श्लोक २६ ते ३०
अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसंघैः ।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥२६॥
अंध धृतराष्ट्र । तयाचे कुमर । नव्हेत का वीर । कौरव हे ॥८१०॥
तुझ्या मुखामाजीं । सर्व हे साचार । सह परिवार । गेले गेले ! ॥८११॥
आणि सहय्यार्थ । देशोदेशींचे जे । राजे महाराजे । आले येथें ॥८१२॥
तयांची तों वार्ता । काय झाली तें हि । सांगावया नाहीं । कोणी मागें ॥८१३॥
सर्वांलागीं ऐसें । मुखीं रगडून । टाकिसी गिळून । एकाएकीं ॥८१४॥
गज -समूहातें । घटघटां घेसी । मुखीं कवळिसी । सर्व सेनाअ ॥८१५॥
गोलंदाज आणि । पादचारी वीर । लोपती अपार । मुखांमाजीं ॥८१६॥
एक एक शस्त्र । ऐसें मह -घोर । जणूं सदोदर । काळाचें चि ॥८१७॥
जें का एकलें च । पुरेल साचार । विश्वाचा संहार । करावया ॥८१८॥
ऐसीं संहारक । शस्त्रें असंख्यात । आवेशें गिळीत । आहेसी तूं ॥८१९॥
चतुरंग सेना । स -तुरंग रथ । न लावितां दांत । गिळितोसी ॥८२०॥
गिळावया सर्वां । कैसा तुज देवा । संतोष बरवा । वाटतसे ॥८२१॥
भीष्माचार्यांऐसा । सत्यवादी कोण । संग्रामीं निपुण । दुजा थोर ॥८२२॥
हाय ! तयासी हि । टाकिसी गिळून । आणि गुरु द्रोण । ब्राह्मण हि ॥८२३॥
अरेरे ! हा देखें । सूर्याचा नंदन । गेला गेला कर्ण । महा -वीर ! ॥८२४॥
आमुची हि सेना । कस्पटासमान । आघवी झाडोन । टाकिलीस ॥८२५॥
हाय ! ब्रह्मदेवा । अनुग्रहें येथ । ऐसें विपरीत । प्राप्त झालें ! ॥८२६॥
बापुड्या जगासी । आणिलें मरण । प्रभूसी प्रार्थून । ऐशा रीती ॥८२७॥
देवें जगन्नाथें । मागें थोडाफार । विभूति -प्रकार । निवेदिला ॥८२८॥
परी व्यापकता । तैसी नये चित्ता । म्हणोनि मागुता । पुसों गेलों ॥८२९॥
होणार जें जैसें । बुद्धि हि तैसी च । भोक्तव्य तें साच । टाळवे ना ॥८३०॥
माझिया कपाळीं । सर्वांनीं साचार । फोडावें खापर । अनर्थाचें ॥८३१॥
विधि -लिखित हें । ऐसें जरी असे । तरी कोणा कैसें । टाळवेल ॥८३२॥
मंथितां सागर । लाधलें अम्रुत । तरी देव स्वस्थ । राहती ना ॥८३३॥
मग पुनरपि । घुसळितां अंतीं । आलें तयांहातीं । काळकूट ॥८३४॥
परी तें संकट । एकेपरी अल्प । प्रत्ययाचें माप । घेतां वाटे ॥८३५॥
आणि तयाचा हि । परिहार करी । तिये अवसरीं । नील -कंठ ॥८३६॥
परी हा प्रसंग । कैसा विलक्षण । त्याहुनी भीषण । वाटे मज ॥८३७॥
गिळील का कोण । विषाचें गगन । पेटता पवन । आवरील ॥८३८॥
महा -काळासंगें । मांडावया खेळ । असे काय बळ । कोणाअंगीं ? ॥८३९॥
ऐसा तो किरीटी । होवोनियां कष्टी । आपुलिया चित्तीं । करी शोक ॥८४०॥
परी तयालागीं । कळे ना प्रस्तुत । काय मनोगत । श्रीहरीचें ॥८४१॥
ग्रासिला तो देखा । ऐशा महा -मोहें । वध्य कौरव हे । वधिता मी ॥८४२॥
तयाचा हा मोह । करावया दूर । दाविलें साचार । विश्वरूप ॥८४३॥
विश्वरूपाचें तों । करोनि निमित्त । तत्त्व हें चि व्यक्त । केलें देवें ॥८४४॥
अरे येथें कोणी । कोणातें न मारी । सर्व हें संहारी । मी चि एक ॥८४५॥
परी प्रभूचा हा । गूढ अभिप्राय । नेणे धनंजय । म्हणोनियां ॥८४६॥
कंप पावे वायां । व्याकुळोनि चित्तीं । नसती च भीति । वाढवोनि ॥८४७॥
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि ।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संद्दश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्नैः ॥२७॥
मग म्हणे देख । अभ्रें जैशा रीती । जिरोनियां जाती । आकाशांत ॥८४८॥
दोन्ही दलें तैसीं । शस्त्रास्त्रांसहित । तुझिया मुखांत । गेलीं गेळीं ! ॥८४९॥
किंवा देख महा - । कल्पाचिया अंतीं । कोपतां च सृष्टी - । वरी काळ ॥८५०॥
पाताळासकट । करीतसे ग्रास । जैसा एकवीस । स्वर्गांचा हि ॥८५१॥
प्रतिकूल दैवें । कृपणाचे ठेवे । ठायीं च स्वाभावें । लया जाती ॥८५२॥
तैसीं साठवलीं । देख एकाएकीं । प्रवेशलीं मुखीं । सर्व सैन्यें ॥८५३॥
परी तोंडांतून । सुटे ना कोणी च । कर्म -गति साच । विलक्षण ॥८५४॥
चघळावे उंटें । अशोकाचे टाळे । तैसे मुखीं गेले । वायां लोक ॥८५५॥
मुकुटांसहित । मस्तकें हीं येथ । कैसीं चिमटयांत । सांपडलीं ॥८५६॥
जणूं रगडोनि । तयांचें तों कैसें । पीठ झालें दिसे । दाढांमाजीं ॥८५७॥
मुकुटांवरील । हिरे -माणिकें हि । अडकलीं कांहीं । तीक्ष्ण दंतीं ॥८५८॥
तया माणिकांचा । होवोनियां चुरा । पसरला सारा । जिव्हेखालीं ॥८५९॥
दातांचे हि कांहीं । कांहीं अग्रभाग । ते हि गेले चांग । माखोनियां ॥८६०॥
विश्वरूप -काळें । टाकिलें ग्रासोन । बळ हि संपूर्ण । लोकांचें ह्या ॥८६१॥
परी तयांचें जें । असे उत्तमांग । अवश्य अभंग । ठेविलें तें ॥८६२॥
शरीरामाझारीं । मस्तकें हीं देख । सुनिश्चयें चोख । होती साच ॥८६३॥
म्हणोनियां महा - । काळाच्या हि तोंडीं । तयांची राखोंडी । नाहीं झाली ॥८६४॥
मग पार्थ म्हणे । नवल हें पाहीं । दुजी गति नाहीं । भूतांसी ह्या ॥८६५॥
म्हणोनि हें जग । मुखरूपी डोहीं । बुडोनियां जाई । आपोआप ॥८६६॥
कैशा स्वभावें च । सर्व हि ह्या सृष्टि । प्रवेशती अंतीं । मुखामाजीं ॥८६७॥
हें तों विश्वरूप । राहोनियां स्वस्थ । गिळीतसे येथ । आघवें हि ॥८६८॥
उंच मुखामाजीं । धांवती साचार । समस्त हि थोर । ब्रह्मादिक ॥८६९॥
विश्वरूपाचिया । पडती वदनीं । ऐलीकडे कोणी । सामान्य हे ॥८७०॥
जन्मल्या ठायीं च । गिळोनी टाकीत । कैसें भूतजात । आणिक हि ॥८७१॥
तुझिया आनना - । पासोनियां येथ । सुटेना निभ्रांत । कांहीं एक ॥८७२॥
यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।
तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥२८॥
महा -नदांचें ते । ओघ जैशा रीती । जावोनि मिळती । सागरातें ॥८७३॥
तैसें सारें जग । सर्व हा बाजूंनीं । तुझिया वदनीं । शिरताहे ॥८७४॥
दिन -रजनीचीं । करोनियां पेणीं । पंथ आक्रमोनि । आयुष्याचा ॥८७५॥
जाहलें प्रविष्ट । तुझिया मुखांत । वेगें भूतजात । आघवें हें ॥८७६॥
यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्न विशन्ति नाशाय समृद्धवेगाः ।
तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥२९॥
लोटती पतंग । पेटत्या दरींत । तैसें भूतजात । तुझ्या मुखीं ॥८७७॥
तप्त लोहावरी । पडतां चि तोय । आटोनियां जाय । क्षणामाजीं ॥८७८॥
तैसें तुझ्या मुखीं । लोटलें जें कांहीं । तयाचें नांव हि । राहिलें ना ॥८७९॥
लोलिह्यसे ग्रसमानः समन्ता - ल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वलद्भिः ।
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥३०॥
आणि एवढें हि । करोनि भक्षण । नाहीं उणेपण । भुकेलागीं ॥८८०॥
ऐसा लोकोत्तर । जठराग्नि येथ । जाहला प्रदीप्त । तुझा देवा ॥८८१॥
दोषी -ज्वरांतून । वाटावतां रोगी । उठे तयालागीं । खा खा जैसी ॥८८२॥
ना तरी भणंग । हिंडे वणवण । जैसा सांपडोन । दुष्काळांत ॥८८३॥
तैसी तुझी देवा । वळवळे जिह्वा । चाटितां बरवा । ओष्ठप्रांत ॥८८४॥
तुझिया वदना - । पासोनियां साच । सुटलें नाहीं च । कांहीं एक ॥८८५॥
श्रीहरी प्रखर । ऐसी तुझी भूक । मज अलौकिक । वाटतसे ॥८८६॥
एका घोटीं पोटीं । घ्यावें सागरास । करावा कीं घास । पर्वताचा ॥८८७॥
किंवा ब्रह्मगोल । गिळावा संपूर्ण । त्वरें रगडून । दाढेखालीं ॥८८८॥
ना तरी टाकाव्या । चांदिण्या चाटोन । दिशांतें घालोन । घशाखालीं ॥८८९॥
तुझिया भुकेची । ऐसी वखवख । दिसे स्वाभाविक । विश्वरूपा ॥८९०॥
जैसी कामासक्ति । वाढत चि जाय । भोगावे विषय । जों जों येथें ॥८९१॥
किंवा अग्निमाजीं । घालितां सर्पण । जाय भडकोन । वेगें जैसा ॥८९२॥
देवा , तुझी भूक । वाढूं लागे तैसी । जों जों खाणें खासी । ब्रह्मांडाचें ॥८९३॥
वडवानलास । द्यावा गिलायास । जैसा एक धांस । कवठाचा ॥८७४॥
टेंकलें जिह्वाग्रीं । तैसें त्रिभुवन । तुझिया विस्तीर्ण । मुखामाजीं ॥८९५॥
पुरे ना त्रैलोक्य । एका मुखासी च । ऐसीं मुखें साच । असंख्यात ॥८९६॥
तरी त्रिभुवनें । एवढीं कोठून । आणावीं भक्षण । करावया ॥८९७॥
न मिळे आहार । तरी मुखें ऐसीं । कां गा वाढविसी । देवराया ॥८९८॥
लागोनि वणवा । पेटतां पर्वत । सांपडती त्यांत । पशू जैसे ॥८९९॥
तैसें बापुडें हें । पोळे त्रिभुवन । तुझिया वदन - । ज्वाळेमाजीं ॥९००॥
नोहे नोहे विश्व - । रूपाची ही प्राप्ति । कैसी कर्म - गति । ओढवली ॥९०१॥
जग - जळचरां । कृतांताचें जाळें । जणूं पसरलें । ऐसें वाटे ॥९०२॥
अंग - प्रभेचिया । ऐशा जाळ्यांतून । सुटावें कोठून । जगें आतां ॥९०३॥
नव्हेत हीं मुखें । जणूं लाक्षा - गृहें । ओढवलीं पाहें । जगालागीं ॥९०४॥
आपुलिया तेजें । कैसा पोळे प्राणी । हें तों काय अग्नि । जाणतसे ॥९०५॥
परी प्राणियासी । होतां अग्नि - स्पर्श । जळोनियां नाश । होय त्याचा ॥९०६॥
किंवा शस्त्र नेणे । निज - तीक्ष्णपण । प्राण्यासी मरण । कैसें आणी ॥९०७॥
ना तरी जह । निज - मारकता । सहजें सर्वथा । नेणे जैसें ॥९०८॥
तैसें आपुलिया । उग्रतेचें कांहीं । राहिलें च नाहीं । भान तुज ॥९०९॥
परी तुझ्या मुखीं । ऐलीकडे पाहें । होळी होत आहे । ब्रह्मांडाची ॥९१०॥
विश्व - व्यापक तूं । परमात्मा एक । तरी कां मारक । होसी आम्हां ॥९११॥
मज तों नाहीं च ॥ जीवित्वाची चाड । नको धरूं भीड । तूं हि आतां ॥९१२॥
असेल जें कांहीं । प्रभो तुझ्या मनीं । उघड बोलोनि । दाखवीं तें ॥९१३॥
किती वाढविसी । उग्र रूप आतां । प्रभो जगन्नाथा । विश्व - पाळा ॥९१४॥
मजवरी तरी । कृपा करीं पूर्ण । निज प्रभुपण । आठवोनि ॥९१५॥