सावित्रीचा सुका 1
‘आई, बाबा कधी येतील?’
‘तु नीज रे राजा.’
‘मी नाही निजत जा. बाबा मला खाऊ घेऊन येणार होते,
‘चेंडू आणणार होते. रबरी चेंडू.’
‘खाऊ आणला तर सकाळी खा. चेंडू त्यांनी आणला तर सकाळी खेळ. कोण नेणार आहे तुझा खाऊ, तुझा खेळ? नीज. तुझे डोळे झोपेस आले आहेत.’
आणि बाळ झोपला. सावित्री वाट पहात होती. नाही नाही ते विचार तिच्या मनात येत होते. तिच्या नव-याचे नाव सुका. कोठून त्याला दारूचे व्यसन लागले हरी जाणे! ती माहेराहून लहान बाळाला घेऊन आली. तो ते नवीन प्रकार दिसले. ती एक रात्र तिला आठवली. भयंकर रात्र! सुका घरी तर्र होऊन आला. होता. त्याला आणखी पैसे हवे होते. तुझ्या आईने दिले असतील. तू एकटी पोर तुझ्या आईची.’ दिले होते की नाही पैसे? दे ते पैसे.’ असे म्हणून तो दरडावीत होता. ‘पैसे संपले. बाळाला दूध लागते. अंगावर दूध नाही. नाही पैसे. बाळाला आता दूध कोठून? ती म्हणाली.
तुझ्या बाळाला दूध हवे. आणि बाळाच्या बापाला दारू नको? असे म्हणून तो पाळण्याकडे धावला. तिने त्याला लोटले दूर! ती तरुण माता नागिणीप्रमाणे चवताळली होती. तो कोप-यात पडला तिला वाटले त्याला झोप लागली. आणि तिचाही पुढे डोळा लागला. परंतु एकदम ती दचकून उठली. बाळ रडला. असे तिला वाटले. ती पाळण्याजवळ गेली. कोठे आहे बाळ? बाळ
नाही. ती घाबरली. बाळाला घेऊन पती कोठे गेला? मध्यरात्र होऊन गेली होती. एकाएकी तिला काही शब्द आठवले. ती घरातून बाणाप्रमाणे बाहेर पडली. कोठे जात होती ती? सर्वत्र सामसूम होते. मध्येच कुठे कुत्रे भुंके, गाढव ओरडे. तिला भान नव्हते. ती पहा नदी वाहत आहे. जणू अखंड प्रार्थना म्हणत आहे. तिला कोणी तरी नदीकडे जात आहे असे दिसले. तिच्या
पायांत वा-यांची गती आली. तिने गाठले त्याला. तिने त्याचा हात पकडला.
‘माझे बाळ द्या' ती ओरडली.
‘ते माझे आहे तो म्हणाला.
देता की नाही? कोण आहात तुम्ही? राक्षस की काय?
कोठे चाललात बाळाला घेऊन?'
‘नदीत बुडवायला'
‘तुमची जीभ झडत कशी नाही?'
‘अधिक बोलू नकोस. तुलाही नदीत फेकीन.'