Get it on Google Play
Download on the App Store

१.

विटेवरी उभा नीट कटावरी कर । वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये ॥ १ ॥

श्रीमुकुट रत्‍नाचा ढाळ देती कुंडलांचा । तुरा खोंविला मोत्याचा तो गे माय ॥ २ ॥

कंठी शोभे एकावळी । तोडर गर्जे भूमंडळी । भक्तजनाची माउली तो गे माये ॥ ३ ॥

सोनसळा पीतांबर । ब्रीद वागवी मनोहर । सेना वंदि निरंतर तो गे माय ॥ ४ ॥

२.

विटेवरी उभा नीट देखिलागे माये । निवाली कांती हरपला देहभाव ॥ १ ॥

तें रूप पाहतां मन माझें वेधले । नुठेचि कांहीं केलें तेथुनि गे माये ॥ २ ॥

अवघे अवघियाचा विसर पडियेला । पाहतां चरणाला श्रीविठोबाच्या ॥ ३ ॥

सेना म्हणे चला जाऊं पंढरीसी । जिवलग विठ्ठलासी भेटावया ॥ ४ ॥

३.

जो हा दुर्लभ योगिया जनासी । उभाचि देखिला पुंडलीकापासी ॥ १ ॥

हारपलें दुजेपण फिटला संदेह । निमाली वासना गेला देहभाव ॥ २ ॥

विठेवरी उभा पंढरीचा राणा । सेना म्हणे बहु आवडतो मना ॥ ३ ॥

४.

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा । आनंदें केशवा भेटतांचि ॥ १ ॥

या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे ॥ २ ॥

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार । ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें ॥ ३ ॥

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक । ऐसा वेणुनादीं काला दावा ॥ ४ ॥

ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर । ऐसें पाहतां निर्धार नाहीं कोठें ॥ ५ ॥

सेना म्हणे खूण सांगितली संतीं । यापरती विश्रांती न मिळे जीवा ॥ ६ ॥

५.

समचरण विटेवरी । पाहतां समाधान अंतरीं ॥ १ ॥

चला जाऊं पंढरीसी । भेटुं रखुमाई वरासी ॥ २ ॥

होती संतांचिया भेटी । सांगू सुखाचिया गोष्टी ॥ ३ ॥

जन्ममरणाची चिंता । सेना म्हणे नाही आतां ॥ ४ ॥

६.

विटेवरी उभा । जैसा लावण्याचा गाभा ॥ १ ॥

पायीं ठेउनियां माथा । अवघी वारली चिंता ॥ २ ॥

समाधान चित्ता । डोळा श्रीमुख पाहतां ॥ ३ ॥

बहू जन्मी केला लाग । सेना देखे पांडुरंग ॥ ४ ॥

७.

जेथें वेदा न कळे पार । पुराणासी अगोचर ॥ १ ॥

तो हा पंढरीराणा । बहु आवडतो मना ॥ २ ॥

सहा शास्त्र शिणलीं । मन मौनचि राहिली ॥ ३ ॥

सेना म्हणे मायबाप । उभा कटी ठेउनी हात ॥ ४ ॥

८.

ब्रह्मादिक पडती पायां । जे शरण पंढरीराया ॥ १ ॥

मोक्ष मुक्ती लोटांगणीं । उभ्या तिष्ठती आंगणीं ॥ २ ॥

सूर्यसुत शरणागत । येउनी चरणीं लागत ॥ ३ ॥

काया मनें वाचा । सेना शरण विठोबाचा ॥ ४ ॥

९.

मोक्ष आणि मुक्ति । हे तो तुम्हांसी आवडती ॥ १ ॥

एका नामावांचून कांही । नसे आवडी आम्हां पाही ॥ २ ॥

तुम्ही करावा जतन । तुमचा आहे ठेवा राखून ॥ ३ ॥

सेना म्हणे देई भेटी । कृपावंता जगजेठी ॥ ४ ॥

१०.

शरण जाऊं कोणासी । तुजविण ऋषीकेशी ॥ १ ॥

पाहतां नाहीं त्रिभुवनी । दुजा तुज ऐसा कोणी ॥ २ ॥

पाहिला शोधुनी । वेदशास्त्र पुराणीं ॥ ३ ॥

सेना म्हणे पंढरीराया । शरण सांभाळी सखया ॥ ४ ॥

११.

देहूडे ठाण सुकुमार गोजिरें । कल्पद्रुमातळीं उभा देखिलारे ॥ १ ॥

मनीं वेध लागला त्या गोपाळाचा । जो जिवलग गोपगोपिकेचा ॥ २ ॥

जी सावळी सगुण घनानंद मूर्ति । पाहतां वेधली माझी चित्तवृत्ती ॥ ३ ॥

जो उभाचि राहिला व्यापुनी सकळ । भेटिलागीं सेना व्हावी उतावळी ॥ ४ ॥

१२.

धन्य महाराज पुंडलीक मुनी । वैकुंठीचा सखा आणिला भूतळालागोनी ॥ १ ॥

केला उपकार जग तारिलें सकळ । निरसली भ्रांति माउली स्नेहाळ ॥ २ ॥

आली चंद्रभागा गर्जना करीत । तुझिया भेटीलागी उतावीळ धांवत ॥ ३ ॥

जोडोनिया पाणी सेना करी विनवणी । म्हणे धन्य पुंडलीका माथा ठेविला चरणीं ॥ ४ ॥

१३.

उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत ॥ १ ॥

केवढा केला उपकार । काय वाणूं मी पामर ॥ २ ॥

जडजीवा उद्धार केला । मार्ग सुपंथ दाविला ॥ ३ ॥

सेना म्हणे उतराई । होतां न दिसे कांहीं ॥ ४ ॥

१४.

तुम्ही संत दयानिधी । तारा सांभाळा दुर्बुद्धि ॥ १ ॥

तुम्हां आहे शरणागत । तरी तारावा पतित ॥ २ ॥

अधिकार नाहीं । न कळे भक्तिभाव कांहीं ॥ ३ ॥

वागवा अभिमान । सेना आहे याती हीन ॥ ४ ॥

१५.

आजि सोनियाचा दिवस । दृष्टीं देखिलें संतांस ॥ १ ॥

जीवा सुख झालें । माझें माहेर भेटलें ॥ २ ॥

अवघा निरसला शीण । देखता संतचरण ॥ ३ ॥

आजि दिवाळी दसरा । सेना म्हणे आले घरा ॥ ४ ॥

१६.

म्हणविलों विठोबाचा दास । शरण जाईन संतांस ॥ १ ॥

सदा सुकाळ प्रेमाचा । नासे दुष्ट मळ बुद्धीचा ॥ २ ॥

ऐकतां हरीचें कीर्तन । अभक्त भक्ति लागे जाण ॥ ३ ॥

उभा राहे कीर्तनांत । हर्षे डुले पंढरिनाथ ॥ ४ ॥

सेना म्हणे हेंचि सुख । नाहीं ब्रह्मयासि देख ॥ ५ ॥

१७.

मायबाप कृपावंत । तुम्ही दयाळू संत ॥ १ ॥

घातला भार तुमच्या माथा । आवडे तें करा आतां ॥ २ ॥

चिंतुनि आलों पायांपाशीं । न धरीं वेगळें मशी ॥ ३ ॥

सेना म्हणे पायीं मिठी । घातली न करा हिंपुटी ॥ ४ ॥

१८.

तेचि एक संत जाणा । आवडती नारायणा ॥ १ ॥

पांडुरंगावांचोनि कांहीं । न जाणे दुसरे पाही ॥ २ ॥

मुखीं नाम अमृतवाणी । धाले मनीं डुल्लती ॥ ३ ॥

सेना म्हणे पायीं माथां । त्यांच्या ठेवियला आतां ॥ ४ ॥

१९.

संतसंगतीनें थोर लाभ झाला । मोह निरसला मायादिक ॥ १ ॥

घातले बाहेरा काम क्रोध वैरी । बैसला अंतरीं पांडुरंगा ॥ २ ॥

दुजियाचा वारा लागूं नेदी अंगा । ऐसें पांडुरंगा कळो आलें ॥ ३ ॥

संतांनीं सरता केला सेना न्हावी । ब्रह्मादिक पाही नातुडे जो ॥ ४ ॥

२०.

उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत ॥ १ ॥

केवढा केला उपकार । काय वाणूं मी पामर ॥ २ ॥

जड जीवा उद्धार केला । मार्ग दाखविला सुपंथ ॥ ३ ॥

सेना म्हणे उतराई । होता कांहीं दिसेना ॥ ४ ॥

२१.

हित व्हावें मनासीं । दवडा दंभ मानसीं ॥ १ ॥

अलभ्यलाभ येईल हातां । शरण जावें पंढरिनाथा ॥ २ ॥

चित्त शुद्ध करा । न देई दुजियासी थारा ॥ ३ ॥

हेंचि शस्त्र निर्वाणीचें । सेना म्हणे धरा साचें ॥ ४ ॥

२२.

करिसी खटपटी । पोटासाठीं आटा आटी ॥ १ ॥

नाम घेतां विठोबाचें । काय तुझ्या वाचें वेंचे ॥ २ ॥

धनाचिया आशा । वाउगा फिरसी दाही दिशा ॥ ३ ॥

जावें हरिकीर्तना । आवडेचि तुझ्या मना ॥ ४ ॥

सेना म्हणे ऐसा नरा । जवळूनि दूर करा ॥ ५ ॥

२३.

धन कोणा कामा आलें । पहा विचारूनि भले ॥ १ ॥

ऐसें सकळ जाणती । कळोनियां आंधळे होती ॥ २ ॥

स्त्रिया पुत्र बंधु पाही । त्याचा तुझा संबंधु नाहीं ॥ ३ ॥

सखा पांडुरंगाविण । सेना म्हणे दुजा कोण ॥ ४ ॥

२४.

रामें अहिल्या उद्धरिली । रामें गणिका तारिली ॥ १ ॥

म्हणा राम श्रीराम । भवसिंधु तारक राम ॥ २ ॥

रामें जटायु तारिलें । रामें वानरा उद्धरिलें ॥ ३ ॥

ऐसा अयोध्येचा राजा । सेना म्हणे बाप माझा ॥ ४ ॥

२५.

मुखीं नाम नाहीं । त्याची संगती नको पाही ॥ १ ॥

ऐसियाचे मुखीं माउली । वार घालितां विसरली ॥ २ ॥

जया नावडे संतसंगती । अधम जाणावा निश्चिती ॥ ३ ॥

नाम घेतां लाज वाटे । रंभे निर्लज्ज भेटें ॥ ४ ॥

जातां हरिकीर्तना । नावडे ज्याच्या मना ॥ ५ ॥

सेना म्हणे त्यास । कुलासुद्धां नर्कवास ॥ ६ ॥

२६.

स्वहित सांगावें भलें । जैसें आपणासि कळे ॥ १ ॥

त्यांच्या पुण्या नाहीं पार । होय अगणित उपकार ॥ २ ॥

मोहपाशें बांधिला । होता तोहि मुक्त केला ॥ ३ ॥

जेणें वाट दाखविली । सेना म्हणे कृपा केली ॥ ४ ॥

२७.

रामकृष्ण नामें । ऐसी उच्चारावीं प्रेमें ॥ १ ॥

तेणें काळ दुरी पळे । जाती दोष ते सकळे ॥ २ ॥

ऐसा नामाचा प्रताप । मागें निवारिला ताप ॥ ३ ॥

मुखीं रामनाम उच्चारी । सेना म्हणे निरंतरी ॥ ४ ॥

२८.

मानिसी देहाचा भरंवसा । केला जाईल नकळे कैसा ॥ १ ॥

सार्थक कर हो कांहीं । जेणें हरी जोडे पायां ॥ २ ॥

धनसंपत्ति पाही । ही तो राहील ठायीं ॥ ३ ॥

शरण रिघा पंढरिराया । सेना न्हावी लागे पायां ॥ ४ ॥