Get it on Google Play
Download on the App Store

दुर्दैवी सीता 1

सीताचा नवरा गिरणीत होता. तीही गिरणीत काम करी. चिंचपोकळीजवळच्या एका जुनाट चाळीतील एका अंधा-या खोलीत त्यांचा चिमुकला संसार. प्रथम ती कोकणातून मोठया हौसेने आली. गावचे लोक म्हणाले, सीता, नव-याच्या रोजगारा वर चाललीस. जपून राहा मुंबईस. आता ये बाळंतपणाला. बाळंतपणाला मुलखातच यावे. सीता लाजली. ती मुंबईला आली.  कधी मुंबई तिने पाहिली नव्हती. इकडे तिकडे बघे. मुंबई पाहून तिला आश्चर्य वाटले. मुबंई कोकणचे मायपोट. प्रत्येक घरची दोनचार माणसे मुंबईला आहेत. मुबंई म्हणे कोणाची? मुबंई श्रमणा-यांची.

रामाचे सीतेवर खूप प्रेम होते. तो तिला सिनेमाला नेई. त्याने तिला राणीची बाग दाखविली, भुलेश्वर, मुंबादेवी दाखविली, बाबुलनाथ, महालक्ष्मी, हँगिंग गार्डन, सारे दाखविले. सुटटी्च्या दिवशी एकदा दोघे चौपाटीवर गेली. दोघे शिंपा गोळा करीत होती. कोणी मुले वाळूत किल्ले रचीत होती. सीता किल्ला करू लागली. रामा मदत करू लागला. असे दिवस जात होते. त्यांची ती लहानशी अंधारी खोली. तेथे प्रेमाचा प्रकाश होता.

परंतु रामाला आता निराळया लोकांची संगत लागली. तो जुगार खेळू लागला. पैसे जाऊ लागले. तुम्ही जुगार नका खेळू ती म्हणाली. मोठे मोठे खेळतात. त्यात पाप नाही. पैसे मिळतील. मुलखात कौलारू घर बांधू. तेथे राम-सीतेचा जोडा राहील. मग हसशील, खेळशील तो म्हणाला.

घर बांधतो की वनवास भोगतो, कोणाला माहीत? पगार तर पुरत नाही.

वेडी. अग, पेरल्याशिवाय उगवत नाही. पेरलेला दाणा फुकट गेला असे का म्हणशील? आधी मनुष्य गमावतो. अनुभवाने शहाणा होतो. मग गेलेले परत मिळते. तुला सोन्याने मढवीन. तुझी मुलं साहेबांच्या मुलांप्रमाणं राहतील.

आपली मीठभाकर बरी. साहेबाची ऐट आपल्याला कशाला? मुलखातले लोक आपल्यापासून दूर पळतील. तुम्ही माझं ऐका. नको जुगार गप्प बस.

तो उठून निघून गेला. ते तिरस्काराने उच्चारलेले गप्प बस शब्द तिला लागले. तिचे डोळे भरुन आले.

तू गिरणीत कामाला चल उद्यापासून. मी विचारले आहे.

मला येईल का काम?

तेथे शेकडो बाया आहेत. मनापासून काम कर. शंभर

पाऊणशे पगार मिळेल.

आणि तोही जुगारापायी जाईल.

बायकांनी चुरूचुरू बोलू नये.

सीता आज गिरणीत गेली. मुलखातल्या मोकळया हवेतून आलेली ती मुलगी. चिमुकल्या अंधा-या खोलीतही आनंदाने राहणारी ती आज गिरणीत गेली. जाताना त्याला भाकर दिलंन, स्वत:ची बांधून घेतलंन. इतर बाया कुजबुजू लागल्या. परंतु एकदोघींनी तिला काम शिकविले. सुट्टीत भाकर खायला ती गेली. जवळची चटणी, कांदा तिने जवळच्या बायांनाही दिला. ती अजून उदार होती. मोकळी होती. सायंकाळी ती दमून घरी आली. चूल पेटवून स्वयंपाक करुन ती पतीची वाट पाहत बसली. परंतु त्याचा पत्ता नाही. ती आडवी झाली. तो उशिरा आला. दार ठोठावलं त्यानं. ती उठली. तो शुद्धित नव्हता.  जेवायला चला ती म्हणाली.