लैंगिक शिक्षणाच्या बाजूने दृष्टिकोण
लैंगिक शिक्षणाची गरज नाही असे म्हणणाऱ्या मंडळींचे असे मत असते की पौगंडावस्थेत शरीराच्या गरजा आपसूकपणे आतून धडका द्यायला लागतात. त्यामुळे त्याचे शिक्षण वगैरे देण्याची गरज नाही. लोक हेही म्हणतात की कित्येक हजार वर्षे माणूस प्रजनन करतो आहेच की, मग आताच शिक्षणाची गरज काय?
कारणे खालीलप्रमाणे आहेतः
१. भारतासारख्या उष्ण कटिबंधात मुले-मुली पौगंडावस्था (वयात येण्याचे) वय हळूहळू कमी होत चालले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मुलीला मासिक पाळी सुरू झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या वयात मुलीचे शरीर तयार होत असले तरी तिचे मन एका बालिकेचेच असते. तिला तिच्यात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देणे आवश्यक आहे.
२. माध्यमांचा रेटा, विशेषतः इंटरनेटवर अक्षरशः लाखोंच्या संख्येने उपलब्ध असणारी पोर्नोग्राफिक संकेतस्थळे आणि त्यातून उतू जाणारी लैंगिक विकृती, भारतात अगदी सहजासहजी उपलब्ध असणारे लैंगिक साहित्य आणि पोर्नोग्राफिक फिल्म्स यांच्यापासून या मुलांचा बचाव करायचा असेल तर त्यांना निकोप कामजीवनाची ओळख शाळेतच करून दिली पाहिजे. लैंगिक सुखाविषयी चुकीच्या किंवा अवास्तव कल्पना याने एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते.
तसेच समाजात बलात्कार, अल्पवयीन 'वेश्यागमन', 'लैंगिक संबंध' चे प्रकारही आढळतात.
यामागे एकच ठळक कारण दिसते, ते म्हणजे 'लैंगिक शिक्षणा'चा अभाव !
याबद्दल बरेच प्रश्न पडतात - १. भारतात 'सेक्स ही वाईट गोष्ट आहे' असे बऱ्याच वेळा का पटवून दिले जाते? की भारतीय संस्कृतीत ही गोष्ट बसत नाही ?
२. सर्व पालक आपल्या 'पौगंडावस्थेतील' मुलांशी, आई मुलीशी एक 'मैत्रीण' आणि 'वडील मुलाशी एक 'मित्र' या नात्याने, मोकळेपणाने का बोलतात का ?
३. किशोरावस्थेतील मुलांच्या काही प्रश्नांना पालकांनी कसे उत्तर द्यायला पाहिजे ? जसे - 'माझा जन्म कसा झाला?', 'आई सेक्स म्हणजे काय गं?'
४. सर्व शाळांत हा विषय इतर शालेय विषयांसारखा 'सक्तीचा' विषय म्हणून का नाही शिकवला जात ? (काही शाळांत चालतो पण फारच अल्पप्रमाणात) याविषयावरील एखादे 'पाठ्यपुस्तक' का नाही ?
५. प्रसारमाध्यमांमुळे (दूरचित्रवाणी, मासिके इ.) किशोरावस्थेतील मुलांना 'सेक्स' विषयीची कितपत कल्पना मिळते ?
६. जवळच्या मित्राकडून किंवा मैत्रिणीकडून मिळालेल्या अर्धवट माहितीमुळे त्यांच्या मनात न्यूनगंड येऊ शकत नाही काय ?
भारतासारख्या देशात, जिथे आधीच लैगिक संबंधांबद्दल इतका चोरटेपणा आणि अपराधीपणा आहे, तिथे ही कोंडी फुटावी यात जितक्या लवकर मोकळेपणा याव असे लैंगिक शिक्षणाच्या समर्थकांचे मत पडते.
मुलांना प्रजननाचे कार्य व त्याच्याशी संबंधित रोग व सुरक्षितता याविषयी शास्त्रशुद्ध माहिती व्हावी व मुलांचा लैंगिकतेकडे पाहाण्याचा दृष्टिकोण निकोप व्हावा म्हणून शाळेंत लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे असे सर्वसाधारणपणे म्हंटले जाते. शास्त्रशुद्ध माहितीसाठी त्यांना जीवशास्त्र या विषयांतर्गत ज्याप्रमाणे पचनसंस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्था यांच्या कार्याची व त्यांना होणाऱ्या रोगांची व प्रतिबंधक उपायांची माहिती दिली जाते त्याचप्रमाणे प्रजननसंस्थेविषयीही माहिती देता येईल.
शाळेत पचनसंस्था, मज्जासंस्था वगैरेंसोबत मानवी प्रजननासाठी उपयुक्त ठरणारे अवयव, त्यांची माहिती, कार्य इत्यादींवरही एक धडा असे. शाळेत अनुभवानुसार केवळ मुलांच्या वा केवळ मुलींच्या शाळेमध्ये ह्या धड्यातील काही भाग तरी शिक्षक शिकवीत असत. बहुधा मुलांच्या शाळेतील जीवशास्त्रासाठी शिक्षक आणि मुलींच्या शाळेत जीवशास्त्र शिकविणाऱ्या शिक्षिका असतानाच हे होत असे. तरीही पचनसंस्था वा मज्जासंस्थेवरील धडा जेवढा खोलात जाऊन शिकवला जात असे तेवढाच प्रजनन संस्थेची माहिती देणारा धडा वरवर शिकवला जात असे. मुले-मुली एकत्र असलेल्या शाळेमध्ये शिकविताना शिक्षक/शिक्षिकांना अत्यंत अवघडल्यासारखे वाटल्यामुळे सदर धडा न शिकविण्याकडेच कल दिसून येई. तसेच ह्या धड्यावर एकही प्रश्न परीक्षेत विचारला जात नसे. तेव्हा हा विषय जीवशास्त्राच्या पुस्तकात अंतर्भूत असल्यामुळे तो वगळून इतर धड्यांवर भर देणे सहज शक्य होते. मात्र हा स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासक्रमामध्ये घेतला तर तो वगळणे शक्य होणार नाही आणि खात्रीपूर्वक शिकवला जाईल असे वाटते.