२
२९.
वाट धरितां पंढरीची । चिंता हारे संसाराची ॥ १ ॥
ऐसे कोठें नसे पायीं । धुंडितां ब्रह्मांड पाही ॥ २ ॥
पाहिलीं शोधूनीं । तीर्थे आणि देवस्थानी ॥ ३ ॥
मोक्ष मुक्ती पाही । सेना म्हणे लागा पायीं ॥ ४ ॥
३०.
येथें सुखाचिये राशी । पार नाहीं त्या भाग्यासी ॥ १ ॥
झालें आलिंगन । कांती निवाली दर्शनें ॥ २ ॥
उपकार उत्तीर्णता । सेना म्हणे नाही आतां ॥ ३ ॥
३१.
करितां योगयाग । न भेटेची पांडुरंग ॥ १ ॥
एका भावावांचोनि कांहीं । देव जोडे ऐसा नाहीं ॥ २ ॥
धूम्रपानादि साधन । करितां व्यर्थ होय शीण ॥ ३ ॥
करितां साधनें शिणलीं । सेना म्हणे वायां गेलीं ॥ ४ ॥
३२.
बैसोनि कीर्तनांत । गोष्टी सांगतो निश्चित ॥ १ ॥
दुष्ट अधम तो खरा । येथुनियां दूर करा ॥ २ ॥
तमाखु ओढूनि सोडी धूर । दुष्टबुद्धि दुराचार ॥ ३ ॥
पान खाय कीर्तनांत । रुधिर विटाळशीचें पीत ॥ ४ ॥
त्याची संगती जयास । सेना म्हणे नर्कवास ॥ ५ ॥
३३.
नलगे योग तप । करणें साटोप आम्हांसी ॥ १ ॥
सोपें साधन आमुचें । नाम गाऊं विठोबाचें ॥ २ ॥
जो नातुडे धूम्रपानीं । राहे संपुष्टि येऊनि ॥ ३ ॥
जया नाहीं रूप । आम्हां कीर्तनीं समीप ॥ ४ ॥
सेना म्हणे लडिवाळ । जाणो हरीसी निर्मळ ॥ ५ ॥
३४.
म्हणा हरी हरी । अवघे सकळ नरनारी ॥ १ ॥
येणें तुटेल बंधन । भाग निवारील शीण ॥ २ ॥
प्रेमें घ्यारे मुखीं नाम । हरे सकळही श्रम ॥ ३ ॥
सेना म्हणे चित्तीं धरा । बळकट रखुमाईच्या वरा ॥ ४ ॥
३५.
कशासाठीं करितां खटपट । तप तीर्थ व्रतें अचाट ॥ १ ॥
नलगे शोधावें गिरिकानन । भावें रिघा विठ्ठला शरण ॥ २ ॥
विभांडक श्रृंगी तपस्वी आगळा । क्षण न लागत रंभेनें नागविला ॥ ३ ॥
जाणोनि सेना निवांत बैसला । केशवराजा शरण रिघाला ॥ ४ ॥
३६.
सिद्ध ब्रह्मज्ञान बोलतां नोहे वाचें । शांतवन क्रोधाचें झालें नाहीं ॥ १ ॥
पाल्हाळ लटिका करणें तो काय । शरण पंढरीराया गेला नाहीं ॥ २ ॥
जंव नाहीं गेली अज्ञानाची भ्रांती । जंव नाहीं विरक्ती बाणली आंगीं ॥ ३ ॥
जीवाची तळमळ राहिली सकळ । मग ब्रह्मज्ञान कळे सेना म्हणे ॥ ४ ॥
३७.
घरासी आले संत देखोनिया । म्हणे यासी खावया कोठुनी घालूं ॥ १ ॥
ऐसा हा निर्धारीम दुष्ट दुराचारी । जन्मोनियां झाला भूमि भारी ॥ २ ॥
दासीचें आर्जव करोनि भोजन । घाली समाधान करी तीचें ॥ ३ ॥
आणि आवडीनें करी तिची सेवा । म्हणे सुख जीवा फार माझ्या ॥ ४ ॥
संतानीं पाणी मागतां म्हणे काय । मोडले कीं पाय जाय आणि ॥ ५ ॥
सेनां म्हणे कारे गाढवा नेणसी । कुंभपाक वस्तीसि केला आहे ॥ ६ ॥
३८.
येऊनि गर्भासी मेलों उपवासीं । नाहीं सखी ऐसी भेटली कोणी ॥ १ ॥
देह जाणे अनित्य करावें स्वहित । मोहापासुनि निश्चित सोडवील ॥ २ ॥
न होय अनारिसा पाळी तोंडिच्या घासा । सोडवी ना ऐसी परी देखो ॥ ३ ॥
वाटलो मीपणें धनमान कांहीं । सेना म्हणे नाहीं लाभ अलाभ ॥ ४ ॥
३९.
तुज ऐसें वाटे देह व्यर्थ जावा । द्यूतकर्म खेळावा सारीपाट ॥ १ ॥
मग नाहीं नाम निजल्य जागा राम । जन्मोनि अधम दुःख पावे ॥ २ ॥
दासीगमनीं धीट विषयीं लंपट । जावया वाट अधोगती ॥ ३ ॥
नर्का जावयासी धरसील चाड । तरी निंदा गोड वैष्णवांची ॥ ४ ॥
सेना म्हणे नामाचें लावीं करि पिसें । जन्माल्या सायासें व्यर्थ जासी ॥ ५ ॥
४०.
जे म्हणविती न्हावियाचे वंशीं । तेणें पाळावें स्वधर्मासी ॥ १ ॥
येर अवघे बटकीचे । नव्हे न्हावियाचे वंशीचे ॥ २ ॥
शास्त्रें नेम नेमियला । सांडोनि अनाचार केला ॥ ३ ॥
जन्मलों ज्या वंशांत । धंदा दोन प्रहर नेमस्त ॥ ४ ॥
सत्य पाळारे स्वधर्मासी । सेन म्हणे आज्ञा ऐसी ॥ ५ ॥
४१.
न्हावीयाचे वंशीं । जन्म दिला ऋषीकेशी । प्रतिपाळावें धर्मासी । व्यवहारासी न सांडी ॥ १ ॥
ऐका स्वधर्मविचारी ।धंदा करी दोन प्रहर । सांगितलें साचार । पुरणांतरीं ऐसें हें ॥ २ ॥
करूनियां स्नान । मुखीं जपे नारायण मागुती न जाण । शिवूं नये धोकटी ॥ ३ ॥
ऐसे जे कां न मानिती । ते जातील नरकाप्रती । सकळ पूर्वज बुडविती । शास्त्रसंमती ऐसी हे ॥ ४ ॥
शिरीं पाळावें आज्ञेसी । शरण जावें विठोबासी । सेना म्हणे त्यासी । ऋषीकेशी सांभाळी ॥ ५ ॥
४२.
करितों विनवणी । हात जोडोनियां दोन्ही ॥ १ ॥
हेंचि द्यावे मज दान । करा हरीचें चिंतन ॥ २ ॥
जातों सांगूनियां मात । पांडुरंग बोलावित ॥ ३ ॥
सोडा द्वादशी पारणें । सुखें करावें कीर्तन ॥ ४ ॥
दिवस मध्यान्हीं आला । सेना वैकुंठासी गेला ॥ ५ ॥
४३.
आलिंगन भेटी । मग चरणीं घाली मिठी ॥ १ ॥
ऐसा माझा भोळा भाव । पंढरिराव जाणता ॥ २ ॥
घेतलें हिरोनी । सीणभाग चक्रपाणी ॥ ३ ॥
सेना म्हणे मायबापें । द्यावें भातें हें आतां ॥ ४ ॥
४४.
नाहीं सुख त्रिभुवनीं । म्हणुनि मनीं धरिलें ॥ १ ॥
पायीं ठेवियला भाळ । कंठीं माळ नामाची ॥ २ ॥
पावलीं विश्रांती । सेना म्हणे कमळापती ॥ ३ ॥
४५.
ऐसी आवडी आहे जीवा । कैं पाहीन केशवा ॥ १ ॥
माझी पुरवा वासना । सिद्धी न्यावी नारायणा ॥ २ ॥
नलगे वित्त धन । मुखीं नाम नारायण ॥ ३ ॥
सेना म्हणें कमळापती । हेंचि द्यावें पुढती पुढती ॥ ४ ॥
४६.
संतीं सांगितलें । तेंचि तुम्हां निवेदिलें ॥ १ ॥
मी तों सांगतसें निकें । येतील रागें येवों सुखें ॥ २ ॥
निरोप सांगतां । कासया वागवावी चिंता ॥ ३ ॥
सेना आहे शरणागत । विठोबा रायाचा दूत ॥ ४ ॥
४७.
करा हाचि विचार । तरा भवसिंधु पार ॥ १ ॥
धरा संतांची संगती । मुखीं नाम अहोराती ॥ २ ॥
अजामीळ पापराशी । पार पावविलें त्यासी ॥ ३ ॥
नका धुरें भरूं डोळा । सेना सांगे वेळोवेळां ॥ ४ ॥
४८.
करितां परोपकार । त्याच्या पुण्या नाहीं पार ॥ १ ॥
करितां परपीडा । त्याच्या पापा नाही जोडा ॥ २ ॥
आपुलें परावें समान । दुजा चरफडे देखून ॥ ३ ॥
आवडे जगा जें कांहीं । तैसें पाहीं करावें ॥ ४ ॥
उघडा घात आणि हित । सेना म्हणे आहे निश्चित ॥ ५ ॥
४९.
शरणागत आहे वैभवाचा धनी । सत्य भावें मानी अर्पिलें तें ॥ १ ॥
आपणा वेगळें नेदी उरो कांहीं । भावेंचि दावी आपणामाजी ॥ २ ॥
दशा आपली अंगा नेणें जाणे कांहीं । आपणाचि होय इच्छा त्याची ॥ ३ ॥
धाकुट्यासी माता करी स्तनपान । सेना म्हणे जिणें बरें हेंचि ॥ ४ ॥
५०.
अंतरीचें पुरें काम । घेतां नाम विठोबाचे ॥ १ ॥
नाम साराचेंही सार । शरणागत यमकिंकर ॥ २ ॥
पाहिले वेदांत । निश्चय केला निगमांत ॥ ३ ॥
सेना म्हणे न वेचा कांहीं । लाभ नाहीं या ऐसा ॥ ४ ॥
५१.
करितां योगयाग । सिद्धी न पवेचि सांग ॥ १ ॥
देव एक भावाविण । नाहीं व्यर्थ शीण ॥ २ ॥
केल्या तपाचिया राशी । तरि न मिळेची त्यासी ॥ ३ ॥
करितां धूम्रपान । न भेटे नारायण ॥ ४ ॥
सेना म्हणे नको कांहीं । एका वीण दुजे नहीं ॥ ५ ॥
५२.
घेतां नाम विठोबाचें । पर्वत जळती पापांचे ॥ १ ॥
ऐसा नामाचा महिमा । वेद शिणला झाली सीमा ॥ २ ॥
नामें तारिलें अपार । महा पापी दुराचार ॥ ३ ॥
वाल्हा कोळी ब्रह्महत्यारी । नामें तारिला निर्धारीं ॥ ४ ॥
सेना बैसला निवांत । विठ्ठल नाम उच्चारीत ॥ ५ ॥
५३.
नामाचें चिंतन श्रेष्ठ पैं साधन । जातील जळोनि महापापें ॥ १ ॥
न लगे धूम्रपान पंचाग्निसाधन । करितां चिंतन हरी भेटे ॥ २ ॥
बैसुनि निवांत करा एकचित्त । आवडी गायें गीत विठोबाचें ॥ ३ ॥
सकळाहुनि सोपें हेंची पैं साधन । सेना म्हणे आण विठोबाची ॥ ४ ॥
५४.
कांही न करी रे मना । चिंती या चरणा विठोबाच्या ॥ १ ॥
ठाव नाहीं कल्पनेसी । राशी सुखाची अमूप ॥ १ ॥
पाहिलें श्रीमुख । नासे दुःख महाताप ॥ ३ ॥
होईल विसावा । सेना म्हणे सुख जिवा ॥ ४ ॥
५५.
सुखें घालीं जन्मासी । हेंचि बरें कीं मानसीं ॥ १ ॥
वारी करीन पंढरीची । जोडी ही माझी साची ॥ २ ॥
हरिदासाची करीन सेवा । तेणें सुख थोर जीवा ॥ ३ ॥
सेना म्हणे सर्व संग । केला त्याग यासाठीं ॥ ४ ॥
५६.
आम्हां हेंचि अळंकार । कंठीं हार तुळशीचें ॥ १ ॥
नाम घेऊं विठोबाचें । म्हणवूं डिंगर तयाचें ॥ २ ॥
चित्तीं चाड नाहीं । न धरू आणिकाची कांहीं ॥ ३ ॥
सकळ सुख त्याचे पायीं । मिळे बैसलिया ठायीं ॥ ४ ॥
सेना म्हणे याविण कांहीं । मोक्ष युक्ति चाड नाहीं ॥ ५ ॥
५७.
आम्ही विष्णूचे दास । न मानूं आणिक देवास ॥ १ ॥
स्तुति आणिकांची करिता । ब्रह्महत्या पडे माथा ॥ २ ॥
तुजविण देव म्हणतां । अवघी पापें पडो माथा ॥ ३ ॥
न करी पूजा आणि सेवन । सेंना म्हणे तुझी आण ॥ ४ ॥
५८.
प्रेमसुखें कीर्तन । आनंदें गाऊं हरीचे गुण ॥ १ ॥
धरिला वैष्णवांचा संग । नाहीं लाग कळीकाळा ॥ २ ॥
स्वल्प मंत्र हाचि जाण । राम कृष्ण नारायण ॥ ३ ॥
वाचे न उच्चारी कांहीं । याविण आणिक नाहीं ॥ ४ ॥
सेना म्हणे रंगलें ठायीं । माझें चित्त तुझें पायीं ॥ ५ ॥
५९.
सांडोनि किर्तन । न करी आणिक साधन ॥ १ ॥
पुरवा आवडीचें आर्त । तुम्हां आलों शरणागत ॥ २ ॥
मुखीं नाम वाहीन टाळी । नाचेन निर्लज्ज राउळी ॥ ३ ॥
सेना म्हणे नुपेक्षावें हेंचि मागें जीवें भावें ॥ ४ ॥
६०.
चित्तीं पाय रूप डोळां । मुखीं नाम वेळोवेळा ॥ १ ॥
हेंचि मागे तुजपाशीं । भाव खरा कीं जाणसी ॥ २ ॥
हें उचित तुमचें । कोड पुरवा बालकाचें ॥ ३ ॥
नको देऊं अंतर । सेना लोखे पायांवर ॥ ४ ॥