३
६१.
चित्त नाहीं हातीं । करूं जाता हरिभक्ति ॥ १ ॥
मज इतुली वासना । भेटी द्यावी नारायणा ॥ २ ॥
कोण जाणे दानधर्म । नव्हे स्वतंत्र कैचें कर्म ॥ ३ ॥
सेना म्हणे सांगें मात । जेणें माझें होय हित ॥ ४ ॥
६२.
संताचे पाय मस्तकीं । सरता झालों तिहीं लोकीं ॥ १ ॥
लोळेन चरणावरी । इच्छा फिटेल तोंवरी ॥ २ ॥
नाहीं सेवा केली । मूर्ती डोळां म्यां देखिली ॥ ३ ॥
कृतकृत्य झाला सेना न्हावी । ठेविली पायांवरी डोई ॥ ४ ॥
६३.
कळेल तैसें गाईन तुज । नाहीं जनासवें काज ॥ १ ॥
स्तुती करीन आवडी । जैसी जीवा वाटे गोडी ॥ २ ॥
नाम गाईन आनंदें । नाचेन आपुलाले छंदें ॥ ३ ॥
सेना म्हणे नाहीं । जनासवें काज कांहीं ॥ ४ ॥
६४.
अन्यायी अन्यायी । किती म्हणोन सांगो काई ॥ १ ॥
तूं तो उदाराचा राणा । क्षमा करी नारायणा ॥ २ ॥
काम क्रोध लोभ मोहो । नाडिलों याचेनि पहाहो ॥ ३ ॥
नावडे संतसंगती । नाहीं केली हरिभक्ती ॥ ४ ॥
निंदा केली भाविकांची । चित्तीं आस धनाची ॥ ५ ॥
सेना पायांचा पुतळा । तुज शरण जी दयाळा ॥ ६ ॥
६५.
कटीं ठेऊनियां कर । रूप पाहिलें मनोहर ॥ १ ॥
तेणें समाधान चित्ता । पायीं ठेवियेला माथा ॥ २ ॥
वाहो टाळी गातो गीत । सुखें नाचे राउळांत ॥ ३ ॥
सेना म्हणे नामा पुढें । तुच्छ सकळ बापुडें ॥ ४ ॥
६६.
तूं जीवींचें जाणसी । मुखें बोलावें मानसीं ॥ १ ॥
आतां भाकितों करुणा । नको मोकलूं नारायणा ॥ २ ॥
आपुले केलें न चले कांहीं । साधन वाउगें पाहीं ॥ ३ ॥
सेना म्हणे आशा कांहीं । नाहीं देहाची पाहीं ॥ ४ ॥
६७.
बुडतो भवसागरीं । मज काढीं बा मुरारी ॥ १ ॥
आतां न मानी भार कांहीं । माझी पाही माऊली ॥ २ ॥
करीं जतन ब्रीदावळी । वागविशी ते सांभाळी ॥ ३ ॥
मी महादोषी चांडाळ । सेना म्हणे तूं दयाळ ॥ ४ ॥
६८.
आतां ऐसे करीगा देवा । तुझी घडो पाय सेवा ॥ १ ॥
मनामाजी दुर्बुद्धी । न यावी माउलिये कधीं ॥ २ ॥
चित्तीं भाव जो धरिला । सिद्धी न्यावाजी विठ्ठला ॥ ३ ॥
सेना म्हणे याविण कांहीं । लाभ दुसरा नाहीं ॥ ४ ॥
६९.
वाचे म्हणतां निवृत्ति । अवघी निरसली भ्रांती ॥ १ ॥
हें तों माझ्या अनुभवा । प्रत्यया आलें जीवा ॥ २ ॥
गुंतलों होतो मोह आशा । स्मरतां पावलों नाशा ॥ ३ ॥
ऐसा अनुभव नामाचा । सेना न्हावी स्मरे वाचा ॥ ४ ॥
७०.
अगा पंढरीनाथा । शरण आलों कृपावंता ॥ १ ॥
याचा धरी अभिमान । सत्य करवें वचन ॥ २ ॥
गीता भागवतीं । स्वयें बोले रमापती ॥ ३ ॥
म्हणती दीनानाथ । हेंचि सांभाळीं कीं व्रत ॥ ४ ॥
मोकलिता दुरी । सेना न ठेविची उरी ॥ ५ ॥
७१.
उतरलों पार । संसारसिंधू हा दुस्तर ॥ १ ॥
कृपा केली पांडुरंगें । सर्व निवाली आंगे ॥ २ ॥
सुख संतोषा पडे मिठी । आवडी पोटीं होती तें ॥ ३ ॥
उपाधी वेगळा । सेना राहिला निराळा ॥ ४ ॥
७२.
माझा केला अंगीकार । काय जाणे मी पामर ॥ १ ॥
देव दीनाचा दयाळ । शरणागता पाळी लळा ॥ २ ॥
प्रल्हाद कारण । प्रगटला नारायण ॥ ३ ॥
मीराबाईसाठीं । केवढी केली आटाआटी ॥ ४ ॥
शरण रिघा पंढरीराया । सेना न्हावी लागे पाया ॥ ५ ॥
७३.
हाचि माझा शकुन । ह्रदयीं देवाचे चिंतन ॥ १ ॥
होईल तैसें हो आतां । काय वाहूं याची चिंता ॥ २ ॥
पडियेली गांठी । याचा धाक वाहे पोटीं ॥ ३ ॥
सेना म्हणे हीनपणें । देवा काय माझें जिणें ॥ ४ ॥
७४.
लेकुराची आळी मायबापापुढें । पुरवी लाडे कोडे लळे त्याचें ॥ १ ॥
करावा सांभाळ सर्वस्वी गा आतां । कांहो अव्हेरितां जवळीचा ॥ २ ॥
आम्हांवरी चाले सत्ता आणिकांची । थोरीव तुमची काय मग ॥ ३ ॥
आला सेना न्हावी पायांपें जवळी । आतां टाळाटाळी नकां करूं ॥ ४ ॥
७५.
योगियाचा राजा कैलासवासी गे माये । गाती नारद तुंबर पुढें बसवा आहे ॥ १ ॥
गळां रुंडमाळा वासुकीचें भूषण । गजचर्म पांघुरला । अंगी भस्माचें लेपन ॥ २ ॥
वास अंगीं गिरिजा देवी जटा गंगा वाहे । भोंवतें गण गंधर्व जोडोनि पाणि उभे राहे ॥ ३ ॥
सेना म्हणे जेणें भाळीं चंद्र धरियेला । नमस्कार माझा तया आदि नाथाला ॥ ४ ॥
७६.
शिणसो भरोवरी । वांया कासया येरझारी ॥ १ ॥
वेद मंथोनियां । नाम काढिलें लवलाह्या ॥ २ ॥
आणिक साधन । नाहीं नाहीं नामाविण ॥ ३ ॥
सेना म्हणे केला नेम । वस्ती राहे पुरुषोत्तम ॥ ४ ॥
७७.
तरी का माझा केला अंगिकार । आतां विचार करिसी वायां ॥ १ ॥
तुज मी ठाऊक होतों अन्याई । हा खरा तेव्हा कां विचार केला नाहीं ॥ २ ॥
आमुचें तें आम्ही केलेंसे जतन । अंतर तुम्हांकूण न पडावा ॥ ३ ॥
समर्थाचें असे वचन प्रमाण । शरणागता जाण जतन जीवी ॥ ४ ॥
तुझा म्हणविलों सांभाळी जी आतां । न घे अपेश माथा सेना म्हणे ॥ ५ ॥
७८.
अन्यायी अपराधी लडिवाळ संतांचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥ १ ॥
समर्थाचे बाळ समर्थचि जाणें । वागवी अभिमान म्हणतां त्याचें ॥ २ ॥
अन्यायाच्या राशी उदंड केल्या जरी । तरी क्षमा करी मायबापा ॥ ३ ॥
कल्पतरू छाया बैसला सेना न्हावी । दया ते वागवी बहु पोटीं ॥ ४ ॥
७९.
ठेविला पाय माथा संतजनीं । तिन्हीं लोकी जाण सरता केला ॥ १ ॥
घालीन लोटांगण वंदीन पाय माथा । पुरेल माझी इच्छा धणीवरी ॥ २ ॥
सेना म्हणे धन्य धन्य झालों देवा । न करितां सेवा भेटी दिली ॥ ३ ॥
८०.
ऐकिलें मागें तारिले बहुता । धांवसी कीं आतां नाम घेतां ॥ १ ॥
बरव्यापरी मज ऐसे कळों आलें । म्हणउनी विठ्ठलें करी धावा ॥ २ ॥
पडिला विसरू माझा तुजलागी । आतां पांडुरंगीं करणें काय ॥ ३ ॥
तुजलागि माझी नयेचि करुणा । धरिलें कीं जाण दुरीं मज ॥ ४ ॥
सेना म्हणे आतां सांभाळी नारायणा । जाऊं पाहे प्राण तुजसाठीं ॥ ५ ॥
८१.
पुत्राचिया ओढी बाप करी जोडी । वाळवुनि कुरवंडी आपणा करी ॥ १ ॥
मिरासीचा धनी करुनी ठेविला । भार तो वाहिला कडिये खांदी ॥ २ ॥
घाली अलंकार कौतुक डोळा पाहे । ठेवा दावी काय आहे तोचि ॥ ३ ॥
दुजियांनीं कोणी गांजितां तयासी । उदार जीवासी सेना म्हणे ॥ ४ ॥
८२.
आम्हां एकविध भाविकांची जाती । न जाणे निश्चिती दुजें कांहीं ॥ १ ॥
खूण जाणे चित्तीं क्षोभ उपजेना । कळवळुनि स्तना लावी पाळी ॥ २ ॥
अवघे होऊं येतें तुज वाटे चित्तें । उपासने परतें नावडे कांहीं ॥ ३ ॥
डोळा मुख पाहूं मुखीं नाम गाऊं । सेना म्हणे पाहूं जळींस्थळीं ॥ ४ ॥
८३.
असतां वैकुंठासी । काय सांगें ऋषिकेशी । जाऊनि मृत्युलोकाशी । जन भक्तिसी लावीं कां ॥ १ ॥
आज्ञा वंदुनीया शिरीं । जन्मलों न्हावीयाचे उदरीं । वाचे नाम निरंतरीं । रामकृष्ण गोविंद ॥ २ ॥
कलियुगामाजी जाण । सोपें हेंचि साधन । रामकृष्ण नारायण । ऐसें पुरुषोत्तम सांगत ॥ ३ ॥
सेना म्हणे देवाधिदेवा । आम्हीं करावी तुझी सेवा । हेंचि मागतों केशवा । नित्य रहावें मजपाशीं ॥ ४ ॥
८४.
स्वभावें गाईन । आवडीनें तुझें नाम ॥ १ ॥
हाचि माझा निर्धार । न करी आणिक विचार ॥ २ ॥
लोळेन तुझिये आंगणीं । निर्लज्ज होउनि मनीं ॥ ३ ॥
रंगीं नाचेन मना ऐसें । पाहिन श्रीमुख सरिसें ॥ ४ ॥
सेना म्हणे संकल्प जीवा । हाचि निर्धार हेवा ॥ ५ ॥
८५.
मान करावा खंडण । दुर्जनाचा सुखें करून ॥ १ ॥
लाथा हाणुनि घाला दुरी । निंदकासी झडकरी ॥ २ ॥
त्याचा जाणावा विटाळ । लोकां पिडीतो चांडाळ ॥ ३ ॥
त्याची संगती जयास । म्हणे नर्कवास ॥ ४ ॥
८६.
हंबरोनि येती । वत्सा घेनु पान्हा देती ॥ १ ॥
तुम्ही करावा सांभाळ । माझा अवघा सकळ ॥ २ ॥
विसरली भूकतान । तुमचें देखिल्या चरण ॥ ३ ॥
सेना म्हणे प्रेम भातुकें । द्यावें आतां हें कौतुकें ॥ ४ ॥
८७.
तुम्ही करा कृपादान । येइन धाऊन पायापें ॥ १ ॥
घेईन संतांची भेटी । सांगेन सूखाचिये गोष्टी ॥ २ ॥
जैसे माते पाशीं बाळ । सांगे जीवीचें सकळ ॥ ३ ॥
सेना म्हणे हरे ताप । मायबाप देखुनी ॥ ४ ॥
८८.
आजि फळा आलें पुण्य । गेलें भेदोनि गगन ॥ १ ॥
संत झालेति कृपाळ । माझा केलाजी सांभाळ ॥ २ ॥
संचित वोळलें । तुमचीं देखिलीं पाउलें ॥ ३ ॥
सेना म्हणे नेणे । कृपा केली नारायणें ॥ ४ ॥
८९.
उच्चारीत कोडें । नाम आबद्ध वांकुडें ॥ १ ॥
मना आवडे त्यावेळीं । भलत्या काळीं उच्चारीं ॥ २ ॥
कैसें नाम ठेवूं आतां । कोठें न मिळे पाहतां ॥ ३ ॥
सेना म्हणे आनंदे धालो । सुख लाधलों । परिपूर्ण ॥ ४ ॥
९०.
असाल तेथें नामाचें चिंतन । याहुनि साधन आणिक नाहीं ॥ १ ॥
सोडवील माझा भक्ताचा कैवारी । प्रतिज्ञा निर्धार केला आम्ही ॥ २ ॥
गुण दोष याती न विचारी कांहीं । धांवे लवलाही भक्तकाजा ॥ ३ ॥
अवघे काळीं वाचें म्हणा नारायण । सेना म्हणे क्षण जाऊं न द्या ॥ ४ ॥
९१.
अंगिकार केला । भार चालवी विठ्ठला ॥ १ ॥
संतीं सांगितलें । तें म्यां ह्रदयीं धरिलें ॥ २ ॥
तारिला अजामिळ । महा पापी कीं चांडाळ ॥ ३ ॥
पतितपावन । करी नाम हें जतन ॥ ४ ॥
वागवी अभिमान । सेना न्हवी यातिहीन ॥ ५ ॥
९२.
ऐशी आवडी आहे माझ्या जीवा । तुजसि केशवा निवेदिलें ॥ १ ॥
पांडुरंगा ऐसें वाटतसे जीवा । करिन संतसेवा अहर्निशी ॥ २ ॥
नलगे वित्त गोत वैकुंठीं राहणें । साज्युता सदनीं चाड नाहीं ॥ ३ ॥
करुणास्वरें सेना बहात विठ्ठला । हेतु पुरविला आवडीचा ॥ ४ ॥
९३.
करितां देवपूजा । नित्य नेम सारिला वोजा । मग आठविलें अधोक्षजा । ध्यानस्थ बैसलों ॥ १ ॥
दूत आले लवलाही । राये बोलाविलें पाहीं । कोठें आहे मज दावी । उरी न ठेवी याची कांहीं ॥ २ ॥
जाणुनि संकट श्रीहरी । धोकटी घेतली खांद्यावरी । त्वरें आला राजदरबारीं । देखुनि हरी क्रोध निमाला ॥ ३ ॥
राया सन्मुख बैसून । हातीं दिधलें दर्पण । मुख पाहे विलोकून । मूर्ती दिसे चतुर्भुज ॥ ४ ॥
हात लाविला मस्तका । वृत्ती हरपली देखा । राम म्हणे प्राणसखा । नित्य भेटे मजलागी ॥ ५ ॥
मग केलें तेलमर्दन । घाटी बिंबला नारायण । विसरला कार्य आठवण । वेधलें मन रूपासी ॥ ६ ॥
भोंवतां पाहे विलोकून । अवघा बिंबला नारायण । तटस्थ पाहती सभाजन । नाहीं भान रायासी ॥ ७ ॥
राव म्हणे हरीसी । तुम्हीं रहावे मजपाशीं । तुजविण न गमे दिवसनिशीं । हरी म्हणे भाकेसि न गुंतें मी ॥ ८ ॥
मग प्रधानें काय केलें । राया स्नानासी पाठविलें । रायें सोने दिधलें । हरीनें ठेविलें धोकटींत ॥ ९ ॥
शुद्ध नाहीं याती । नाही केली हरिभक्ति । शिणविला कमळापती । नाहीं विरक्ति बाणली अंगीं ॥ १० ॥
नाहीं अपराधा गणीत । देखोनि सोने ब्राह्मणा देत देवास घाली संकटांत । आण वाहत विठोबाची ॥ ११ ॥
सेना म्हणे ऋषीकेशी । मज कारणें शिणलासी । म्हणूनि लागलों चरणासी । संसारासी त्यागिलें ॥ १२ ॥
९४.
करिता नित्य नेम । रायें बोलाविलें जाण ॥ १ ॥
पांडुरंगें कृपा केली । राया उपरती झाली ॥ २ ॥
मुख पाहतां दर्पणीं । आंत दिसे चक्रपाणी ॥ ३ ॥
कैसी नवलपरी । वाटीमाजी दिसे हरीं रखुमादेवीवर । सेना म्हणे मी पामर ॥ ४ ॥
९५.
म्हणवितों दास । तरी सांभाळी ब्रिदास ॥ १ ॥
शुद्ध नाहीं भाव । तूं जाणशी पंढरीराव ॥ २ ॥
केलेंसे जतन । धोकटी आरसाची जाण ॥ ३ ॥
करितों व्यवसाव । माझ्या जातीचा स्वभाव ॥ ४ ॥
सेनां करितो विनवणी । हात जोडूनिया दोन्ही ॥ ५ ॥
९६.
चिंतन चित्ताला । लावी मनाच्या मनाला ॥ १ ॥
उन्मनी सुखांत । पांडुरंग भेटी देत ॥ २ ॥
ऐसा आहे श्रेष्ठाचार । वेद शास्त्राचा निर्धार ॥ ३ ॥
कवटाळूनि पोटीं । सेना म्हणे सांगूं गोष्टी ॥ ४ ॥