Android app on Google Play

 

नगर निर्माण योजना

 

या संस्कृतीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथली विकसित नगर निर्माण योजना. हडप्पा आणि मोहेंजोदडो दोन्ही नगरांचे आपले दुर्ग होते जिथे शासक वर्गाचा परिवार राहत असे. प्रत्येक नगरात दुर्गाच्या बाहेर एक एक त्याच्यापेक्षा निम्न स्तराचे शहर होते जिथे विटांच्या घरात सामान्य लोक राहत असत. या नगर भवनांच्या बाबतीत खास गोष्ट अशी की ते एखाद्या जाळ्याप्रमाणे विणलेले होते. म्हणजे रस्ते एकमेकाला काटकोनात छेदत होते आणि नगर अनेक आयताकार भागात विभागले जात होते. ही रचना सर्व सिंधू संस्कृती वस्त्यांमध्ये लागू होत होती, मग ती वस्ती मोठी असो वा लहान. हडप्पा आणि मोहेंजोदडो मधील भवने मोठी असत. तिथली स्मारके या गोष्टीचे प्रमाण आहेत की तिथले शासक मजूर जमवणे आणि कर - संग्रहात कमालीचे कुशल होते. विटांच्या मोठमोठ्या इमारती पाहून सामान्य लोकांना देखील समजेल की हे शासक किती प्रतापी आणि प्रतिष्ठावान होते.
मोहेंजोदडो मधील आतापर्यंतचे सर्वांत प्रसिद्ध स्थळ आहे इथले विशाल सार्वजनिक स्नानगृह, ज्याचे जलाशय दुर्गाच्या तटबंदीत आहे. हे विटांच्या बांधकामाचे एक अत्यंत सुंदर असे उदाहरण आहे. हे ११.८८ मीटर लांब, ७.०१ मीटर रुंद आणि २.४३ मीटर खोल आहे. दोन्ही काठांवर तळापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. बाजूला कपडे बदलण्यासाठी खोल्या आहेत. स्नानगृहाची फरशी पक्क्या विटांची बनलेली आहे. बाजूच्या खोलीत एक मोठ्ठाली विहीर आहे जिचे पाणी काढून हौदात घातले जाई. हौदाच्या कोपऱ्यात एक आउटलेट आहे ज्यातून पाणी वाहून नाल्यात जात असे. असे मानले जाते की हे स्नानगृह धार्मिक कार्यांच्या वेळी स्नान करण्यासाठी बनवण्यात आले असावे जे भारतात पारंपारिक रूपाने धार्मिक कार्यांच्या वेळी आवश्यक राहिले आहे. मोहेंजोदडो मधील सर्वांत विशाल रचना आहे धान्य साठवण्याचे कोठार, जे ४५.७१ मीटर लांब आणि १५.२३ मीटर रुंद आहे. हडप्पाच्या दुर्गात सहा कोठारे मिळाली आहेत जी विटांच्या चौथऱ्यावर दोन पन्क्तींमध्ये उभी आहेत. प्रत्येक कोठार हे १५.२३ मीटर लांब आणि ६.०९ मीटर रुंद आहे आणि नदीपासून काही मीटर अंतरावर आहे. या सर्व एककांचे क्षेत्रफळ जवळपास ८३८.१२५ वर्ग मीटर आहे जे जवळपास मोहेन्जोदडोच्या कोठारा इतकेच आहे. हडप्पाच्या कोठारांच्या दक्षिणेला उघडी फरशी आहे आणि त्यावर दोन रंगांमध्ये विटांचे वर्तुळाकार चौथरे बनलेले आहेत. फरशीच्या भेगांमध्ये गहू आणि जवाचे दाणे मिळाले आहेत. यावरून सिद्ध होते की या चौथर्यान्वर पिकांची मळणी होत होती. हडप्पामध्ये दोन खोल्यांचे बरेक देखील मिळाले आहेत जे कदाचित मजुरांच्या राहण्यासाठी बनलेले होते. कालीबंगा मध्ये देखील नगरच्या दक्षिण भागात विटांचे चौथरे बनलेले आहेत जे कदाचित कोठारांसाठी बनवलेले असावेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे कोठार हे हडप्पा संस्कृतीचे अविभाज्य अंग होते.
हडप्पा संस्कृतीच्या नगरांत विटांचा वापर ही एक विशेष गोष्ट आहे, कारण त्याच काळात मिस्रच्या भवनांमध्ये उन्हात वाळवलेल्या विटांचाच वापर झाला होता. समकालीन मेसोपेटामियामध्ये पक्क्क्या विटांचा वापर आढळून तर येतो परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही जेवढा सिंधू संस्कृतीमध्ये आढळतो. मोहेंजोदडो मधील पाण्याचा निचरा करण्याची प्रणाली अद्भुत होती. जवळ जवळ प्रत्येक लहान किंवा मोठ्या घरात अंगण आणि स्नानगृह असायचे. कालीबंगा येथील अनेक घरांत आपापल्या विहिरी होत्या. घरातील पाणी वाहून रस्त्यापर्यंत येत असे जिथे त्यांच्या खाली नाले किंवा गटारे बांधलेली होती. ही गटारे विटा आणि दगडांच्या झाकणांनी झाकलेली असायची. रस्त्याजवळच्या या गटारांना मेनहोल देखील होती. रस्ते आणि गटारांचे अवशेष बनावलीमध्ये देखील मिळाले आहेत.