Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ९

२६

जातींसाठी माती खाते मी लवणाची

बंधुजीची माझ्या उच्चकुळी रावनाची

२७

जातीसाठीं माती, कुळाकारण एवढी लज्जा

तुझ्या नांवाकारणं, बंधुराजा

२८

जोडव्याचा पाय हळु टाकावा मालनी

कंथ बघतो चालणी

२९

जोडव्याचा पाय हळु टाकावा गरतीबाई

सोप्या बैसले ददाभाई

३०

जोडव्याचा पाय टाकावं भरदार

गांव मर्‍हाठी निंदखोर

३१

जोडव्याचा पाय जमिनीसंगं बोले

भरज्वनीची नार चाले

३२

जोडव्याचं पाय कुना नारीनं वाजवीले

नंदी गाडीचे बुजविले

३३

पराय पुरुषाच्या उभं र्‍हाऊं नये साउलीला

बोल येतो माऊलीला

३४

भल्याची मी लेक भलेपणा मिळवीन

पिता दौलतीचं नांव कारंडी वागवीन

३५

गरतीमधें बसे मी गरतीच्या वजनाची

बहीण भल्या सजणाची

३६

गरतीमधें बसे, गरततीवानी माझं चित्त

बया गवळनीनं शिकवल्याचं झालं हीत

३७

माय म्हनिते, लेकी नांदुन व्हावं खरं

वडील बाप्पाजीचं नांव हाई दूरवर

३८

पराया पुरुषाशी बोलायाचं काम काई ?

जन खडा टाकुनी अंत पाही

३९

भरताराची खूण डाव्या डोळ्याच्या तराटणी

भुज झाकावी मराठणी

४०

काळ्या चोळीवरी राघु काढाया जीव भीतो

बंधु रागीट शिव्या देतो

४१

वाटंवरला वाडा आल्यागेल्याची नंदर

बंधुजी बोले, बहिणी संभाळ पदर

४२

हासूं नको नारी हसनं कोन्या परकाराचं ?

उतरले पानी तुझ्या चातुर भरताराचं

४३

हांसूं नको नारी हंशाचा भ्रम मोठा

आपुला अस्तुरीच जल्म खोटा

४४

हांसूं नको नारी, हंशाची व्हईल थट्टा

भरल्या सभेमंदी भरतारा लागेल बट्टा

४५

हसूं नको नारी हंसनं न्हवं ते कामाचं

पानी जाईल तुझ्या रामाचं

४६

हंसू नको नारी हंसनं न्हवं ते परीचं

पानी जाईल थोराघरीचं

४७

पराया पुरूषाची नको साउली माझ्या दारी

मावळण आत्याबाई तुळशीबरोबरी

४८

चंदनासारिखा देह घातिला करवती

बाप्पाजी तुमच्या नांवासाठी