मानाचा मुजरा
मानाचा मुजरा
आई आई पहा ना माझे जरा ऐक ना
उशीर होतो रोज तुला ऑफिस मधून येताना
फॅन्सी ड्रेसवाल्याकडे आज तरी जाऊया ना
कॉम्पिटीशन मध्ये भाग मला घेऊ दे ना
दाखवायचंय मला माझ्या मित्रांना
दिसेन कसा मी रुबाबात चालताना
वेळ नाही रे सोनूल्या मला यंदाच्या वर्षाला
भाग नक्की घेऊ हं आपण पुढच्या स्पर्धेला
वैतागलेय आधीच मी ऑफिसातल्या कटकटीला
पुरवू कशी मी तुझ्या फॅशन परेड च्या सोसाला!
पगार माझा आहे कालच झालेला
Scrabble चा गेम आणीन येताना तुला
मजा येईल बघ नवे नवे शब्द शिकताना
आई आई पहा ना माझे जरासे ऐक ना
मामाच्या गावी पाठवून मला देना
हुंदडताना अन विहिरीत डुंबताना
येईल मजा चिंचा बोरे खाताना
वेळ नाही रे सोनूल्या मला गावी यायला
जाते कशी येते कशी मीच ट्रेन च्या वेळेला
विचारून बघ मामालाच येतोस का मला न्यायला
सोसायटी च्या क्लबची फी आपण भरतो ना
तिथल्या स्विस्मिंग टॅंक मध्ये पोहायला शिकून घे ना
आणि शिकून घे जरा एकटे जायला नी यायला
आई आई पहा ना माझे जरासे ऐक ना फ्रायम्स,पास्ता,फरसाण वाईटच ना प्रकृतीला
गरमागरम तुझ्या हात चा डबा करून दे ना
छान छान कांदे पोहे माझ्यासाठी आज कर ना
तुझ्या हाताने मऊ मऊ भात मला भरव ना
वेळ नाही रे सोनूल्या गरमागरम डब्याला
प्रमोशन चा चान्स दिसतोय मला यंदाच्या वर्षाला
लवकरच जावे लागेल साहेबाची मर्जी राखायला
झोपेतही डेड line दिसते माझ्या डोळ्याला
कॉम्पुटरच्या क्लास ला ऍडमिशन हवीय ना तुला
Arrears मिळालेत माझे घेऊन टाक उदयाला
Maggi दोन मिनिटात होतात ऍड पहातोस ना टीव्ही ला
कॅलौग्स मध्ये प्रोटिन्स असतात आणीन येताना तुला
...........
रिटायर झाली आई...रिटायर झाली आई आता घरीच असते
आयुष्याच्या कष्टांचे सार्थक तिचे होते
उच्चशिक्षित लेकाची आई म्हणून मिरवते
.....लेक आला की आता त्याच्या जवळ बसीन
सुखदुःखाच्या चार गोष्टी त्याच्यापाशी बोलींन
गरमागरम पोहे त्याच्यासाठी करीन
मामाच्या गावी एकदा त्याला घेऊन जाईन
त्याच्याबरोबर एखादी टूर प्लॅन करीन
आयुष्याची सायंकाळ त्याच्या संगे घालवीन
......ऑफिस मधून थोडा उशिराच लेक आला
पोहे नको थोडा चिवडाच दे खायला म्हणाला
सुस्तावेल शरीर,सवय नाही ना पोटाला
फ्रेश होऊन क्लब मध्ये पोहायला ही गेला
....कोणास ठाऊक किती वेळ गेला
जेवण झाल्यावर थोडासा विसावला
आई ने आपला मानस त्याला सांगितला
किंचित घोटाळून लेक तिला म्हणाला
रजा नाही ग आई मला गावी यायला
केसरी च्या माय फेअर लेडी ला जाऊन एकदा बघ ना
एकटे एन्जॉय करायची सवय कर जिवाला
स्मार्ट फोन घेऊन देतो वेळ घालवायला तुला
...... हद्दबुद्ध होऊन आई रडू लागली
पराभूत मनाने केविलवाणी झाली
आपल्या कष्टाची हीच का परिणीती झाली
माझ्या त्यागाची जाणीव का नाही त्याला झाली
लेकाच्या उच्चशिक्षणासाठी किती मी धडपडले
घरच्या बाहेरच्या कर्तव्यांना जरा ही ना डगमगले
काळजावर दगड ठेऊन ऑफिसला जावे लागले
हृदयातल्या प्रेमाला मी नेहमीच लपवून ठेवले
कर्तृत्ववान स्त्री म्हणून बाहेर मी मिरवले
पोटच्या पोरानेच आज घायाळ मला केले
खरच.. खरच माझे काय चुकले?
......अचानक दोन हात खांद्यावर तिच्या पडले
चमकून आई ने मागे वळून पाहिले
सुनेने तिच्या नजरेनेच तिला सावरले
आई ला दुखावणाऱ्या पतीला थांबवले
तिचा आवेश पाहून बोलून गेली घायाळ आई
काही मिळवण्यासाठी काही गमवावे लागले सूनबाई
उच्चशिक्षित लेकासाठी आज उपेक्षित होते आई
पण दृढनिश्चया ने बोलून सुनबाई जाई
आता नाही बोलले तरच अनर्थ होईल
माझेही कर्तृत्व असेच पायदळी तुडवले जाईल
आज घायाळ तुम्ही उद्या मी घायाळ होईन
माझ्या लेकाकडून माझी ही अशीच संभावना होईल
संसार रथ हा दोन चाकांचा असतो याची जाणीव जेंव्हा होईल
दोन हातांना खंबीर हातांची साथ जेव्हा मान्य केली जाईल
स्त्री म्हणजे चूल आणि मूल ही संकल्पनाच नष्ट होईल.
थरथरणाऱ्या हाताला एक अश्वासक हात मिळाला
लेकाच्या नजरेत मानाचा मुजरा मिळाला
रेशमी नात्यांच्या विणेचा घट्ट धागा गुंफला
एका जुन्याच नात्याचा नव्याने उदय झाला
लेखन
मंजू काणे ©