Android app on Google Play

 

प्रवाहावेगळा 'पी.के.'

 

'पीके' हा सिनेमा त्याच्या नावापासूनच चर्चेत राहिला. सिनेमाच्या नावातच थोडासा वेगळेपणा होता आणि त्यासोबत सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी करणार होते. आमिर आणि थ्री इडियट्सचा दिग्दर्शक पुन्हा एकत्र म्हणजे दुग्धशर्करा योगच...! पहिल्या मोशन पोस्टर पासूनच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात होता तो अगदी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तर हा वाद चांगलाच चिघळला. पहिला वाद झाला होता तो, स्वयंघोषित 'समाजरक्षक' यांच्याकडून आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यावर हा वाद चिघळला (स्वयंघोषित) हिंदूरक्षकांकडून. तर नक्की काय होतं या सिनेमा मध्ये, हेच आपण थोडक्यात पाहू.

आमिर खानने सिनेमामधील एन्ट्रीसाठी नग्न होणे पसंत केले. त्याच्या हातातील रेडियोने कमरेखालचा भाग झाकलेल्या नग्न पोस्टरवर याअगोदरच समाजसंरक्षकांनी तोंड भरुन टिका केली होती. अगदी काही आमिरद्वेष्टे त्याची तुलना पुनम पांडे आणि सनी लियोनेशी करुन देखील मोकळे झाले होते परंतु सिनेमाची गरज असल्याशिवाय आमिर खान पुर्णपणे नग्न होण्याचा टोकाचा निर्णय घेणार नाही. फक्त दुस-या ग्रहावरील लोक कपडे वापरत नाहीत हे दाखवण्याकरता आमिरला नग्न व्हायची काय गरज...? परग्रहातील लोक अंतराळयानाचा शोध लावत असतील तर त्यांना कपड्यांचा शोध लागु नये, हे कुठेतरी तार्किकद्रुष्ट्या मनाला पटत नव्हते. सिनेमाभर वावरताना पीकेचा दिसलेला भाबडेपणा आणि या नग्नतेचा काही संबंध असेल का...? पीके ज्या ग्रहावरून पृथ्वीवर आला होता त्या ग्रहातील लोकांची कोणतीही भाषा नव्हती. समोरच्या व्यक्तीचा हात हातात घेऊन ते त्या व्यक्तीच्या मनाचा कांगोवा घेत असत. त्यांच्यात कोणत्याही बाबतीत लपवाछपावी, खोटारडेपणा अशा गोष्टी होत नसत. थोडक्यात त्यांच्या दैनदिन व्यवहारामध्ये नागडेपणा होता. लहान मुल हे नग्न असत आणि ती नग्नता आपल्यापैकी कोणालाच अश्लीलता वाटत नाही कारण त्या लहान मुलाला आपण भाबडं समजत असतो. लहान मुलालाही त्याचे वर्तन चुकीचे वाटत नाही कारण तोपर्यँत त्याचा 'लज्जा' या शब्दाशी परिचय झालेला नसतो. समाजात वाढु लागल्यावर, दुनियादारीशी संपर्क आल्यानंतर, जेव्हा 'लज्जा' या शब्दाचा अर्थ त्या लहान मुलास कळु लागतो तेव्हा ते केवळ लज्जारक्षणाखातर कपडे परिधान करते. त्याच वेळी त्याच्यातील भाबडेपणा संपलेला असतो. त्यामुळे मनातुन भाबडे असलेले (म्हणजेच मनाचा नागडेपणा असलेले) पीके जेवढ्या जास्त संख्येने निर्माण होतील, तेवढ्या जास्त प्रमाणात आपला समाज निकोप जीवन जगण्यास प्रगल्भ होईल, असेच काहीसे आमिरला सुचवायचे असेल.

गेल्या काही वर्षात आमिर खानचा सिनेमा म्हणजे फक्त आणि फक्त आमिर, असाच पायंडा पडला होता. अगदी धुम-3 मध्ये कटरीना कैफसारखी बाँलिवुडमधील लिडिंग नटी असुन तिच्या वाट्यालासुद्धा धुम-3 मध्ये तीन गाण्यांमध्ये थिरकण्याबरोबर अर्ध्या तासापेक्षा कमी रोल आला होता. त्यामानाने पीकेमध्ये अनुष्काला फारच चांगला रोल मिळालाय आणि नवखी असुनही तीने तो ब-यापैकी पेललाय...! साक्षात मिस्टर परफेक्शनीस्ट आमिर खान समोर असताना, स्वतःचा रोल निभावुन नेणे एखाद्या नवख्या अभिनेत्रीसाठी नक्कीच आव्हानात्मक आहे. वेशभूषा करताना आपण परग्रहावर राहणारे वाटावं याकरिता काहीतरी वेगळेपणा आणण्यासाठी आमिर खानने थोडेसे बाहेर काढलेले कान यावरून तो एखाद्या भूमिकेचा किती गंभीरपणे विचार करतो याची प्रचीती येईल. उगाचच मिस्टर परफेक्शनीस्ट ही पदवी प्रेक्षक बहाल करत नसतात.

पीके सिनेमा कोणत्याही धर्माला आव्हान देत नाही किंवा थेट टिका देखील करत नाही. धर्माच्या नावाखाली बजबजलेल्या पाखंडीपणावर हा सिनेमा हलक्या-फुलक्या भाषेत टिका करतो. पीके मध्ये स्पष्टपणे सांगितलय की देव हा दोन प्रकारचा आहे- एक देव जो या स्रुष्टीचा निर्माता आहे, ज्याने हे संपुर्ण विश्व निर्माण केले आहे. आणि दुसरा देव या पाखंडी बाबा-महाराजांनी निर्माण केलाय. तो ही त्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी...! या दुस-या देवाला बहुसंख्य लोकांनी मान्यता द्यायला हवी यासाठी निरनिराळ्या प्रकारची भिती या भोंदुबाबांनी समाजात निर्माण केली आहे. भितीपोटी मनुष्य शेंदूर फासलेल्या दगडाला देव मानतो आणि त्याच भितीपोटी कित्येक लोक या भोंदुबाबांकडे आपल सर्वस्व गहाण करुन नतमस्तक होतात. आसाराम बापुसारख्या भोंदुबाबांनी याच अनामिक भितीवर आजवर कित्येक लोकांच्या आयाबहिणींची अब्रु लुटली, सत्यसाईने अब्जावधी रुपयांची माया गोळा केली. सध्या किस करुन समस्या सोडवणा-या 'किसिंग बाबा'चा विषय गाजतोय. हे सगळ आपल्या द्रुष्टीला पडत नाही किंवा आकलनापलीकडचे आहे, अशातली गोष्ट नाही. मात्र तरीही आपली सदसदविवेकबुद्धी गहाण ठेवुन आम्ही सगळेजण या नालायक भोंदुबाबांची पाठराखण करतो कारण याच पाखंडी लोकांनी अगदी नियोजनबद्धरित्या हिंदु धर्माचा Wrong Number आपल्यापैकी अनेकांच्या डोक्यात डायल करुन ठेवलाय. या भोंदुबाबांवर हल्ला म्हणजे हिंदु धर्मावर हल्ला, या भोंदुंचा पर्दापाश म्हणजे हिंदु धर्माचा अपमान अशी चुकीची समीकरणे पिढ्यानपिढ्या आपल्या मनावर बिंबवण्यात आली आहेत. त्यात करुन हिंदु धर्मातील या पाखंड्यांवर जळजळीत टिका करणारा आमिर धर्माने मुसलमान असेल तर मग विषयच संपला. एक मुसलमान आमच्या हिंदु धर्माची चिकीत्सा कशी काय करु शकतो, असा धार्मिक अस्मितेवर आधारलेला प्रश्न जेव्हा आपल्या मनात थांड मांडुन बसतो तेव्हा आपण सदसदविवेकबुद्धी गमावुन प्रसंगी धार्मिक अस्मितेखातर असल्या भोंदु बाबांचे समर्थन करण्यासही राजी होतो. 'ओ माय गाँड' सिनेमा मध्ये परेश रावलने अशाच प्रकारे हिंदु धर्मातील भोंदुबाबांविरोधात टिका केली होती पण आमिर एवढा टोकाचा विरोध त्याला सहन करावा लागला नाही कारण टिका करणारा परेश रावल 'हिंदु'च होता. त्यातही परेश रावल भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाशी संलग्न होता. सिनेमामधील लवस्टोरीत पाकिस्तानमधील सर्फराजचे उदाहरण दिले आहे. एका स्वयंघोषित हिंदुरक्षक दलाने विधान केले की, आमिर खान सर्फराजचे उदाहरण देऊन 'लव्ह-जिहाद'ला प्रोत्साहन देत आहे. आमिर खानने काही वर्षाँपुर्वी 'सरफरोश' सिनेमामध्ये 'एसीपी अजय राठोड'ची भुमिका पार पाडली होती. त्या सिनेमामध्ये गुल्फाम हसन (नसिरुद्दीन शहा) हा पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक भारतविरोधी कारवाया करणारा आतंकवादी दाखवला होता. सिनेमाच्या शेवटी एसीपी अजय राठोडच या गुल्फाम हसनला कंठस्थान घालतो. बजरंग दलवाल्यांच्या तर्कानुसार आमिर खानला मुस्लीमांचा इतकाच पुळका येत असता तर गुल्फाम हसन ऐवजी 'योगी ****' नामक कोणीही आतंकवादी सरफरोशमध्ये दाखवता आला असता आणि त्याला मारणारा आमिर खान मुस्लिम कुटुंबातील पोलीस अधिकारी दाखवत भारतातील मुस्लिमांचे उदात्तीकरण करण्यात आले असते परंतु आमिरने एक कर्तव्यदक्ष हिंदु पोलिस अधिकारी मुस्लीम दहशतवाद्याला मारतो अशीच भुमिका वठवली. सांगायची गोष्ट अशी की हिंदुत्ववादी संघटनांना नको तिथे बादरायण संबंध जोडुन आपला मुद्दा पुढे रेटायची सवयच झालेली आहे. अगदी पीकेमधील सर्फराजच्या उदाहरणाबाबत म्हणाल तर हिंदु कुटुंबात मुलांच्या मनात मुस्लीमांबाबत काही गोष्टी अशा प्रकारे ठसवल्या जातात की एखाद्या मुस्लीम व्यक्तीसोबत कोणताही निर्णय घेताना आपण शहानिशा न करता केवळ गैरसमजातुन महत्वाचा निर्णय घेऊन मोकळे होतो. हिच गोष्ट व्हाईस व्हर्सा मुस्लीम कुटुंबांनाही लागु पडते. "मुस्लीम मुले संभोग घेऊन हिंदु मुलींना लग्न न करता वा-यावर सोडतात" हा भोंदुबाबाने सांगितलेला चुकीचा संदेश कुठेतरी जग्गुच्या मनात कुठेतरी फिट बसला होता म्हणुनच ती सर्फराजवर जीवापाड प्रेम करत असुनही तो लग्न करु शकत नाही या पत्राची शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवते आणि आपल प्रेम गमावते. अगदी जग्गुच्या मनातही सर्फराज मुसलमान आहे म्हणजे तो आपल्याला लग्नाला फसवु शकेल ही गोष्ट तिच्या घरच्यांनी बिंबवलेली असते. सर्फराजचे उदाहरण देऊन आमिर खान एवढच सांगतो की, एखाद्याच्या धर्मावरुन त्याचे संभाव्य वर्तन कधीच ग्रुहित धरु नका. अन्यथा समोरच्या व्यक्तीला ग्रुहित धरण्याने निर्माण होणा-या गैरसमजांमुळे आयुष्यातली महत्वाची गोष्ट तुमच्या हातातुन निसटुन जाईल. हिंदुत्ववादी सर्फराजच्या या उदाहरणाचा बादरायण संबंध लव जिहादशी जोडुन मोकळे झाले. थोड्या वेळासाठी मान्य करू की धर्माने मुसलमान असलेला आमिर खान हा हिंदुद्वेष्टा आहे आणि त्याने मुद्दामहून हिंदुधर्मीयांच्या भावना दुखावण्यासाठीच हा सिनेमा काढला. मग हिंदुत्ववादयांना आपल्याला हव्या त्या गोष्टी सिनेमात मांडण्यापासून कोणी रोखलंय…? त्यांना लव जिहादविषयी इतकाच तिटकारा असेल तर आमिर खानच्या पीकेला प्रत्युत्तर द्यायला 'लव जिहाद'ला विरोध करणारा एखादा सिनेमा का प्रदर्शित करत नाहीत...? हिंदुत्ववादी संघटना सिनेमा काढतेय म्हटल्यावर परेश रावल किंवा शरद पोंक्षे असे हिंदुत्ववादी पक्षांसाठी प्रचार करणारे अभिनेते या सिनेमात विनामुल्य काम करायला सुद्धा तयार होतील. सध्या किमान 500-600 कोटींची उलाढाल करणारे बाबा रामदेव पीकेला विरोध करत आहेत. त्यांच्याकडुनही या सिनेमाला आर्थिक पाठबळ मिळेल. गेली 10 वर्षे सुडोसेक्युलर आणि मुस्लिमांचे हित जपणारे काँग्रेसचे सरकार होते. आता तर केंद्रात सरकारसुद्धा हिंदुत्ववादी आहे आणि तेही स्वबळावर...! म्हणजेच सिनेमा प्रदर्शित करताना कोणतीच अडचण येणार नाही. हिंदुत्ववादी संघटना निर्माण करत असलेल्या या सिनेमात लव्ह-जिहाद हिंदुसाठी किती धोकादायक आहे, मुस्लीम तरुण हिंदु तरुणींना कशा प्रकारे प्रेमाच्या जाळ्यात ओढुन त्यांचे आयुष्य बरबाद करतात याचे चित्रीकरण करावे. याव्यतिरिक्त पीके सिनेमात हिंदु धर्माबद्दल विनोदी स्वरुपात जी टिका करण्यात आली आहे त्याची सुद्धा सविस्तर उत्तरे तुम्हाला देता येतील. मंदिराच्या पवित्र आवारात काढलेल्या चपला कधीही चोरीला जात नाहीत किंवा अगदी चुकुन अदलाबदल झाली तरी त्या परत आणुन मंदिरातच ठेवल्या जातात, अशा प्रकारे एखादा सीन चित्रीत केला तर जगभरात हिंदु धर्माची प्रतिमा आणखीनच उंचावेल. त्यानंतर आमच्या हिंदु धर्मात सर्वत्र धर्माचे सेवाभावी व्रुत्तीने कार्य करत असलेले बाबा, योगी, संत कसे चारित्र्यसंपन्न-सदगुणी-सत्शील-निस्वार्थी आहेत, याचेही चित्रीकरण करा. त्यासाठी पाहिजे तर निस्वार्थी व्रुत्तीने आश्रम चालवणारे सत्यसाई एखाद्या पर्णकुटीत आयुष्य व्यतीत करतायेत असा देखावा करा किंवा आसारामबापु स्त्रियांपासुन चार हात दुरच राहण पसंत करतायेत असा एखादा सीन टाका. अन्य धर्मीय सोडा पण हिंदु धर्मातील प्रेक्षकच सत्यसाईला निस्वार्थी आणि आसारामला चारित्र्यसंपन्न म्हणून स्वीकारतात का ते पाहा. याचाच अर्थ सिनेमात दाखवलेल्या गोष्टी बुद्धीला पटणा-या असल्या तरच प्रेक्षक त्यांचा स्वीकार करतात. आमिर खान हिंदू धर्मावर टीका करू शकला कारण त्याने हिंदू धर्माबाबत सत्य परिस्थिती सिनेमात कथन केली होती. देवळात चपला चोरणारे, दानपेटीत पैसा टाकणारे हिंदू सर्वांच्याच नजरेस पडतात. आसाराम बापू, सत्यसाई, बाबा रामपाल, किसिंग बाबा यांची थेर सर्वांनीच अनुभवलेली आहेत. आता मुस्लीम किंवा ख्रिश्चन समाजात असे कोणी प्रति-आसाराम किंवा प्रति-सत्यसाई सापडतायेत का त्याचा शोध घ्या. समजा त्यांच्या धर्मात असे कोणीतरी महाभाग सापडलेच तर मग प्रश्नच मिटला. त्यांच्यावर चित्रीकरण करुन तुम्ही अन्य धर्मात सुद्धा हिंदुंसारखेच भोंदुबाबा आहेत हे सांगायला मोकळे...! तुमच्याच भाषेत (किंवा द्रुष्टीकोनातुन) सांगायच तर, "शेजा-याच्या घरात घाण असेल तर मग माझ्या घरात त्याच्यापेक्षा जास्त घाण असली तर बिघडल कुठे...? मी माझ्या घरातील घाण अजिबात साफ करणार नाही. माझा शेजारी घाणीत राहतो ना...! मग मी सुद्धा घाणीतच राहणार...!! आणि बर का, माझ्या घरातील घाणीबद्दल टिकाटीप्पणी करण्याचा अधिकार कुठल्याही परधर्मीयाला दिलेला नाही. त्याने अगोदर माझ्या शेजा-याच्या घरातील घाणीवर भाष्य करावे."

भारत देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकट्या आमिर खानलाच दिलेले नाही. भारताच्या संविधानाने ते प्रत्येक नागरिकाला बहाल केले आहे. याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करुन हिंदुत्ववाद्यांनी पीकेमधील आक्षेपांचे निर्दालन करणारा सिनेमा  काढावा. मी खात्रीने सांगु शकतो की एकही हिंदुत्ववादी संघटना हे धाडस करणार नाही. पीकेसारखा उपदेशात्मक सिनेमा  काढण्यासाठी मुळात तो बनविणा-यांमध्ये अफाट क्रिएटीव्हीटी असावी लागते, ती या हिंदुत्ववाद्यांपाशी अजिबात नाही. यांनी एखादा सिनेमा बनवलाच तर त्याची तुलना पीकेशी होणे स्वाभाविकच आहे. अभिनयाच्या क्षेत्रात मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणुन ओळखल्या जाणा-या आमिरला त्याच्याच प्रांतात जाऊन टक्कर देण्यासाठी त्या तोडीचा अन्य अभिनेता यांना सापडणार नाही. अगदी यांनी एखादा सिनेमा बनवला तरी तो लोकांना भावण्यासाठी किंवा व्यावसायिकद्रुष्ट्या यशस्वी करण्यासाठी नुसता उपदेश असुन भागत नाही तर त्यात भरपुर मनोरंजनही असावे लागते. तर आणि तरच तिकीटे खरेदी करुन प्रेक्षक थिएटरमध्ये जातात. यापुर्वी असे प्रबोधनात्मक सिनेमा किती आले आणि किती गेले परंतु प्रबोधनासोबत मनोरंजन करण्याची क्षमता नसल्याने ते कमर्शिअली सुपर-डुपर हिट ठरु शकले नाहीत. साहजिकच जास्त गाजावाजा न झाल्याने त्यांनी केलेले प्रबोधन किंवा दिलेला संदेश एका ठराविक वर्गापुरताच मर्यादित राहिला. हलक्या-फुलक्या गोष्टींनी लोकांचे मनोरंजन करत आपल्याला पाहिजे तो सामाजिक संदेश लोकांपर्यँत पोहोचवायचा ही एक अनोखी कला आहे. त्यात आमिरचा हात कोणीच धरु शकत नाही. पीके बद्दल प्रतिक्रीया देताना काही लोकांनी अशा प्रतिक्रीया दिल्या की यापेक्षा 'ओ माय गाँड' कितीतरी पटीने बरा होता. निव्वळ समाजप्रबोधन या एकाच पैलुबाबत तुलना करायची तर 'ओ माय गाँड'मधुन गेलेला मेसेज पीकेपेक्षा कितीतरी पटीने सरस होता. मात्र एक सिनेमा म्हणुन विचार करता आमिरचा 'पीके' परेश रावलच्या 'ओ माय गाँड'पेक्षा नक्कीच सरस ठरतो. आमिरने उपदेशासोबत मनोरंजन हा बँलन्स अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळलाय. फक्त उपदेश ऐकण्यासाठी आमिर खानचा सिनेमा पाहणारे माझ्यासारखे 10 ते 20 टक्के लोक असतील. परंतु थिएटरमध्ये फक्त प्रवचन ऐकण्यासाठी नव्हे तर त्यासोबत मिळणा-या मनोरंजनासाठी जाणा-या 80 ते 90 टक्के प्रेक्षकांची आमिर अतिशय उत्क्रुष्टरित्या काळजी घेतो. म्हणुनच त्याचे सिनेमे कमाईचे नवनवे उच्चांक गाठताना दिसतात.

पीके ख्रिस्ती धर्मांतरावरही भाष्य करतो. चर्चमध्ये वाईनची बोटल घेऊन जातात त्यावर टिका करतो. अगदी मुस्लीम, जैन, बौद्ध अशा सर्वधर्मीयांच्या ठराविक गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे दाखवुन देतो. मात्र आमिरला हिंदुविरोधी ठरवण्याच्या प्रयत्नात आपण सोयीस्कररित्या त्याने अन्य धर्मीयांवर केलेली टिका विसरतो. आमिरने थेट हिंदु धर्मावर टिका केलेलीच नाही. अगदी तशी थेट टिका त्याने केली असती तरी एवढे वादविवाद निर्माण झाले नसते. आमिर हिंदु धर्मातील दलालांबाबत भाष्य करतो आणि त्यामुळेच तो टिकेचा धनी ठरतो. आमिरवर टिका करणारे त्याच्यासारखाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करुन अन्य एखादा सिनेमा करणे टाळतात कारण त्यांना पीकेवर बंदी आणा अशी मागणी करणे सोयीचे वाटते. स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करण्यापेक्षा दुस-याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे एकदम सोपे...! कोणतीही व्यक्ती धर्माची खुण घेऊन जन्माला येत नाही. फक्त आपण एखाद लहान मुल जन्माला येताच त्याच्यावर धर्माच लेबल चिकटवतो. त्याच्या कोवळ्या मनावर परधर्मीयांविषयी द्वेष पसरविणा-या गोष्टी सांगुन नको ते संस्कार करतो. मग ज्यावेळी हे बालक समाजात वावरू लागते तेव्हा ते समोरच्याकडे मानवताधर्माने कधी पाहुच शकत नाही, पीकेच्याच भाषेत सांगायचे तर लहानपणीच त्या कोवळ्या मुलाबरोबर एवढे Wrong number डायल झालेले असतात की त्याला उभ्या आयुष्यात कधी Right number सापडतच नाही. नव्हे, या देशात निर्माण झालेले धर्माचे दलाल त्याला तो Right number मिळवण्याचा प्रयत्न देखील करु देत नाहीत. सरतेशेवटी परग्रहावरुन आलेला पीके आपणा सर्वाँना "एक मानवी समाज म्हणुन आपण खरेच प्रगल्भ झालो आहोत का", असा प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाच उत्तर सध्या पीके सिनेमाविरोधात ठिकठिकाणी होणा-या हिंदुत्ववाद्यांच्या आंदोलनातुन मिळतय. मानवी समाज खुप दुरच राहिला परंतु पीके सिनेमा सुरु असलेल्या सिनेमागृहांची तोडफोड करुन एक 'लोकशाही राष्ट्र' म्हणुन आजही आपण बाल्यावस्थेत आहोत, एवढ मात्र नक्की...!