गूढकथा
आज बऱ्याच दिवसांनी ऑफिसमध्ये गेलो होतो. पूर्वी रोज जायचो पण आताशा बाहेरील कामामुळे रोज रोज जाणे नाही होत. बऱ्याच दिवसांनी गेल्यामुळे ऑफिस मधील बरीच कामे पेंडिंग पडली होती ती संपवता संपवता कधी ऑफिस बंद करायची वेळ झाली ते समजलेच नाही. स्टाफ निघून गेला आणि माझ्याकडे पण ऑफिसची चावी असल्याने मी थांबून राहिलो. आज सगळी कामे संपवूनच जायचे म्हणून आपला कॉम्प्युटरवर काम करत होतो. माझ्या ऑफिसच्या बाहेर निलगिरीची 3-4 झाडे आहेत. त्याकडे कधी असं फारसं लक्ष जात नाही पण आज सारखं त्या झाडांचं अस्तित्व जाणवत होतं. का कुणास ठाऊक पण ती झाडे तेथे आहेत हे आज जेवढं जाणवत होतं तेवढी जाणीव गेल्या 10 वर्षात कशी काय झाली नाही कुणास ठाऊक? थोड्या थोड्या वेळाने असा काही वारा यायचा की त्या पानांची सळसळ पार माझ्या मेंदूला स्पर्श करून जायची. वेळ जात होता तशी ही सळसळ जरा जास्तच वाढली. एवढी की जणू काही मी एखाद्या भयाण अरण्यात आहे आणि जोराचे वादळ सुटलेय. एवढ्यात जिन्यात कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला.
आता एवढ्या रात्री कोण कस्टमर आला म्हणून जरा आश्चर्य तर वाटले पण मनातून जरा खुश पण झालो की आज ऑफिसला उशिरापर्यंत थांबल्याचा फायदा झाला बहुतेक. पावलांचा आवाज आता जवळ येत गेला. अगदी दाराशी आला तसा मी दरवाज्याकडे पाहिले तर दरवाज्यात माझ्या मित्राची आई! मी विचार केला की एवढ्या रात्री ह्या इथे कशा? पण हा विचार चालू असतानाच त्या एकदम आत आल्या आणि माझ्या अगदी समोर बसल्या. मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो कारण मित्राची आई म्हणजे जवळपास माझ्याच आईच्या वयाची... पण काय मेंटेन केलंय राव. मी लहानपणी त्यांच्या घरी जायचो तेंव्हा मला चॉकलेट देणाऱ्या ह्याच त्या. आख्या घरातलं काम उरकून बाहेर कामाला जायच्या. कामावरून आल्यावर परत घरातला पसारा आवरून स्वयंपाक करायला लागायच्या. केवढि ती एनर्जी. लहानपणी तेवढं कळायचं नाही पण आता जाणवत की एवढं काम करणं म्हणजे तोंडाच्या गप्पा नाहीत. आणि त्याच मित्राचा काही दिवसांपूर्वी फोन आला होता की आई फार थकलीय आता. काम होत नाही, जास्त चालवत नाही. एका जागेवर बसून असते वगैरे वगैरे. पण आता त्यांच्याकडे पाहून अस काही मला तर वाटलं नाही. 25 वर्षांपूर्वी जशा होत्या अगदी तशाच होत्या त्या. 'पप्या आलाय का तुझ्याकडे' हा प्रश्न कानावर पडताच मी माझ्या विचारातून जागा झालो.
पप्या मला गेल्या 3 वर्षात भेटला नाही हे त्यांना सांगायचे होते पण माझ्या तोंडातून काहीच शब्द बाहेर पडले नाहीत. पण त्यांना बहुतेक कळले असावे मला काय म्हणायचंय ते. त्या ताडकन उठल्या आणि निघाल्या. जिन्यातून हळू जा म्हणायला मी दारात गेलो तर त्या तिथे दिसल्याच नाहीत. काय स्पीडने पायऱ्या उतरल्या असतील त्यांनाच माहीत. मला राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की पप्याने आई थकलीय, तिला चालवत नाही असे कसे मला सांगितले? मी आज माझ्या डोळ्यांनी बघितले त्यांना तर 25 वर्ष्यापूर्वी जशा होत्या तशाच होत्या त्या. मनातले विचार तसेच ठेवत मी माझा डबा घेतला आणि निघणार तेवढ्यात डबा थोडा जड लागला म्हणून डबा उघडून बघितले तर लक्षात आले की आज आपण जेवलोच नाहीय. पोटात भूक लागलीय हे मला जाणवले. 2 घास खाऊन मग निघू असा विचार करून परत बसलो. आणि डब्यातील मेनू बघून डोकेच फिरले. डब्यात तूप, साखर, पोळीचे 2 छोटे रोल दिले होते. लहानपणी आई द्यायची डब्यात तसे. पण आता मी काय लहान राहिलोय का असा रोल खायला? बायको पण राव अँटिकच पीस आहे. हे 2 रोल पोटाच्या कुठच्या कोपऱ्यात जाऊन पडतील तेही कळणार नाही. माझी मुलगी एका घासात संपवेल हे. आणि मला दिवसभराचा डबा म्हणून हे दिलंय. डबा बंद केला आणि घरी जाऊनच जेवू असा विचार करत ऑफिस बंद केले आणि निघालो.
खाली उतरलो तर समोर ऑफिसचा वाचमन दिसला. त्याला सहजच काय चाललंय विचारावे म्हणाले तर तोच आपणहून म्हणाला, पप्पा नाही आले का आज? मी मनात विचार केला ह्याचे बहुतेक डोके फिरलेय. आज एवढ्या वर्षात माझे वडील कधी ऑफिसला आले नाहीत आणि याला बरी आज त्यांची आठवण आली. त्याच्याकडे पाहून मी नुसता कसनुसा हसलो आणि कारकडे निघालो. कार काढली आणि घराच्या दिशेने निघालो. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गाडी तर मी नीटच चालवत होतो पण शेजारून जाणारा प्रत्येक जण अगदी आश्चर्याने माझ्याकडे पाहत होता. मी ठरवले की सगळ्यांचे डोके फिरलेय बहुतेक. आपण कुणाकडे लक्षच द्यायचं नाही. पण पुढच्या सिग्नलवर एका पोलिसाने अडविलेच. त्याला लायसन्स दाखवायला पाकिटात हात घातला तेंव्हा लक्षात आले की आज पाकीट घरीच विसरून आलोय. तेवढ्यात तो पोलिसच म्हणाला बाळा, सोबत कोणी नसताना अशी एकट्याने गाडी चालवणे चांगले नाही. खरं तर मला त्याचा खूप राग आला होता. साला हा माझ्याच वयाचा किंवा 1/2 वर्षांनी लहान पण असेल आणि मीच बाळा? पण जाऊ दे, चूक आपलीच आहे. आपणच पाकीट नव्हते विसरायला पाहिजे होतं. मी काही न बोलता निघालो.
गेटवरून गाडी माझ्या बिल्डींगपाशी आणली आणि माझ्या नेहमीच्या जागेवर पार्क केली. गाडीतून उतरलो तेवढ्यात एक जोडपं वॉक करायला निघालं होत. मी त्यांना क्रॉस करून पुढे आलो तोच त्यांची कुजबुज माझ्या कानावर पडली, आईबापांना कळलं पाहिजे ना की मुलांच्या हातात एवढी मोठी गाडी कशी द्यावी. त्यांना सूनवायची खूप इच्छा होती पण मन आवरले आणि लिफ्टकडे वळलो. लिफ्टने घराबाहेर आलो आणि बेल वाजवली. बायकोने दार उघडले आणि लगेच बंद केले. अरेच्चा हे काय? असा विचार करत मी तसाच जिन्यात बसलो. एवढ्या वर्षात हिने मला बघून कधी दार बंद नाही केले आज असे काय झाले असा विचार मी करत असतानाच माझा मोबाईल वाजला. तर बायकोचाच फोन होता. तिला आता झापायचेच ठरवून जरा रागातच फोन उचलला. तर तिकडून बायको घाबऱ्या आवाजात सांगत होती की अहो, रात्रीचे 2 वाजलेत आणि कोणीतरी 8-10 वर्षाचा मुलगा आपल्या दारात उभा राहून बेल वाजवतोय. आता मात्र माझे डोकेच फिरले. फोन कट करून मी लिफ्टकडे वळलो. लिफ्ट आली आणि मी लिफ्टमध्ये गेलो. लिफ्टमधील आरशात सहज नजर गेली आणि माझ्या हातातील डब्याची पिशवी व मोबाईल खालीच गळुन पडला. कारण आरश्यात मी नव्हतोच. बायकोने वर्णन केलेला तो 8-10 वर्षाचा मुलगा माझ्याकडेच पहात उभा होता.
(संपूर्ण काल्पनिक)
- प्रसाद कुलकर्णी
9689911027