भारतावर व जगावर विवेकानंदांचा प्रभाव
स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व स्वामीजींच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला. काही विषय, व्यक्ती आणि प्रसंग यांवर त्यांनी कडाडून तोफ डागली. तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाची पाकळी ज्या हळुवारपणे उमलते तसा त्यांचा प्रभाव होता.
मानवी जीवनावर स्वामीजींच्या एकूण झालेल्या प्रभावाची खालीलप्रमाणे वर्गवारी करता येईल -
त्यांनी वेदान्ताकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली .
निस्वार्थी मानवसेवा हाच खरा धर्म होय, असे त्यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केले .
भारतातील राष्ट्रीय चळवळी, आध्यात्मिक चळवळी व इतर सामाजिक सेवाकार्ये या सगळ्यांच्या मागे प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरीत्या स्वामीजींची प्रेरणा होती व आहे.
पाश्चिमात्य जगात त्यांनी भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दूत म्हणून भूमिका बजावली.