Get it on Google Play
Download on the App Store

कामजीवन

कामजीवन आणि लैंगिक विषयांवर उघड चर्चा करणे, प्रश्न विचारणे हे भारतीय समाजात निषिद्ध मानले गेल्याने या विषयाबद्दल समाजात अनेक गैरसमज असल्याचे आढळून येते. उदाहरण द्यायचे झाल्यास, स्त्रीला कामवासना असते याची कल्पनाच नसणाऱ्यांपासून स्त्रीची कामवासना भागवणेच आपले परमकर्तव्य आहे असे समजणारे दोन्ही प्रकारचे वर्ग समाजात आढळतात. काही समाजात विशिष्ट वयांनतर विशिष्ट विधी करून नग्न न होता कपडे घालूनच स्नान करण्यास फर्मावले जाते. हे ज्या काळात पुरेशी स्वतंत्र न्हाणीघरे नव्हती त्या काळातील ही प्रथा असेल पण ती परंपरा आजतागायत जपली जाते, यामुळे जांघेतील त्वचेची स्वच्छता करणे राहून गेले तर त्वचारोग उद्भवतात व त्यांची मोकळेपणे चर्चा न करता त्यांना गुप्तरोग हे विशेषण लावून प्रशिक्षित वैद्यकीय तज्‍ज्ञाकडे जाण्यापेक्षा असंख्य लोक भोंदू लोकांच्या जाहिरातबाजीला बळी पडून बऱ्याचदा विनाइलाज पैसा गमावतात. अनेकदा त्यांना कुसंगतीतील लोक चुकीचे मार्गदर्शन करून वेश्यागमनाचा वाममार्ग सुचवतात किंवा काहीवेळा अल्पवयीनांशी संभोगाचा अत्यंत चुकीचा सल्ला देऊन कायद्याशी आणि माणुसकीशी विनाकारण प्रतारणा करताना आढळून येतात.

तशाचप्रमाणे हस्तमैथुनात होणाऱ्या वीर्यस्खलनामुळे शारीरिक शक्तीचा नाश होतो असाही गैरसमज फार मोठ्या मानवी समूहात आजही प्रचलित आहे. त्वचेच्या स्वच्छतेची काळजी घेतल्यास हस्तमैथुनात शरीरशास्त्राच्या दृष्टीने काही गैर नाही. त्यामुळे शारीरिक शक्तीचे कोणत्याही स्वरूपात नुकसान होत नाही असे आधुनिक वैद्यकशास्त्र समजते. तसेच शरीराबाहेर वीर्य पडले तरी पुन्हा आपोआप पूर्वीएवढ्याच प्रमाणात नवीन तयार होते याची असंख्य पौगंडावस्थेतील मुले मुली तसेच तरुणांनाही कल्पना नसते.

स्त्रियांमध्ये मासिक पाळी ही तशी स्वाभाविक व नैसर्गिक क्रिया असून कोणताही स्पर्शजन्य किंवा संसर्गजन्य आजार निर्माण करत नसली तरी काही मानवी समूहांमध्ये तेवढ्या कालावधीकरिता शिवाशिव पाळावी, तसेच धार्मिक विधीत सहभाग घेऊ नये असा समज आहे तर त्याच वेळी बहुसंख्य इतर मानवी समाजात हा गैरसमज काय आहे याचीसुद्धा कल्पना नसते.

समूह आणि संस्कृतिगणिक विविध श्रद्धा अजाणवयातच मुलांना अथवा मुलींना सक्तीचे ब्रम्हचर्य लादण्यापासून ते सक्तीच्या कौमार्यभंगाच्या परंपरांपर्यंत चालत आल्या आहेत. काही देशात लठ्ठपणा हेच सौंदर्य समजून स्त्रियांना सक्तीचे जेवण देऊन त्या आजारी पडल्या तरी खाऊ घातले जाते तर काही समाजात जेवणही वर्ज्य करवले जाते.

असंख्य पुरूष आपण स्त्रीस लैंगिकदृष्ट्या समाधान देऊ शकू की नाही या न्यूनगंडापायी वेश्यागमन करतात तर असंख्य पुरूषांना आपले शिश्न इतर पुरूषांपेक्षा लहान असल्याचा गैरसमज असतो आणि या गैरसमजातून ते भोंदू बाबांकडे पोहोचतात. वस्तुतः सर्वसाधारणपणे जगातील सर्व पुरूषांच्या लिंगाची लांबी सारखीच म्हणजे ताठरता आल्यानंतर १५ से.मी. एवढीच असते. आणि काही वैद्यकीय अडचणीमुळे या लांबीत काही फरक पडला तरी कोणत्याही स्त्रीची योनी कोणत्याही लांबीशी आपोआप नैसर्गिकरीत्या जुळवून घेते व स्त्रीच्या लैंगिक समाधानात लांबीचा काही संबध नसतो याची असंख्य पुरूषांना कल्पना नसते; तर विवाहानंतर आपल्याला लैंगिक संबधांना सामोरे जायचे आहे याची असंख्य नवपरिणित विवाहित स्त्रियांना कल्पनाच नसते.