शिकागोतील सर्वधर्मपरिषद
सर्वधर्मपरिषदेतील विवेकानंद
सप्टेंबर ११, १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. "जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यूयॉर्क क्रिटिक'ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की "ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत." वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.