जीवन
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणार्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांची त्या ज्येष्ठ कन्या. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणार्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.
गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. ते स्वतः लोकहितवादीची शतपत्रे वाचत. आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले. लोकहितवादीच्या शतपत्रांतून ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचा निश्चय केला.