Get it on Google Play
Download on the App Store

मायलेकरे

माझे तान्हेबाळ
देवाचे मंगल
अमृताचे फळ
संसाराचे ॥१॥

देवाजीचे देणे
कोणते सुंदर
तान्हेबाळ मांडीवर
माउलीचे ॥२॥

तान्हीया रे बाळा
मंगलाच्या मूर्ती
संसाराची पूर्ती
तुझ्यामुळे ॥३॥

तान्हे हे जन्मले
भाग्य ग उदेले
आनंदी बुडाले
सारे जग ॥४॥

पाळणा बांधीला
रंगीत सुंदर
तान्हा सुकुमार
माउलीचा ॥५॥

पालख पाळणा
मोत्यांनी विणीला
मामाने धाडीला
तान्हेबाळा ॥६॥

रंगीत पाळणा
त्याला रेशमाची दोरी
हालवीते गोरी
उषाताई ॥७॥

पाळण्याच्या वरी
विचित्र आकडा
गळां ताईत वाकडा
तान्हेयाच्या ॥८॥

पाळण्याच्या वरी
खेळणे कागदाचे
गोड बोलणे बाळाचे
राजसाचे ॥९॥

पाळण्याच्या वरी
विचित्र पाखरु
नक्षत्र लेकरु
तान्हेबाळ ॥१०॥

पाळणा पालख
वर खेळणे मोराचे
बाळ झोपले थोराचे
गोपूबाळ ॥११॥

पाळणा पात्यांचा
वर चेंडू ग मोत्यांचा
आत बाळ नवसाचा
झोप घेई ॥१२॥

पाळणा बांधीला
हत्तीणी दातांचा
आत बाळ नवसाचा
निद्रा करी ॥१३॥

पाळणा पालखा
वर रावे रत्नागिरी
खेळ तुझे नानापरी
तान्हेबाळा ॥१४॥

पाळण्या ग वरी
राव्यांचा गलबला
आनंदाची झोप तुला
तान्हेबाळा ॥१५॥

रंगीत पाळणा
त्याला रेशमाचा दोर
हळूहळू झोपा काढ
उषाताई ॥१६॥

रंगीत पाळणा
येता जाताना हलवा
कोठे गेली ती बोलवा
उषाताई ॥१७॥

पालख पाळणा
हलवीतो मामा
नीज तू परशरामा
पाळण्यात ॥१८॥

पोपट पिंजर्‍यात
म्हणू लागे रामराम
बाळ घेईल आराम
पाळण्यात ॥१९॥

निजू दे गं बाई
बाळाला क्षणभर
घरातील कामधंदा
आटपू दे भराभर ॥२०॥

पाळणा पालख
येता जाताना हलवा
माझ्या राघूला नीजवा
तान्हेबाळा ॥२१॥

न्हाउनी माखुनी
पालखी घातले
शताउक्ष म्हणीतले
तान्हेबाळा ॥२२॥

पाळण्याच्या दोर्‍या
वाजती करकरा
झोप नाही चारी प्रहरा
गोपूबाळा ॥२३॥

पाळण्याचे दोर
जसे मोतियाचे सर
शोभिवंत घर
पाळण्याने ॥२४॥

रंगीत पाळणा
बांधिला महाली
येताजाता मुली
हालवीती ॥२५॥

आंथरुण केले
पांघरुण शेला
निजवीते तुला
गोपूबाळा ॥२६॥

आंथरुण केले
जाई मोगर्‍याचे
बाळा गोजिर्‍याचे
अंग मऊ ॥२७॥

आंथरुण केले
मऊ ऊबदार
झोप घे चारी प्रहर
तान्हेबाळा ॥२८॥

निद्रा आली बाळा
आपुले पालखी
श्रीरामाला जानकी
माळ घाली ॥२९॥

निद्रा आली बाळा
आपुले पालखी
आता काम करु सखी
जरा वेळ ॥३०॥

बाळासाठी केली
चिमणीशी गादी
बाळाचे सारे आधी
कवतूक ॥३१॥

निजेला रे आले
बाळा तुझे डोळे
भोरे विसावले
पाळण्याचे ॥३२॥

नीज रे बाळका
आपुल्या पालखी
तुला रक्षण जानकी
रघुनाथ ॥३३॥

अंगाई म्हणून
बाळाला नीजवी
वाटीत नीववी
दूधतूप ॥३४॥

सकाळच्या वेळी
किती असे कामधंदा
नको रडू रे गोविंदा
तान्हेबाळा ॥३५॥

सकाळच्या वेळी
झाडलोट कामधंदा
नको घेऊ वेडया छंदा
तान्हेबाळा ॥३६॥

सोड रे राजसा
सारवू दे वैलचूल
देईन तुला फूल
मोगर्‍याचे ॥३७॥

सोड रे राजसा
असा चिकटुन नको बसू
होईल माझे हसू
रामप्रहरी ॥३८॥

सोड रे राजसा
नको रडू उजाडत
येतील ओरडत
सासूबाई ॥३९॥

देव वर आला
पडली किती उन्हे
उठले माझे तान्हे
झोप झाली ॥४०॥

पाखरे उडती
फुलतात फुले
उठतात मुले
उजाडत ॥४१॥

सूर्य उगवला
कमळे फुलली
तान्हेलाभे उघडीली
निज दृष्टी ॥४२॥

भानू उगवला
उगवला लालगोळा
तान्हेबाळा जागा झाला
पाळण्यात ॥४३॥

झोप रे अजून
कशाला उठशी
कोणी म्हणेल आळशी
म्हणून का ॥४४॥

झोप रे अजून
करुन गुरंगुटी
असे म्हणून थोपटी
तान्हेबाळा ॥४५॥

मला वाटे बाळ
आहे पालखी निजले
जाऊन बघते
तोच खुदकन हासले ॥४६॥

उघडून डोळे
पाय घालून तोंडात
होते तान्हुले खेळत
पाळण्यात ॥४७॥

पहाटेची वेळ
दूर कोंबडा आरवे
तान्हुल्या झोपी जावे
लहान तू ॥४८॥

पहाटेची वेळ
कूऊ करिती रहाट
बाळा तू पाळण्यात
झोप घेई ॥४९॥

पहाटेची वेळ
कावळा का का करी
निजावे तान्ह्या परी
पाळण्यात ॥५०॥

पहाटेची वेळ
तुला नाही परी काम
नीज रे आत्माराम
तान्हेबाळा ॥५१॥

पहाटेची वेळ
नीज रे बाळपणी
ऊठ तू मोठेपणी
तान्हेबाळा ॥५२॥

तान्हीया रे बाळा
तुला मशीचा रे टिळा
कोणा पापिणी चांडाळा
दृष्ट केली ॥५३॥

तान्ह्या रे तान्हिका
बाळा रे माणिका
तुझ्या रे श्रीमुखा
लिंबलोण ॥५४॥

घडीघडी कोण
उतरी लिंबलोण
तान्ह्या बाळाची बहीण
उषाताई ॥५५॥

लिंबलोण करु
दोन्ही या ग मुठी भरु
बाळा बरोबरी
शेजीचा बाळा उभा करु ॥५६॥

लिंबा ग लोण्याची
आयती कोणी केली
तुझी मावशी रे आली
तान्हेबाळा ॥५७॥

तान्हेबाळ खेळे
ओसरीच्या काठी
जिउतीच्या हाती
निंबलोण ॥५८॥

कोणे दृष्ट केली
तान्हेबाळा सोनटक्क्या
बिंदुली मनगटया
सैल झाल्या ॥५९॥

कोणे दुष्ट केली
तान्हेबाळाला देखून
लिंबू देत्ये मी फेकून
दृष्टीवरी ॥६०॥

माळ्याच्या मळ्यात
विसबंदी वेली गेला
दृष्टीसाठी गोळा केला
तान्हेबाळाच्या ॥६१॥

माळयाच्या मळ्यात
विसबंद गं कोवळा
तान्हेबाळाच्या जावळा
दृष्ट पडे ॥६२॥

माळ्याच्या मळ्यात
पाचूबंदाचा एक वाफा
दृष्ट होईल बापलेका
तिन्हीसांजा ॥६३॥

माळ्याच्या मळ्यात
सुगंध ये रोपारोपा
दृष्ट झाली बापलेका
भाईराया ॥६४॥

एकापुढे एक
चालती बापलेक
दृष्ट होईल मागे थोप
गोपूबाळा ॥६५॥

माळ्याला ताकीद
विसबंदाच्या रोपाची
तान्हेबाळा दृष्ट झाली
सभेमधल्या लोकांची ॥६६॥

हात रे कुतर्‍या
छूत रे मांजरा
तान्हेबाळाच्या काजळा
दृष्ट पडे ॥६७॥

नका बाळाकडे
असे पाहू टकामका
चित्ताला लागे धका
माउलीच्या ॥६८॥

दृष्ट उतरीली
मीठमोहर्‍या नी मेथ्या
न्याहाळीत कोण होत्या
तान्हेबाळाला ॥६९॥

एकापाठीमागे एक
येतील शिवूमिवू
माझ्या ग राजसांना
नको पापिणी दृष्ट लावू ॥७०॥

जळो जळो दृष्ट
तुझ्या पाळण्यावरुन गेली
निंबलोणाची जलदी केली
उषाताईने ॥७१॥

जळो जळो दृष्ट
मिठाचे झाले पाणी
बाळ माझे फुलावाणी
कोमेजले ॥७२॥

जळो जळो दृष्ट
मिठाचे झाले खडे
घडी घडी रडे
तान्हेबाळ ॥७३॥

पापिणीची दृष्ट
चुलीमध्ये पडो
माझा कडुलिंब वाढे
तान्हेबाळा ॥७४॥

कोणे दृष्ट केली
पापिणी गं वांझे
कोमेजले तिन्हीसांजे
तान्हेबाळ ॥७५॥

कोणे दृष्ट केली
तान्हेबाळाच्या डोळिया
करु पाळणेया
आंथरुण ॥७६॥

कोणे दृष्ट केली
तान्हेबाळाच्या काजळा
रडून भागला
तान्हेबाळ ॥७७॥

गोरीया गोरेपणा
नको भिऊ तू जीवाला
तुझी काळजी देवाला
माउलीये ॥७८॥

दृष्ट मी काढू किती
मीठमोहर्‍या काळी माती
गोरपणा जपू किती
तान्हेबाळाच्या ॥७९॥

तुला सांगितले
उभे गंध लावू नको
दृष्ट पडेल जाऊ नको
गोपूबाळा ॥८०॥

तान्हियाचे दात
जशी मोतियांची ओळी
हासता पडे खळी
गोड गाली ॥८१॥

तान्हियाचे दात
जसे डाळिंबाचे दाणे
हांसवीते कौतुकाने
उषाताई ॥८२॥

पेरा झाला रानातून
मोड काढी वरी मान
तसे हसे माझे तान्ह
पाळण्यात ॥८३॥

गोर्‍या गालांवर
मुलामा लाल लाल
जणु गुलाबाचे फूल
शोभिवंत ॥८४॥

रुप्याच्या वाटीत
ठेवावे लाल फूल
तसे राजसाचे गाल
तान्हेयाचे ॥८५॥

गोर्‍या गालांवर
लाल शोभतो मुलामा
गोड हसशी गुलामा
तान्हेबाळा ॥८६॥

तान्हीया रे बाळा
गोड तुझी हनुवटी
गोंडस तुझ्या मुठी
नाचवीशी ॥८७॥

कुरळया केसांचा
विरळ दातांचा
लाडका आईचा
तान्हेबाळ ॥८८॥

चंद्राची वाढे कला
तसे बाळाचे बाळसे
लावण्या उणे नसे
अणुमात्र ॥८९॥

कितीदा हाका मारु
लेकाच्या जिन्नसा
मोत्याच्या कणीसा
तान्हेबाळा ॥९०॥

माझे दोघे बाळ
पायावरी उभे
चंद्रसूर्य दोघे
उगवले ॥९१॥

माझे दोघे बाळ
उभे पायावरी
शेजीच्या दारावरी
उजेड पडे ॥९२॥

माझा बाळ गोरा
हळदीचा ओंडा
शोभते गोरे तोंडा
पिंपळपान ॥९३॥

माझा तान्हे बाळ
हळदीचा ओंडा
पाठीवरती गोंडा
रेशिमाचा ॥९४॥

माझे तान्हेबाळ
हळदीने न्हाई
त्याचे पाणी जाई
शेवंतीला ॥९५॥

शेवंती फुलली
फुलली लाखलाख
बाळाचे कौतुक
करावया ॥९६॥

शेवंती फुलली
फुलली सोन्यावाणी
न्हाणाचे जाते पाणी
तान्हेबाळाचे ॥९७॥

निळे ग गगन
हिरवे गं रान
आहे गोरेपान
तान्हेबाळ ॥९८॥

काळी गं यमुना
सांवळा गं कान्हा
गोरा गोरा माझा तान्हा
गोपूबाळ ॥९९॥

काळा ग कालीया
काळा ग घननीळ
सुंदर तान्हेबाळ
माउलीचे ॥१००॥

पिवळे गंहू
पिवळी शेवंती
अंगाची शोभे कांती
तान्हेबाळाच्या ॥१०१॥

पिवळे गं लिंबू
पिवळे वरण
किती गोड गं वदन
तान्हेबाळाचे ॥१०२॥

अंगणात उभा
कमळाचा जसा देठ
तसा तुझा अंगलोट
तान्हेबाळा ॥१०३॥

अंगणात उभा
कसा म्हणु मी लोकाचा
वाकडा ताईत गोपाचा
तान्हेबाळाचा ॥१०४॥

मोठमोठे डोळे
भिवया लांबरुंद
कपाळी शोभे गंध
केशराचे ॥१०५॥

मोठमोठे डोळे
भिवया चंद्रज्योती
शहाणा म्हणु किती
तान्हेबाळ ॥१०६॥

तान्हेया रे बाळा
तुला काय साजे
गळयात बांधिले
वाघनख ॥१०७॥

वाघाचे वाघनख
सोन्याने मढवीले
गळा चढवीले
तान्हेबाळाच्या ॥१०८॥

गळ्यात हासोळी
कमरे साखळी
मूर्ति साजिरी गोजिरी
तान्हेबाळाची ॥१०९॥

केलासे ताईत
गळ्यात घालावा
घालुनीया न्यावा
तान्हेबाळ ॥११०॥

सोनारा रे शेटी
उघड अपुली पेटी
कडीतोडे कंठी
करु बाळा ॥१११॥

सोनारी रे शेटी
उघड अपुली पेटी
रुसला कंठीसाठी
तान्हेबाळ ॥११२॥

आले आले पटवेकरी
पटवाया काय देऊ
टोपीला गोंडे लावू
तान्हेबाळाच्या ॥११३॥

घातलीसे कुंची
गझनीच्या कापडाची
मोत्यांच्या पिंपळपानाची
त्यात शोभा ॥११४॥

घातलीसे कुंची
रेशमी जरतारी
त्यातून येताती बाहेरी
कुरळे केस ॥११५॥

पिंपळपानाची
मोती झाली जुनी
तुला शोभती बाळपणी
तान्हेबाळा ॥११६॥

माझिया घरात
मुले लहानलहान
टोपीला पिंपळपान
शोभा देई ॥११७॥

माझीया घरात
लहानलहान मुले
टोपीला लावू फुले
गुलाबाची ॥११८॥

माझ्या अंगणात
शिंपिणी जावाजावा
टोपीला गोंडे लावा
तान्हेबाळाच्या ॥११९॥

मला हौस मोठी
करगोटा सव्वाशाचा
पुत्र आहे नवसाचा
तान्हेबाळ ॥१२०॥

बापाचा लाडका
चुलत्याचा आत्माराम
तुला जडित पिंपळपान
तान्हेबाळ ॥१२१॥

हाती कडीतोडे
कमरे करगोटा पेट्यांचा
मुलगा दिसतो मोठयांचा
गोपूबाळ ॥१२२॥

हाती कडीतोडे
कानात भीकबाळी
आता माझ्या तान्हेबाळा
नको खेळू सायंकाळी ॥१२३॥

हाती कडीतोडे
कमरे करगोटा मोराचा
पुत्र दिसतो थोराचा
गोपूबाळ ॥१२४॥

हाती कडीतोडे
गळ्यात कंठीगोप
सावकाराचा ग लेक
गोपूबाळ ॥१२५॥

हाती कडीतोडे
पावठणी उभा
आजीबाई नातू तुझा
गोपूबाळ ॥१२६॥

तान्हीया रे बाळा
तुझ्या पायी वाळा
तुझा डोळा काळा
काजळाने ॥१२७॥

बिंदुल्यांचा हात
ठेवी ताटापुढे
जेवतो मामापुढे
गोपूबाळ ॥१२८॥

श्रीमंतीचा डौल
तुझा बाई पुरे कर
सोनेरी चंद्रकोर
तान्हेबाळ ॥१२९॥

नटव थटव
तुझे श्रीमंत लेकरु
मोहक वासरु
बाळ माझे ॥१३०॥

माझे तान्हेबाळ
मला ते आवडे
लोकांना नावडे
घडीभरी ॥१३१॥

माझा ग बाळाला
नको हो दागीना
कोवळया लावण्या
पूर आला ॥१३२॥

माझ्या राजसाला
नकोत दागिने
शोभे अलंकारावीणे
तान्हेबाळ ॥१३३॥

कशाने नटवू
कशाने भूषवू
कशाने शोभवू
तान्हेबाळ ॥१३४॥

गरीब माउली
काय बाळा लेववील
प्रेमाने पांघरवील
तान्हेबाळ ॥१३५॥

गरीब माउली
काय बाळाला घालील
प्रेमाने रंगवील
सर्वकाळ ॥१३६॥

गरीब माउली
कोठले बाळलेणे
बाळाला वात्सल्याने
वाढवील ॥१३७॥

आसवांची माळा
गळा घालील बाळाचे
गरीब माउलीचे
हेची धन ॥१३८॥

श्रीमंतांची मुले
शेजारी शृंगारली
नाही ती शोभली
बाळाला ॥१३९॥

श्रीमंतांची मुले
पडली निस्तेज
पाहुनीया तेज
तान्हेबाळाचे ॥१४०॥

नाचती हासती
फुले जशी वेलीवर
तशी माझ्या मांडीवर
माझी बाळे ॥१४१॥

सखीया लेणे लेती
आपले हारदोरे
आपण दाखवू
आपले बाळ गोरे ॥१४२॥

तरुलता वेली
रानावनांत डोलती
माझ्या घरात शोभती
तान्ही बाळे ॥१४३॥

सरोवरामध्ये
जशी फुलती कमळे
तशी शोभतात बाळे
घरामध्ये ॥१४४॥

समुद्राचे तळी
मोती झळाळती
तशी घरात शोभती
तान्हे बाळे ॥१४५॥

तारे चमचम
करिती आकाशात
बाळे नाचती घरात
माउलीची ॥१४६॥

रांगुनी खेळुनी
बाळ उंबर्‍यात बसे
सोन्याचा ढीग दिसे
तान्हेबाळ ॥१४७॥

अंगणीचे खडे
मी गं लोटीते नित्याने
माझे रांगे गुडघ्याने
तान्हेबाळ ॥१४८॥

अंगणीचे खडे
झाडित्ये निरियांनी
बाळ रांगे गुडघ्यानी
उषाताईचे ॥१४९॥

शेजारिणीबाई
दाट दाट घाली सडा
रांगतो सवंगडा
तान्हेबाळ ॥१५०॥

शेजीबाई तू ग
दाट दाट घाली सडा
माझे बाळ ग रांगते
रुतेल हो त्याला खडा ॥१५१॥

शेजारिणी बाई
आटप जाईजुई
अचपळ माझी सई
कळ्या तोडी ॥१५२॥

शेजारिणी बाई
सडा टाक ग भिडूनी
अनाडी बाळ माझा
येतो रांगोळी मोडूनी ॥१५३॥

शेजारिणी बाई
आवर डाळी साळी
अनाडे तान्हेबाळ
नको देऊ शिवीगाळी ॥१५४॥

शेजारणी बाई
आटप मोगरा
अचपळ माझा हिरा
गोपूबाळा ॥१५५॥

शेजारिणी बाई
आटप आपले वाळवण
रेती करिल मिसळण
तान्हेबाळ ॥१५६॥

दळणाची पाटी
ठेवू मी कोणीकडे
हिंडते चोहीकडे
तान्हेबाळ ॥१५७॥

शेजी आली घरा
बैस म्हणाया चुकल्ये
तुझ्या कामात गुंतले
तान्हेबाळ ॥१५८॥

किती सांगितले
नको तू जाऊ कोठे
लबाड झाले मोठे
माझे बाळ ॥१५९॥

माळ्याच्या मळ्यात
नको जाऊ तू राजसा
माळी अवदसा
शिव्या देई ॥१६०॥

शेजीने दिली शिवी
लागली माझ्या जीवी
आयुष्याची तुला ओवी
तान्हेबाळा ॥१६१॥

शेजीने दिली शिवी
ह्रदया झाला भेद
समजू आशीर्वाद
तान्हेबाळा ॥१६२॥

शेजीने रागाने
तान्हेबाळा शिव्या दिल्या
पदरी घेतल्या
जाईजुई ॥१६३॥

शेजी देते शिव्या
तान्हेबाळा देखोनी
जाईमोगर्‍याच्या कळ्या
ओटी घेत्ये मी वेचोनी ॥१६४॥

शेजीने दिली शिवी
जिची तिला पडो
माझा कडुलिंब वाढो
गोपूबाळ ॥१६५॥

शेजीने वाहिली
शिव्यांची लाखोली
पुष्पूजा झाली
बाळराजा ॥१६६॥

शेजीने दिली शिवी
वेचून घेतली
कळी मी मानिली
शेवंतीची ॥१६७॥

शेजी आली घरा
तुम्ही बसा बसा घाई
अन्याय केला काई
तान्हेबाळाने ॥१६८॥

शेजी आली घरा
पाट देऊ बसायाला
अन्याय पुसायाला
तान्हेबाळाचे ॥१६९॥

शेजी आली घरा
धरील मनगटी
अन्याय घाल पोटी
तान्हेबाळाचे ॥१७०॥

आहेत तुझी मुले
तुला मी काय सांगू
पुरे कर ग शेजीबाई
कितीदा मी क्षमा मागू ॥१७१॥

चुकले माझे बाळ
तुझ्या किती पाया लागू
आता माझे शेजीबाई
विसर गं प्रेमे वागू ॥१७२॥

टोचून बोलती
परके चटाचटा
बाळाच्या डोळ्यांना
पाणी येई पटापटा ॥१७३॥

टोचून बोलती
कोवळे तुझे मन
उगी रडून रडून
दमशील ॥१७४॥

इवलासा गुन्हा
किती बाळाला बोलती
मेरु मोहरीचा करिती
लोक मेले ॥१७५॥

खेळशी खेळ गडया
विटीदांडू रे मोगर्‍या
तुझ्या दांडूला घागर्‍या
तान्हेबाळा ॥१७६॥

लहान लहान बाळ
खेळती आट्या पाट्या
रंगीत तुझ्या गोटया
तान्हेबाळा ॥१७७॥

लहान लहान मुले
खेळती विटीदांडू
रंगीत तुझा चेंडू
तान्हेबाळा ॥१७८॥

खेळशी खेळ गड्या
विटीदांडू पैलथडी
भागले तुझे गडी
गोपूबाळा ॥१७९॥

अंगाई मंगाई
तांबुले गंगाई
तान्हेबाळाने दंगाई
मांडीयेली ॥१८०॥

लहान लहान मुले
खेळती हुतूतू
दमला परंतु
तान्हेबाळ ॥१८१॥

माझ्या अंगणात
बांधिलासे झोका
तेथे खेळवा बाळका
गोपूबाळा ॥१८२॥

माझ्या अंगणात
घातला मांडव
तान्हेबाळाला खेळव
साउलीत ॥१८३॥

माझे दोन्ही बाळ
दुपारी कोठे गेले
उन्हाने कोमेजले
नागचाफे ॥१८४॥

कोकंब पिकले
पिकले लाललाल
खेळून तसे झाले
तान्हेबाळाचे ग गाल ॥१८५॥

उन्हाळ्याचे ऊन
ऊन लागते पाठीला
कंठी शोभते छातीला
तान्हेबाळाच्या ॥१८६॥

उन्हाळ्याचे ऊन
ऊन लागते गालांला
कंठी शोभते कंठाला
तान्हेबाळाच्या ॥१८७॥

दुपारचे ऊन
टाळू तुझी रे तापली
उघड छत्री रे आपुली
तान्हेबाळा ॥१८८॥

करवंदी काळ्या झाल्या
लाल पीवळे हो काजू
गेले कोणत्या हो बाजू
तान्हेबाळ ॥१८९॥

रानीनवी किती
भारावल्या बोरी
आणिती रानमेवा
तान्हेबाळाला गोवारी ॥१९०॥

रानीचा तो मेवा
रानीच्या पाखरांना
दुधाच्या चारी धारा
गायीच्या वासरांना ॥१९१॥

बाळारे बागड
शिवीन आंगडं
बिदीये उघड
जाऊ नये ॥१९२॥

गायीच्या गोठयात
सर्पाची वेटाळी
तेथे तुझी चेंडूफळी
तान्हेबाळा ॥१९३॥

आणते चेंडूफळी
सर्पाच्या जवळून
सर्प भुले सर्पपण
मातेसाठी ॥१९४॥

गायीच्या गोठ्यात
वाघ हंबरला
शेष दणाणला
पाताळात ॥१९५॥

गायीच्या गोठयात
वाघ हंबरतो
बाळ दचकतो
पाळण्यात ॥१९६॥

तान्हेबाळ खेळे
विंचवाच्या संगे
त्याचे विष भंगे
बाळापुढे ॥१९७॥

माझ्या अंगणात
पाचफणी नाग डोले
त्याच्या संगे खेळे
तान्हेबाळ ॥१९८॥

तान्हे बाळ खेळे
अंगण झाले थोडे
लाविली फुलेझाडे
काकारायांनी ॥१९९॥

सोन्याचा विटीदांडू
भिंतीशी उभा केला
खेळणारा कोठे गेला
गोपूबाळ ॥२००॥

दुरुन दिसतो
हालतो, चालतो
सखा नारिंग झेलतो
गोपूबाळ ॥२०१॥

मायेच्या पाठीवर
बाळ बैसले जाऊन
माय झाडीते वाकून
अंगणाला ॥२०२॥

छंदकर बाळ
छंदाला काय देऊ
नको असा हट्ट घेऊन
तान्हेबाळा ॥२०३॥

छंदकर बाळ
छंदाला दिल्या लाह्या
खेळतो माझा राया
कौतुकाने ॥२०४॥

छंदकर बाळ
छंद घेतलासे रात्री
चंद्रमा मागे हाती
खेळावया ॥२०५॥

पाळण्याच्या दोर्‍या
धरुन उभा राहे
चंद्रमा दे ग माये
खेळावया ॥२०६॥

माझ्या अंगणात
उडे, बागडे कावळा
जरी दिसतो बावळा
बाळा गोड ॥२०७॥

माझ्या अंगणात
कावणा का का करी
बाळाला हाका मारी
खेळावया ॥२०८॥

माझ्या अंगणात
कावळ्यांची गर्दी
बाळाला माझ्या सर्दी
सांगा त्यांना ॥२०९॥

माझ्या अंगणात
नाचते चिमणी
बाळाला खेळणी
देवाजीची ॥२१०॥

माझ्या अंगणात
चिमणी वेची दाणे
धावून बाळकाने
उडवीली ॥२११॥

माझ्या अंगणात
हिरवा पोपट बोलतो
चोचीला धरु बघतो
तान्हेबाळ ॥२१२॥

माझ्या अंगणात
साळुंकी मंजुळ बोले
नाचतो प्रेमे डोले
तान्हेबाळ ॥२१३॥

चुलीच्या जवळी
मनी मांजरीची पिले
खेळती माझी बाळे
त्यांच्या संगे ॥२१४॥

कुस्कुरी मांजरी
परि ना बाळा चावे
बाळ माझे हवे
प्राणिमात्रा ॥२१५॥

ओसरीच्या वरी
मोत्या भू भू भू भुंकतो
तान्हा ग ओढतो
त्याचे पाय ॥२१६॥

माझ्या अंगणात
पिवळ्या लाल गं कर्दळी
बाळाची वर्दळी
चारी दिशा ॥२१७॥

माझ्या अंगणात
लाविल्या तुळशी
नाही होणार आळशी
तान्हेबाळ ॥२१८॥

माझ्या अंगणात
तुळशीचा वाफा
गोविंद घाली खेपा
मंजुळींना ॥२१९॥

माझ्या अंगणात
शोभती दुर्वा, फुले
खेळाया येती मुले
बाळासंगे ॥२२०॥

अंगणात किती
नाचती फुलवेल
बाळाचा चाले खेळ
त्यांच्यासंगे ॥२२१॥

माझ्या अंगणात
वानरे येती जाती
वाकुल्या दाखविती
तान्हेबाळा ॥२२२॥

माझ्या अंगणात
कारंजे थुईथुई
रांगतसे भुई
तान्हेबाळ ॥२२३॥

माझ्या अंगणात
कारंजे नाचे उडे
बघून जाते रडे
तान्हेबाळाचे ॥२२४॥

माझ्या अंगणात
वासरे बागडती
बाळके धांवती
त्यांच्यासंगे ॥२२५॥

घागर्‍या घुळुघुळु
दणाणला सोपा
खेळतो प्राणसखा
तान्हेबाळा ॥२२६॥

घागर्‍यांना नाद
पडतो माझ्या कानी
खेळतो वृंदावनी
तान्हेबाळ ॥२२७॥

माझे तान्हेबाळ
खेळाया जाई लांब
हातावरी जांब
पिकलेला ॥२२८॥

माझे तान्हेबाळ
खेळाया जाई दुरी
हातावरी पुरी
साखर मागे ॥२२९॥

घरात काम करु
चित्त माझे नाही स्थिर
दारी खेळे रघुवर
तान्हेबाळ ॥२३०॥

तिन्हीसांझा झाल्या
गुरावासरांची वेळ
वाटेवेगळा तू खेळ
गोपूबाळ ॥२३१॥

अंगणात रावा
परसावात साळुबाई
मधुबाळा कमळाबाई
हाक मारी ॥२३२॥

पाखरे घरा गेली
बाहेर सांजावले
खेळून आली बाळे
आईपाशी ॥२३३॥

गायी घरी आल्या
देव मावळला
बाळ नाही आला
कैसा घरी ॥२३४॥

गायीच्या पान्ह्यासाठी
वासरे हंबरती
खेळुनी बाळ येती
तिन्हीसांजा ॥२३५॥

तिन्हीसांजा झाल्या
दिवे लागले घरात
गायी चाटती गोठयांत
वासरांना ॥२३६॥

तिन्हीसांजा झाल्या
दिवे लागले घरात
बाळा पाळण्यात
आंदुळती ॥२३७॥

किती हाका मारु
उभी राहुनी दारात
चंद्र कोणाच्या वाड्यात
तान्हेबाळ ॥२३८॥

बाळ खेळू जाये
वडासाउलीये
घरी माउलीये
साद घाली ॥२३९॥

पारवा दारावरी
सारी रात्र निंद घाली
माझे बाळ गाणे गाई
पाळण्यात ॥२४०॥

माझ्या माडीवरी
पारवे घुमती
बाळे ग रमती
घरांमध्ये ॥२४१॥

गायींनी भरला गोठा
म्हशींना झाली दाटी
यशवंत तुझी काठी
तान्हेबाळा ॥२४२॥

गायी गोठीयांत
म्हशी वाडीयांत
बाळ पाळण्यांत
दुध मागे ॥२४३॥

काळया ग गायीचे
दूध गोड लागे
वाटीभर मागे
तान्हेबाळ ॥२४४॥

काळे ग गायीचे
दूध गोडाईचे
बाळ बढाईचे
ताईबाईचे ॥२४५॥

ये ग तू ग गायी
चरशील कोंडा
तान्ह्या बाळाच्या ग तोंडा
दुधमांडा ॥२४६॥

ये ग तू ग गायी
चरुन वरुन
तान्ह्या बाळाला म्हणून
दूध पाजू ॥२४७॥

गायी गं चरती
कोवळी कणीसे
तान्हेबाळाला नीरसे
दूध पाजू ॥२४८॥

गायी हंबरती
प्रेमाचा पान्हा फुटे
गळ्याचे दावे सुटे
वासरांच्या ॥२४९॥

गायीचा गोवारी
म्हशीचा खिल्लारी
तान्हेबाळाचा कैवारी
गोकुळीचा ॥२५०॥

गायी ग चरती
वासरे कोठे गेली
गंगेच्या पाण्या नेली
तान्हेबाळाने ॥२५१॥

गायी गं चरती
कोवळा गं चारा
दुधाच्या चारी धारा
वासरांना ॥२५२॥

गायी गं चरती
वासरे हंबरती
वाडा आहे हा श्रीमंती
तान्हेबाळाचा ॥२५३॥

तान्हीया बाळाला
कोणी गं काय केले
कडू मी भरविले
मायफळ ॥२५४॥

तान्हीया बाळाला
कोणी गं काय केले
रागाने धाडिले
निजावया ॥२५५॥

तान्हीया रे बाळा
पुरे कर आता रडे
दारीचे घेवडे
जून झाले ॥२५६॥

माझे तान्हे बाळ
मला ते आवडे
दारीचे घेवडे
जून झाले ॥२५७॥

बाळा तुझी झोप
कावळ्याने नेली
सारी रात्र गेली
आंदुळता ॥२५८॥

कां गं हे रडते
तान्हे बाळ आज
त्याला आधी पाज
सूनबाई ॥२५९॥

तान्हे बाळ रडे
उगी ना मुळी राही
त्याला आधी घेई
माऊलीये ॥२६०॥

सोड सारे काम
सोड सारे धंदे
तान्हेबाळ गं आक्रंदे
पाळण्यात ॥२६१॥

कळवळले गं तान्हे
त्याला आधी पाज
मग करी कामकाज
सूनबाई ॥२६२॥

मारु नको बाळा
किती कळवळे
असे म्हणून घेतले
आजीबाईने ॥२६३॥

झाली आता रात्र
झोप म्हणे आई
चंद्र का वर येई
माउलीये ॥२६४॥

झाली आता रात्र
झोप रे चिमण्या तान्ह्या
वर नाचती चांदण्या
माऊलीये ॥२६५॥

आई गादी ही कोणाला
साधे आंथरुण कोणा
गादी तुझ्या जन्मदात्या
साधे मला माझ्या तान्ह्या ॥२६६॥

गादीवर आपण निजू
बाप्पाजी निजो खाली
वेडा कुठला म्हणे आई
हळूच थापड मारी गाली ॥२६७॥

कोल्हे कुई कुई
आज का तिन्ही सांजा
थंडी पडेल हो भारी
जपा म्हणती बाळराजा ॥२६८॥

कोल्हे कुई कुई
आज का सांगा मशी
थंडी पडेल हो भारी
बाळ घ्यावा म्हणती कुशी ॥२६९॥

का गं हे काजवे
करिती लुकलुक
पाहाया श्रीमुख
तुझे बाळा ॥२७०॥

काजवे फुलले
फुलले लाख लाख
पाहाया श्रीमुख
तान्हेबाळाचे ॥२७१॥

का गं झाडांवर
आई काजवे नाचती
तुला ओवाळिती
झाडे माडे ॥२७२॥

वनदेवतांचे
काजवे जणु डोळे
बघाया माझे बाळ
त्यांनी रात्री उघडिले ॥२७३॥

वनदेवतांचे
काजवे डोळे झाले
बाळा बान नाही तृप्ती
पुन्हा पुन्हा उघडीले ॥२७४॥

आकाशात तारे
काय आई म्हणताती
तुझी राजा स्तोत्रे गाती
अखंडीत ॥२७५॥

आकाशात तारे
त्यांचे ओठ का हालती
संगीत गाणी गाती
तान्हेबाळा ॥२७६॥

थुई थुई उडे
का गं कारंजे उसळे
तुझ्यामुळे उचंबळे
तान्हेबाळा ॥२७७॥

तान्ह्या तुझ्या भाती
घालीन तोंडले
आता नको रे बोंडले
भात जेव ॥२७८॥

रुप्याची ही वाटी
आणि चांदीचे बोंडले
तुझ्या आजीने धाडले
तान्हेबाळा ॥२७९॥

काल माझ्या गं बाळाचे
शेजी केले उष्टावण
आला होता मामाराया
घास भरवी आंगठीनं ॥२८०॥

दह्यादुधी भरल्या वाटया
वर साखरेची मूठ
छंदगोर बाळा ऊठ
जेवावया ॥२८१॥

दह्यादुधी भरल्या वाट्या
वर साखर मावेना
छंदखोर हा जेवेना
गोपूबाळ ॥२८२॥

बापाचा लाडका
साखर तोंडी लावी
चुलत्यापुढे जेवी
तान्हेबाळ ॥२८३॥

बापाचा लाडका
चुलत्याच्या कडे
तबकी दूध पेढे
तान्हेबाळ ॥२८४॥

माझ्या अंगणात
ठेवीला दहीभात
जेवीला रघुनाथ
तान्हेबाळा ॥२८५॥

लाडका ग लेक
भूक म्हणून नीजला
माझ्या राजसाचा
तूप बत्तासा थीजला ॥२८६॥

वाटीये दूध तूप
निवत मी घाली
लहान बाळा हाका मारी
उषाताई ॥२८७॥

लोकांची ती मुले
खाती ताककण्या
तुझ्या ताटी साखरफेण्या
तान्हेबाळा ॥२८८॥

लोकांची ती मुले
खाती ताकभात
तुझ्या हाती लाडू नित्य
तान्हेबाळा ॥२८९॥

तान्हे ग बाळाला
गोडसे जेवण
दुधाला विरजण
साखरेचे ॥२९०॥

हाती दूधभात
वर पेरते साखर
तुझे जेवण प्रकार
तान्हेबाळा ॥२९१॥

अंगणात गाय
दाखवीते माय
गोड घास खाय
तान्हेबाळ ॥२९२॥

बघ रे चिमणी
करिते चीवचीव
म्हणते तुला जेव
तान्हेबाळा ॥२९३॥

दाखवी पाखरे
चुटक्या वाजवी
माउली जेववी
तान्हेबाळा ॥२९४॥

माझे तान्हे बाळ
मोठ्या ग मनाचे
त्याच्या जेवणाचे
नाना रंग ॥२९५॥

आळवून किती
भरविते घास
माउलीला त्रास
नाही त्याचा ॥२९६॥

तान्हेबाळ खेळे
आंगण ओसरी
त्याला संगत दुसरी
ताईबाईची ॥२९७॥

पाऊस पडतो
मृगाआधी रोहिणीचा
पाळणा हालतो
भावाआधी बहिणीचा ॥२९८॥

समोर पाळणा
हलग्यांशी गं हालतो
बाळ बापाशी खेळतो
आनंदाने ॥२९९॥

पिवळा पीतांबर
काठी कमळाचा
कडे नातू घ्या जावळाचा
गोपूबाळ ॥३००॥

हस रे राजसा
हसशी किती गोड
देई आनंदाची जोड
माउलीला ॥३०१॥

मामाराया भाचा
कडे घेतसे हिर्‍याला
हात घातला तुर्‍याला
तान्हेबाळाने ॥३०२॥

पुरे आता रडे
डोळे झाले लालेलाल
मामा देईल रुमाल
पुसावया ॥३०३॥

पुरे आता रडे
आता दाखव हंसून
मामा आलासे दुरुन
तुझ्यासाठी ॥३०४॥

पुरे आता रडे
ठेवील मामा नावे
मामाने प्रेमे घ्यावे
भाचेयाला ॥३०५॥

घे रे घे रे मामा
जरा भाच्याला खेळव
त्याला वासरे दाखव
गोठयातील ॥३०६॥

घे रे घे रे मामा
तुझ्या भाच्याला हिंडव
त्याला दाखव मांडव
तोंडलीचा ॥३०७॥

घे रे घे रे मामा
तुझा भाचा छंदकर
दाखव झाडांवर
पाखरांना ॥३०८॥

आवडत्या मामाराया
आवडता भाचा घेई
गोडसा पापा घेई
आनंदाने ॥३०९॥

मामेया भाचेया
कौतुके नाचव
वानर दाखव
हुपूप करी ॥३१०॥

घे रे घे रे मामा
छंदी भाच्याला डोलव
हिरवा राघू तू बोलव
पिंजर्‍यात ॥३११॥

घे रे घेरे मामा
आवडता तुझा भाचा
कोण लळा पुरवी त्याचा
तुझ्यावीण ॥३१२॥

मामाने घेतला
आश्चर्य हो झाले
उभे की राहिले
तान्हेबाळ ॥३१३॥

काय जादू केली
मामा राया सांगे
हसू कसे लागे
तान्हेबाळ ॥३१४॥

मामा तो मातुल
आईची बरोबरी
म्हणून कडेवरी
हासे बाळ ॥३१५॥

एक जसा एक
कृष्णनाथ देवकीचा
तसा हा तान्हेबाळ
आहे हो माउलीचा ॥३१६॥

आई म्हणे बाळा
नको रे खाऊ बोरे
खाती माये सारी पोरे
बाळ म्हणे ॥३१७॥

आई म्हणे बाळा
नको खाऊ रे चिंचा गड्या
पाणी सुटे माझ्या तोंडा
माउलीये ॥३१८॥

आई म्हणे बाळा
नको खाऊ रे आवळे
खाती ग सगळी बाळे
माउलीये ॥३१९॥

बसशी सारखा
तान्हेबाळा चुलीपाशी
आवडे ना मशी
खरोखरी ॥३२०॥

बाहेर तू जाई
लपंडाव खेळ खेळे
कुसकरती माझे डोळे
माउलीये ॥३२१॥

बाहेर तू जाई
जरा खेळे छप्पापाणी
डोळयांना आणी पाणी
तान्हेबाळ ॥३२२॥

बाहेर तू जाई
खेळ हमामा हुतूतू
आई खेळू मी तू
घरामध्ये ॥३२३॥

बाहेर तू जाई
खेळ हमामा हुतूतू
तुझ्या करितो सांगे कामा
माउलीये ॥३२४॥

बाहेर जाई रे
खेळ रे लंगडी
दुखते तंगडी
माउलीये ॥३२५॥

घराचा घरकोंबडा
होऊ नये बाळा
बाहेर खेळ जा
मुलांमध्ये ॥३२६॥

चुलीचा चुलकोंबडा
कोणाला आवडेल
नावे तुला ठेवतील
तान्हेबाळा ॥३२७॥

ऊठ नको बसू
खेळ जा बाहेर
आई तुझ्याबरोबर
खेळेन मी ॥३२८॥

काम ग करुन
पाट घेईन बसायला
माझे तान्हे बाळ
मांडीवरी विसाव्याला ॥३२९॥

रांगत खेळत
बाळ आले विसाव्याला
माझ्या ग राजसाला
मांडी देत्ये बसायला ॥३३०॥

खेळूनी ग आला
धुळीने माखला
माझा सोनुला दमला
तान्हेबाळ ॥३३१॥

मातीने मढले
मांडीये चढले
मायेने मानीले
मोक्षसुख ॥३३२॥

लोळले मातीत
घुसले मांडीत
मायेच्या मनात
प्रेम दाटे ॥३३३॥

माती का लागली
माती ना तो रे बुका
चुंबीन तुझ्या मुखा
तान्हेबाळा ॥३३४॥

माती का लागली
लागू दे शोभे तुला
कलंक चंद्राला
तान्हेबाळा ॥३३५॥

माती का लागली
तिची झाली रे कस्तुरी
सोन्याच्या शरीरी
तान्हेबाळाच्या ॥३३६॥

माती का लागली
लागू दे रे बाप्पा
घेतील प्रेमे पापा
बाप्पाराया ॥३३७॥

लोकांची ती मुले
जसे भिंतीचे दगड
माझी सोन्याची लगड
तान्हेबाळ ॥३३८॥

शाळेसी जाताना
रडे कशाचे रे आले
पाटी दप्तराचे झाले
ओझे आई ॥३३९॥

शाळेसी जाताना
का रे राया रडू आले
भय माउली वाटले
पंतोजीचे ॥३४०॥

शाळेसी जाताना
डोळे येती का भरुन
केव्हा तुला मी भेटेन
माउलीये ॥३४१॥

शाळेच्या पंतोजींना
देऊ करा ताटवाटी
नका मारु छडीकाठी
तान्हेबाळा ॥३४२॥

शाळेच्या पंतोजींना
देऊ करावी सुपारी
नका मारु हो दुपारी
तान्हेबाळा ॥३४३॥

शाळेच्या पंतोजींना
देऊ करावी खारीक
बाळ शिकू दे लिहाया
आता अक्षर बारीक ॥३४४॥

शाळेच्या पंतोजींना
देऊ करा धोतरजोडा
सांगा, नको देऊ खडा
मानेवरी ॥३४५॥

शाळेच्या पंतोजींना
देऊ करावी घागर
मारु नका सुकुमार
तान्हेबाळ ॥३४६॥

शाळेचा पंतोजी
उग्र हो मुद्रेचा
जीव घाबरे मुलांचा
क्षणोक्षणी ॥३४७॥

शाळेचा पंतोजी
त्याचा केवढा दरारा
मुले कापती थरारा
थंडीवीण ॥३४८॥

शाळेचा पंतोजी
मुद्रा त्याची उग्र
मुलांना वाटे व्याघ्र
खरोखरी ॥३४९॥

शाळेचा पंतोजी
शिकवितो पाढे
मुलांना येई रडे
ओक्साबोक्शी ॥३५०॥

शाळेचा पंतोजी
शिकवी एकदोन
मुले जाती कंटाळून
ओरडून ॥३५१॥

शाळेचा पंतोजी
पढवी बेकंबेला
मुलांचा जीव गेला
म्हणता म्हणता ॥३५२॥

शाळेचा पंतोजी
शिकवीतो लेखे
सुकतात मुखे
बाळराजांची ॥३५३॥

शाळेचा पंतोजी
शिकवी अकरकी
मुलांची मुखश्री
कोमेजली ॥३५४॥

शाळेचा पंतोजी
मुला पर्वचा शिकवी
सारखा चाखवी
महिमा छडीचा ॥३५५॥

शाळेचा पंतोजी
वाजवीतो छडी
येती रडकुंडी
तान्हीबाळ ॥३५६॥

शाळेचा पंतोजी
छडी वाजवीतो
मुले रडवीतो
घडोघडी ॥३५७॥

शाळेचा पंतोजी
रडवीतो मुले
कोमेजती फुले
देवाघरची ॥३५८॥

शाळेचा पंतोजी
छडी का शीणवील
कळ्या का फुलतील
पाण्यावीण ॥३५९॥

शाळेचा पंतोजी
काय शिकवीतो
सोडीतो बांधीतो
रुमालाला ॥३६०॥

शाळेचा पंतोजी
काय शिकवीतो
सोडीतो बांधीतो
चंचीलागी ॥३६१॥

शाळेचा पंतोजी
मुलांचा हाकारी
गायींना गोवारी
जसा रानी ॥३६२॥

पंतोजी पंतोजी
शाळा बाळाला आवडो
घरी ना तो दडो
तुमच्या धाके ॥३६३॥

पंतोजी रे बाप्पा
नसावा भारी धाक
ओंगणावीण चाक
मोडतसे ॥३६४॥

शाळेचा पंतोजी
मुला वाटे यम
केलासे कायम
कोंडवाडा ॥३६५॥

जा रे बाळा शाळे
घरी नको कटकट
पुरे तुझी वटवट
सांगते मी ॥३६६॥

आई नको शाळा
मला घरीच शीकव
मुळी ना पाठव
शाळेमाजी ॥३६७॥

अडाणी माउली
कसा शिकवील तान्हा
पाठवीते रानावना
तान्हेबाळा ॥३६८॥

अडाणी माउली
कसा देईल ती धडा
रिकामा काय घडा
उपयोगी ॥३६९॥

पंतोजी मारती
हाताला येती फोड
आई तू किती गोड
ममताळू ॥३७०॥

हट्ट नको घेऊ
बाळा शाळेला तू जाई
विद्येला मिळवी
तेची धन ॥३७१॥

हट्ट नको घेऊ
लिहाया घेई पाटी
खिरीची तुला वाटी
तान्हेबाळा ॥३७२॥

हट्ट नको घेऊ
अक्षरे शीक चार
विद्येला मान फार
सभेमध्ये ॥३७३॥

हट्ट नको घेऊ
बाबा मारतील काठी
माय रडेल तुझ्यासाठी
तान्हेबाळा ॥३७४॥

हाती काडीतोडे
कमरेला हिरवा शेला
सखा पंडित शाळे गेला
गोपूबाळ ॥३७५॥

नागिणी सर्पिणी
वाट दे मधुनी
सखा येतो शाळेतूनी
गोपूबाळ ॥३७६॥

आई तू खाऊ देशी
बाबा का मारताती
बाळा तुझ्या बर्‍यासाठी
माय बोले ॥३७७॥

आई तू मुके घेशी
बाबा का बोलताती
पुत्र होवो वाचस्पती
म्हणुनीया ॥३७८॥

आई तू मायेची
बाबा का कठोर
लेकाने व्हावे थोर
म्हणुनीया ॥३७९॥

काय रे झाले बाळा
कोणी रे मारीले
बाप्पाजी गुरगुरले
अंगावर ॥३८०॥

बाप्पाजी भास्कर
माउली चंद्रमा
बाळाला वाटे प्रेमा
माउलीचा ॥३८१॥

बाप्पाजी नारळ
माउली द्राक्षघोस
बाळाला वाटे ओस
आईवीण ॥३८२॥

बाप्पाजी चंदन
घासलीया वास
आईचा सुवास
आपोआप ॥३८३॥

माता जरी मारी
तान्हेयाला कोण
जाईल सुकून
तान्हेबाळ ॥३८४॥

कोमल रोपाला
काय नको पाणी
नको का जननी
तान्हेबाळा ॥३८५॥

माता जरी मारी
बाळाने कोठे जावे
दुःख कोणाला सांगावे
तान्हेयाने ॥३८६॥

माता जरी लोटी
बाळ निराधार
स्नेहसूत्रावीण हार
कोण गुंफी ॥३८७॥

माता धरी दूर
तरी कोण घेई बाळ
त्याची होईल आबाळ
घरीदारी ॥३८८॥

आई तू हवीस
हवीस जन्मोजन्मी
असा अभागी ग कोणी
नको म्हणेल सुधा - उर्मी ॥३८९॥

आई तू हवीस
हवीस जन्मवेरी
सांग कोण कंटाळेल
अमृताच्या गं सागरी ॥३९०॥

आई तू हवीस
कशी पुरेशी होशील
असा कोण ग करंटा
माउलीला कंटाळेल ॥३९१॥

माउली असावी
रानीच्या पाखरांना
चोचीने त्यांना चारा
भरवीते ॥३९२॥

माउली असावी
गोठयाच्या वासराला
अंग चाटायाला
पान्हावोनी ॥३९३॥

माउली असावी
पिलापाखरांना
मुलावासरांना
संसारात ॥३९४॥

फुलांमध्ये फूल
फूल हुंगावे जाईचे
सुख भोगावे आईचे
बाळपणी ॥३९५॥

फुलांमध्ये फूल
फुल हुंगावे चाफ्याचे
सुख भोगावे बापाचे
बाळपणी ॥३९६॥

फूलांमध्ये फूल
फूल शोभते कमळाचे
आईच्या प्रेमाचे
माप नाही ॥३९७॥

गायीचा ही डुबा
गोठणीये उभा
माउलीच्या लोभा
मीत नाही ॥३९८॥

माउलीचे कष्ट
कुठे रे फेडू देवा
तळहाताचा पाळणा
नेत्रीचा केला दिवा ॥३९९॥

बापाचे उपकार
फिटती काशी गेल्या
माउलीचे उपकार
फिटती ना काही केल्या ॥४००॥

माउलीची माया
शेजी करायला गेली
गुळाची गं गोडी
साखरेला नाही आली ॥४०१॥

माउलीची माया
नाही येत आणीकाला
कोवळ्या माणीकाला
रंग बहू ॥४०२॥

धन गं संपदा
आग लागो त्या वस्तेला
माझ्या बाळाच्या गं संगे
उभी राहीन रस्त्याला ॥४०३॥

धन गं संपदा
नाही मला ती लागत
तुझ्या जीवाचे अगत्य
तान्हेबाळा ॥४०४॥

नदी वाहे झुळझुळ
परी पाण्यावीण मासा
जीव माझा तोळामासा
बाळावीण ॥४०५॥

जेथे तान्हेबाळ
तेथे माउलीचा स्वर्ग
तान्हेबाळावीण
कडू वीख सुखभोग ॥४०६॥

देवाच्या देवळात
उभी मी जागत्ये
आयुष्य मागत्ये
तान्हेबाळाला ॥४०७॥

देवाच्या देवळात
करिते मी धावा
पुत्र माझा व्हावा
शतावंत ॥४०८॥

तुळशीच्या पाशी
सांजवात मी लावीते
आयुष्य मागते
तान्हेबाळा ॥४०९॥

अतिथाला अन्न
गायीला देत्ये चारा
आयुष्य लेकराला
देवे द्यावे ॥४१०॥

माउली रागावली
रागात लोभ तीचा
असे गोळा गं पोटीचा
तान्हेबाळ ॥४११॥

माउलीचा मार
त्यात अमृताचा चारा
बाळाच्या कल्याणाच्या
त्यात कोटी कोटी धारा ॥४१२॥

माऊलीचा मार
नसे पंतोजीसारखा
माउली मायेची
असे पंतोजी पारखा ॥४१३॥

समुद्राचे पाणी
अहोरात्र उचंबळे
माउली तळमळे
बाळासाठी ॥४१४॥

समुद्राचे पाणी
अहोरात्र नाचे
तसे चित्त माउलीचे
बाळासाठी ॥४१५॥

समुद्र उचंबळे
होता चंद्राचे दर्शन
माउली गं हेलावते
होता पुत्राचे स्मरण ॥४१६॥

किती ओव्यांमध्ये गाऊ
मी गं माउलीचे ऋण
हे गं कोणा मोजवती
वाळवंटातील कण ॥४१७॥

किती ओव्यांमध्ये गाऊ
माउलीच्या मी गुणांला
या ग सागराच्या लाटा
मोजवतील कुणाला ॥४१८॥

किती ओव्यांमध्ये गाऊ
माउलीच्या मी प्रेमाला
कोण प्रदक्षिणा घाली
आकाशाच्या गं सीमेला ॥४१९॥

माउलीची माया
कुणा गं वर्णवेल
प्रत्यक्ष भागेल
ब्रह्मदेव ॥४२०॥

माउलीची माया
कुणा गं वर्णवेल
पाताळीचाही थकेल
सहस्रफणी ॥४२१॥

अंधारात दिवा
प्राणाला जसी हवा
मातृप्रेमा हवा
तान्हेबाळा ॥४२२॥

आंधळयाला दृष्टी
पांगळयाला काठी पाय
तशी असावी होय माय
तान्हेबाळा ॥४२३॥

पाऊस शेताला
माशाला ते पाणी
तशी असावी जननी
तान्हेबाळा ॥४२४॥

वासराला गाय
पाडसा हरिणी
तशी असावी जननी
तान्हेबाळा ॥४२५॥

भुकेल्याला अन्न
तहानेल्याला पाणी
तान्हेबाळाला जननी
तैशापरी ॥४२६॥

डोंगराचे पाणी
नद्यांना पोसायाला
माउलीचे तसे सारे
तान्हेबाळ वाढायाला ॥४२७॥

देवा रे ईश्वरा
एक गोष्ट आईकावी
आई सावत्र नसावी
तान्हेबाळा ॥४२८॥

सावत्र आईची
प्रीतीही कडू वीख
दृष्टीत बाण तीख
भरलेले ॥४२९॥

सावत्र आईची
प्रीतीही विषारी
काटेच बोचतील
जरी बाभुळ मिठी मारी ॥४३०॥

सावत्र ती आई
तान्हेबाळाची गं सासू
आणील डोळ्या आसू
घडीघडी ॥४३१॥

सावत्र माउली
माउली ती ना मृत्यू
तान्हेबाळाला जप तू
प्रभुराया ॥४३२॥

सावत्र आईची
साऊली न पडावी
नागिणीची भेट
कधीसुद्धा न घडावी ॥४३३॥

सावत्र आईस
छळील तान्हेबाळ
होईल त्याचा काळ
अवदसा ॥४३४॥

सावत्र आईस
संसारीचा शाप
देईल सदा ताप
तान्हेबाळा ॥४३५॥

पेटलेली आग
पेटलेली खाई
तशी सावत्र ती आई
खाष्टनष्ट ॥४३६॥

सख्ख्या गं आईची
गोड लागे मारपीट
सावत्र आईची
कडू साखरेची मूठ ॥४३७॥

सावत्र आईला
आई तरी कशी म्हणू
आईच्या नावाला
आपण त्याने अवगणु ॥४३८॥

माऊली माउली
माउली कामधेनू
माउली गोड वेणू
गोविंदाची ॥४३९॥

माउली माउली
माउली चिंतामणी
बाळाचे जे जे मनी
पुरवीते ॥४४०॥

माउली माउली
कल्पवृक्षाची साउली
तान्हेबाळालागी दिली
देवाजीने ॥४४१॥

माउली माउली
देवा म्हणती साधुसंत
माउलीचा अंत
कोण गाई ॥४४२॥

माउलीची सेवा
कोण आणीक करील
सागराच्या पुढे
कसे थिल्लर राहील ॥४४३॥

देवाच्या मायेची
माउली मूर्ती झाली
बाळासाठी गं रंगली
भवपाशी ॥४४४॥

तान्हेबाळासाठी
माऊली ओव्या म्हणे
या गं माउलीच्यासाठी
कोण करील कवने ॥४४५॥

आई आई अशी
तान्हेबाळ हाक मारी
मिळाली स्तुति सारी
माउलीये ॥४४६॥

माता रागावली
बोले ना एक शब्द
कंठ झालास सदगद
गोपूबाळाचा ॥४४७॥

शेजीला पुसतो
माउली का बोलेना
दुखवीशी तिच्या मना
घडीघडी ॥४४८॥

शेजीला पुसतो
शेजी माय का रुसली
गोष्ट नाही तू ऐकिली
माउलीची ॥४४९॥

शेजी मला सांग
आई प्रेमे कशी घेई
रडत उभा राही
दीनवाणा ॥४५०॥

शेजी मला सांग
कसे आईला हसवावे
जाऊन मांडीवर बसावे
एकाएकी ॥४५१॥

शेजी मला सांग
कसे हसवू माउलीला
धरी जाऊन डोळयाला
तान्हेबाळा ॥४५२॥

शेजी मला सांग
सुखवू कशी माय
जाऊन धरी पाय
दोन्ही हाती ॥४५३॥

शेजी मला सांग
आईचा जावा राग
चरणी तिच्या लाग
भक्तिभावे ॥४५४॥

जेवून आलास
भूक इतुक्यात कशी
आई तुझ्या हातच्या गे
घासावीणे उपवासी ॥४५५॥

जेवून आलास
पंगत होती मोठी
माउली तुझ्यावीण
घास जाईना गे पोटी ॥४५६॥

जेवून आलास
काय होते लाडू वडे
मला नाही आई ठावे
लक्ष होते तुझ्याकडे ॥४५७॥

जेवून आलास
श्लोक कोणता म्हटला
आई तुला आठवून
पूर डोळयाला लोटला ॥४५८॥

आई नको धाडू
कुठे मला जेवायला
माझे ग पोट भरे
तुझ्या पाहून मुखाला ॥४५९॥

आई नको धाडू
कधी परक्याच्या घरी
बये तुझ्या ग हातची
गोड कोरडी भाकरी ॥४६०॥

आई नको धाडू
कधी मला मोठयांकडे
विचारीना तेथे कोणी
मग येते मला रडे ॥४६१॥

जाईच्या फुलासाठी
बाळे फांदी ओळंबीली
देवपूजा खोळंबली
बाप्पाजींची ॥४६२॥

जाईचा मंडप
नको मोडू फांद्या
ऐक राजा रे गोविंदा
तान्हेबाळा ॥४६३॥

फुले वेचूनीया
तान्हेबाळाने आणीली
पूजेसाठी झाली
बाप्पाजींना ॥४६४॥

हट्ट नको घेऊ
सूर्यनाथ डोक्यावर
तू रे राजा सुकुमार
सुकशील ॥४६५॥

हट्ट नको घेऊ
आहे दुपारचे ऊन
जाशील सुकून
तान्हेबाळा ॥४६६॥

हट्ट नको घेऊ
शुभं करोतीला म्हण
होई नीट सुलक्षण
तान्हेबाळा ॥४६७॥

हट्ट नको घेऊ
येईन मी उठाउठी
खाऊ देईन दोन्ही मुठी
भरुनीया ॥४६८॥

पाहुणे घरी आले
सांग त्यांना नाव नीट
नको लाजू होई धीट
तान्हेबाळा ॥४६९॥

पाहुणे घरी आले
श्लोक दाखवी म्हणून
घेतील कौतुकानं
तुला मांडी ॥४७०॥

पाहुणे घरी आले
स्तोत्र म्हण तोंडपाठ
थोपटतील तुझी पाठ
तान्हेबाळा ॥४७१॥

पाहुणे घरी आले
घरी जरा नीट वाग
काम करायला लाग
माउलीचे ॥४७२॥

पाहुणे घरी आले
नको ठेवू देऊ नाव
हीच बाळा एक हाव
माउलीची ॥४७३॥

पाहुणे घरी आले
करितील तुझी स्तुति
अशी करावी हो कृती
तान्हेबाळा ॥४७४॥

पाहुणे आलेले
गेले निघून हो काल
आवडले माझे बाळ
पाहुण्यांना ॥४७५॥

पाहुणे आलेले
गेले निरोप घेऊन
खाऊ हातात देऊन
तान्हेबाळाला ॥४७६॥

पाहुणे आलेले
गेले हो काल रात्री
रुपया दिला हाती
तान्हेबाळाच्या ॥४७७॥

कोण बागुलबोवा
बैसला माये ओटी
काकाजी आले भेटी
तान्हेबाळा ॥४७८॥

मोठया मोठया मिशा
भली मोठी शेंडी
होतसे घाबरगुंडी
तान्हेबाळाची ॥४७९॥

काय रे झाले बाळा
काही नाही घेती मुका
रुतती दाढी मिशा
काकाजींच्या ॥४८०॥

हट्ट नको घेऊ
त्रास नको देऊ
नीट वाग पाहू
तान्हेबाळा ॥४८१॥

सारखी किरकीर
नको करु राजा
फजीतवाडा माझा
होई बाळा ॥४८२॥

टोचून बोलतील
हळवे माझे मन
छळू नको रे रडून
माउलीला ॥४८३॥

मला हौस मोठी
सोन्याच्या जानव्याची
मुंज करा तान्हेयाची
गोपूबाळाची ॥४८४॥

पाच वरसांचा
मुंजीची काय घाई
वाटते सून यावी
मायबाईला ॥४८५॥

मुंजीचा मुहूर्त
मामा पुसतो जोश्याला
चंद्रबळ भाचेयाला
गोपूबाळाला ॥४८६॥

मुंजीचा मुहूर्त
दशमी एकादशी
चंद्रबळ तुझ्या राशी
गोपूबाळा ॥४८७॥

उखळी मुसळ
पोहे कांडायाला
गोपूबाळाचे मुंजीला
आणीयेली ॥४८८॥

भिंती सारवल्या
वर काढिली केरेमोरे
तुझ्या मुंजीची आमंत्रणे
तान्हेबाळा ॥४८९॥

नदीपलीकडे
हिरव्या शालूच्या दोघीजणी
मुंजीची बोलावणी
तान्हेबाळाच्या ॥४९०॥

भिंती सारवून
वर काढावे ताम्हन
तुझ्या मुंजीचे सामान
तान्हेबाळा ॥४९१॥

सोनाराच्या आळी
कशाची ठोकाठोकी
माझ्या ग बाळाच्या
मुंजीची ताटवाटी ॥४९२॥

मुंजा ग मुलाला
मोत्यांच्या मुंडावळी
ओवीते चंद्रावळी
उषाताई ॥४९३॥
 
मुंजीचे लगीन
बापलेका लागे
परके दारी वागे
मायाबाई ॥४९४॥

पिवळया पाटावाची
घडी उकलीते नेस
मातृभोजना तू बैस
उषाताई ॥४९५॥

मातृभोजनाला
पाट मांडीले चोवीस
मातृभोजनाला बैस
उषाताई ॥४९६॥

पहिली भिक्षावळ
आई घालते नारळ
शतायुषी होवो बाळ
माउलीचा ॥४९७॥

पहिली भिक्षावळ
मामा मावशीची
तुझ्या ओंजळीची
गोपूबाळा ॥४९८॥

पहिली भिक्षावळ
माय घालीते बत्तासा
विजयी होई कसा
तान्हेबाळा ॥४९९॥

एके हाती दंड
दुजा हाती झोळी
भिक्षा मागे ब्रह्मचारी
गोपूबाळ ॥५००॥

पिवळा पीतांबर
काठोकाठी ठसे
संध्येच्या वेळी नेसे
तान्हेबाळ ॥५०१॥

गायत्रीचा मंत्र
भटजी पढवीतो
बाळाला रडवीतो
दोन्ही वेळा ॥५०२॥

पाचा वरुषांचा
मुंजा आहे लहान
कडे घेऊन ब्राह्मण
संध्या सांगे ॥५०३॥

पाचा वरुषांचा
मुंजा उभा केला
गायत्री मंत्र दिला
ब्राह्मणाने ॥५०४॥

माझ्या अंगणात
चांदीची कावड
तुला संध्येची आवड
तान्हेबाळा ॥५०५॥

वाढतसे लोक
बापसंगे हिंडे फिरे
बापलेक जसे हिरे
झळाळती ॥५०६॥

एकापुढे एक
चालती बापलेक
समुद्राला आले पीक
मोतीयाचे ॥५०७॥

वाघाचे ग पिलू
वाघासंगे ग रांनात
बापासंगे बसे
तान्हेबाळ दिवाणात ॥५०८॥

माशाचे गं पिलू
माशासंगे गं पाण्यात
बापासंगे बसे
तान्हेबाळ दिवाणात ॥५०९॥

मुली सांगू येती
शाळेसी जाऊनी
तुझे अक्षर पाहुनी
तान्हेबाळा ॥५१०॥

भुलतील कोणी
रुप बाळाचे पाहून
कोणी पाहताती गुण
तान्हेबाळाचे ॥५११॥

रुपगुण दोन्ही
देवाने बाळ दिले
नाही काही कमी केले
देवाजीने ॥५१२॥

एक रे करावे
त्रिभुवननाथा
बाळाच्या असो माथा
हात तुझा ॥५१३॥

रुपगुण आहे
पुरते देवा दे आयुष्य
माझ्या रे तान्हेबाळा
तुझ्या मागते पायांस ॥५१४॥