बिटकॉइन म्हणजे काय ?
लेखक - अक्षर प्रभू देसाई
कुठल्याही समाजांत "चलन" हि गोष्ट फार महत्वाची आहे. जुन्या काळी राजे महाराजे आपल्या नावानेमुद्रा करायचे आणि लोक चलन म्हणून ती वापरत. सोने सुद्धा चलन म्हणून वापरले जायचे. चलन म्हणजे नक्की काय ? समजा आपण शेतकरी आहात आणि आपण संत्री पिकवता. तुम्हाला केस कापायची गरज भासली तर तुम्ही न्हाव्याकडे जाऊन केस कापू शकता आणि त्याला बदल्यांत एक टोपली भरून संत्री देऊ शकता. पण न्हावी इतक्या संत्रांचे करील तरी काय ? तर तो ती संत्री अंडी वाल्याला देऊन अंडी घेऊ शकतो. पण संत्री, अंडी, इत्यादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणे कठीण आहे.अशा परिस्तिथीत "चलन" हि गोष्ट वापरली जाते. जेंव्हा आपण १०० रुपयांची नोट कुणाला देतो तेंव्हा त्या नोटेला महत्व नसते तर "ती नोट देऊन बदल्यांत आम्हाला काय मिळू शकते?" ह्या भावनेला जास्त महत्व असते.
४० वर्षे आधी १०० रुपयांना प्रचंड महत्व होते ,कारण शंभर रुपयांत १ आठवड्याचे अन्न सहज येत असे. आज १०० रुपयांत फार तर १ दिवसाचे अन्न येते. १०० रुपयांची किंमत कमी का झाली ? कारण सरकारने जास्त पैसा छापला. कागदी पैसे सरकार वाट्टेल तेंव्हा छापू शकते. आणि ज्यावेळी सरकार पैसे छापते त्या वेळी पैश्यांची किंमत कमी कमी होत जाते. भारतीय चलन छापण्याची जबाबदारी रिझर्व बँक वर आहे. प्रत्येक देशाची आपली अशी एक सेंट्रल बॅंक असते जी सरकार साठी पैसे छापते. झिम्बाबे, व्हेनेझुएला सारख्या देशांनी बेजबाबदार पणे खूप पैसा छापला आणि त्यांच्या चलनाची किंमत आज शून्य आहे.
सरकार शिवाय चलन
बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे आणि ह्याला कुठल्याही सरकारची गरज नाही. सातोशी नावाच्या एका गूढ वैज्ञानिकाने ह्याचा शोध लावला आणि नंतर अनेक लोकांनी हातभार लावून बिटकॉइन ची निर्मिती केली. गणिती दृष्टिकोनातून फक्त २१ दशलक्ष बिटकॉईन्स अस्तित्वांत येऊ शकतात त्यामुळे सरकारी चालना प्रमाणे अत्याधिक चलन निर्माण करून बिटकॉइन ची किंमत कमी होऊ शकत नाही. ज्यावेळी दोन व्यक्ती बिटकॉईन्स ची देवाण घेवाण करतात तेंव्हा त्याला "रेकॉर्ड" म्हटले जाते. अश्या रेकॉर्डसना एकत्रित स्वरूपांत पहिले तर त्यांचे "ब्लॉक" बनतात. बिटकॉईन्स मध्ये कुणीही माणूस ह्या "ब्लॉक्स" चे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यांत ज्या प्रकारे बँक आमच्या देवाण घेवाणीची नोंद ठेवते त्या प्रमाणे बिटकॉईन्स च्या देवाण घेवाणीची नोंद कुणीही ठेवू शकतो.
पण मग ब्लॉक्स ची नोंद ठेवणारा माणूस त्यांत गडबड करणार नाही ह्याची काय शाश्वती ? तर इथे सातोशी ह्यांचे गणित कामाला येते. ब्लॉक्स व्यवस्थापन करणाऱ्याला त्यांत काही गडबड नाही हे एक गणिती मार्गाने सिद्ध करावे लागते. हे गणित अत्यंत क्लिष्ट असून त्यासाठी खूप वेळ लागून संगणकाला हे "प्रूफ ऑफ वर्क" निर्माण करावे लागते. काही ब्लॉक्स अशा पद्धतीने ठेवल्यानंतर त्या माणसाला काही बिटकॉईन्स भेट स्वरूपांत मिळतात. आजपर्यंत जे १३ दशलक्ष बिटकॉईन्स वापरत आहेत ते सर्व बिटकॉईन्स अशा पद्धतीने निर्माण झाले आहेत. ह्यालाच बिटकॉइन मायनिंग असे म्हणतात.
चलनाची देवाण घेवाण
साधारण रुपया प्रमाणेच बिटकॉईन्स सुद्धा आपण इतरांना देऊ शकतो. बिटकॉईन्स एका डिजिटल वॉलेट (बटवा) मध्ये ठेवले जातात. आपला बटवा म्हणजे एक गुप्त पासवर्ड असतो. हा पासवर्ड इतरांना सापडला तर इतर लोक आपले बिटकॉईन्स चोरू शकतात. त्यामुळे हा पासवर्ड सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. पेटीएम किंवा आपल्या UPI प्रमाणे आपण आपल्या बिटकॉईन्स बटव्या मधून साधारण रुपया पैशाप्रमाणेच बिटकॉईन्स सुद्धा आपण इतरांना पाठवू शकतो.
बिटकॉईन्सच्या हजाराव्या भागाला मिलीबिटकॉइन असे म्हटले जाते तर १०० दशलक्ष भागाला सातोषी म्हटले जाते.
हा लेख लिहिताना १ बिटकॉईन्स ची किंमत सुमारे ७ लाख होती. भारतांत बिटकॉईन्स घ्यायचा तर तुम्ही तो zebpay किंवा coinsecure ह्या संकेतस्थळांवर घेऊ शकता.