Get it on Google Play
Download on the App Store

तुलनात्मक व्यक्तिमत्व....

मंगेश विठ्ठल कोळी

व्यक्तिमत्व विकास
मो. ९०२८७१३८२०

सतत कार्यरत राहिल्याने थोडासा शीण आला होता.                                                                                      

हा शीण घालवण्यासाठी दिवसभराची धावपळ आटपून सायंकाळी समुद्रकिनारी खूप दिवसातून एकांतात आणि शांत ठिकाणी बसलो होतो. समुद्राकडे पाहत छोटे-छोटे विचार डोक्यामध्ये येत होते. हे छोटे-छोटे विचार एकत्र येऊन जणू विचारांची एक शृंखला तयार झाली. ती शृंखला वाढत गेली आणि मी त्या विचारांमध्ये अगदी रममाण झालो.थोड्या वेळातच तिकडे कसला तरी आवाजाचा गोंगाट कानी पडू लागला त्यामुळे विचारांची शृंखला खंडीत झाली.मी चाणाक्षपणे ऐकताच लक्षात आले कि, दोन व्यक्ती एकमेकांशी मोठमोठ्याने बोलत होते. जस जसा हवेचे तरंग माझ्या दिशेला येऊ लागले त्यांचे चाललेले संभाषण मला अगदी स्पष्ट ऐकू येऊ लागले. त्या सर्व संभाषणाचा सारांश पाहता माझ्या लक्षात आले कि,ते दोघेजण कोणाशी तरी तुलना करत होते. कित्येक व्यक्ती दिवसातील बराच वेळ स्वतःची किंवा इतरांची तुलना करत असतात.

एखाद्या व्यक्तीने "तुलना" सोडून दे..असा सल्ला दिला, तर त्या व्यक्तीलाच मूर्ख समजले जाते किंवा तो कशा पद्धतीने मूर्ख समजूती सांगत आहे याची अनेक उदाहरणे रंगवून सांगत असतात.त्या दोन व्यक्तींच्या संभाषणावरून माझ्या असे लक्षात आले.आज कित्येक व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल, कामाबद्दल किंवा त्याच्या वैचारिक दृष्टिकोनाबद्दल स्वतःशी तुलना करतात.अशी तुलना करत असताना स्वतः कोणत्या पातळीच्या विचारांची जोपासना करत आहेत, याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. तुम्हाला लक्षात येईल, स्वतःच्या विचारांची कुवत नसताना देखील किंवा उगाचच अर्धवट बुद्धीने इतरांशी तुलना करण्याची जणू सवयच जडत चालली असलेल्या व्यक्ती आजूबाजूला पहावयास मिळतील.

तुलना करण्याची सुरुवात प्रत्येकाच्या लहानपणीच होते, मुलं व्यवस्थित जेवत नसतील,शांत न राहता गोंधळ करत असतील,अशा वेळी त्यांची  तुलना इतर मुलांशी केली जाते. आपण नकळतपणे लहान मुलांना त्याची सवय जडवण्यास मदत करतअसतो. हळूहळू पुढे शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा त्या ही पुढे जाऊन संसार व इतर सर्वच बाबतीत हळूहळू तुलना करण्याची सवय स्वत:च्या अंगी रुजवली जाते.काही कालावधी नंतर त्याचे रुपांतर सवयीमध्ये होते. मग अशा सवयींचे हळूहळू व्यसनात रुपांतर होते.

फार छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये करत असलेली तुलना सोडून दिली नाही, तर स्वतःच्या प्रगतीवर परिणाम होतअसतो. त्याच बरोबर स्वतःची विचारक्षमता आणि एकंदरीतच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो,हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यासाठी तुलना हा शब्दच स्वतःच्या डिक्शनरीतून आता लगेच काढून टाकायला सुरुवात करा. इतरांशी तुलना करण्यात वेळ वाया घालविण्यापेक्षा स्वतःच स्वतःशी तुलना करून अनेक चांगल्या सवयी आणि नवनवीन क्षमता स्वतःमध्ये रुजवण्यास सुरुवात करायला हवी. "काल जे मी करू शकत नव्हतो,ते आज मला कशा पद्धतीने शिकता येईल" याकडे लक्ष दिले पाहिजे. मग वाट कशाची आणि कोणाची पहायची, विचार करण्यात वेळ न दवडता कृती करण्यास प्रारंभ करा. येणाऱ्या काही दिवसामध्येच तुम्ही यशाच्या अगदी उंच ठिकाणी पोहचलेला असाल. मग तुमची तुलना कोणीही करू शकणार नाही.