श्लोक ३१ ते ४०
आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर ग्रसीद ।
विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥३१॥
त्रैलोक्याचें मूळ - । कारण तूं होसी । वेद्य तूं वेदांसी । पद्मनाभा ॥९१६॥
विश्वासी तूं वंद्य । होसी चक्र - पाणी । ऐक विनवणी । एक वेळ ॥९१७॥
बोलोनियां ऐसें । करी नमस्कार । लववोनि शिर । पाद - पद्मीं ॥९१८॥
मग म्हणे पार्थ । प्रभो ह्रषीकेशी । माझिया बोलासी । चित्त द्यावें ॥९१९॥
पुसिलें मीं तुज । विश्वरूप - ध्यान । व्हावें समाधान । म्हणोनियां ॥९२०॥
तों चि एकाएकीं । रूप हें धरोन । कैसें त्रिभुवन । गिळितोसी ॥९२१॥
तरी तूं गा कोण । उग्र मुखें ऐसीं । कां गा मेळविसी । असंख्यात ॥९२२॥
सर्व हि हातांत । ऐसीं शस्त्रें तीक्ष्ण । कां गा परजोन । राहिलासी ॥९२३॥
जेव्हां तेव्हां क्रोधें । डोळे वटारून । विशाल होऊन । नभाहूनि ॥९२४॥
जगालागीं भय । दावोनियां देवा । करिसी कां हेवा । कृतांताशीं ॥९२५॥
श्रीभगवानुवाच ---
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो । लोकान्ससाहर्तुमिह प्रवृत्तः ॥
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे । येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥३२॥
ऐकोनि हे बोल । म्हणे नारायण । कोण मी म्हणोन । विचारिसी ॥९२६॥
आणि कासयासी । ऐसा भयंकर । वाढवीं विस्तार । आपुला मी ॥९२७॥
तरी मी तों काळ । वाढलों साचार । लोकांचा संहार । करावया ! ॥९२८॥
आतां असंख्यात । मुखें पसरून । आघवें गिळीन । त्रैलोक्य हें ॥९२९॥
पार्थ म्हणे तेथ । मागील संकटा । त्रासोनि अनंता । प्रार्थिलें मीं ॥९३०॥
परी तोषला हा । कैसा विपरीत । जाय वाढवीत । उग्र - रूप ! ॥९३१॥
ऐकोनि आपुले । कठोर हे बोल । निराश होईल । दुःखी पार्थ ॥९३२॥
आणोनि हें मग । देव म्हणे तया । नको धनंजया । भिऊं येथें ॥९३३॥
ऐशा ह्या संहार - । संकटाची झल । तुम्हां न लागेल । पांडवांसी ॥९३४॥
ऐकोनियां पार्थें । ऐसें आश्वासन । जातां जातां प्राण । सांवरले ॥९३५॥
सांपडला पार्थ । काळ - संकटांत । परी केला मुक्त । नारायणें ॥९३६॥
म्हणोनि सावध । होवोनि त्वरित । देवोनियां चित्त । ऐकूं लागे ॥९३७॥
तों चि देव म्हणे । तुम्ही माझे भक्त । म्हणोनियां मुक्त । केलें तुम्हां ॥९३८॥
परी हा इतर । सर्व दळ - भार । गिळाया साचार । प्रवर्तलों ॥९३९॥
काळाग्नींत जैसी । लोणियाची उंडी । तैसें माझ्या तोंडीं । गेलें विश्व ॥९४०॥
देखिलें तूं जें हें । सर्वथा तें साच । वल्गना वायां च । वीरांच्या ह्या ॥९४१॥
कुंथती हे वीर । शौर्याचिया बळें । जमवोनि । मेळे । सैनिकांचे ॥९४२॥
निज - गज - दळां । वाखणिती किती । तुच्छसा लेखिती । काळातें हि ॥९४३॥
बोलती गर्जोन । वाहोनियां आण । रणीं हरूं प्राण । मृत्यूचे हि ॥९४४॥
सृष्टीवर सृष्टि । रचूं आम्ही थेट । जगाचा हि घोट । घेऊं आतां ॥९४५॥
गिळोनियां टाकूं । मेदिनी सकळ । जाळूं अंतराळ । वरतीं च ॥९४६॥
जागच्या जागीं च । टाकूं जखडून । सोडोनियां बाण । वायूतें हि ॥९४७॥
चतुरंग - दळ । ऐसें जमवोन । उन्मत्त होवोन । अंग - बळें ॥९४८॥
महाकाळाशीं हि । खेळावया झुंझ । सिद्ध झाले आज । रणीं येथें ॥९४९॥
तयांचे ते बोल । शस्त्रांहुनी तीक्ष्ण । अग्नीहुनी । उष्ण । दाहकारी ॥९५०॥
काळकूटासी हि । आणितील हार । मारक अघोर । ऐसे जरी ॥९५१॥
तरी हे गंधर्व - । नगरींचे लोट । तैसे फोलकट । वीर सारे ॥९५२॥
किंवा चित्रांतील । बहुरंगी फळें । जाण हें भेंडोळें । पोकळीचें ॥९५३॥
मृगजळा आला । पूर कीं अमाप । केला जणूं साप । कापडाचा ॥९५४॥
किंवा चढवोनि । नाना अलंकार । मांडिलीं साचार । बाहुलीं हीं ॥९५५॥
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥३३॥
सकळ ही सेना । करी चळवळ । परी तिचें बळ । ग्रासिलें मीं ॥९५६॥
आतां ऐसें जाण । मृत्तिकेचीं साच । जणूं बाहुलीं च । निर्जीव हीं ॥९५७॥
थांबतसे जैसा । बाहुल्यांचा नाच । तुटोनि जातां च । कळ - सूत्र ॥९५८॥
मग तयालागीं । कोणी हि लोटून । देतां उलथून । पडती तीं ॥९५९॥
तैसा वीरांचा ह्या । कराया संहार । नको तुज फार । वेळ आतां ॥९६०॥
जाणोनि हें पार्था । होईं तूं शहाणा । घेईं धनुर्बाणा । ऊठ वेगें ॥९६१॥
मागें कौरव हे । विराटाच्या गाई । हरावया पाहीं । आले जेव्हां ॥९६२॥
तेव्हां तेथींचा तो । विराट - कुमर । नामें जो उत्तर । महा - भीरु ॥९६३॥
तयाहातीं रणीं । नागविलें सर्वां । घालोनियां तुवां । मोहनास्त्र ॥९६४॥
आतां त्याहूनी हि । बळ - हीन सेना । आयती च रणा । पातली ही ॥९६५॥
तरी सेनेचा ह्या । करोनि संहार । अर्जुना अपार । कीर्ती जोडीं ॥९६६॥
पार्थें एकल्यानें । जिंकिलें शत्रूंस । लोकीं ऐसें यश । मेळवीं गा ॥९६७॥
जाण कोरडें च । यश नव्हे येथ । राज्य हि समस्त । हातीं आलें ॥९६८॥
म्हणोनि तूं आतां । निमित्ताचा धनी । होवोनियां रणीं । झुंज वेगें ॥९६९॥
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् ।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यख जेतासि रणे सपत्नान् ॥३४॥
नको बाळगूं च । द्रोणाची तुं क्षिती । नको धरूं भीति । भीष्माची हि ॥९७०॥
चालवूं हें शस्त्र । कर्णावरी कैसें । नको मनीं ऐसें । आणूं कांहीं ॥९७१॥
जयद्रथालागीं । वधावया पाहीं । उपाय तो कांहीं । चिंतूं नको ॥९७२॥
आणिक हि जे जे । वीर नामांकित । सिंह ते समस्त । चित्रांतील ॥९७३॥
जणूं ओल्या हातें । टाकावे पुसून । तैसा परी जाण । निर्जीव ते ॥९७४॥
सेना - समूहाचा । घेतला मीं ग्रास । राहिला आभास । मात्र येथें ॥९७५॥
झूंजार हे वीर । माझ्या मुखीं गेले । ऐसें त्वां देखिलें । पार्था जेव्हां ॥९७६॥
तेव्हां चि ते झाले । निर्जीव सकळ । सोपटें पोकळ । तैसे आतां ॥९७७॥
तरी ऊठ वेगें । घेईं धनुर्बाण । करावया रण । ह्यांच्या संगें ॥९७८॥
आंतून हे मीं च । मारिले सकळ । वधीं तूं केवळ । बाहेरून ॥९७९॥
आतां लटक्या च । शोक - संकटांत । नको पडूं भ्रांत । होवोनियां ॥९८०॥
लावोनियां खूण । मारितों निशाण । कौतुकें आपण । जैशा रीती ॥९८१॥
घेवोनियां ध्यानीं । ईश्वरी संकेत । तैसा रणीं येथ । झुंज आतां ॥९८२॥
तुझ्या वैरियांस । गिळिलें निःशेष । राज्यासह यश । भोगीं पार्था ॥९८३॥
तुझे भाऊबंद । झाले होते धुंद । चढोनियां मद । सामर्थ्याचा ॥९८४॥
तयांसवें झुंज । देवोनि सहज । दुष्टांचा त्वां माज । नष्ट केला ॥९८५॥
ऐशा थोर गोष्टी । विस्वाच्या वाक्पटीं । लिहोनि किरीटी । यश जोडीं ॥९८६॥
संजय उवाच ---
एतच्छुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरोटी ।
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्नदं भीतभीतः प्रणम्य ॥३५॥
राहिले अपूर्ण । ज्याचे मनोरथ । ऐसा जो का नाथ । कौरवांचा ॥९८७॥
तया सांगताहे । संजय हें सर्व । म्हणे ज्ञानदेव । निवृत्तीचा ॥९८८॥
सत्य - लोकांतून । सुटे गंगाजळ । मग खळखळ । वाहे जैसें ॥९८९॥
तैसा वाक्प्रवाह । विशाळ गंभीर । भासला साचार । श्रीहरीचा ॥९९०॥
महा - मेघांचे कीं । उसळतां लोट । होय गडगडाटा । नभीं जैसा ॥९९१॥
नातरी मंदरें । होतां घुसळण । राहिला घुमोन । क्षीरार्णव ॥९९२॥
तैसे महा - नाद । गंभीर ते शब्द । बोले विश्व - कंद । विश्वरूप ॥९९३॥
आली जिये क्षणीं । देवाची ती वाणी । घोघावत कानीं । अर्जुनाच्या ॥९९४॥
तिये क्षणीं तेथें । सुख किंवा भय । दुणावलें काय । नेणों आम्हीं ॥९९५॥
परी थरथर । सर्व हि शरीर । तयाचें साचार । कांपूं लागे ॥९९६॥
भिडले अमोल । देवाचे ते बोल । अंतरीं सखोल । म्हणोनियां ॥९९७॥
ठेवी वेळोवेळां । चरणीं ललाट । जोडोनियां हात । नम्रपणें ॥९९८॥
मुखांतुनी शब्द । काढावया पाहे । तंव दाटताहे । कंठ त्याचा ॥९९९॥
म्हणावें हें काय । सुख किंवा भय । तुम्ही च निर्णय । करा ह्याचा ॥१०००॥
परी देवाची ती । ऐकोनियां उक्ति । ऐसी झाली स्थिति । अर्जुनाची ॥१००१॥
जाणिलें हें पूर्ण । अहो श्रोतेजन । यथार्थ पाहोन । श्लोक - पदें ॥१००२॥
असो तैसा चि तो । मग भीतभीत । चरण वंदीत । बोले पुन्हां ॥१००३॥
अर्जुन उवाच ---
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रह्रष्यत्यनुरज्यते च ।
रक्षांसि भीतानि दिशो द्नवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः ॥३६॥
म्हणे सांगितलें । ऐसें जें आपण । ‘ अर्जुना , मी जाण । असें काळ ॥१००४॥
ग्रासितसें विश्व । कीं तो माझा खेळ ’ । बोलहा अढळा । मानूं तुझा ॥१००५॥
परी तुवां काळें । स्थितीचिया वेळे । ग्रासावें हें जुळे । कैसें संग ॥१००६॥
देहींचें तारुण्य । काढोनियां तेथें । वार्धक्य नसतें । आणूं ये का ? ॥१००७॥
ग्रासावया आज । पाहसी विश्वातें । परी बहुधा तें । न घडेल ॥१००८॥
न लोटतां चार । प्रहर साचार । माध्याह्लीं भास्कर । मावळे का ? ॥१००९॥
तुज अखंडित । काळातें हि जाण । समय हे तीन । नसती का ? ॥१०१०॥
सर्ग - स्थिति - लय । तीन हे समय । जो तो बळी होय । त्या त्या काळीं ॥१०११॥
स्थितीचिया वेळे । उत्पत्ति - समय । नाहीं स्थिति - लय । तिये वेळीं ॥१०१२॥
स्थितीचिया वेळे । उत्पत्ति - प्रलय । दोहोंचा हि लय । होत असे ॥१०१३॥
तेविं प्रळयाची । वेळ येतां मग । स्थिति आणि सर्व । मावळती ॥१०१४॥
ऐसा असे क्रम । अनादि अढळ । सदा सर्वकाळ । अबाधित ॥१०१५॥
आतां सर्व जग । स्थितीचा च भोग । घेत असे चांग । आज जरी ॥१०१६॥
तरी सांग मीं हें । ग्रासिलें सकल । ऐसे कैसे बोल । बोलसी तूं ॥१०१७॥
तंव देव म्हणे । सांगितला येथ । ईश्वरी संकेत । तुजलागीं ॥१०१८॥
मृत्यूचिया मुखीं । गेलीं दोन्ही दळें । तुज दाखविलें । प्रत्यक्ष हें ॥१०१९॥
परी इतर जें । विश्व हें सकळ । तें हि यथाकाळ । संहरेल ॥१०२०॥
ऐशा परी कृष्ण । देव भगवंत । जंव हा संकेत । सांगतसे ॥१०२१॥
तंव पंडु - सुतें । देखिले मागुते । यथास्थित तेथें । सर्व लोक ॥१०२२॥
मग म्हणे पार्थ । देवा तूं साचार । होसी सूत्रधार । विश्वाचा ह्या ॥१०२३॥
नव्हे का हें पुन्हां । दिसतसे येथ । जग । व्यवस्थित । होतें तैसें ॥१०२४॥
परी दुःखार्णवीं । पडले जे जीव । तयांचा सद्भाव । पाहोनियां ॥१०२५॥
उद्धरसी त्यांसी । प्रभो ह्रषीकेशी । कीर्ति तुझी ऐसी । आठवितों ॥१०२६॥
भोगीतसें महा - । सुखाचा सोहळा । कीर्ति वेळोवेळां । आठवोनि ॥१०२७॥
आनंदामृताच्या । लाटांवरी साच । करीतसें नाच । देवदेवा ॥१०२८॥
आतां सर्व जग । वांचलें हें चांग । धरी अनुराग । तुझ्या ठायीं ॥१०२९॥
तूं चि दुर्जनांचा । करिसी संहार । जगीं वारंवार । प्रकटोनि ॥१०३०॥
महा - भयें दूर । दाही दिशांपार । पळती असुर । त्रिलोकींचे ॥१०३१॥
सिद्ध - संघ देव । किन्नर गंधर्व । किंबहुना सर्व । चराचर ॥१०३२॥
होतां चि दर्शन । आनंद पावोन । करीत वंदन । तुजलागीं ॥१०३३॥
कस्माच्च ते न नमेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।
अनन्त देवेशा जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥३७॥
तुझे हे पावन । सोडोनि चरण । कां गेले पळून । राक्षस ते ॥१०३४॥
हें तों काय देवें । सांगावया हवें । सहजें जाणवे । आम्हांसी हि ॥१०३५॥
काय पळभर । राहेल अंधार । अंबरीं भास्कर । उगवतां ॥१०३६॥
आत्म - प्रकाशाची । खाण तूं विराट । झालासी प्रकट । आज येथें ॥१०३७॥
म्हणोनियां दुष्ट । निशाचरें नष्ट । झालीं ऐसें स्पष्ट । कळों आलें ॥१०३८॥
प्रभो पर - ब्रह्मा । हृदयाभिरामा । आजवरी आम्हां । ठाउकें ना ॥१०३९॥
परी आतां तुझी । थोरवी गंभीर । देखिली साचार । विश्वरूपा ॥१०४०॥
भूत - समूहांच्या । पसरती वेली । नाना जगें झालीं । जेथोनियां ॥१०४१॥
आदिमायेसी त्या । प्रसवली साच । इच्छा गा तुझी च । विश्वरूपा ॥१०४२॥
देवा तूं अपार । नित्य - तत्त्व - रूप । अनंत अमाप । गुण तुझे ॥१०४३॥
देवांचा हि देव । होसी तूं निःसीम । सर्वां ठायीं सम । निरंतर ॥१०४४॥
त्रिभुवनालागीं । तुझा चि आधार । सदा शुभंकर । अक्षर तूं ॥१०४५॥
प्रभो संतासंत । तूं चि गा समस्त । तया हि अतीत । तें हि तूं चि ॥१०४६॥
त्वमादिदेवः पुरुषः पुराण -- स्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥३८॥
प्रकृति - पुरुषांचें । होसी मूळपीठ । अनादि वैकुंठ - । नायका तूं ॥१०४७॥
महत्तत्त्वाचा हि । शेवट तूं साच । पुरातन तूं च । विश्वरूपा ॥१०४८॥
होसी तूं सकळ । विश्वाचें जीवन । जीवांसी निधान । तूं चि एक ॥१०४९॥
भूत - भविष्याचें । ज्ञान तुझ्या हातीं । सुखावती श्रुती । देखोनियां ॥१०५०॥
व्यापिते जी माया । सर्व त्रैलोक्यास । आधार तियेस । अभेदा तूं ॥१०५१॥
म्हणोनियां तुज । श्रेष्ठ परं - धाम । ऐसें सार्थ नाम । दिलें जाय ॥१०५२॥
माया महद्ब्रह्म । तें हि कल्प - क्षयीं । प्रभो तुझ्या ठायीं । होई लीन ॥१०५३॥
तुवां चि हें विश्व । विस्तारिलें सर्व । नसे रिता ठाव । तुजविण ॥१०५४॥
प्रभो तुझीं रूपें । अनंत अपार । वानावें साचार । तुज कोणें ॥१०५५॥
वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च ।
नमो नमस्तेऽस्तु सहस्त्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥३९॥
नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व ।
अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥४०॥
दिसे चि ना ऐसा । एक हि पदार्थ । नाहींस तूं ज्यांत । विश्वरूपा ॥१०५६॥
सर्वदा सर्वत्र । असे तुझा वास । कोठें तूं नाहींस । ऐसें नाहीं ॥१०५७॥
असो आतां जैसा । होसी तूं श्रीहरी । तैशा तुज करीं । नमस्कार ॥१०५८॥
वायु तूं अनंता । यम नियमित । अन्नें पचविता । अग्नि तो तूं ॥१०५९॥
प्रजाप्रतीचा हि । पिता तूं परम । वरूण तूं सोम । प्रजापति ॥१०६०॥
आणि जें जें कांहीं । आकारलें येथ । किंवा जें अव्यक्त । निराकार ॥१०६१॥
तया तैसिया हि । तुज वारंवार । करीं नमस्कार । जगन्नाथा ॥१०६२॥
ऐशा परी तेथें । जोडोनियां हात । स्तुति - स्तोत्रें गात । प्रेमभरें ॥१०६३॥
म्हणे तुज पुन्हाम । असो नमस्कार । असो नमस्कार । विश्वरूपा ॥१०६४॥
मग तो अर्जुन । पाहे न्याहाळून । मागुतीं संपूर्ण । श्रीमूर्तीतें ॥१०६५॥
आणि म्हणे तुज । असो नमस्कार । असो नमस्कार । विश्वरूपा ॥१०६६॥
चराचरीं देखे । सर्वत्र तें एक । म्हणोनि मस्तक । नमवोनि ॥१०६७॥
पुन्हां म्हणे तुज । असो नमस्कार । असो नमस्कार । विश्व - रूपा ॥१०६८॥
जंव ऐसीं रूपें । अद्भुत अनंत । होतीं प्रकटत । पार्थापुढें ॥१०६९॥
तंव तंव तुज । असो नमस्कार । असो नमस्कार । हें चि म्हणे ॥१०७०॥
नाठवे आणिक । स्तुतिस्तोत्र तें हि । आणि निवांत हि । राहवे ना ॥१०७१॥
नेणों प्रेमभावें । कैसा वारंवार । असो नमस्कार । हें चि म्हणे ॥१०७२॥
काय सांगूं फार । ह्यापरी सहस्त्र । केले नमस्कार । पंडु - सुतें ॥१०७३॥
मग पुन्हां म्हणे । आहे किंवा नाहीं । मज कासया । नमस्कार ॥१०७४॥
तुज पाठ - पोट । आहे किंवा नाहीं । मज कासया हि । उठाठेव ॥१०७५॥
जरी पाठमोरा । होसी तूं साचार । तरी नमस्कार । तैशा तुज ॥१०७६॥
पाठमोरा ऐसें । म्हणावें तुम्हासी । उभा तूं पाठीशीं । म्हणोनियां ॥१०७७॥
एर्हवीं सन्मुख - । विन्मुख ही भाषा । घडे ना विश्वेशा । तुझ्या ठायीं ॥१०७८॥
प्रभो तुझीं ऐसीं । अंगें अगणित । मी तों असमर्थ । वानावया ॥१०७९॥
म्हणोनियां तुज । सर्वात्मका सर्वा । असो महा - देवा । नमस्कार ॥१०८०॥
प्रभो तुझें बळ । अपार अनंत । थोर अगणित । पराक्रम ॥१०८१॥
सर्व काळीं सम । होसी तूं साचार । तुज नमस्कार । सर्वरूपा ॥१०८२॥
शून्यामाजीं सर्व । शून्यमय जैसें । होवोनियां असे । शून्य चि तें ॥१०८३॥
तैसा सर्वपणें । सर्वांसी व्यापून । सर्व तूं होऊन । राहिलासी ॥१०८४॥
क्षीर - सागरांत । तरंग हि साच । जैसे क्षीराचे च । संभवती ॥१०८५॥
तैसा विश्व - रूपा । सर्वत्र सकळ । त्रि - लोकीं केवळ । तूं चि होसी ॥१०८६॥
म्हणोनि तूं विश्वा - । वेगळा नाहींस । ऐसे प्रत्ययास । आलें आतां ॥१०८७॥