आळंदी महात्म्य
आळंदीमाहात्म्य.
१
पुण्यभूमी आळंकावती । प्रत्यक्ष नांदे कैलासपती । आणि सिद्ध साधकां वस्ती । ब्रह्मा अमरपती आदिकरुनी ॥ १ ॥
ऐका अळंकापुरीची मात । स्वयें वर्णीत श्रीभगवंत । उपमेसि न पुरे निश्चित । वैकुंठ आदिकरुनी ॥ २ ॥
येथें तिन्ही मूर्ति अवतार । धरुनि करिती जगाचा उद्धार । मुळ अदि माया साचार । दह्री अवतार मुक्ताबाई ॥ ३ ॥
या चौघांचे स्मरणी । महापापा होय धुणी । येऊनि मुक्ती लागती चरणीं । ऐसें चक्रपाणी सांगत ॥ ४ ॥
नामया सांगे जगज्जीवन । या भूमीचें न करवें वर्णन । सेना घाली लोटांगण । वंदी चरण ज्ञानदेवाचें ॥ ५ ॥
२
धन्य अलंकापुर धन्य सिद्धेश्वर । धन्य ते तरुवर पशुपक्षी ॥ १ ॥
धन्य इंद्रायणी धन्य भागीरथी । तेथें स्नान जे करिती धन्य जन्म ॥ २ ॥
धन्य ते प्रयाग धन्य ते त्रिवेणी । वहाती येऊनि गुप्तरूपें ॥ ३ ॥
धन्य ते भूमी धन्य ते प्राणी । देखती नयनीं ज्ञानदेवा ॥ ४ ॥
धन्य ते भाग्याचे होती अळंकापुरी । तयाचा निर्धारी धन्य वंश ॥ ५ ॥
धन्य दासानुदास अळंकापुरीचा । सेना न्हावी त्याचा रजःकण ॥ ६ ॥
३
नामयाच्या नारायणें घेतली आळी । या भूमीचें महिमान सांगे म्हणे वनमाळी ॥ १ ॥
धन्य धन्य अलंकापुर धन्य धन्य सिद्धेश्वर । धन्य इंद्रायणि तीरीं राज्य करी ज्ञानेश्वर ॥ २ ॥
या भूमीचें वर्णन करूं न शके चतुरानन । महा क्षेत्र पुरातन पातकें नासती स्मरणें ॥ ३ ॥
सेना म्हणे जगज्जीवन सांगतसे जीवींची खूण । महा दोषा होय दहन ज्ञानदेव दरुशनें ॥ ४ ॥
४
नाम हें अमृत भक्तासी दिधलें । ठेवणें ठेविलें होतें गुप्त ॥ १ ॥
प्रत्यक्ष अवतार धरिला अलंकापुरी । मार्ग तो निर्धारी दाखविला ॥ २ ॥
कृतयुगामाजी वरिष्ठ जाणता । नाम तो घेतां नारद मुनि ॥ ३ ॥
कलियुगामाजी न घडे साधन । जातील बुडोन महा डोहीं ॥ ४ ॥
रामकृष्ण हरी गोविंद गोपाळ । स्मरा वेळोवेळां सेना म्हणे ॥ ५ ॥
५
धन्य महाराज अलंकापुरवासी । साष्टांग तयासी नमन माझें ॥ १ ॥
या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचें । उद्धरती तयाचें सकळ कुळें ॥ २ ॥
इंद्रायणी स्नान करिती प्रदक्षिणा । तुटती यातना सकळ त्याच्या ॥ ३ ॥
सेना म्हणे त्याचें धन्य झालें जिणें । ज्ञानदेव दरुशनें मुक्त होती ॥ ४ ॥
६
वाचें उच्चारी जो ज्ञानदेवाशी । तयाच्या सुकृतासी नाहीं पार ॥ १ ॥
पूर्वींचे सुकृत फळासि आलें । वाचें उच्चारिलें ज्ञानदेवा ॥ २ ॥
या अलंकापुरीं आला जन्मांसि । पूर्वज तयासी मानिती धन्य ॥ ३ ॥
सेना म्हणे त्यानें उद्धरिलें कुळ । पूर्वज सकळ आशिर्वाद देती ॥ ४ ॥
७
येउनी नरदेहासी वाचें उच्चारी ज्ञानेश्वर । तयाचा संसार सुफळ झालागे माये ॥ १ ॥
प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी । तारिलें जगासी नाममात्रें ॥ २ ॥
जयाचें आंगणीं पिंपळ सोनियाचा । सिद्ध साधकाचा मेळा तेथें ॥ ३ ॥
तयाचे स्मरणें जळती पातकें । सांगत पंढरीनाथ सेना म्हणे ॥ ४ ॥
८
विष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥ १ ॥
चला जाऊं अळंकापुरा । संतजनाच्या माहेरा ॥ २ ॥
स्नान करितां इंद्रायणी । मुक्तां लागती चरणीं ॥ ३ ॥
ज्ञानेश्वराच्या चरणीं । सेना आला लोटांगणीं ॥ ४ ॥
९.
गिरजेप्रती शंकर उपदेशिले । तो गुह्य मंत्र सप्त समुद्रापलीकडे ॥ १ ॥
ऐसें निज गुज साराचेंही सार । उघडे दाविलें साचार ज्ञानदेवें ॥ २ ॥
हें सुखाचें सुख साधन । भक्तिज्ञानाचें अंजन । हेंचि परब्रह्म जीवन ॥ ३ ॥
हेंचि मुख निज राममंत्र सार । सुलभ साकार सेना ध्याये निरंतर ॥ ४ ॥
१०
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील पैल पारूं ज्ञानदेव ॥ १ ॥
ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥ २ ॥
ज्ञानदेव माझे सोयरे धायरे । जिवलग निर्धारे ज्ञानदेव ॥ ३ ॥
सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान । दाविली निजखूण ज्ञानदेव ॥ ४ ॥
११
अळंकापुरवासिनी । ज्ञानाबाई मायबहिनी ॥ १ ॥
लेकुराची चिंता । वागवावी कृपावंता ॥ २ ॥
मी तो राहे यातीहीन । माझा राखा अभिमान ॥ ३ ॥
करूनि विनवणी । सेना लागतो चरणीं ॥ ४ ॥
१२
श्रीज्ञानराजें केला उपकार । मार्ग हा निर्धार दाखविला ॥ १ ॥
विटेवरी उभा वैकुंठनायक । आणि पुंडलिक चंद्रभागा ॥ २ ॥
अविनाश पंढरी भूमीवरी पेंठ । प्रत्यक्ष वैकुंठ दाखविलें ॥ ३ ॥
सेना म्हणे चला जाऊं तया ठाया । पांडुरंग सखया भेटावया ॥ ४ ॥