उदार आनंदराव 2
नशा वाढत चालली; व्यसन बळावत चालले. पैसे पुरत ना. ते सुंदर उमदे घोडे विकले गेले. शेतीवाडी जाऊ लागली. सावकाराचे अपार कर्ज झाले. घरातले दागदागिने; भांडीकुंडी जात चालले. दारुची बाटली! परंतु त्रिभुवनातील सारी संपत्ती तिच्यापुढे तुच्छ ठरते. त्या संपत्तिला ती गिळून टाकते. आनंदराव भिकारी झाले. त्यांच्या अंगावर आता चिंध्या असत. पायांत काही नसे. तो रुबाब; ते तेज; ते वैभव सारे लोपले.
त्यांच्या पत्नीने विहिरीत जीव दिला. कारण सावकार वाडयाचा ताबा घेणार होते. त्या माऊलीला ती विटबंना कशी सहन होणार? जेथे मोती वेचले; फुले वेचली; तेथे शेण वेचायची पाळी आली; आणि आईच्या आत्महत्येने मुलगा वामन वेडा झाला. तो आई आई करीत गावोगाव भटकतो.
आनंदराव कोठोतरी बसत; कोठेतरी झोपत. त्यांना घरदार उरले नाही. कधी रस्त्यातून ते अनवाणी जात असायचे. ऊन कडक असायचे. पायांना फोड यायचे. एखादी बैलगाडी जाताना दिसली तर आनंदराव हात जोडून म्हणायचे;
‘मला घे रे जरा गाडीत; पाय पोळले रे. घे रे जरा दादा. आणि गाडीवानाला दया येई. गाडीवानाच्या डोळयांत पाणी येई. हेच ते आनंदराव; उंच घोडयांची गाडी उधळीत यायचे. पैसे वाटीत यायचे. रस्त्याच्या दुतर्फा गोरगरीब उभे असायचे. गावच्या दरवाजाजवळ तर ही गर्दी असायची! परंतु आज? आज त्याच आनंदरावांना; ‘मला घेतो रे गाडीत?;’ असे दुस-याला हात जोडून विनवावे लागत होते. ‘मला देतो रे दिडकी; दे रे एक बिडी; अशी त्यांना दुस-याजवळ भीक मागण्याची पाळी आली होती.
दारुपायी आनंदरावांचे सारे सारे गेले; त्यांच्या सोन्यासारख्या संसाराची दैना झाली! आणि एके दिवशी मनस्वी थंडी पडली होती. पाण्याचे बर्फ व्हायची वेळ आली होती. आनंदराव कोठे आहेत? त्यांना आहे का निवारा; आहे का पांघरुण? गावाबाहेरच्या मरीमाईच्या देवळात ते होते. ना पांघरायला; ना आंथरायला. थंडीने ते गारठून गेले. आहे का धुगधुगी? आहे का प्राण?
उजाडले. हळूहळू सूर्य वर आला. त्यालाही का थंडी वाजत होती? परंतु आता ऊब आली. लोक बाहेर पडले. गायीगुरे निघाली. पाखरे उडू लागली. कोणीतरी देवळात आले; तो मरीआईच्या पायाशी आनंदराव पडलेले. तो मनुष्य धावतच गावात गेला. सगळीकडे बातमी गेली. सारा गाव देवळाजवळ जमा झाला. कोणी हळहळत होते; कोणाचे डोळे ओले झाले होते.
इतक्यात ‘आई कोठे गेली? आई? असे म्हणत वेडा वामन आला. अकस्मात आला. त्याला ती गर्दी दिसली. तो धावत आला. "माझी आई दाखवा" तो म्हणाला.
"तुझा बाप येथे मरुन पडला आहे बघ. जरा शहाणा हो. सोड वेड’ कोणी म्हणाले.