाही.
तर शेवटचा दिवस उजाडला. आम्ही होम स्टे मध्ये राहिलो होतो. तिथल्या अँटीने गरम गरम घरगुती छानसे डोसे आणि ताज्या नारळाची हिरवीगार चटणी दिली होती. एका मागून एक किती डोसे खाल्ले त्याला काही गणतीच नाही. अमेझिंग टेस्ट. आपण इतकं खाऊ शकतो याची झलक. सगळं चाटून पुसून फस्त. नंतर फिल्टर कॉफी तर वर हवीच.
भरपेट नाश्ता करून आम्ही निघालो. तेव्हां माहितही नव्हतं की आजचा दिवस गोड गोड वळसे घेत आपल्या स्मृतीमध्ये कायमचा विराजमान होणार आहे. सकाळचे आठ वाजले असतील आणि आमचा प्रवास सुरु झाला. ड्रायव्हरच्या म्हणण्या प्रमाणे या रूटवर कोणीही येत नाही. कारण हा कोणाच्याही पायाखालचा रूट नाही.
कडाक्याची थंडी पडली होती. भरलेलं पोट त्या मुळे डोळ्यावर पेंग येत होती पण थेककडीच्या बाहेर पडलो आणि डोळे फाडून टाकणारा निसर्ग सुरू झाला. खरंच सांगते. रूट इतका वेगळा होता की रस्त्यावर एखाद दुसरा कोण माणूस दिसत असेल त्याला विचारून जायला लागायचं. तेव्हा GPS एवढा बोकाळला नव्हता. वळणावळणाचे रस्ते, बाजूला चहाचे मळे, त्यात चहाची पानं खुडत असलेल्या बायका, सर्वत्र पसरलेलं धुकं.. ओहो इतका मनमोहक निसर्ग पसरला होता बाहेर की आम्ही दोघंही भान हरपून पाहत होतो. मैलो गणती फक्त चहाचेच मळे. ते इतके सुंदर दिसत होते ना की बस. अशी गावच्या गावं मागे पडत होती.
आधुनिकतेचा वरवंटा फिरण्याआधी त्या गावांनी जपलेलं ते छानसं गोजिरं रुपडं होतं. तेव्हां वाटलं की मुन्नारला खूप बाजारू स्वरूप आलंय. टुरिस्टची टोळधाड पडण्याआधी मुन्नार कसं अजून निसर्गरम्य मोहक दिसत असेल याची ती झलकच होती. मध्येच एका घरी आम्ही वॉशरूम साठी गेलो. बोर्डच होता तसा. पण वहिवाटाचा रस्ता नसूनही किंवा कोणी टुरिस्ट येण्याची खात्री नसतानाही वॉशरूम एकदम स्वछ. म्हणजे टूरिझम किती तळागाळात पोहोचलंय बघा. रस्ता मात्र संपतच नव्हता. खरंतर ते मळे तो रस्ता संपूच नये असं वाटत होतं. नंतर मला राहवलं नाही. नवऱ्याला सांगितलं मला पण चहाची पानं खुडायची आहेत. कार थांबवून मी पण मळ्यात गेले. त्या बायकांकडे जाऊन टोपली मागितली. त्यांना इंग्लिश येत होतं. याचं मला आश्चर्य नाही वाटलं कारण हैद्राबादची सवय झाली होती. पूर्ण साऊथ मधे इंग्लिश बोलता येणं हा इशू नाहीच आहे. कोणालाही येऊ शकतं. तर मी त्या बायकांशी छान गप्पा मारत चहाची पानं खुडत होते. इतकं अमेझिंग वाटत होतं ना.
खूप सारे फोटो घेऊन आम्ही निघालो. (या वर्षी झालेल्या पुरामध्ये इडूक्की जिल्ह्याचं फार नुकसान झालं त्या गावांना त्याची नक्कीच झळ पोहोचली असेल या विचाराने मन कासावीस होतं) थोड्या वेळाने तो रस्ता संपला तेव्हा मला फार अवघड गेलं. केरळ सोडणार आता याची फीलिंग यायला लागली. दुपार नंतर कोची जवळ आलो. कलाडी इथल्या आदी शंकराचार्यांच्या समाधीचे दुरून दर्शन घेतलं कारण तेवढा वेळ नव्हता. आता थ्रीचुरच्या मार्गावर लागलो.
पण आम्हांला आथिरापल्ली च्या वॉटरफॉल ला जायचं होतं. हा खूप फेमस आहे. सेम वॉटरफॉल जो बाहुबली मध्ये पण आहे.अर्थात तेव्हा काही बाहुबलीचा फर्स्ट पार्ट पण आला नव्हता आणि तो दाखवला आहे तेवढा मोठाही नाही. ती VFX ची कमाल आहे. आम्ही तिथे संध्याकाळी पाच वाजता पोहोचलो पण खाली जायचा रस्ता बंद झाला होता. (तोच रस्ता ज्यावरून शिवगामी खाली उतरते) त्या मुळे जे दिसलं (तेही प्रचंडच होतं) त्यावर समाधान मानून आम्ही निघालो. आता आमचं शेवटचं डेस्टिनेशन गुरुवायूरचं मंदिर खुणावत होतं. कसेबसे आम्ही रात्री साडे सात च्या दरम्यान गुरुवायूरला पोहोचलो. हे केरळ मधलं सगळ्यांत महत्वाचं मंदिर आहे. हे कृष्णाचं मंदिर आहे. याला दक्षिणे कडची द्वारका संबोधलं जातं. (या खालोखाल तीरुअनंतपुरम चं पद्मनाभ मंदिर जे सगळ्यात श्रीमंत आणि तितकंच गूढ देवस्थान आहे.) इथेच क्रिकेटर श्रीसंथचं लग्न झालं होतं.सोंडेला सोनेरी झूल पांघरून कितीतरी हत्ती उभे होते मंदिरात.अतिशय मोठा विस्तार आहे मंदिराचा. दक्षिणेच्या देवळांमध्ये टुरिस्ट ला जास्त महत्व नसतं. त्यांना त्यांचे वेगवेगळे विधी करायचे असतात. ड्रायवरने आम्हांला आधीच सांगितलं होतं दर्शन अवघड आहे कारण इथे खूप जास्त गर्दी असते आणि त्यात कार्तिक महिना असल्या मुळे जास्तीत जास्त लोकं दर्शन करतात. सबरीमलाचे काळे कपडे घालून ती लोकं पण खूप गर्दी करतातच. (आम्ही आमच्या प्रवासात सबरीमलाला जायचा जंगलातून गेलेला रस्ता बघितला) पण आम्ही आमचं लक ट्राय करायचं ठरवलं. पण असं झालं की सकाळपासून ट्रॅकवर चाललेल्या आमच्या नशिबाने आम्हांला दगा दिला. सरळ चालून बिचारं वैतागलं असेल.दर्शन मिळायला चार तास लागतील असं कळलं तोपर्यंत आमच्या ट्रेन ने कन्नूर (केरळ- कर्नाटक बॉर्डर वरचं स्टेशन)सुद्धा सोडलं असतं. तेव्हा खिन्न मनाने नुसता बाहेरून नमस्कार करून आम्ही प्रवासाला लागलो.
परतीच्या प्रवासात आमचा ड्रायवर आम्हांला म्हणाला, तुमच्या मुळे आज मी त्या रूट वरून आलो. गेली पंचवीस वर्षे मी टुरिस्टला फिरवतो पण बिलिव मी तुमच्या सारखं केरळ कोणी पाहिलं नाही. मला सुरुवातीला खूप कंटाळा आला होता तुम्हांला एवढं फिरवायचा पण पैशांसाठी आलो. तुमचं प्लांनिंग अगदी परफेक्ट होतं. खरंच सांगते मूठभर मांस चढलं.या वर्षी त्या देवभूमीची पुरामुळे वासलात लागली होती..हळूहळू केरळ पूर्वपदावर येतेय..त्या साठी गुरुवायूरच्या चरणी प्रार्थना!!
लेखिका: अनुष्का मेहेर
ईमेल: anushkameher9@gmail.com