सार्थक
सार्थक
दिवाळी झाली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे सुदीप ची गाडी 'सार्थक' या त्याच्या आलिशान बंगल्याच्या पोर्च मधून बाहेर पडली. सगळे घेतलेस ना बरोबर? सुदीप ने बायको ला विचारले. स्वाती हसूनच म्हणाली होय रे घेतलंय सगळे. सुदीप ने लेकाकडे पाहिले सोहम ने पण मान डोलावली. काल त्यांचा प्लॅन ठरला तेंव्हापासून सुदीप चे फोन, स्वाती ची किचनमधील लगबग आणि सोहम ची गाडीवरून बाहेरची खरेदी अखंड चालू होती.
कल्याण पासून थोडे आतल्या बाजूला सुदीप चे फार्म हाऊस होते. मुंबई मध्ये बऱ्यापैकी सेटल झाल्यावर त्याने इन्व्हेस्टमेंट म्हणून हे सेकंड होम घेतले होते. कधी आपल्या भावंडाना कधी मित्रांना , तर कधी ऑफिस मधल्या कलिग्सना तर कधी सासुरवाडी च्या नातेवाईकांना तो इथे घेऊन आला होता. सगळ्यांनी इथे येऊन धमाल मस्ती केली होती.
या वेळी पण बऱ्याच जणांनी आडून आडून चौकशी केली होती की या सुट्टी चा काय प्लॅन आहे. पण सुदिप ने आपल्या प्लॅन चा कोणाला पत्ता लागू दिला नव्हता. साडे आठ नऊ च्या सुमारास गाडी 'माऊली' अनाथालयाच्या आत शिरली. रेणू ताईंनी तिघांचे हसून स्वागत केले. व त्यांना आत घेऊन गेल्या. सगळी बच्चेकंपनी आवरून हातात छोट्या छोट्या बॅगा घेऊन तयारच होती. रेणू ताईंनी सांगायच्या आधीच सगळे एकसुरात नमस्ते म्हणाले. सारेजण उत्सुक होते सुदीप मामाच्या घरी जायला... ते सुद्धा मोठ्या आलिशान गाडीतून. सगळे सोपस्कार रेणू ताईंनी स्वाती बरोबर बसून पूर्ण केले. कोणाचे काय औषध, कोणाच्या खाण्या पिण्याच्या सवयी या व अनेक गोष्टींची कल्पना त्यांनी स्वाती ला दिली. एकंदर 10 मुले आज त्यांच्या अनाथालयातून दिवाळी च्या सुट्टी साठी सुदिप मामा च्या गावी जाणार होती. आश्रमातल्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होते. सोहम ने
आपल्या गाडीमध्ये बच्चे कंपनी भरली. व गणपती बाप्पा मोरया म्हणत सारी बालसेना अत्यंत आनंदाने व उत्साहाने फार्म हाऊस वर निघाली. रस्ताभर मुलांची धमाल चालली होती.
फार्म हाऊस वर पोचताच सुदिप ने रेणूताईना तसे कळविले व पुढच्या तयारी ला लागला. त्याने अनेक प्लॅन्स केले होते. सगळी मुले थोडी बावरली होती. कधी शाळेशिवाय चार भिंतीच्या बाहेरच गेली नव्हती आज पर्यंत. मोठी गाडी, एवढे मोठे घर फक्त tv वर च पाहिले होते. सोहम ने खाऊ आणि फराळाची पाकिटे फोडली व डिश मध्ये घालून मुलांना गोल बसवून खायला दिली. स्वतः पण त्यांच्या बरोबर खायला बसला. स्वाती ने बरेच सामान आणले होते सुदिप च्या मदतीने तिने थोडे फ्रिज मध्ये ते थोडे डब्यांमध्ये भरून ठेवले.
खाणेपिणे उरकून बच्चे मंडळी मागल्या बाजूच्या स्विमिंग टॅंक वर पोहायला गेली.
दुपारी जेवणाचा साधा पण चमचमीत बेत होता.. मिसळ पाव. स्विमिंग झाल्यामुळे सारे जण भुकेले होते. पोटभर खाऊन झाल्यावर सोहम व स्वाती ने मुलांना छान क्राफ्ट शिकवले. ग्रीटिंग कशी बनवायची, फ्लॉवर पॉट कसा बनवायचा, हे शिकवले. अख्खी दुपार मुले अगदी रंगून गेली होती. दुसऱ्या दिवशी आकाशकंदील कसा बनवायचा हे सुदिप मामा शिकवणार होता. चार दिवसांचा मस्त भरगच्च कार्यक्रम होता. जादूचे प्रयोग होणार होते. योगा ची माहिती द्यायला योग शिक्षक येणार होते. आणखी बरेच काही सुदिप च्या जादूच्या पोतडीतून बाहेर येणार होते. संध्याकाळी मस्त भेळेचा कार्यक्रम झाला. मुले स्वाती मामी ला मदत करत होती. एकूणच मुलांना संस्थेत शिस्त व स्वावलंबन रेणू ताईंनी छान शिकवले होते.
रात्री जेवणे झाल्यावर सगळे बाहेर अंगणात बसले.गाण्याच्या भेंड्या, नकला, आणि हास्य विनोद करत सगळी झोपून गेली.
मोकळ्या गार हवेत झोपलेल्या गोंडस , निरागस मुलांकडे पहात स्वाती व सुदिप ला अगदी भरून आले. मुलांचा लाडका सोहम दादा पण तिथेच मुलांच्या जवळ झोपला होता. स्वाती सुदिप ने अभिमानाने आपल्या लेकाच्या मस्तकावरून हात फिरवला.
दोघांना 5 वर्षांपूर्वी चा सोहम आठवला. हट्टी, दुराग्रही. जे हवे ते, जे आवडेल ते आत्ता च्या आत्ता मिळालेच पाहिजे असा आक्रस्ताळी. पण तो प्रसंग घडला आणि त्याच्यात अमूलाग्र बदल झाला.
एक ना एक दिवस त्याला कळणारच होते पण अचानक काही कागदपत्र स्वाती च्या हातून बाहेर राहिली आणि सोहम ने ती वाचली. आणि 'माऊली' मध्ये घेऊन जायचा हट्ट करू लागला. दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. आज ना उद्या सोहम ला सगळे सांगायचे च होते पण एकदम तशी वेळ आल्यावर मात्र ते गांगरून गेले. सोहम च्या आग्रहाखातर ते तिघे 'माऊली' मध्ये गेले. रेणू ताईंनी दोघांना धीर दिला व दोन दिवस इथेच राहा व सोहम ला माझ्यावर सोपवा मी छान हाताळते त्याला असा धीर दिला.
पुढचे दोन दिवस सोहम सगळे निरिक्षण करत होता. एवढी मुले होती आश्रमात पण कुणाला ही स्वतःची अशी खोली नव्हती. सगळे जण एकत्र झोपायचे. एकमेकांच्या गळ्यात गळे घालून. उठल्यावर सगळी अंथरूण, पांघरूण आवरून मग आपले आवरून जे समोर दिले ते खाऊन शाळेत जायची. चालत... एकमेकांचा हात धरून. दंगा मस्ती चालू असायची पण मारामारी नाही की आरडाओरडा नाही. कसलेही हट्ट नाहीत की कसल्या मागण्या नाहीत. सारेच जण समजूतदार.
सोहम ला याच दोन दिवसात कळले की काही वर्षांपूर्वी तो पण याच आश्रमाचा एक भाग होता. आई बाबांच्या अपघाती मृत्यू नंतर काही नातेवाईक त्याला इथे सोडून गेले होते. पण सुदिप स्वातीच्या एकाकी आयुष्यात त्याच्या मोहक, लाडिक हसण्याने भुरळ पडली व एके दिवशी सगळे सोपस्कार पूर्ण करून ते सोहम ला घरी घेऊन आले.
रेणूताईंच्या सकारात्मक समुपदेशनाने सोहम मध्ये खूपच बदल झाला. दोन दिवसात त्याच्यात छान समज आली.
तेंव्हा पासून तो दर दिवाळी ला फटाके आणि खाऊ घेऊन 'माऊली' मध्ये यायला लागला. आपला वाढदिवस इथेच येऊन साजरा करू लागला. आपल्या गरजा कमी करून पैसे साठवून मुलांसाठी वह्या पुस्तके अशा अनेक वस्तू आणू लागला. पण या वर्षी त्याच्या डोक्यात वेगळाच प्लॅन चालू होता. मनाशी पक्के झाल्यावर त्याने आपल्या छोट्याश्या ट्रिप बद्दल आई बाबांना सांगितले. अर्थातच दोघांनी लगेचच संमती दिली.
पहाता पाहता चार दिवस कसे संपले कळले पण नाही. घरी जायची वेळ झाली. वाटले मुले नाराज होतील, अजून थोडे दिवस राहण्यासाठी मागे लागतील.पण नाही.. मुले खूप समजूतदार होती. कुठून आली असेल या वयात इतकी समज या मुलांकडे! दोघांना ही आश्चर्य वाटले. एकमेकांच्या मदतीने सगळे समान भरले.
व थोड्याच वेळात सगळे 'माऊली' मध्ये पोचले. आपली चार दिवसांची सुट्टी संपवून रेणूताईही मुलांच्या स्वागतासाठी सज्ज होत्या. मुले ताईंना चिकटली व चार दिवस काय काय मजा केली काय काय शिकले ते सांगितले. मुलांच्या विराण आयुष्यात रेणूताई जसे जमेल तसे आपल्या प्रेमाची फुंकर घालत होत्याच पण सोहम ने पण आपली इथली नाळ तोडली नाही याचा त्यांना अभिमान वाटत होता. आपल्यानंतर मुलांचे कसे होणार याची चिंता त्यांना सतत असायची. रेणुताईंनी मायेने सोहम ला जवळ घेतले व तुझा खूप अभिमान वाटतो असे म्हणाल्या. सोहम म्हणाला नाही नाही ताई मी काहीच वेगळे करत नाही तुमच्या मुळे आणि आई बाबांनी केलेल्या संस्कारांमुळे मी घडत आहे आणि अजून पण खूप काही करायचेय मला. मी खूप शिकेन, मोठा होईन आणि आश्रमाची सगळी जबाबदारी स्विकारीन. इथल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी मदत करीन. त्यांना आपल्या पायावर उभे राहायला व छोटे छोटे उद्योग करून आर्थिक दृष्ट्या सक्षम करीन हे माझे वचन आहे. आई बाबांच्या प्रेमातुन उतराई होणे शक्यच नाही पण त्यांना दुःख होईल, वाईट वाटेल असे कधीच वागणार नाही. त्यांच्या मदतीने व प्रेरणेने मी हे हाती घेतलेले काम तडीस नेईन.
सगळे निशब्द झाले होते. एक खळखळता छोटासा झरा सागरात मिसळायला नव्हे तर सागराला कवेत घ्यायला आतुर झाला होता. पंखात हळू हळू बळ येत होते. विचारात परिपक्वता येत होती. अजून स्वाती सुदिप ला काय हवे होते बरे!!
मोठ्या जड अंतःकरणा ने ' माउली ' चा निरोप घेऊन स्वाती सुदिप ची गाडी सोहम सह घराकडे निघाली. काही वर्षात झालेला सोहम मधील सुखद बदल दोघांना ही आनंद देत होता. त्यांनी एका अनाथ जीवाला आपलेसे केले होते पण सोहम ने त्याच्या बदल्यात अनेक अभागी जीवांना आपलेसे करून आपले वेगळे पण सिद्ध केले होते. रेणूताई म्हणाल्या ते बरोबर होते एक पेरलं तर हजार पटीने उगवते. तुमचे संस्कार आणि तळमळ वाया जाणार नाही,खरे होते ते. घर आले गाडी आपल्या बंगल्या च्या पोर्च मध्ये शिरली.खऱ्या अर्थाने बंगल्याचे नाव सोहम ने 'सार्थक' केले होते. सुदिप स्वाती चे स्वप्न खरे होत होते.
लेखन
मंजू काणे