गुरुभेट व संन्यासदीक्षा
याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या यास सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देवून संन्यासदीक्षा दिली. संन्यासग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष्य बनले. नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, "भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्वरीला श्रीरामकृष्णांकडे जा." एके दिवशी त्यांचे शेजारी सुरेंद्रनाथ यांच्याकडेच रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, 'नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.' काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, "हे सारे माझ्याने होणार नाही." रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, "काय ? होणार नाही? अरे तुझी हाडं हे काम करतील." पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण 'स्वामी विवेकानंद' असे केले.