Get it on Google Play
Download on the App Store

दिवाळी ची पहाट

दिवेलागण झाली. अजून कांचन कशी नाही हो आली ऑफिस मधून?उशीर होणार असेल तर फोन करून सांगते ती न विसरता . जरा न्यूज तरी पहा बरं! गाड्या लेट तर नाहीत ना? की परत काही बंद.. हा पाऊस पण ना दिवाळी तोंडावर आली तरी पडतोच आहे. कशी तयारी करावी माणसाने.जिवाला घोर आहे नुसता.आणि हा यश पण कधी फोन करून सांगत नाही की आई आज उशीर होणार आहे म्हणून. अहो चला बाळाला तरी घेऊन येऊया day care मधून.कधी एकदा पोरांना पाहतेय असे झालेय मला.गुढग्यावर हात ठेवत सुवर्णा उठली.आई..ग आज खूपच गुढगे दुखतायत. अग नेहमी कांचन लावते ते तेल का नाही लावलेस आज?त्याने आराम पडतो ना तुला.. आहो बोलले.तेलाने नाही हो सुनबाई च्या प्रेमळ मऊ हाताने मला निम्मे बरे वाटते असे बोलावेसे वाटत असून पण सुवर्णा बोलली नाही. अरेच्चा... आपण ठरवले असून पण आपल्या सासू च्या वळणावर जात नाही आहोत ना.खर तर कुठल्याही गोष्टी चे भरभरून कौतुक करणे हा सुवर्णाचा स्वभाव.पण आज काल काय झाले हे तिचे तिलाच कळत नव्हते.तिच्या आयुष्यातील निम्मा काळ सासुबाईंचे आजारपण काढण्यात गेला होता.सांधेदुखी ने त्रस्त सासूबाई कायम त्रासलेल्या असायच्या.सुवर्णा मन लावून त्यांची सेवा करायची. अगदी आई मानून त्यांची मनस्थिती समजून घ्यायची.पण कधी त्यांच्या तोंडून कौतुकाचा शब्द ही आला नव्हता.कुठली ही गोष्ट मन लावून करणे हा तर तिचा स्वभाव.केलेला स्वैपाकाला साऱ्यांची दाद मिळायची पण यांच्या तोंडून कधी छान हा शब्द नसायचा. त्यांची आबाळ नको म्हणून नोकरी पण सोडून दिली होती तीने.आले गेले म्हणायचे किती करते सासुबाईंचे.अंगावर अगदी मूठ भर मांस चढायचे पण या मात्र मूग गिळून गप्प बसायच्या.

सुवर्णा ने 'यश' झाला तेंव्हाच ठरवले की आपली सून आली की आपण तिच्यावर अगदी आई सारखे प्रेम करायचे.तिची सगळी हौस मौज पुरवायची. आपल्या सारखे घरकामात आणि आजारपण काढण्यात तीचे करिअर वाया घालवायचे नाही.अन सून पण तशीच मिळाली त्यांना लाघवी , गोड. हसली की कशा मस्त खळ्या पडायच्या गालावर.तिचे नाव पण यश च्या नावावरून न ठेवता आपल्या सुवर्णा या नावावरून 'कांचन' असे ठेवले होते.

लग्नानंतर सगळे म्हणाले सुनेला म्हणावं आता केस वाढव. कापू नकोस.पण मला मात्र तिच्या केसांचा बॉब च छान वाटतो.जीन्स वर एखादा फॉर्मल घातला की काय टॉप दिसते. आणि बाहेरच्या पेहेरावाला काय करायचेय.मन निर्मल तर सर्वच छान. एकेकाळी दुखावलेल्या सुवर्णा च्या मनाला आपल्या लाडीक मधाळ स्वभावाने फुंकर घालून हसवणारी कांचन दुधात साखर विरघळावी तशी त्यांच्या घरात मिसळून गेली. लेकीची सगळी हौस प्रेम सुवर्णा तिच्यावर उधळू लागली.सगळे सणवार मोठया हौसेने केले.कांचन ने ही आधुनिक विचारसरणी ची असून देखील सगळे करून घेतले.सासू चे मन जपण्यासाठी.थोड्याच दिवसात एका छोट्या बाळाला जन्म देऊन कांचन ने सुवर्णा ला आजी च्या पदावर पण बसवले.सुवर्णा ने बाळा ची सगळी जबाबदारी घेऊन कांचन ला तिचे क्षितिज गाठायला मोकळीक दिली पण  एकदा पडल्याचे निमित्त झाले आणि ही गुडघेदुखी कायमची मागे लागली. कांचन त्यांच्याच हाताखाली तयार झाली होती आणि मुळात होतीच चटपटीत. थोड्या दिवसातच सुवर्णा ला तिने किचन च्या जबाबदारीतून बाहेर काढून हॉल मध्ये आणले. रोज ऑफिस मधून फोन करायची.आल्यावर तिच्या गुढग्याला मालिश करून द्यायची.दमायची पण कंटाळायची नाही. नेट वर कुठल्या कुठल्या डॉक्टरांशी आजाराबद्दल चॅटिंग करायची. सुरुवातीला काही वाटले नाही पण एक दिवस असा आला ..त्या दिवशी ती असेच सुवर्णा जवळ बसली असताना तिला एक फोन आला.एरव्ही आपल्या मित्रांशी पण आपल्या समोर बोलणारी आज आत जाऊन बोलली. असे का बरे केले असेल... .कोणाचा बरे असेल फोन....सुवर्णाचे मन शंकेने घेरले.ती कुठल्या संकटात तर नसेल ना. न राहवून एकदा तिच्या मैत्रिणी ला फोन केला तर कळले की तिला खूप मोठे प्रोजेक्ट मिळणार होते.तिच्या करिअर मधला टर्निंग पॉईंट होता.पण आपल्या सासू आई साठी तिने तो नाकारला आणि हे कळू नये म्हणून ती तिच्यासमोर फोन घेत नव्हती.

नाही नाही ......   जे माझे झाले ते मी या पोरीचे होऊ देणार नाही. मुळीच नाही.

अन मनाशी एक निश्चय केला . त्या दिवशी कांचन तेल लावायला आली तर सुवर्णा नकोच म्हणाली. कांचन ने खूप विनवण्या केल्या.हक्काने रागावली सुद्धा. पण यावेळी सुवर्णा हटूनच बसली.आठवडा झाला तरी तिच्या कडून काही करून घेईना.मग कांचन पण रुसली. दुखावल्या सारखेच वागायला लागली.बाळाला day care मध्ये ठेवायला सुरवात केली.आजकाल यश पण सारे तिचेच ऐकतो. नीट बोलत पण नाही हल्ली.एके दिवशी कळले की त्या प्रोजेक्ट मध्ये ती सहभागी झालीय.तेंव्हा जरा मनातला ताण दूर झाला पण तिची लाडाची लेक मात्र तिच्यापासून दुरावली होती.त्याला इलाज नव्हता.

पण आज इतका का उशीर झालाय हिला. कांचन च्या काळजी ने सुवर्णाचा जीव व्याकुळला.तिला पंखाखाली घेण्यास त्यांचे मन आसुसले.थरथरत्या हाताने देवापुढे दिवा लावला.

इकडे कांचन ची अवस्था पण काही वेगळी नव्हती.आधीच dead line चे प्रेशर त्यात हा गाड्यांचा गोंधळ त्या मुळे घरी जायला उशीर होत होता.खरे तर लवकर जाऊन दिवाळी ची तयारी करायची होती .आता आईच धडपडत उठेल कुकर लावेल. फराळाचे जिन्नस करेल.बाहेरून आणून मुळी देणार नाही. अर्थात विकत च्या पदार्थाला आई च्या हातची चव कुठे म्हणा.पण मग रात्रभर कण्हत बसेल. हाल अगदी पाहवत नाही पण ऐकेल तर शपथ.मालिश कसे करायचे याचे व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन मी तेल लावत होते.पण हात लावून देईल तर ना. पूर्वी मी तेल लावे पर्यंत वाट पहात बसायची. दिवसभरातल्या गप्पा गोष्टी त्याच वेळी होत.तेला पेक्षा तुझ्या मऊ हाताने जास्त बरे वाटते असे म्हणायची.

खरच अगदी आई सारखी च प्रेमळ सासू मिळाली आहे मला . सासू  कसली आई च आहे. मी कधीच अहो आई म्हणाले नाही यश म्हणतो तसे ए आई च म्हणते. हौशी तर किती .. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींचे पण किती कौतुक आहे तिला. एखादी गोष्ट चुकली तर किती मायेने सांभाळून घेते.बाळाच्या वेळी किती त्रास झाला पण अगदी फुला सारखे जपले.माझ्या आई ला सांगितले तुम्ही काळजी करू नका

माझी मुलगीच आहे ती.आई पण निर्धास्त होऊन वहिनी च्या डिलिव्हरी साठी अमेरिकेला गेली. अनेकांच्या डोळ्यात असूया दिसते पण मी आहेच मुळी नशीबवान. बाळ लहान असताना नोकरी करावी की नाही या विचारात असताना तर माझ्या पाठी खंबीर उभी राहिली.बाळाची सगळी जबाबदारी घेतली. तिच्या पाठिंब्याने तर आज एवढी मोठी पोस्ट सांभाळत आहे मी. पण आज काल काय झालंय तेच कळत नाही.रुसून झाले, फुगून झाले,राग धरून झाले.सगळे प्रयत्न थकले.पण तिने स्वतःला मिटून घेतले ते घेतलेच. बाळ आजकाल खूप मस्तीखोर आणि हट्टी झालाय म्हणून day care ला टाकले तेंव्हापासून सारेच बिनसल्या सारखे झाले.आज बाळ घरी असता तर त्याची काळजी तरी नसती.यशला पण  आज नेमका उशीर  होणार आहे. आई माझ्या फोन ची वाट पहात असेल. नक्कीच काळजी ने देवापुढे हात जोडून बसली असेल.बॅटरी संपल्यामुळे फोन पण लागत नाहीय. काय करू ..

पण आई काही इतकावेळ थांबणारच नाही.बाळाला केंव्हाच बाबांच्या मागे लागून घरी आणले असेल.दूध भात भरवून आजी च्या मांडीत लबाड गोष्टी ऐकत बसला असेल. घराच्या , बाळाच्या, आई च्या ओढीने कांचन चे कढ अनावर झाले.

रात्री 12 वाजता कांचन घरी पोचली. बाबा येरझाऱ्याच घालत होते.तिला पाहून न बोलता सुवर्णा आत गेली. ती चेंज करे पर्यंत  गरम गरम तिचा आवडता मेतकूट भात तीच्या पुढे आणला.थकल्या भागल्या तिच्या  जीवाला जवळ घेताना सुवर्णा आपले दुखणे विसरली होती.

दिवाळी ची पहाट उजाडली तीच मुळी आनंदाचे पर्व घेऊन..आई बाबांचे आशीर्वाद घेऊन कांचन ने एक कविता रुपी भेट सुवर्णा ला दिली

उत्कर्षाची चाहूल घेऊन आली दिवाळी ची पहाट
पाठीवरती असे सदैव तुमच्या मायेचा हात
घार उडते आकाशी परी लक्ष तिचे असे पिल्लात
कसली चिंता आम्हाला असता तुम्ही इथे साक्षात
निश्चित असतो  सदैव तुमच्या मायेच्या घरट्यात
आधार  मिळतो आम्हास असो कितीही
संकटात
अजाणतेपणी घडली चूक नका ठेऊ राग
मनात
सून नाही लेकच मी तुमची वात्सल्य असे हृदयात
यश चे नाव लावून आले मी दिमाखाने या घरकुलात
घेतलेत सामावून मजलाही या उबदार विसाव्यात
ठाऊक आहे मजला काय सलते  तुमच्या मनात
देते वचन मागे नाही हटणार यशाचे शिखर गाठण्यात

माय रुपी सासू ने देखील पत्र रुपी भेट सुनेच्या हाती सोपवली.

कसे सांगू तुला काय आहे माझ्या मना
कशी व्यक्त करू ग मी माझी वेदना
पाहता तुजकडे आठवे दुखरी संवेदना
सून माझी लेकीसामान नाही दुजी भावना
लक्ष्मी तू या घरची घे जाणून शब्दविना
नाही मुळीच शोभा या घरास तुझ्याविना
भरला संसार तुझ्या हाती सोपविताना
लेक माझा लाडाचा तुझ्या सवे वाटताना
वय झाले माझे सांभाळून तू घेताना
नको प्रगतीच्या आड माझे आजारपण पुढे रेटताना
विजयाच्या च्या उंबरठ्यावर पाऊल पुढे पडताना
आनंदतील डोळे माझे भरारी  तुझी पाहताना


बाहेर दिवाळी ची पहाट दिव्यांच्या रोषणाई ने उजाडत होती
तर घरात नात्यांची पहाट सासू सुने च्या मनातील दुरावा दूर करत होती.पुन्हा एकदा सुवर्ण कांचन योग जुळून आलेला
बाबा आणि यश समाधानाने अनुभवत होते.

लेखन : मंजू काणे