सुपरमॅनची लाथ
अमेरिकेत ज्या काळात ‘सुपरमॅन’ या पात्राच्या चित्रकथा अगदी पहिल्यांदा प्रसृत झाल्या, तो १९४५ ते ५० हा काळ छापील माध्यमाच्या ताकदीवर विश्वास असणाऱ्या लोकांचा होता. चित्रकथांचे छापील पुस्तक, तेही मासिकाच्या आकारात आणि दर महिन्यापंधरवडय़ाला आपल्या भेटीला येणारी चित्रकथांमधील पात्रे, ही कल्पना अमेरिकेतील आणि अन्यही देशांतील वाचकांना आवडू लागली होती. चित्रकथा हेच तेव्हाचे नवमाध्यम होते.
दुसऱ्या महायुद्धाच्या धुरापासून लोकांना दूर नेण्याचे आणि याच महायुद्धात बलवत्तर ठरलेल्या अमेरिकेची देशभक्ती करण्यास प्रोत्साहन देण्याचे काम सुपरमॅनने- म्हणजे १९३८ साली प्रथम ‘सुपरबॉय’ म्हणून कुणा केन्ट दाम्पत्याला परसबागेत सापडलेल्या या परग्रहावरल्या पात्राने- मोठा झाल्यावरही गेली सहा दशके इमानेइतबारे केले. हा जो देशभक्तीचा आदर्शवाद सुपरमॅनने जपला, तो त्यालाच शोभलाही; कारण अखेर ते एक काल्पनिक पात्र होते. निक्सन वा धाकल्या बुशसारखे अध्यक्ष, लेहमन ब्रदर्ससारख्या बँका आणि नफ्यासाठी घायकुतीला येऊन अमेरिकेला मंदीच्या खाईत ढकलणाऱ्या अर्थसंस्था यांच्याशी अमेरिकेतील वृत्तपत्रे, चित्रवाणी वाहिन्या झगडत राहिल्या असताना, यापैकी कशाशीही सुपरमॅनचा संबंध नसला तरी चालेल, असेच अमेरिकी आम आदमीला वाटत असल्याचे सुपरमॅन चित्रकथेच्या मालकांनी ठरवले होते.
हा सुपरमॅन जणू आपल्यापैकीच आहे, तो एक पत्रकार म्हणून डेली प्लॅनेट नावाच्या दैनिकात नोकरी करतो आणि फारच अन्याय झाला की मग हा पत्रकार त्याच्या सुपर-अवतारात येऊन जगाला वाचवतो, अशाच कथा लोकांना आवडणार आहेत, हेही ठरून गेलेले होते. ‘डीसी कॉमिक्स’ या जगडव्याळ प्रकाशन संस्थेने सुपरमॅनसह अनेक काल्पनिक महानायकांच्या छापील आणि टीव्ही मालिका प्रसृत केल्या, गाजवल्या; त्यांत सुपरमॅन ऊर्फ क्लार्क केन्ट याची ‘डेली प्लॅनेट’मधील नोकरी कायम राहिली.. हा क्लार्क केन्टही प्रत्येक मालिकेत अगदी २७ वर्षांचाच राहिला. या भूतकाळावर सुपरमॅनने लाथ मारली आहे.
ताज्या- म्हणजे गेल्याच बुधवारी प्रकाशित झालेल्या- मालिकेतही क्लार्क केन्ट २७ वर्षांचाच आहे आणि नेहमीप्रमाणे, ‘डेली प्लॅनेट’मधल्या त्याच्या जागेवर बसून काहीतरी खरडतो आहे.. हातात जुन्या मालिकांतल्या टाइपरायटरऐवजी आता सपाट पडद्याचा संगणक आहे, हा फरक. तेवढय़ात कलाटणी मिळते- ‘सुपरमॅन’च्या बातम्या देणे हे क्लार्क केन्टचे काम तो नीट करीत नाही, यावरून थेट या काल्पनिक दैनिकाच्या मालकाशी काल्पनिक सुपरमॅनचा खटका उडतो आणि नोकरीवर लाथ मारून तो बाहेर पडतो. त्याआधी तो जे बोलतो ते मात्र तमाम वाचकांना खरेच वाटले पाहिजे, याची काळजी ‘सुपरमॅन कॉमिक्स : क्र. १३’च्या कथालेखक आणि प्रमुख चित्रकारांनी घेतली आहे. काल्पनिक दैनिकाचा मालक म्हणतो की मी सांगतो तीच बातमी.. तीच तू दिली पाहिजेस.. त्यावर आपला काल्पनिक महानायक म्हणतो की लोकांना काय हवे हे तुम्ही ठरवू नका. सत्य सांगणे आपले काम आहे आणि तुम्ही मालक मंडळी, सत्य सांगणाऱ्यांना त्यांचे श्रेय देत जा! मालक पाठ वळवून उभा राहिल्यावरही सुपरमॅन बोलतच राहातो.. तो हे मान्य करतो की पत्रकारांनाही नोकरीची चिंता असायला हवी, हल्लीच्या काळात तर नोकऱ्या टिकवणे कठीणच आहे.. पण सुपरमॅनचे खरे प्रवचन पुढे सुरू होते. एखाद्या आदर्शासाठी उभे राहणे हे नोकरीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. माझ्या सहकाऱ्यांनो, तुम्हालाही माझे म्हणणे पटले असेल तर तुम्हीही चला माझ्यासोबत, असे म्हणत सुपरमॅन या दैनिकाच्या कचेरीतून निघून जातो..
हा प्रसंग तर फार परिणामकारक आणि ‘सत्य’ सांगणारा वाटतो, नाही? पण सुपरमॅनसोबत कुणीही नोकऱ्या सोडत नाही, मालक आणि कनिष्ठ अधिकारी यांचा खटका उडत असताना कोणत्याही अन्य ठिकाणी सहकर्मचाऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया असतील, तशाच त्यांच्याही असतात. क्लार्क केन्टची सहकारी-मैत्रीण कॅट ग्रँट तेवढी अस्वस्थ होते आणि तीही नोकरी सोडण्याचे ठरवते. पुढे हे दोघे जगण्यासाठी पैसा कोठून आणणार किंवा त्यांना हवे असलेले सत्य सांगून आदर्श पाळण्यासाठी काय करणार, हे पुढल्या भागात कळणार आहे. परंतु याच तेराव्या भागात, सुपरमॅनने केवळ प्रवचने देण्याच्या किंवा आदर्श शिकवण्याच्या कामातच गुंतून न राहाता त्याचे मूळ काम- म्हणजे जगाच्या भल्यासाठी अतिमानवी शक्ती दाखवून अमेरिकेचा उदोउदो करण्याचे काम- चोखपणे करावे, यासाठी कथेने पुढील वळणे घेतली आहेत. नोकरी सोडून काहीसा निर्मनस्कपणे पायरीवर बसलेल्या क्लार्क केन्टला अचानक एका दुष्ट अतिमानवी प्राण्याशी सामना करण्यासाठी सुपरमॅनची झूल फडकवावी लागते.. तो दोन हात करतोही, पण हा प्राणीदेखील इतका भारी की सुपरमॅन थेट अटलांटिकपार आर्यलडमध्ये फेकला जातो. इथे चित्रकथेचा अंक संपवण्यातच मजा आहे, हे अनेक चित्रकथांचे मालक असलेल्या कंपनीतील एक्झिक्युटिव्ह दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही कळत असल्यास नवल नाही. आपले काम लोकांना सत्य-निर्भीडपणा, देशभक्ती नि आदर्शवाद यांच्या गोष्टी सांगण्याचे आहे आणि त्यासाठीच आपण सुपरमॅनसारख्या अतिमानवी पात्रांचा आधार घेतो, हा आदर्शवाद थोडा बाजूला ठेवण्याची सवयच अशा चित्रकथा- मालिकांच्या लेखक वा चित्रकारांनाही झालेली असावी. प्रकाशकांना त्यांचा धंदा करू देण्यासाठी -म्हणजेच पुढले अंक विकले जावेत यासाठी- कथा अध्र्यावरच तोडायची हा धंधे का उसूलही सुखेनैव पाळला जातो. आजच्या पत्रकारितेच्या धंद्यावर लाथ मारणारा आणि मीडियाला धरून लाथेने तुडवण्याच्या लोकेच्छेलाच जणू सभ्य, सुसंस्कृत शब्दरूप देणारा सुपरमॅन पुढे काय करणार आहे, हे या भागात तरी गुलदस्त्यातच राहिले आहे. आता सुपरमॅन ब्लॉग लिहिणार, अशी भूमिका अमेरिकी प्रसारमाध्यमांनीच सध्या उठवली आहे. ते तार्किकही म्हणायचे, कारण ब्लॉगसाठी काही आर्थिक भांडवल लागत नाही- बुद्धी, अनुभव आणि भाषा यांच्या बळावर ब्लॉग लोकांपर्यंत पोहोचतो, लोकप्रिय होऊन लोकांवर परिणामही घडवून आणू शकतो. सुपरमॅन ब्लॉग सुरू करणार की नाही, हे अद्याप जाहीर झाले नसले तरी ज्या पद्धतीने आजच्या तमाम पत्रकारितेला बोल लावून त्याने नोकरी सोडली, ते पाहता तो पुन्हा मीडियात येण्याची शक्यता कमी. याच आजन्म २७ वर्षांच्या पत्रकाराने १९७१ साली ‘डेली प्लॅनेट’मधील नोकरी सोडून चित्रवाणी माध्यमात मुशाफिरी केली होती, पण आता तो स्वत:चा ब्लॉग सुरू करण्याची शक्यता अधिक, कारण त्याला मालकांची ताबेदारी नको आहे.
सुपरमॅनने नोकरीवर मारलेल्या लाथेची ही गोष्ट अर्धीच, तरीही महत्त्वाची आहे. आपल्याकडे देखील अनेकांना ही ताबेदारी नको असते. सरकारी खात्यांतील किंवा खासगी कंपन्यांतील कर्मचारी, अधिकारीही ‘हे योग्य नाही’ या निष्कर्षांला अनेकदा येतात. यापैकी अनेक जण क्षेत्रच बदलतात, औषध कंपनीत दर्जानियंत्रण नीट नाही, म्हणून तिथला अधिकारी रंगाच्या कंपनीत गेला की मग तेथील प्रयोगशाळा काटेकोर नसली तरी त्याची नैतिक टोचणी कमी होते. पत्रकारितेसारख्या क्षेत्रांमध्ये मात्र असे तौलनिक सुख नसते. स्वतसकट वाचकांचीही विवेकबुद्धी टिकवण्याची परीक्षाच आजचा काळ घेत असतो; त्यामुळे या परीक्षेत उतरण्याचे कौशल्य आजच्या पत्रकारांकडे नसले, तर मग उरते ते शल्य आणि आपणही एकदा सुपरमॅन व्हावे नि नोकरीवर लाथ मारावी, असे आदर्शवादी स्वप्न! त्याहीपेक्षा कीव येण्याजोगे आपल्या देशातले उदाहरण म्हणजे, ताबेदारांच्या दिशेने लाथा झाडल्या की आपण सुपरमॅनच झालो, असे समजणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यांच्याकडे सुपरमॅनचे कपडे नसतील, ‘मैं हूं अमुक तमुक’ अशा टोप्या असतील, एवढाच फरक.