Get it on Google Play
Download on the App Store

९७.

पांडुरंग दास । म्हणती सांभाळी ब्रीदास ॥ १ ॥

नाहीं भाव आंगीं । भूषण मिरवितो जगीं ॥ २ ॥

व्रत आचरण । नाहीं केलें तुझें ध्यान ॥ ३ ॥

स्थिर नाहीं मन । सदा विषयाचें ध्यान ॥ ४ ॥

सेना आहे अपराधी । सांभाळावें कृपानिधी ॥ ५ ॥

९८.

स्तुति करूं ऐसा नाहीं अधिकार । शिणला फणिवर वर्णवेना ॥ १ ॥

तेथें मी सरता होईन कैशापरी । वर्णावया हरी कीर्ति तुझी ॥ २ ॥

आठराही भागले सहाही शीणले । चा‍र्‍ही राहिले मौन्यची ॥ ३ ॥

रुक्मादेवीवरें अंगिकार केला । निवांत राहिला सेना न्हावी ॥ ४ ॥

९९.

वेद वर्णिता शीणला । मग मौन्यची राहिला ॥ १ ॥

तेथें माझी वैखरी । कैशी पूर्ण पावे हरी ॥ २ ॥

नेणती गोरा कीं सावळा । त्याचि न कळेचि लीला ॥ ३ ॥

हा सगुण कीं निर्गुण । गुणातीत परिपूर्ण ॥ ४ ॥

माथा ठेऊनि चरणीं । सेना पाहे विलोकुनी ॥ ५ ॥

१००.

धन्य धन्य दिन । तुमचें झालें दरुषण ॥ १ ॥

आजि भाग्य उदया आलें । तुमचें पाऊल देखिलें ॥ २ ॥

पूर्व पुण्य फळा आलें । माझें माहेर भेटलें ॥ ३ ॥

सेना म्हणे झाला । धन्य दिवस आजि भला ॥ ४ ॥

१०१.

माझें अंतरीचें । जाणें पांडुरंग साचें ॥ १ ॥

जीवभाव त्याचे पायी । ठेउनी कांहीं न मागों ॥ २ ॥

सुख संत समागम । घेऊं नाम आवडी ॥ ३ ॥

सेना म्हणे चुकलों साचें । आणिक वाचे न सेवी ॥ ४ ॥

१०२.

देई मज जन्म देवा । करीन सेवा आवडी ॥ १ ॥

करीन संतांचें पूजन । मुखीं नाम नारायण ॥ २ ॥

असो भलते ठायीं । सुख दुःखा चाड नाहीं ॥ ३ ॥

मोक्षं सायुज्यता । सेना म्हणे जिवा चित्ता ॥ ४ ॥

१०३.

नाम साधनाचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ १ ॥

तिहीं लोकीं श्रेष्ठ । नाम वरिष्ठ सेवी हें ॥ २ ॥

शिवभवानीचा । गुप्त मंत्र आवडीचा ॥ ३ ॥

सेना म्हणे इतरांचा । पाड कैचा मग येथें ॥ ४ ॥

१०४.

त्रैलोक्य पाळतां । नाहीं उबग तुमच्या चित्ता ॥ १ ॥

तया आमुची चिंता । नसे काय रुक्मिणीकांता ॥ २ ॥

दुर्दर राहे पाषाणांत । तया चारा कोण देत ॥ ३ ॥

पक्षी अजगर । तया पाळी सर्वेश्वर ॥ ४ ॥

सेना म्हणे पाळुनी भार । राहिलों निर्धार उगाची ॥ ५ ॥

१०५.

म्हणवितो विठोबाचा दास । शरण जाईन संतास ॥ १ ॥

सदा सुकाळ प्रेमाचा । नासे मळ दुष्ट बुद्धीचा ॥ २ ॥

ऐकत हरिचें कीर्तन । अभक्ति भक्ति लागे ज्ञान ॥ ३ ॥

उभा राहे कीर्तनांत । हर्षे डोले पंढरीनाथ ॥ ४ ॥

सेना म्हणे हें सुख । नाहीं ब्रह्मयासी देख ॥ ५ ॥

१०६.

आम्ही वारीक वारीक । करूं हजामत बारीक ॥ ५ ॥

विवेक दर्पण आयना दाऊं । वैराग्य चिमटा हालऊं ॥ २ ॥

उदक शांती डोई घोळूं । अहंकाराची शेंडी पिळूं ॥ ३ ॥

भावार्थाच्या बगला झाडूं । काम क्रोध नखें काढूं ॥ ४ ॥

चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ॥ ५ ॥

१०७.

स्वर्गीचे अमर मागताती देवा । संताची सेवा करावया ॥ १ ॥

पंढरीचें सुख देखोनी नयनी । करिती विनवणी जोडुनी हात ॥ २ ॥

चारी मुक्ति तेथें हिंडती दीनरूप । येऊं नेदी समीप कोणी तया ॥ ३ ॥

धिक्कारुनी तया घालिती बाहेरी । मागुती पायावरी लोळताती ॥ ४ ॥

वैष्णव शरण येती काकुळती । आमुची ती गती काय सांगा ॥ ५ ॥

या सुखाचा थेंबुटा नमी ब्रह्मादीकां । तेथें देखा सरता झाला ॥ ६ ॥

१०८.

सुखें घालीं जन्मासी । हेंचि बरें कीं मानसीं ॥ १ ॥

वारी करीन पंढरीची । जोडी साची ही माझी ॥ २ ॥

हरिदासाची करीन सेवा । तेणें सुख फार जीवा ॥ ३ ॥

सेना म्हणे सर्व संग । केला त्याग यासाठीं ॥ ४ ॥

१०९.

ही माझी मिरासी । पांडुरंग पायापासी ॥ १ ॥

करीन आपुलें जतन । वागवितों अभिमान ॥ २ ॥

जुनाट जुगादीचें । वडिलें साधियेलें साचें ॥ ३ ॥

सेना म्हणे कमळापती । पुरातन हे माझी वृत्ती ॥ ४ ॥

११०.

स्वहिताकारणें सांगतसे तुज । अंतरीचें गुज होतें कांहीं ॥ १ ॥

करा हरीभजन तराल भवसागर । उतरील पैलपार पांडुरंग ॥ २ ॥

कृपा नारायणें केली मजवरी । तुम्हालागीं हरी विसंबेना ॥ ३ ॥

सेना सांगूनियां जातो वैकुंठासी । तिथि ते द्वादशी श्रावणमास ॥ ४ ॥