Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ८

उभ्या गल्ली जाते हाय पदर डाव्या मुठी

पाप्या नंदर तुझी खोटी, मी अशिलाची बेटी

जाते मी उभ्या गल्ली वर करीना पापणी

माझ्या बंधुजीची वाघाची जाचणी

जाते मी उभ्या गल्ली, घेते पदर हाताला

सासर माहेरीं, पानी चढे दुही गोताला

जाते मी उभ्या गल्ली दंडभुजा पदरांत

बंधुजीचं बसणं मोठमोठया वजिरात

उभ्या गल्लीनं मी जाते, दंड उजवा झाकुनी

नाव पित्याचं राखुनी

उभ्या गल्ली जाते, झाकुन पदरापरीस पासवा

सया पुशित्यात, कुन्या मातेंचा कुसवा ?

उभ्या गल्ली जाते, नंदर जिमीनीला

पिता दौलतीला पानी चढंल समिंद्राला

उभ्या गल्ली जाते, माझी नजर बाहीकडे

बंधुजीची सभा बसली दुहीकडे

उभ्या गल्ली जाते नको धरूस माझा हात

मझा बंधुराय पुढं उभा रघुनाथ

१०

उभ्या गल्ली जाते माझी उभार भडकली

छाती वैर्‍याची तडकली

११

उभ्या गल्ली जाते न्हाई उघडी माझी छाती

उच्च कुळीची माझी माती

१२

उभ्या गल्लीनं मी जाते, करते पदराची सारासारी

ताईत माझा बंधु रागीट पारावरी

१३

उभ्या गल्ली जात्ये, नव्हे असल्यातसल्याची

पिताजीची माझ्या उच्च कुळी जाधवाची

१४

उभ्या गल्ली जात्ये माझी निर्‍याला पांची बोटं

सया पुशित्यात, लेक गरतीची जाती कुठं

१५

उभ्या गल्ली जाते, माझ्या पदराची बंदुबस्ती

पित्याच्या नावासाठी देत्ये जिवाला मी तस्ती

१६

उभ्य गल्ली जाते, कुनी काढीना माझं नांऊ

वाघासारखे माझे भाऊ

१७

उभ्या गल्ली जाते हात झाकूनी कांकनाचा

धाक पाठीच्या रतनाचा

१८

उभ्या गल्ली जाते खडा हलेना भुईचा

बया माझ्या गौळणीचा येल शीतल जाईचा

१९

उभ्या गल्ली जाते खडा हलेना जिमिनीचा

येल शीतळ जाईचा बया माझ्या मालनीचा

२०

जातीसाठी माती, हिमतीसाठी खाते वाळु

पिता दौलतीची, अशिलाची मी बाळु

२१

जातीसाठीं खाते माती, कुळासाठी खाते खस्त

जातकुळी ही लौकिकाची वस्त

२२

जातीसाठी माती खाते मी चावुनी

माऊलीबाई तुमच्या नांवाला भिऊनी

२३

जातीसाठीं माती खावं गोतासाठी खडं

पिता दौलती लौकिकाला चढं

२४

जातीसाठीं माती खावावी लईलई

बाबा बयाच्य नांवापायी

२५

जातीसाठीं माती खाते मी बरोबर

पित्याचं नांव दूरवर