Get it on Google Play
Download on the App Store

सत्यभामाव्रत - अभंग ३४०९

३४०९.

कृष्ण सर्वागीं सुंदर । लावण्य गुण रत्नाकर । सत्यभामा म्हणे हा वर । जन्मोजन्मीं पावावा ॥१॥

ऎसें विचारितां मनीं । तंव पातले नारदमुनी । चरणां लागली धांवोनी । वरासनीं बैसविलें ॥२॥

ऎका विनोद कथा विचित्र । नारद सत्यभामेसी सांगत । दान दिधलिया कृष्णनाथ । सोडवूं आतां ते नेणें ॥३॥

करुनि षोडशोपचारें पूजा । मग म्हणे जी योगिराजा । तुम्हांसारिखा न देख दुजा । परियेसी माझा निर्धारु ॥४॥

मज मनीं ऎसा भावो । जन्मोंजन्मीं कृष्ण नाहो । पावावया सुगम उपावो । व्रतें तपें कीं दानें ॥५॥

ऎकोनि हांसे नारदमुनी । म्हणे हें नाही मिनली कृष्ण मिळणी । म्हणोनि जन्मजन्मांतर सोसणी । विषयबुध्दि करीतसे ॥६॥

पाहूनि अधिकाराचा भेदु । तैसाचि उपदेश करिती साधु । इचा झडे गर्व मदु । तैसा विनोद करुं आजी ॥७॥

म्हणती दिधल्यावांचून नाहीं पावणें । ऎसी बोलती पुराणें । येविषयीं स्मृतिवचनें । पूर्वदत्तें पाविजे ॥८॥

जरी हा कृष्ण दानासी देसी । तरी जन्मोजन्मी पावसी । हे जरी मानेल मानसीं । तरी कृष्ण दानासी तूं देई ॥९॥

सत्यभामा म्हणे कृष्णासी । तुम्हासीं देईन दानासी । हें जरी मानेल मानसीं । तरी आज्ञा मज द्यावी ॥१०॥

ऎकोनि हासिन्नले देवो । म्हणे नारदें विंदान मांडिलें पहा हो । जाणोनि तियेचा अभिप्रावो । धन्य भावो प्रिये तुझा ॥११॥

म्हणे तुझी प्रिति मज बहु । तुज मनीं जैसा जिऊ । तुज तैसा भाऊ । भीमकी पैं नाहीं ॥१२॥

दाना न करी वो उशीरु । आजिचा पर्वकाळ थोरु । शुध्द सप्तमी रविवारु । मकरीं सूर्यो गुरुयुक्त ॥१३॥

सत्यभामा म्हणे ब्राम्हणासी । तुम्हांसी कृष्ण देईन दानासी । ते म्हणती गिळील अनुष्ठानासी । ध्येय ध्यानासी उच्छेदु ॥१४॥

जेणें हिरोनी परात्पर नोवरी । येणें घातली निजमंदिरीं । अहं मामा जीवें मारी । अकर्मे करी हा कृष्ण ॥१५॥

आम्ही भिक्षुक ब्राम्हण । कृष्णासी पाहिजे मिष्टान्न । कैंचें पीतांबर परिधान । आम्ही तयासी पुरवावें ॥१६॥

तो सदाचा परदारीं । कर्मे तितुकीं अकर्मे करी । विटाळ न व्हावा य़ाचा घरीं । आम्हां सोंवळें स्वयंपाका ॥१७।

सत्यभामा म्हणे नारदासी । ब्राम्हण दान न घेती कृष्णासी । काय करुं वो देवऋषी । तूं दानासी अंगिकारीं ॥१८॥

म्हणवुनी धरिले दोनी चरण । कृष्णदासासी तूं पात्र धन्य । आजीचें मानावें वचन । व्रत जेणें परिपूर्ण होय ॥१९॥

नारद म्हणे भले आतां । व्रते तपेंविण कृष्णा ये हातां । कवण सरे मागुता । कर्मकरंटा कर्मिष्ठु ॥२०॥

सेवकापदीं स्वामी ठावो । सेवेचा सेवक होईल देवो । न कळे दोहींचा अभिप्रावो । येरी लवलाहो दानाचा ॥२१॥

सत्यभामेनें श्रीकृष्ण । आणिला सालंकृत श्रुंगारुन । आपुलेनि पल्लवें झांकून । नारदा करीं देतसे ॥२२॥

येरी म्हणे प्रतिग्रहिताम । प्रतिगृण्हामि नारद म्हणतां । नमामि म्हणोनि कृष्णनाथा । मग संकल्पें घातला ॥२३॥

नारद म्हणे रे कृष्णा । बोध बांधुनी घेईं ब्रम्हाविणा । तुटों नेदी मुळींच्या खुणा । जिवींचा जिव्हाळा राखावा ॥२४॥

पैल माझिया सिध्द पादुका । सावधानें जवळी घे कां । येरे वंदिलिया मस्तका । ब्राम्हणाच्या म्हणवुनी ॥२५॥

अरे हे देवपूजा घेऊनि खांदीं । माझी बांधोनियां त्रिशुध्दी । बोधें बांधिनियां बुध्दी । अलिप्तपणीं वागवावी ॥२६॥

ओंवळेपणें नातळें क्षिती । विटाल न व्हावा महाभूतीं । पाउला पाउलीं आत्मस्थिती । देव निगुती आणावो ॥२७॥

पुढें चालिला नारद । मागें मागें गोविंद । येरु म्हणे कां रे मंदमंद । गृहसंबंध न सुटे ॥२८॥

नेणसी वैराग्याची ओढी । सांडीं स्त्रीपुत्राची गोडी । देहगेहाची आवडी । ते खोडी मज नावडे ॥२९॥

नारद म्हणे रे कृष्णा । शौचविधिसी उदक आणा । मृतिका अवलोकुनी नयना । जीवेंविण आणावी ॥३०॥

येरु म्हणे न दिसे जीऊपद । अवघे भूमंडळीची शुध्द । कोपेंविण कोपला नारद । वेद विरोध बोलतसे ॥३१॥

अरे हे ब्रह्मीं ब्रह्माचर्याची कसोटी । जीवा जीवनें प्रक्षाळिलीं गोमटी । सोंवळें पाहोनियां दृष्टी । वरी वाळे घालावी ॥३२॥

येरु म्हणे न दिसे वोवळे । अवघे त्रिभुवनचि सोंवळें । विकल्प कल्पना विटाळें । शुध्दासी मळ म्हणताती ॥३३॥

कृष्णें केलें नारदाचे चरणक्षालन । तें तीर्थ मुखीं मस्तकीं वंदून । ह्रदयी धरिलें आलिंगून श्रीवत्सलांछनाहुनी आध ॥३४॥

कृष्णें तीर्थाचे केलें वंदन । कृक्ष्णतीर्थाचें जन्मस्थान । तोही करी ब्राम्हणपूजन । धरा अमर पूजी जे ॥३५॥

कृष्ण चुरी नारदाचे चरण । म्हणे मी आजी धन्य धन्य । तुम्हांसी दिधलें दान । परम पावन मी झालों ॥३६॥

अलक्ष दोघांचें महिमान । कवण स्वामी सेवक कोण ब्रम्हांदिकां न कळे जाण । विस्मित जन द्वारकेचे ॥३७॥

जन म्हणती हा नारद जाण । आम्हां देखतां वंदी श्रीकृष्ण चरण । त्यास हाता आलिया कृष्ण । येणें माणुसपणा सांडियेलें ॥३८॥

नीच सेवकाची गती । सेवा घेतो कृष्ण हातीं । बाईलेच्या भिडा श्रीपती । नारदहातीं सांपडला ॥३९॥

नारद कृष्णासी नेतां दुरी । सत्यभामा रुदन करी । अंतरलें श्रीहरी । जन्मांतरीं कोण पावे ॥४०॥

नारदें ठकिलें ठकिलें गे फ़ुडी । मजचि बुध्दि ठाकी कुडी । युगासमान जातसे घडी । अति चरफ़डी मीन जैसी ॥४१॥

सत्यभामेच्या मंदिरीं । मिळाल्या सोळा सहस्त्र नारी । भली प्रवर्तली सवती मत्सरी । आपणया आपण नाडियेलें ॥४२॥

नाक कापुनी आपुलें । वैरियां अपशकुन केलें । तें तुवां साच दाविलें । दाना दिधले निजपती ॥४३॥

मग बोलली नागर जयंती । तुवां आस्वली आणिली आम्हां भोंवती । अवघिया श्रेष्ठ जांबुवंती । जाली सवती तुझेनी ॥४४॥

कृष्णाअंगीं लागली चोरी । सामास घातला विवरीं । आस्वला वरपडा केला श्रीहरी । पूर्व वोळखी वांचला ॥४५॥

तंव बोलली मित्रवृंदा । तुझी दुष्टबुध्दी गे सदा । भोगणें सांडूनियां परमानंदा । आजन्मांतर पर इच्छिसी ॥४६॥

अहंभावें सोहं धरणी । तुवां भांडविला सारंगपाणी । कृष्ण पडिला विकल्पा बाणीं । कुडी तूं धरणी लोळसी ॥४७॥

आम्ही सदाच्या समभाग । तेणें उमजला श्रीरंग । भेदुनी अहंभावाचे अंग । वरासनीं श्रीकृष्ण ॥४८॥

तेणें परिणल्या अनंत शक्ती । सोळा सहस्त्र आणिल्या सवती । हें तंव तुझीच ख्याती । न लाजसी चित्तीं निर्लज्जे ॥४९॥

मग बोलिली लक्षुमणा । थोर भुलली गे देहाच्या बरवेपणा । केली जन्मांतर तृष्णा । ते तंव कृष्णासी नावडे ॥५०॥

आजन्म न जन्मे श्रीहरी । कैंचा पावसी जन्मांतरी । नाडलीस दोहोंपरी । येथें न तेथेंसें जालें तुज ॥५१॥

तंव बोलिली कालिंदी । तुझी दृष्टी गे देहबुध्दी । कृष्ण परमात्मा त्रिशुध्दी । मन बुध्दि नातळे ॥५२॥

त्यासी तूं गे निजकल्पना । आणूं पहासी जन्मबंधना । तुझी तुज गे फ़ळली वासना । दुष्ट बुध्दी ॥५३॥

हांसोनी बोलिली जांबुवंती । जैसी घटामाजीं गभस्ती । असोनि अलिप्त चित्तीं । तैसा श्रीपती विषयासी ॥५४॥

भोग भोगुनी अभोक्ता । कर्म करुनी अकर्ता । त्यासी कैंची जन्मकथा । कृष्ण सर्वथा अजन्म ॥५५॥

हा साक्षात्कार ब्रह्म जाण । चिन्मात्रैक चैतन्यघन । त्यासी तूं माणूस म्हणसी कृष्ण । कुडी कल्पना हे तुझी ॥५६॥

ज्यासी जैसी गे भावना । त्यासी फ़ळे वासना । तुझी तुज भोंवे कल्पना । निजबंधना भवमूळ ॥५७॥

मग बोले सुभद्रा । तुवां कलंक लाविला कृष्णचंद्रा । तुझी बुडाली ज्ञानमुद्रा । जन्मसमुद्रा पडलीसी ॥५८॥

कृष्ण सबाह्य परिपूर्ण । चिन्मात्रैक चैतन्यघन । तयासी कैसें जन्ममरण । जीवा जीवन श्रीकृष्ण ॥५९॥

तेथें पावली देवकी । म्हणे ज्ञानमुढे सत्राजिताचे लेकी । म्यां नवमास वाहिली कीं । तूं दानासी स्वामिनी ॥६०॥

तुझेनि बापें घातला आळ । विवरी सूदला माझा बाळ । रीसा वरपडा गोपाळ । निजभाग्यें वांचला ॥६१॥

तुझेनि बापें तुज वर । केला सत्यभामा निर्धार । तूं दाटुनी निघालीस घर । मणी आंदणा म्हणवुनी ॥६२॥

त्या मणियाच्या लोभें जाणा । तुझा बाप मुकला प्राणा । तुवां मारिलें सत्यभामा । आणि पळविला अक्रुर ॥६३॥

जैं आणविले हनुमंता । ते तुज म्हणीतले होये सीता । नानावेष आणितां । परि सर्वथा नव्हेसी ॥६४॥

लाजा झालीस काळमुखी । तंव पाचारिली भीमकी । वचनमात्रें झाली जानकी । रामरुपीं आरुप ॥६५॥

थितें अंतरलें कृष्णसुख । सत्यभामा अधोमुख । मरमर करिती सकळही लोक । तेणें दु:ख दुणावें ॥६६॥

जैसी कां चोराची माये । धाय मोकलोनी रडो न लाहे । तैशीच दशा होत आहे । आंतचे आंत चरफ़डी ॥६७॥

हें ऎकोनी कोपला । बळिभद्र जाणा । म्हणे वारु पालानारे पालाना । घाव घातला निशाणा । धांवे धांवण्या बंधूच्या ॥६८॥

कृष्ण पदांकिता वाट । लागे मागे लगबग सुभट । अश्व राजांचे पैं थाट । घडघडाट पैं रथांचे ॥६९॥

आम्ही म्हणों ब्रह्मनिष्ठा नारद । हा तंव विश्वासघातमी मैंद । आमुचा मुगुटमणि गोविंद । ठकवूनियां नेतसे ॥७०॥

कृष्ण सांगे नारदापुढें । कोपें बलिदेव पातले गाढे । ज्येष्ठपणें दडती पुढें । म्यां कवणीकडे पळावें ॥७१॥

नारद म्हणे कृष्णासी । तूं स्त्री ना पुरुष होसी । शेखीं नपुंसक नव्हेसी । भवभयासी भिसी तूं ॥७२॥

ऎसाचि तूं सदा भ्याडू । जरासंध युध्दीं काढिला मोडू । काळयवना भेणें आडू । मुदकुंदाचे रिघालासी ॥७३॥

कृष्ण कांपतसे गदगदां । नारद हांसे खदखदां । सेवक बळेंविण गोविंदा । नामरुप तुज नाहीं ॥७४॥

अवघीं आपुलाची जाणसी । आपण आपणीया कां भिसी । तूं राहे माझे पाठीसी । मी कळिकाळासी पैं जाणें ॥७५॥

नारद म्हणे यादवांसी । अभिमान धरावा देवासी । ते आपण या दिधलें दानासी । संबध तुम्हांसी पैं नाहीं ॥७६॥

देउनी मागुती घेसी दानाती । ते तंव होती रवरवासी । तेथोनी निर्गती नाहीं त्यासी । जेवीं आचळ पां धर ॥७७॥

कृष्ण मर दिधला दाना । हें काय समस्त नेणां । छळणोक्ति करतां ब्राम्हणा । कुलक्षयो पावाल ॥७८॥

जारे पुसा सत्यभामेसी । प्रत्यक्षासी साक्ष या कृष्णासी । ठकऊनि नेईल यादवांसी । तरी दंडासी पैं लाभें ॥७९॥

तेथें पातले वसुदेव उग्रसेन । समस्त यादव मिळोन । धरिले नारदाचे चरण । जीवदान द्यावें आम्हां ॥८०॥

कृष्णाच्या पालटासी । जें मागाल तें देवऋषी । तें देउनी पदार्थासी । परीं कृष्णासी सोडावे ॥८१॥

नारद म्हणे मज म्हातारपण । म्हणऊन कृष्ण घेतला दान । एकलिया न करवे गमन । हा सांगाती जीवाचा ॥८२॥

एक म्हणे ती देऊं साठा । नारद म्हणे तो काय करंटा । चालों नेणें आमुचिया वाटा । फ़ुकट पोटा कोण घाली ॥८३॥

आमुच्या चालीं कृष्णासी चालणें । आमुच्या कर्मकर्तव्यपणें । आमुच्या गुणें होय सगुणें । धर्मसंरक्षण श्रीकृष्ण ॥८४॥

पाहतां श्रीकृष्णाचें मुख । फ़िकें होय समाधिसुख । स्वप्नीं न देखीजे दु:ख । हरीखें हरीखें कोंदाटे ॥८५॥

ऎसी कृष्णाची आस केली मोठी । म्हणोनि जीवेंभावें घातली मिठी । तुम्ही आम्हां भोंवतें शेवटीं । दिधलें दान मागतसां ॥८६॥

जळो जळो हें आमुचें दु:ख । आशा सांडिली नि:शेष । तुम्हांसी तंव द्यावें दु:ख । अज्ञान मूर्ख म्हणाल ॥८७॥

कृष्णाच्या पालटासी । कवण मागों पदार्थेंसी । जें जें उचित मानेल तुम्हांसी । शुध्द वस्तु मज द्यावी ॥८८॥

श्रीकृष्ण पालट सीमंतमणी । नेघों म्हणती नारदमुनी । होईल सत्राजिताचे वानी । देहघातनीं पैं लाभे ॥८९॥

जितुकें केलें कृष्णाचें तुक । तितुकें देऊनि कनक । नारद म्हणे आवश्यक । किती आग्रह करावा ॥९०॥

तुला उभविली झडझडा । कृष्ण दिधला दाना । तरी मी सोडवीन जाणा । मज मर्यादा नाहीं धना । मणी आंदणा बापाचा ॥९२॥

कृष्ण सोडवीन अभिमानेसी । म्हणवुनी घाली कनकरासी । कृष्ण न तुके अहंकारासी । लगड मासी तैसें सोनें ॥९३॥

नि:शेष सोनें सरलिया देखा । सत्यभामा अधोमुखा । तंव उठलिया यदुनायका । सोळा सळस्त्र सहमेळी ॥९४॥

कृष्ण सोडवावा आपण । उपरा उपरी घालिती सुवर्ण । धनासमान नाहीं कृष्ण । नाहीं होणें कल्पांती ॥९५॥

गजामुखीं जैसी राई । तैसें सोनें झालें पाही । गोपिका म्हणती अगे आई । आतां काई घालावें ॥९६॥

विशेष द्रव्य वेंचिलियावरी । लाजलिया सोळासहस्त्र नारी । धनवंता नातुडे श्रीहरी । सखा हरी दीनाचा ॥९७॥

घातलें द्वारकेचें भांडार । कुमरा कुमरीचे अळंकार । सकळ सुनांचें श्रुंगार । तुला भार तरी नव्हेचि ॥९८॥

नगर नागरिक लोक । देती आपुलालें कनक । द्वारका निर्धन केली देख । तुळा जोख तर्‍ही नव्हे ॥९९॥

मोहें पातली देवकी । माझा बाळ मीच सोडवी निकी । म्हणवुनी वरुषली कनकी । वसुदेवा अच्युत ॥१००॥

मोहें घातलें कनक । मोहासमान नव्हे कृष्णतुक । मेरुपुढें जेवीं मशक । तैसें कनक होउनी ठेलें ॥१॥

रुपें तांबें पितळ । सिसे कांसे वाटोळ । धातु घातलिया सकळ । तुळा आढळ तें न ढळे ॥२॥

कृष्ण स्थूळ सूक्ष न अचाट । सर्व सर्वांगीं निघोट । मेरुपरिस घनदाट । धराधरु बैसलासे ॥३॥

वस्त्रें भूषणें याची फ़ेडा । काहीं भार होईल थोडा । एक म्हणती कृष्णाचि कुडा । येणें वेडा लावियेलें ॥४॥

भोळी सत्यभामा बापुडी । नारदें बुध्दि दिधली कुडी । कृष्ण अनुमोदनी फ़ुडी । आपणा दान देवविलें ॥५॥

एक ठक एक महाठक । ठकिले द्वारकेचे लोक । तरी न सुटे यदुनायक । तुळा तुक अपुरें ॥६॥

रत्नप्रवाळें मुक्ताफ़ळें । तुका घातलें सकळें । नारदें केलें वाटोळें । तरी गोपाळ न सुटे ॥७॥

नुचलें कृष्णाचें पारडें । धाये मोकलूनि देवकी रडे । वैरीण सत्यभामेनें केलें कुडें । उपाव पुढें दिसेना ॥८॥

मागें देखिलें ना ऎकिलें । तें तुवां दान इया केलें । भ्रतारासी दान दिधलें । ना ऎकिलें पुराणीं ॥९॥

देवकी धरी नारदाचे चरण । म्हणे मज दे गा पुत्रदान । नाहीं वालभरी सुवर्ण । तुझी आण वहातसें ११०॥

नारद म्हणे भीमकीपासीं । आहेत कनकाच्या राशी । वेगीं बोलावा तियेसी । ते कृष्णासी सोडवील ॥११॥

सत्य जनीं जनार्दन । सकळासी मानलें हें वचन । भीमकीचें शुध्द पुण्य । कृष्न सोडवण ते करील ॥१२॥

उध्दव पाठविला भीमकीपाशीं । साष्टांग नमन केलें तियेसी । मग सांगे वृत्तांतासी । येरी मानसीं हासिन्नली ॥१३॥

सपर्वत समूळ धरा । न पुरे कृष्णाचिया भारा । नारद लाघवी खरा । गर्व परिहारा यादवांच्या ॥१४॥

दोघांनाही दोन्हीपण । नारद तोचि नारायण । कवण जाणें हें विंदान । विचित्र खूण दोघांची ॥१५॥

मग जाऊनि वृंदावना । केली तुळसीस प्रदक्षिणा । पक्वदळ घेतलें जाणा । अपक्व तुका पैं न ये ॥१६॥

तें घालुनी कनक ताटीं । वरी झांकुनी क्षीरोदक दुटी । निजात्मभावें गोरटी । चरित्र दृष्टी पाहूं आली ॥१७॥

केलें नारदासी नमन । घेतलें चरणतीर्थ प्रार्थून । मग षोडशोपचारीं पूजा करोन । जवळी पैं आली ॥१८॥

भिन्नभावें भजे देवासी । गंगा तळपे सागरीं जैसी । निजभावें कृष्णचरणांसी । तुळा तुळसी ठेविलें ॥१९॥

भावार्थाचे बळ गाढें । उचललें कृष्णाचे पारडें । सुवर्ण अधिक जालें पुढें । तें काढिती लवलाहे ॥१२०॥

भीमकी भावार्थाची देख । तुळसीदळ एकलें एक । देवासमान झालें तुक । पडिलें ठक सुरनरां ॥२१॥

भावार्थ विकला देव । अर्थासी या नाहीं संदेह । जयासी जैसा भाव । तैसा देव तयासी ॥२२॥

केवळ तुळसी़च्या दळीं । सोडविला वनमाळी । धन्य धन्य भीमकबाळी । पिटली टाळी एकदांची ॥२३॥

ऎका भावार्थाचा भावो । भावें सोडविला देवो । भावार्थीं संदेहो । अगम्य भावो भीमकीचा ॥२४॥

कृष्ण देव तैं हे देवता । कृष्ण राम तैं हे सीता । कृष्ण वसंत तैं हे सुगंधता । सर्वांगीं समरस ॥२५॥

कृष्ण मंत्र हे मातृका । कृष्ण देव हे वेदिका । कृष्णयज्ञ हे यज्ञसीखा । अनन्यपणें दोघे ॥२६॥

कृष्ण पुरुष हे प्रकृति । कृष्ण चैतन्य हे चितशक्ती । कृष्ण परमात्मा हे परमज्योती । अनन्य स्थिती दोघांची ॥२७॥

कृष्ण ज्ञेय तैं तें ज्ञान । कृष्ण ध्येय तैं तें ध्यान । कृष्ण साध्य तैं हें साधन । अनन्यपणें पतिव्रता ॥२८॥

सुवर्ण अधिक जालें जोखुनी काढूनि टाकिलें धरणीं । कर पदक कंकणीं । नाना अलंकार स्त्रियांचे ॥२९॥

तेथें मीनलिया नारी । जैशा आमिषालागी घारी । झोंबताती परस्परीं । माझें तुझें म्हणउनी ॥३०॥

एकी म्हणती माझा चुडा । दुजी म्हणे ओळख फ़ुडा । तिजी म्हणे याचा जोडा । पाहें माझा मजपाशीं ॥३१॥

एकी म्हणती गे फ़ळगट । तेझें कांखेचें माझें ताट । तिजी म्हणे संपुष्ट । माझें आंदण बापाचें ॥३२॥

एकी म्हणे हें माझें कारलें । दुजी म्हणे ही खेंकीं सीजलें । तिजी म्हणे डोळां दांतवण नाहीं केले । बुरसा स्वार्थ इचा घाण तो ॥३३॥

येरी म्हणे गे मोठी चोखाट । सलोभ ईष्टा माखले ओठ । बोल घाणताही मठ । सांडी खटपट देई माझे ॥३४॥

एकी म्हणती माझी जडीत जाळी राखडीसी । दुजी म्हणे डोळ्यांची आंबली पुसी ।

तिजी म्हणे नयनीं विटाळसी जालासी । जालासी रजकीं न लाविसी विटाळ ॥३५॥

येरी म्हणे कटाकटा मठ । म्हणो ये आंबट । किती करशील खटपट । माझा वांटा नीट देई ॥३६॥

येरी म्हणे माझें पदक । दुजी म्हणे वोजी वोळख । तिजी म्हणे जीवा सुख । बोलोन कां करिसी ॥३७॥

अगे हे माझे हातसर । दुजी म्हणे परती सर । तिजी म्हणे मरमर । ते अलंकार पैं माझे ॥३८॥

एकी म्हणे तें हें माझेचि रुपें । कृष्ण घडिले हे सोपे । दुजी म्हणे माझेनि बापें । मज आंद्ण दिधलें ॥३९॥

तुझे हातींची माझी झारी । तुझा गळाची माझी सरी । फ़ुकटा चावटा बेरी । तेल्या घरीं घाण्याची ॥१४०॥

सुनेस म्हणे देवकी । अगे अगे ओढाळाचे लेंकी । ते अलंकार माझे कीं । तूं कैसेनी नेतेसी ॥४१॥

येरी म्हणे मा मिसें । तुम्हांसी लागलें धनपिसें । म्हतारपणें घेतलीत सोसें । माझें माझें म्हणतसां ॥४२॥

यापरी जन विगुंतले सुवर्णा । रुक्मिणी घेउनी गेली कृष्णा । बाप धनलोभाची तृष्णा । निजपति कृष्णा विसरल्या ॥४३॥

मोह रचिला विधातेनी । कनक आणि कामिनी । जी विन्मुख यापासुनी । तोचि जनीं जनार्दन ॥४४॥

नारदें नमस्कारिली ती भीमकी । म्हणे कृष्ण अनुभवीं तूंचि एकी । भली उतरलीस तुकीं । परम सुखी मी झालों ॥४५॥

दोघां केली प्रदक्षिणा । नमस्कारुनी कृष्णचरणा । मग वाहुनी ब्रम्हवीणा । ऊर्ध्व पंथ चालविला ॥४६॥

ऎसी कृष्णलीला विचित्र । महा पातकीयां करी पवित्र । जे आवडी गाती कृष्णचरित्र । धन्य धन्य जीवित्व तयांचें ॥४७॥

एका जनार्दनी नमन । संकल्पेंसी केलें दान । तेणें निरसिलें मीतूंपण । कथाकीर्तन तो सेवी ॥१४८॥

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा

Shivam
Chapters
दशावतार - अभंग ३३४४ ते ३३६४ एकादशीमहात्म्य - अभंग ३३६५ रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४ तुळशीमहात्म्य - अभंग ३३९५ ते ३४०८ सत्यभामाव्रत - अभंग ३४०९ श्रीदत्तात्रेयजन्म - अभंग ३४१० हनुमानजन्म - अभंग ३४११ ते ३४१३ प्रल्हादचरित्र - अभंग ३४१४ ते ३४३० ध्रुवचरित्र - अभंग ३४३१ ते ३४४३ उपमन्युकथा - अभंग ३४४४ ते ३४५१ सुदामचरित्र - अभंग ३४५२ ते ३४७४ संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९ पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८० काशीमहिमा - अभंग ३४८१ रामरावणाची एकरुपता - अभंग ३४८२ ते ३४८३ सीता-मंदोदरींची एकरुपता - अभंग ३४८४ शिवशक्ति विवाह - अभंग ३४८५ गंगा गौरी कलह - अभंग ३४८६ रुक्मिणीस्वयंवर हळदुली - अभंग ३४८७