Get it on Google Play
Download on the App Store

तारक देवता 3

त्यांना बोलवेना. मी त्यांच्या कपाळाला भस्म लावले. मी रुद्र मंत्र म्हणत होतो. जवळ बहीण होती. माझा लहान मुलगा तेथे होता. वडिलांनी त्याच्या डोक्यावर क्षणभर हात ठेवला. आणि तेही रुद्र म्हणू लागले. त्यांचा आवाज मंद होत गेला. थांबला. दृष्टी मिटली. मी रुद्र म्हणत होतो. रुद्र संपला. मी वडिलांकडे पाहिले. ते मृत्युंजय शंकराकडे कधीच गेले होते. माझी बहीण मला म्हणाली.

‘रडायची वेळ नाही. हे धन्य मरण आहे. परंतु तू प्रतिज्ञा कर की, दारूला शिवणार नाही. तरच त्यांच्या आत्म्यास शांती! ते तर म्हणाले की, मी क्षमा केली आहे. त्या क्षमेला पात्र हो. कर प्रतिज्ञा.’

ती बहीण नव्हती. ती तारक देवता होती. चुकलेल्या भावाला सत्पथावर आणणारी ती माझी गुरुदेवता होती. आणि मी प्रतिज्ञा केली. वडील तर गेले आणि माझी दारूही गेली. पेन्शन घेतल्यापासून मी दारुबंदीचा प्रचार करीत असतो. माझा मुलगा आपल्या पायावर उभा आहे. मी फकिरी पत्करली आहे. या सेवादलाच्या मुलांबरोबर मी हिंडतो. माझे अनुभव सांगतो. दारू सोडता येते, हे माझ्या अनुभवावरुन सांगतो. परंतु प्रखर निश्चय हवा. प्रभूची कृपाही हवी. बंधुभगिनींनो, नको ही दारू दारूपायी देशाचे दोन, तीनशे कोटी रुपये जातात. हेच पैसे जर तुमच्या संसारांत राहिले. तर देशाला तेज चढेल. हे दोनतीनशे कोटी रुपये देशाच्या संसारात खेळत राहतील. कुटुंबात समाधान नांदेल. डोळे रडणार नाहीत, हृदये जळणार नाहीत, हाल, अपेष्टा कमी होतील. संसार सोन्यासारखे होतील. मी अधिक काय सांगू? गावात दारू ठेवणार नसाल, चोरटया भटटया नष्ट करणार असाल तर हात वर करा.” शेकडो हात वर झाले. आणि खरोखरच आसपास सर्वत्र दारूबंदी होऊ लागली. किती छान, किती सुरेख, नाही?