Get it on Google Play
Download on the App Store

मुकमित्र

हल्ली मला रात्री अपरात्री उठून लेखनाची नवीनच सवय लागली आहे. आज मी माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगणार आहे. लहानपणची म्हणजे मी दहावीला होतो तेव्हाची. आम्ही जिथे राहत होतो त्या बिल्डिंगमध्ये एक मुलगा सतत टीव्ही पाहत होता म्हणून परीक्षेत नापास झाला. अर्थातच या गोष्टीचे पडसाद माझ्या घरी उठले. पप्पांनी घरातील टिव्हीचं कनेक्शन काढून टाकलं. त्यांचं देखील बरोबर होतं. माझं दहावीच वर्ष असल्याने त्यांना मला चांगल्या मार्कंनी उत्तीर्ण झालेलं पाहायचं होतं, आणि यासाठी ते सर्वोतपरी प्रयत्न करत होते.

पण क्रिकेटचं वेड ते वेगळंच, टीव्ही नाही तर मी रोज सकाळी लवकर उठून वर्तमानपत्र आणायला जायचो. त्या काळात बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी (अपडेट राहण्यासाठी) टीव्ही, रेडिओ आणि वर्तमानपत्रे ही माध्यमं होती. तेव्हा व्हाट्सअप फेसबुक असं काही नव्हतं. ऑर्कुट होतं, पण ते मी खूप कमी वापरायचो. (मूळ मुद्द्यावर येऊया) माझी वाचनाची आवड पाहून पप्पा देखील खुश झाले होते. आपला मुलगा आता अपडेट राहतोय याचा त्यांना आनंद होता.

मी रोज सकाळी लहान भावाला शाळेत सोडायला जायचो आणि घरी परत येतेवेळी वर्तमानपत्र सोबत घेऊन यायचो. (माझी शाळा दुपारची होती.) असं करत करत मी तिथल्या पेपर विकणाऱ्या मुलाचा मुकमित्र झालो. मुकमित्र म्हणजे दोघेही मित्र असतात, रोज एकमेकांना भेटतात. दोघेही घाईतच असतात पण त्यातूनही दोन क्षण काढून एकमेकांकडे बघून स्मितहास्य करतात त्याला मुकमित्र म्हणतात. आपल्या आयुष्यात असे बरेचसे मुकमित्र असतात.

मी त्याच्या स्टॉलवर येण्याआधीच तो ‘सकाळ’ वर्तमानपत्र काढून ठेवायचा, मी त्याला 2 रुपये द्यायचो आणि निघायचो. युसूफ नाव होतं त्याचं… माझ्याच वयाचा होता तो… ‘अंजुरफाटा’ नावाच्या गावात राहायचा. सकाळी (पहाटे) 5 वाजता त्याचा दिवस सुरु व्हायचा. रिक्षातून पेपरचे गठ्ठे घेऊन तो शाळेच्या गणवेशातच यायचा आणि आमच्या घराजवळील बसस्थानकाजवळ तो आपला छोटासा स्टॉल मांडायचा. दुपारी साडेबारा पर्यंत पेपर विकून खिशात पैसे असताना देखील तसाच चालत तर कधी लिफ्ट मागून 8 किमी दूर शाळेत जायचा. मग शाळा, क्लास आणि घर असा त्याचा पुढचा प्रवास असायचा.

माझ्या घरची परिस्थिती चांगली होती. वडील बेस्टमध्ये पर्मनंट, तर मी असली कामं का करायची, हा विचार करून मी विचार कारणं थांबवायचो. सहा महिन्यांनंतर मला कळलं, तो सुद्धा दहावीला आहे. मुसलमान असून देखील तो मराठी माध्यमातून शिकत होता. आमची चांगली मैत्री झाली होता म्हणून मी माझे गाईड्स आणि परीक्षेतील प्रश्नपत्रिका त्याला द्यायचो आणि पुस्तकं कुठेतरी हरवून आलो असं घरी सांगायचो. मी केलेल्या मदतीने तो खूप खुश व्हायचा. माझा हात जेव्हा फ्रॅक्चर झाला होता तेव्हा तो स्वतः घरी येऊन पेपर देऊन जायचा.

आम्ही जास्त बोलत नव्हतो, आम्ही मुकमित्र होतो. मी त्याला प्रश्नपत्रिका देताना, तो माझ्या घरी येऊन वर्तमानपत्र देताना आम्ही बोललोच नाही. जे काही बोलायचो ते मुक्यानेच. काही महिन्यांनी एका रविवारी मी क्रिकेट खेळून घरी परतत होतो. तेव्हा तहानेने गोळ्याच्या गाडीजवळ जाऊन मस्त मलाई गोळा खाल्ला. गोळा खात असताना मला तो कुठेतरी जाताना दिसला, मी त्याला नजरेने गोळा खाणार का म्हणून विचारलं. त्याने देखील मान हलवून नाही म्हणून सांगितलं. मी त्याला पुन्हा विचारलं. त्याचे ओठ ‘नाही’ आणि डोळे ‘हो’ बोलत होते. शेवटी स्वभावाप्रमाणे मी त्याला जबरदस्तीने गोळा खायला दिला. त्याचा चेहरा इतका निरागस होता कि त्याच्यावर कुणालाही दया आली असती.

आमची मैत्री अगदी रंगात येत होती. मला माझ्या लेव्हलचा (अपडेट राहणारा) मित्र भेटत होता, पण पुढच्याच महिन्यात त्याने सर्वांना खूप मोठा धक्का दिला. त्याच्या घरातील सर्वजण बाहेर गेले होते तेव्हा वेळ साधून त्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण काय होतं हे मला आजपर्यंत समजलं नाही. तेव्हा मी बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीत होतो म्हणून घडलेल्या घटनेची मला जास्त माहिती मिळाली नाही. पुढे अभ्यासात इतका गुंतलो कि, सगळंच विसरलो, पण जेव्हा सुद्धा त्या बसस्थानकाजवळून जायचो, काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं.

भिवंडीमध्ये एका संवेदनशील भागात एक मुसलमान आणि एक हिंदू मुलगा मित्र म्हणून होते, तिथे शिवसेनेचे आमदार होते, राज ठाकरे तिथे वरचेवर येत होते, चायनीज खायची मुलांना चटक लागली होती, ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येत होते, सगळं काही सुरळीत होत होत, पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. काहीतरी करून दाखवण्याची धमक असणारा मुलगा गळफास लावून देवाघरी का अल्ला च्या घरी गेला होता.