सावित्रीचा सुका 2
द्या माझे बाळ.
‘दूर हो मुकाटयाने, नाहीतर गळा दाबीन.'
तिने त्याच्या हाताला कडकडून चावा घेतला. बाळ खाली पडले. तिने पटकन् उचलले. बाळ रडत होते. मऊ मातीत ते पडले होते. ती त्याला घेऊन निघाली. तो सैतानाप्रमाणे धावून आला. तिने बाळ खाली ठेवले, आणि त्याला दूर लोटले. पलीकडे खळगा होता. तो त्यात पडला. ती मुलाला घेऊन पळत निघाली. पाठीमागे बघत नव्हती. आले एकदाचे घर आणि तिचे डोळे गळू लागले. ती बाळाला पाजीत होती. मृत्यूच्या तोंडातून परत आलेल बाळ! तिच्या स्तनांत अपार पान्हा दाटला होता. बाळ पीत होता. पितापिता झोपला. तिने त्याला पाळण्यात ठेवले. आणि ती पतीची वाट पहात बसली. तो येईल असे तिला वाटे. परंतु पहाट झाली. तरी पत्ता नाही. कोंबडा आरवला. गावात हालचाल सुरू झाली. कोठे जाते वाजत होते. दळणाच्या ओव्या कानांवर येत होत्या.
दाराला कडी लावून सावित्री निघाली. लगबगीने ती आली. त्या जागेपाशी आली. सुकाचे डोके दगडावर आपटले होते. तो तिरमिरी येऊन तेथे पडला होता. ती त्याच्याजवळ बसली. तिने पदर फाडून जखम बांधली. तिने त्याला सावध केले, उठविले. हात धरुन ती त्याला घरी घेऊन आली. तिने अंथरुणावर त्याला निजविले. तिने देवाचे आभार मानले. आता चांगलेच उजाडले होते. सावित्रीने भांडी घासली, पाणी आणले. चूल पेटवून तिने भाकरी केली. उठा, भाकर खा.' ती काला म्हणाली.
‘बाळ कोठे आहे?' त्याने विचारले.
‘पाळण्यात आहे.' पाळण्यात आहे की पाण्यात?'
‘असे काय वेडयासारखे बोलता. बाळ पाळण्यात आहे.'
‘खरेच?'
‘हो खरेच'
इतक्यात पाळणा हलू लागला. मुलाने नेत्रपुष्पे उघडली होती. तिने त्याला उचलून जवळ घेतले. सुका अंथरुणावर बसला होता. ‘बघा हसतो आहे' ती म्हणाली.
‘दे, मी घेतो' तो म्हणाला. त्याचा हात दुखत होता, त्या हातावर तिचे दात उठले होते.