श्लोक ११ ते २०
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥११॥
कंठ -मुकुटांतें । मग पाहूं लागे । घेवोनियां मागें । भयें द्दष्टि ॥४५४॥
तंव तया वाटे । ह्याजपासोनि च । कल्पतरु साच । जन्म घेती ॥४५५॥
श्रांत रमा जेथें । घेतसे विसांवा । दिव्य पद्म -ठेवा । ऐसा जो का ॥४५६॥
किंवा मूळपीठें । महा -सिद्धींचीं जीं । तैसीं फुलें ताजीं । सु -निर्मळ ॥४५७॥
प्रेमोल्हासें देव । तुरंबीत आहे । ऐसें पार्थ पाहे । तिये वेळीं ॥४५८॥
नाना पूजा -बंध । मस्तकावरतीं । शोभती मुकुटीं । पुष्प -गुच्छ ॥४५९॥
तेविं अलौकिक । दिव्यपुष्पमाळा । विराजती गळां । असंख्यात ॥४६०॥
सुवर्णें मेरूतें । जैसें मढवावें । स्वर्गें पांघरावें । सूर्य -तेज ॥४६१॥
तैसा शोभे कांसे । दिव्य पीतांबर । ऐसें वीर -वर । देखतसे ॥४६२॥
कापुराची उटी । घेनोनियां चांग । चर्चावें सर्वांग । शंकराचें ॥४६३॥
ना तरी कैलास - । पर्वतासी लेप । काढावा अमाप । पारदाचा ॥४६४॥
किंवा क्षीरोदक । क्षीरसागरास । पांघरावयास । द्यावें जैसें ॥४६५॥
ना तरी घालावें । नभासी वेष्टन । घडी उकलून । चंद्रम्याची ॥४६६॥
तैसी तयाचिया । सर्वांगीं किरीटी । देखे शुभ्र उटी । चंदनाची ॥४६७॥
आत्म -प्रकाशासी । जेणें चढे कांति । जेणें लाभे शांति । ब्रह्मानंदा ॥४६८॥
स्वयें गंधवती । असोनि हि पृथ्वी । तियेतें जीववी । सुगंध जो ॥४६९॥
देव परब्रह्म । असोनि निर्लेप । स्वयें अनुलेप । करी ज्याचा ॥४७०॥
स्वभावें अनंग । असोनि मदन । लावी जें चंदन । सर्वांगासी ॥४७१॥
तया चंदनाच्या । उटीचा सुगंध । सर्वथा अगाध । वानूं कैसा ॥४७२॥
पाहोनि एकैक । ऐसा दिव्य साज । गेला कपि -ध्वज । भांबावोनि ॥४७३॥
मग देव तेथें । उभा कीं बैसला । किंवा तो निजेला । हें हि नेणे ॥४७४॥
उघडोनि द्दष्टि । चोहोंकडे पाहे । तंव देखताहे । मृर्तिमय ॥४७५॥
न पहावें आतां । म्हणोनि किरीटी । घेई जंव द्दष्टि । मिटोनियां ॥४७६॥
तंव तया दिसे । आंत हि तैसें च । पसरलें साच । विश्वरूप ! ॥४७७॥
विश्वरूपाचीं तीं । मुखें असंख्यात । देखे पंडु -सुत । द्दष्टीपुढें ॥४७८॥
म्हणोनि तो जंव । पाठमोरा होई । तंव तीं तेथें हि । दिसती च ॥४७९॥
तैसे च ते हात । तैसीं च तीं मुखें । चरण हि देखे । तैसे च ते ॥४८०॥
पाहे तें तें दिसे । विश्वरूपमय । नवल तें काय । असे येथें ॥४८१॥
परी जरी नेत्र । मिटोनियां राहे । तरी दिसताहे । तें चि रूप ! ॥४८२॥
आपुल्या कृपेची । थोरवी अपूर्व । पहा दावी देव । पार्थालागीं ॥४८३॥
तयाचें पाहणें । न पाहणें तें हि । तयासह घेई । व्यापोनि तो ॥४८४॥
म्हणोनियां एका । आश्चर्याच्या पूरीं । पडोनि बाहेरी । जंव ठाके ॥४८५॥
तंव तेथें दुज्या ॥ चमत्काराचिया । जाय बुडोनियां । महार्णवीं ॥४८६॥
निज -विश्वरूप । ऐशा रीति पूर्ण । कौशल्यें दावोन । पार्थालागीं ॥४८७॥
अनंत -स्वरूपी । देव तो श्रीकांत । व्यापोनियां घेत । तयातें हि ॥४८८॥
निज -विश्वरूप । दाखवावें मज । ऐसें भीमानुज । प्रार्थी जंव ॥४८९॥
तंव आघवें चि । होनोनि आपण । नटे नारायण । सर्व -व्यापी ॥४९०॥
दीपाधारें किंवा । रवि -प्रकाशांत । पहाया समर्थ । द्दष्टि जी का ॥४९१॥
ना तरी जी द्दष्टि । मिटोनि घेतां च । दिसायाचें साच । खुंटतसे ॥४९२॥
ऐसी स्थूल -द्दष्टि । नव्हती ती देखा । पार्थालागीं जी का । दिली देवें ॥४९३॥
म्हणोनि तो पार्थ । जैसा प्रकाशांत । तैसा अंधारांत । पाहूं शके ! ॥४९४॥
आणि जरी नेत्र । मिटोनियां घ्यावे । तरी हि दिसावें । तयालागीं ॥४९५॥
धृतराष्ट्राप्रति । हस्तिनापुरांत । सांगे ऐसी मात । संजय तो ॥४९६॥
म्हणे ऐकिलें का । काय सांगूं तरी । नाना अलंकारीं । शोभलें जें ॥४९७॥
सर्व हि बाजूंनीं । जयालागी मुखें । विश्वरूप देखे । ऐसें पार्थ ॥४९८॥
दिवि सूर्यसहस्त्रस्य भवेद्युगपदुत्थिता ।
यदि भाः सद्दशी सा स्याद्भासतस्य महात्मनः ॥१२॥
अहा ! तयाचिया । अंग -कांतीची ती । अपूर्वता होती । निरूपम ॥४९९॥
कल्पान्ताच्या वेळीं । बारा आदित्यांचें । तेज होय साचें । एकत्रित ॥५००॥
तैसे ते सहस्त्र । दिव्य सूर्य जरी । एके अवसरीं । प्रकटले ॥५०१॥
तरी तयांची हि । न साजे उपमा । एवढी महिमा । तेजाची त्या ॥५०२॥
सर्व हि विजांचा । मोळावा करून । सामुग्री घेऊन । काळाग्नीची ॥५०३॥
जरी दहा महा - । तेजांचा संघात । केला एकत्रित । तयामाजीं ॥५०४॥
तरी तें तुळेल । तेज कांहीं अंशीं । सर्वांगप्रभेशीं । देवाचिया ॥५०५॥
परी संपूर्णत्वें । तुल्य तें नव्हेच । त्रिवार हें साच । देख राया ॥५०६॥
प्रभु श्रीरंगाच्या । सर्वांगाचें तेज । ह्यापरी सहज । फांकतसे ॥५०७॥
व्यासांचिया कृपे । तें चि दिव्य तेज । आज येथें मज । द्दश्य झालें ॥५०८॥
तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा ।
अपश्यद्देवदेवस्य शरीरें पाण्डवस्तदा ॥१३॥
तिये विश्वरूपीं । एकीकडे सारें । आपुल्या विस्तारें । जग दिसे ॥५०९॥
महोदधीमाजीं । बुडबुडे सान । जैसे भिन्न भिन्न । द्दश्य होती ॥५१०॥
किंवा नभीं जैसी । गंधर्व -नगरी । नातरी भूवरी । वारुळें तीं ॥५११॥
किंवा मेरूवरी । बारीक बारीक । बैसावे अनेक । परमाणु ॥५१२॥
प्रभूचिया देहीं । तैसें सारें जग । पार्थ देखे मग । तिये वेळीं ॥५१३॥
ततः स विस्मयाविष्टो ह्रष्टरोमा धनंजयः ।
प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत ॥१४॥
वेगळें तें विश्व । वेगळे आपण । ऐसें दुजेपण । होतें अल्प ॥५१४॥
तें हि गेलें मग । आटोनि संपूर्ण । एकाएकीं मन । मावळलें ॥५१५॥
होतां ब्रह्मानंद । अंतरीं जागृत । बाहेरी गलित । गात्रें झालीं ॥५१६॥
पायांपासोनियां । मस्तकापर्यंत । होय रोमांचित । काया सारी ॥५१७॥
वर्षाकाळारंभीं । पर्वतावरूप । पाणी ओघळून । जातां मग ॥५१८॥
तयाचे सर्वांगीं । अति सुकुमार । जैसे तृणांकुर । विरूढती ॥५१९॥
तेथें पार्थाचिया । शरीरीं तैसे च । उठले रोमांच । तिये वेळीं ॥५२०॥
चंद्र -किरणांचा । स्पर्श होतां क्षणीं । चंद्रकांत मणि । द्रवे जैसा ॥५२१॥
स्वेद -कणिकांनीं । आली डबडबून । पार्थाची संपूर्ण । तनु तैसी ॥५२२॥
गुंततां भ्रमर । पद्म -कलिकेंत । मग ती जळांत । हाले जैसी ॥५२३॥
तैसा कांपे देह । बळें उसळतां । आनंदाच्या लाटा । अंतरांत ॥५२४॥
कापूरकेळीच्या । गाभारां साचार । दाटतां कापूर । मग जैसीं ॥५२५॥
तियेचीं सोपटें । सुटोनि त्यांतून । कापुराचे कण । ओघळती ॥५२६॥
तैसे अर्जुनाचे । दाटोनि लोचन । गळती त्यांतून । आनंदाक्षु ॥५२७॥
चंद्राचा उदय । होतां एकसरें । भरला चि भरे । अब्धि जैसा ॥५२८॥
तैसा स्वानंदाचा । येवोनियां भर । पार्थ वारंवार । उचंबळे ॥५२९॥
अष्ट सात्त्विकांची । ऐसी परस्पर । लागली साचार । चढाओढ ॥५३०॥
तेथें पार्थालागीं । पूर्ण ब्रह्मानंद -। साम्राज्याचें पद । प्राप्त झालें ॥५३१॥
अद्वैतसुखाचा । ऐसा साक्षात्कार । पार्थासी साचार । भोगवोनि ॥५३२॥
कृपाद्दष्टिक्षेपें । देव -भक्तपण । ठेविलें राखोन । पुन्हां देवें ॥५३३॥
मग दीर्घा श्वास । टाकोनि किरीटी । लावी एकद्दष्टि । देवाकडे ॥५३४॥
होता जिये स्थानीं । बैसला तो पार्थ । तेथोनि च हात । जोडोनियां ॥५३५॥
तेविं नमवोनि । मस्तक आपुलें । काय पुन्हां बोले । देवालागीं ॥५३६॥
अर्जुन उवाच --
पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ।
ब्रह्माणमीशं कमलासनस्थ --- मृषींश्च सर्वानुरगांश्चदिव्यन् ॥१५॥
म्हणे प्रभो तुझा । असो जयजयकार । तुझी कृपा थोर । मजवरी ॥५३७॥
सर्वेश्वरा मी तों । असोनि प्राकृत । देखिलें अदूभुत । विश्वरूप ॥५३८॥
विश्वासी आश्रय । होसी एकला च । पाहिलें हें साच । आज येथें ॥५३९॥
स्वभावें संतोष । झाला माझ्या जीवा । भलें केलें देवा । कृपा -सिंधो ॥५४०॥
मंदराचळाच्या । जैसीं आश्रयानें । ठायीं ठायीं रानें । श्वापदांचीं ॥५४१॥
तैसे तुझ्या देहीं । इंद्रलोकादिक । लोक हे अनेक । देखतसें ॥५४२॥
अंतराळामाजीं । नाना ग्रह -गण । एकत्र दिसून । येती जैसे ॥५४३॥
किंवा महावृक्षीं । जैसीं छोटीं छोटीं । दिसावीं घरटीं । पाखरांचीं ॥५४४॥
तैसे देवगणां - । समवेत स्वर्ग । देखतसें चांग । तुझ्या देहीं ॥५४५॥
प्रभो पंचमहा - । भूतांचीं पंचकें । अनेक मी देखें । तुझ्या ठायीं ॥५४६॥
आणि एक एक । भूत -सृष्टींतील । प्राण्यांचे सकल । समुदाय ॥५४७॥
देखिला हा काय । ब्रह्मदेव नोहे । तुजमाजीं आहे । सत्यलोक ॥५४८॥
आणि दुज्या ठायीं । पाहूं जातां तेथें । दिसे प्रभो मातें । कैलास हि ॥५४९॥
भवानीसहित । शंभु भोलानाथ । पाहतसें तेथ । एके भागीं ॥५५०॥
आणि ह्रषीकेशी । नवल हें पाहीं । देखिलें तुज हि । तुजमाजीं ॥५५१॥
देखें कश्यपादि । सर्व ऋषि -कुळें । देखें हीं पाताळें । नागांसह ॥५५२॥
काय सांगूं फार । त्रैलोक्य -पालका । तुझिया एकैका । अंग -प्रांतीं ॥५५३॥
देखें भिंतीवरी । जैशा चित्राकृति । तैसें उपटती । चौदा लोक ॥५५४॥
आणि तयांतील । प्राणी जे का नाना । चित्रांची रचना । जणूं ती च ॥५५५॥
ऐसा असामान्य । तुझा थोरपणा । देवा नारायणा । देखतसें ॥५५६॥
अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनत्नरूपम् ।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप ॥१६॥
दिव्यद्दष्टीचिया । बळें प्रभो ऐसें । जंव पाहतसें । चोहींकडे ॥५५७॥
तंव तुझ्या भव्य बाहुदंडीं कैसें । आकाश हें दिसे । अंकुरलें ॥५५८॥
आणि नवल हें । पाह्तों अद्भुत । कैसे तुझे हात । एकले चि ॥५५९॥
एका चि समयीं । सर्व हि व्यापार । करिती साचार । निरंतर ॥५६०॥
जणूं उघडावीं । ब्रह्मांड -भांडारें । अपार विस्तारें । ब्रह्माचिया ॥५६१॥
तैसीं अमर्याद । तुझीं मोठीं पोटें । देखतसें येथें । स्पष्टपणें ॥५६२॥
सहस्त्र -शीर्षांचीं । देखातों रूपें तीं । एका वेळीं होती । कोटयवधि ॥५६३॥
किंवा मुखरूपी । फळांनीं दाटून । यावें जणूं पूर्ण । परब्रह्म ॥५६४॥
तैसीं चोहींकडे । तुझीं दिव्य मुखें । आणि नाना देखें । नेत्र -पंक्ति ॥५६५॥
हा तों स्वर्ग , ही तों । भूमि , हें पाताळ । हें तों अंतराळ । दिशा कीं ह्या ॥५६६॥
ऐसें बोलायाची । राहिली ना सोय । विश्वरूपमय । सर्व झालें ॥५६७॥
अणु एवढा हि । अवकाश रिता । येथें भगवंता । तुजविण ॥५६८॥
शोधितां हि मज । सांपडेना देवा । व्यापिलें हें तुवां । ऐसें सर्व ॥५६९॥
नाना परी महा - । भूतांचा अपार । जेवढा विस्तार । सांठवला ॥५७०॥
देखतसें येथें । प्रभो तेवढा हि । भरोनियां राही । तुझ्या रूपें ॥५७१॥
ऐसा तूं आलासी । कोणे ठायाहून । उभा कीं बैसोन । राहिलासी ? ॥५७२॥
होतासी तूं कोणा । मातेचिया पोटीं । केवढी आकृति । होय तुझी ? ॥५७३॥
कैसें तुझें रूप । किती तुझें वय । पलीकडे काय । असे तुझ्या ? ॥५७४॥
कशावरी येथें । आहेसी तूं देव । लागलों मी जंव । पाहूं ऐसें ॥५७५॥
तंव देखिलें मीं । सर्व कांहीं तूं च । तुझा ठाव साच । तूं च होसी ॥५७६॥
नव्हेसी कोणाचा । अनादि तूं प्रभु । होसी तूं स्वयंभू । ह्रषीकेशा ॥५७७॥
उभा ना तूं बैठा । ठेंगणा ना उंच । तळीं वरी साच । तूं च होसी ॥५७८॥
देवा तुझें रूप । तुझ्या सारिखें च । वय हि तैसें च । होय तुझें ॥५७९॥
पाठी पोट तुझें । तूं चि भगवंता । आघवें अनंता । तुझें तूं च ॥५८०॥
हें चि वारंवार । देखिलें साचार । काय सांगूं फार । तुज आतां ॥५८१॥
परी एक न्यून । तुझ्या स्वरूपांत । आदि मध्य अंत । तिन्ही नाहीं ॥५८२॥
तयां सर्वां ठायीं । भलें शोधितां हि । सांपडले नाहीं । मज कोठें ॥५८३॥
म्हणोनि ते तिन्ही । नाहींत हें साच । त्रिवार ऐसें च । मज वाटे ॥५८४॥
ऐशापरी आदि - । मध्यान्त -रहिता । अपार अच्युता । नारायणा ॥५८५॥
त्रैलोक्य -नायका । विश्वरूपा आतां । देखिलें तत्त्वतां । तुजलागीं ॥५८६॥
देखतसें देवा । मूर्ति किती तरी । तुझ्या देहावरी । उमटल्या ॥५८७॥
जणूं नानाविध । वर्णांचीं विचित्रें । पांघरिसी वस्त्रें । ऐसें वाटे ॥५८८॥
तुझ्या स्वरूपाच्या । महोदधीवरी । उठती लहरी । मूर्तिरूप ॥५८९॥
किंवा मूर्तिरूप । फळांनीं तूं देवा । शोभसी बरवा । जणूं वृक्ष ॥५९०॥
व्यापिलें प्राण्यांनीं । जैसें पृथ्वीतळ । किंवा अंतराळ । नक्षत्रांनीं ॥५९१॥
तैसें तुझें रूप । असंख्य मूर्तिनीं । राहिलें भरोनि । देखतसें ॥५९२॥
एकैक मूर्तीच्या । अंग -प्रांतीं होय । आणि लया जाय । त्रैलोक्य हें ॥५९३॥
एवढया त्या मूर्ति । परी रोमाऐशा । जाहल्या विश्वेशा । तुझ्या देहीं ॥५९४॥
ऐसा विश्वाचा हा । पसारा मांडोन । राहिलासी कोण । कोणाचा तूं ? ॥५९५॥
पाहिलें हें तंव । कळों आलें साच । सारथी तूं तो च । आमुचा गा ॥५९६॥
तरी वाटे मज । पाहतां मुकुंदा । ऐसा चि सर्वदा । व्यापक तूं ॥५९७॥
परी धरिसी तूं सगुण स्वरूपा । करावया कृपा । भक्तांवरी ॥५९८॥
रूप चतुर्भुज । सांवळें देखून । निवती नयन । आणि मन ॥५९९॥
मग प्रेम -भावें । देऊं जातां मिठी । कैसा जगजेठी । सांपडसी ? ॥६००॥
प्रभो तूं चि ऐसें । रूप सुकुमार । धारिसी सुंदर । कृपा -सिंधो ॥६०१॥
परी तुजलागीं । लेखितों सामान्य । दोष द्दष्टिजन्य । आमुचा हा ॥६०२॥
तरी आतां माझा । द्दष्टि -दोष गेला । सहजें त्वां दिला । दिव्यचक्षु ॥६०३॥
म्हणोनियां तुझी । थोरवी यथार्थ । पहाया समर्थ । झालों देवा ॥६०४॥
मकर -तुंडाच्या । मागील बाजूसी । बैसला होतासी । रथीं जो तूं ॥६०५॥
तो चि तूं झालासी । विश्वरूप आज । कळलें हें मज । स्पष्टपणें ॥६०६॥
किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ता -- द्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ॥१७॥
तो चि नव्हे का हा । मस्तकीं मुकुट । ठेविला वैकुंठ - । नायका तूं ॥६०७॥
तयाचें तें तेज । आणि थोरपण । परि विलक्षण । दिसे आतां ॥६०८॥
जें का फिरवाया । जाहलासी सिद्ध । तें चि हें प्रसिद्ध । चक्र हातीं ॥६०९॥
धरिसी तूं कैसें । मागें सांवरून । मोडे ना ती खूण । अजूनि हि ॥६१०॥
आणि प्रभो ती च । नव्हे का ही गदा । शोभते गोविंद । दुज्या हातीं ॥६११॥
ते चि हे पुढील । नव्हेत का हात । आयुधें नाहींत । जयांमाजीं ॥६१२॥
परी ते हि कैसे । मागेपुढें होत । लगामा धरीत । सांवरोनि ॥६१३॥
कृपा -सिंधो माझ्या । उत्कंठेचा भर । देखोनि साचार । एकाएकीं ॥६१४॥
दिव्य विश्वरूप । झालासी तूं स्वतां । ऐसें विश्वनाथा । जाणिलें मीं ॥६१५॥
काय हें नवल । कैसें विस्मयांत । बुडोनियां जात । चित्त माझें ॥६१६॥
परी आश्चर्य हि । करावया येथें । आहे कोठें मातें । अवकाश ! ॥६१७॥
आहे नाहीं दोन्ही । भाव हे गिळून । प्रकट होऊन । राहिलासी ॥६१८॥
कैसें तुझ्या दिव्य । स्वरूपाचें तेज । कोंदलें सहज । सर्वत्र हें ! ॥६१९॥
अग्नीची हि द्दष्टि । करपोनि जाय । रवि लुप्त होय । खद्योतसा ॥६२०॥
ऐसें विलक्षण । अद्धुत गहन । असे तीव्रपण । तेजाचें ह्या ॥६२१॥
वाटे सर्व सृष्टि । गेली बुडोनियां । महातेजाचिया । महार्णवीं ॥६२२॥
किंवा कल्पांतींच्या । विजांनीं संपूर्ण । टाकिलें गगन । झांकोनियां ॥६२३॥
प्रळयाग्नि -ज्वाळा । तोडोनियां साच । बांधिला कीं माच । अंतराळीं ॥६२४॥
दिव्य ज्ञान -द्दष्टि । घेवोनि हि आंता । तेज हें अनंता । पाहवेना ॥६२५॥
तेज अनिवार । प्रखर दाहक । कैसें अधिकाधिक । घडाडे हें ॥६२६॥
दिव्यचक्षूसी हि । पडतसे त्रास । न्याहाळावयास । प्रकाश हा ॥६२७॥
काळाग्नि नामक । रुद्राचिया ठायीं । जो का नित्य राही । गूढपणें ॥६२८॥
ऐसा घोर मह - । प्रळयींचा डोंब । उफाळोनि नभ । व्यापी जैसें ॥६२९॥
जणूं शंकराच्या । तृतीय नेत्राची । उमलली साची । दिव्य कळी ॥६३०॥
तैसा पसरतां । प्रकाश आगळा । पंचाग्नीच्या ज्वाळा । भडकोनि ॥६३१॥
तयांच्या वेढयांत । सांपडोनि देख । होत आहे राख । ब्रह्मांडाची ॥६३२॥
ऐसा तूं अद्भुत । दिव्य तेजोराशि । माझिया द्दष्टिसी । द्दश्यमान ॥६३३॥
नवल हें तुझ्या । रूपाचें दर्शन । जन्मल्यापासोन । आज झालें ॥६३४॥
प्रभो तुझी व्याप्ति । निःसीम साचार । तेज हि अपार । तैसें तुझें ॥६३५॥
त्वमक्षरं परमं वेदितव्यं । त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
त्वमव्यय़ः शाश्वतधर्मगोप्त । सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥१८॥
ॐ काराच्या मात्रा । ज्या कीं साडेतीन । होसी तूं त्याहून । पलीकडे ॥६३६॥
देवा परब्रह्म । होसी तूं अ -क्षर । श्रुति तुझें घर । धुंडाळिती ॥६३७॥
सर्व विश्व जेथें । सांठविलें जाय । आकाराचा लय । होय जेथें ॥६३८॥
ऐसें जें अव्यय । अविनाशी स्थान । तें चि हें गहन । रूप तुझें ॥६३९॥
शाश्वत धर्मासी । एक तूं ओलावा । तूं चि नित्य नवा । स्वयं -सिद्ध ॥६४०॥
छत्तीस तत्त्वांच्या । पैलाड जो एक । तो चि अलौकिक । पुरुष तूं ॥६४१॥
अनादिमध्यान्तमनन्तवीर्य -- मनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् ।
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥१९॥
श्रीहरी तूं आदि - । मध्यान्त रह्ति । अपार अ -च्युत । निज -बळें ॥६४२॥
सर्व हि बाजूंनीं । तुज हात पाय । तुझें रूप होय । सर्व -व्यापी ॥६४३॥
रवि -चंद्र -नेत्री । कोप -प्रसादाची । तूं चि लीला साची । दाखविसी ॥६४४॥
कृपाकटाक्षें तूं । पाळिसी एकातें । दण्डिसी एकातें । कोपद्दष्टी ॥६४५॥
ऐसें तुझें दिव्य । स्वरूप साचार । द्दष्टीसी गोचर । झालें आज ॥६४६॥
पेटतां काळाग्नि । तेज फांके जैसें । तुझें मुख तैसें । दिसतसे ॥६४७॥
ज्वाळांचे अलोट । उसळती लोट । पेटतां पर्वत । दावाग्नीनें ॥६४८॥
तैसी मुखामाजीं । दाढा आणि दांत । आवेशें चाटीत । जीभ लोळे ॥६४९॥
तुझिया सर्वांग - । कांतींचें प्रखर । होय अनिवार । तेज जें का ॥६५०॥
आणि मुखांतून । पडे जी बाहेर । उष्णता अपार । अति तीव्र ॥६५१॥
तेणें सर्व विश्व । होवोनि संतप्त । खवळोनि जात । एकाएकीं ॥६५२॥
द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः ।
द्दष्टवाऽद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥२०॥
आतां स्वर्ग -लोक । मेदिनी पाताळ । आणि अंतराळ । दाही दिशा ॥६५३॥
क्षितिजादि सर्व । व्यापिलें त्वां एकें । कौतुकें हें देखें । येथें देवा ॥६५४॥
परी गगना हि । सकट सकळ । बुडावें विक्राळ - । रूपीं जैसें ॥६५५॥
ना तरी अद्भुत । रसाच्या कल्लोळीं । भुवनें वेढिलीं । चवदा हि ॥६५६॥
तैसें तुझें रूप । अद्भुत सखोल । मज आकळेल । कैसें काय ? ॥६५७॥
साहवे ना ऐसी । तुझी उग्र कांति । आवरे ना व्याप्ति । असामान्य ॥६५८॥
सुख व्हावें हें तो । राहिलें बाजूस । परी जगायास । त्रास पडे ॥६५९॥
पाहोनि हें तुझें । स्वरूप अद्भुत । कैसें भयभीत । झालें विश्व ॥६६०॥
प्रभो , कैसें आतां । दुःख -लहरींत । बुडोनियां जात । त्रैलोक्य हें ॥६६१॥
विश्वरूपा तुझें । ऐश्वर्य -दर्शन । कां व्हावें कारण । भय -दुःखां ॥६६२॥
न होय तें कां गा । सुखासी कारण । आलें समजोन । मज आतां ॥६६३॥
जोंवरी द्दष्टीसी । नव्हतें गोचर । श्रीहरी साचार । रूप तुझें ॥६६४॥
तोंवरी नश्वर । संसार -सुखांत । रंगोनियां जात । होतें विश्व ॥६६५॥
आतां तया आला । विषयांचा वीट । झाली तुझी भेट । म्हणोनियां ॥६६६॥
परी द्दढ देऊं । येईल का मिठी । तुज जगजेठी । एकाएकीं ॥६६७॥
आणि तुज मिठी । दिधल्यावांचून । नोहे समाधान । कष्टी जीवा ॥६६८॥
मागें सरूं जावें । तरी अनिवार । पाठीसी संसार । लागलासे ॥६६९॥
पुढें जावें तरी । तूं तों अनावर । न येसी साचार । घेऊं हातीं ॥६७०॥
बापुडें त्रैलोक्य । जातसे पोळून । ऐसें सांपडून । कचाटींत ॥६७१॥
जणूं तूं अग्नीच । प्रकटसी आज । उघड हें मज । वाटतसे ॥६७२॥
जैसा कोणी एक । पोळला आगींत । निवावया येत । सागरासी ॥६७३॥
तंव तेथें हि तो । घाबरे पाहून । तरंग भीषण । सागराचे ॥६७४॥
होय तळमळ । जगाची तैसी च । देखोनियां साच । तुझें रूप ॥६७५॥