संग्रह ५
१
अहेवाचं लेनं, हात भरूनी कांकनं
हळदवरी कुकु कपाळ दिसे छान
२
धनसंपदेच नको देवाला घालूं कोडं
हळदकुकवाच राज असावं येवढं
३
शेरभर सोनं नार ठेविते ठेवणीला
हळदीवर कुकु, झाड कुरूचं लावणीला
४
राजमंदी राज अखंड भरताराचं
भरल्या बाजारी उंच दुकान अत्ताराचं
५
लाल पिंजरीचं कुकु अत्तारा घाल जोखी
आम्ही ल्यायाच्या मायलेकी
६
पंढरीचं कुकु सोनं म्हनुन साठवीलं
बया गौळनीन, लेनं म्हनुन पाठवीलं
७
तिन्हीसांजा झाल्या लक्ष्मी आली वाडया
हळदीकुकवाच्या तिला घालते पायघडया
८
पंढरीचं कुकु धडयानं येतं लई
वाटा घ्याया भावजई
९
पंढरीचं कुकु घ्याग बायांनो बोटबोट
जावानंदांचा मेळा दाट
१०
उगवला नारायेन, काय मागु त्याच्यापाशी
हळदकुकवाच्या राशी
११
शेजी लेनं लेती पाच पुतळ्या कवा मवां
कपाळीचं कुकु नित दागिना माझा नवा
१२
शेरभर सोनं, शेजी झाकुन घेते गळा
कपाळीचं कुकु माझा उघडा पानमळा
१३
सासुसासरा माझी खजिन्याची पेटी
कुकवाचा पुडा जतन केला माझ्यासाठी
१४
सवाशिनीचं लेनं हात भरून बांगडया
हळदीवर कुकु कानामंदी बुगडया
१५
अहेवाचं लेनं मनी डोरलं साजाचं
लेन कथाच्या राजाचं
१६
सोन्याची गरसोळी हौस नारीच्या मनाची
काळी गरसोळी अहेवपनाची
१७
डोरल्याचं सोनं र्हाईलं रानामंदी
जतन कर शंभुदेवा बेलाच्या पानामंदी
१८
कुकवाचं बोट ओढिते रासवट
हाई संचित माझं नीट
१९
एका करंडीचं कुकु लेत्यात सासुसुना
असं भाग्य न्हाई कुना
२०
सम्रताच्या नारी, डाव्या बाजूनं माझ्या चाल
तुझ्या चितांगाचं मोल, कुकवाला दिलं काल
२१
देवा नारायना, मागनं मागु काई
कुकु करंडी घाल लई
२२
माझा नमस्कार गिरीच्या व्यंकोबाला
आउख मागते कुकवाला
२३
देरे देवा मला हळद पुरती
लालकुकु निढळावरती
२४
देवीच्या दरसनाला जीव झाला येडा
जल्मभरी लावाया, तिन दिला कुकवाचा पुडा