जन्म
शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ, शिवनेरी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजीचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजीची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.[१] त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमध्ये वेगवेगळी तारीख दाखविलेली असते.
एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.