Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ११

२६

लोकाच्या अस्तुरीची निंदा करितो वाटेवरी

आपुल्या अस्तुरीचा पदर न्हाई पाठीवरी

२७

अभंड नारीला कुभंडा काय तोटा

वार्‍याच्या बांधी मोटा

२८

अभंड झाली नार तिनं बेलाची केली भाजी

खर्‍याखोटयासाठी तुळस तोडाया झाली राजी

२९

चांगलं म्हून नार जीवाला नांवाजती

बिबव्याचा डाग चुन्यानं सारवीती

३०

वेसवा झाली नार, तिला कशाची लाजलज्जा

बळं पदर धरी तुझा !

३१

नखर्‍याची नार नखरा सांगते रोजरोज

कोर्‍या कागदाला शाई लागुन जाती सहज

३२

नारीनं संग केला, न्हाई पाहिला जातीचा

माळ्याच्या मळ्यामंदी कांदा हिरव्या पातीचा

३३

नारीनं संग केला, न्हाई पाहिला जातीचा

कुंभार घाली आवा, मोघा हिरव्या मातीचा

३४

गरतीची लेक कां ग कावरी बावरी

तिळ घेतील झाडूनी झाड पडेल बावरी

३५

गोरीचं गोरेपन भल्यांनी वानूं नये

कडू विंद्रावण हाती धरून चाखूं नये

३६

कडू विद्रावण बांधाला पसरला

मूर्ख बोलून इसरला

३७

माऊलीच्या पोटी लेक जल्मला तरवड

लोकाच्या लेकराची त्यानं मांडिली परवड

३८

लेकीचा जल्म उंसाच्या वाढयावानी

ज्याची त्यानं नेली, माय बघे वेडयावानी

३९

लेकीच जल्म जसा काचेचा बंगला

संचिताला धनी असावा चांगला

४०

लेकीचा जल्म काय घातिला येडया देवा ?

ज्यांच्या पोटी जल्म, त्यांची घडत न्हाई सेवा

४१

लेकीचा जल्म देव घालूनी चुकला

मातापित्याची सेवा करतो बंधुजी एकला

४२

लेकीचा जल्म जशी तांदुळाची गोणी

बाप विकून झाले वाणी

४३

लेकीचा जल्म जसा बाभळीचा पाला

वार्‍यावावटळानं गेला, धनी कोन झाला !

४४

लेकीचा जल्म जसा गाजराचा वोफा

जोपा करूनी काय नफा !

४५

लेकीच्या पैक्यानं बाप झालाया सम्रत

ससाबाच्या माग गई निघाली हंबरत

४६

बापाजींनी दिली लेक आपुली केली सुई

कसाबाहातीं दिली गई

४७

लेन्यामंदी लेनं अवघड कापाचं

सवतीवरी लेक दिली, कसं धारिष्ट बापाचं

४८

वाटेवरला आंबा, आंबा न्हवं, होती कैरी

सवतीवर लेक दिली बाप न्हवं, होता वैरी

४९

दोन बायकांची चाल निघाली घरूघरी

शेकर देवाजीनं गंगा आनिली गिरजेवरी

५०

आम्ही पाटलाच्या मुली, न्हाई कुनाला मेचायाच्या

अंगी लखुटा वाचायाच्या

५१

आम्ही पाटलाच्या मुली, जशा तलवारीच्या अण्या

जाईल पानी तुझं, दुरून बोल शहाण्या

५२

आम्ही पाटलाच्या मुली मिर्‍यापरास तिखट

जपून बोल दादा, आब जाईल फुकट

५३

आम्ही पाटलाच्या मुली तलवारीच्या धारा

न्हाई घ्येनार, परायाचा वारा

५४

अगाशीचा आंबा, आगाशी झोकं खातो

मूर्ख मनांत मिडकतो

५५

आगाशीचा आंबा आगाशी डळमळे

खाली मुर्ख तळमळे !