शेअर बाजार – सर्वांसाठी
लेखक - मंजुषा सोनार
अर्थ क्षेत्र
सामान्य माणसाच्या मनात शेअर बाजाराविषयी खूप गैरसमज आहे. त्यातल्या त्यात मराठी माणसाची "शेअर बाजार म्हणजे एक जुगार" अशी धारणा असते.
आपल्या जवळ असणारा पैसा लोक जास्तीत जास्त बँक, एफ. डी., सोने, रियल इस्टेट किंवा जागेत (प्लॉट) गुंतवतात. फारच कमी लोक शेअर बाजारात पैसे गुंतवतात, ते सुद्धा कुणीतरी सांगितले म्हणून! मग अशा कंपनीच्या शेअर मध्ये पैसा गुंतवला जातो ज्याबद्दल जास्त काही माहिती नसते आणि मग हात पोळून बसतात. मग नशिबाला दोष देऊन सगळीकडे सांगत बसतात की शेअर बाजारात माझे पैसे बुडाले म्हणून! हा एक जुगार आहे अशी त्यांची धारणा आणखी पक्की होते. कुणाच्या तरी सल्ल्यापेक्षाअभ्यास करून बाजारात उतरला असता तर त्या माणसावर ही पाळी आली नसती.
कोणतेही पैसे मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात. अगदी शेअर बाजारावरून सुद्धा पैसे कमवायचे तर कष्ट करावेच लागतील! कष्टाची तयारी असेल तर शेअर बाजार आपल्याला कधीही निराश करणार नाही.
आज इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या आपण कंपन्यांची सर्व माहिती मिळवू शकतो.
सर्वप्रथम शेअर म्हणजे काय ते आपण समजून घेऊ:
कोणताही धंदा सुरु करायचा तर कंपनीला भांडवल लागते. हे भांडवल कंपनी जनतेला आपल्या गुंतवणुकीतला हिस्सा (शेअर) देऊन करते. कंपनीच्या भाग भांडवलात गुंतवणूकदारांचा हिस्सा असल्याने कंपनीच्या मालमत्तेवर आणि नफ्यावर त्यांचा हक्क असतो. पण त्यांचेकडे त्या कंपनीचे जेवढे शेअर असतील त्या प्रमाणात कंपनीला तोटा झाला तर शेअर धारकांना पैसे देण्यास कंपनी बांधील नसते. म्हणून पैसा गुंतवतांना त्या कंपनीची पूर्ण माहिती मिळवून मगच गुंतवणूक करायला हवी.